आई...
आई...
त्यागमयी मूर्ती । ममता अपार ।
जीवनाचे सार । आई सदा।।१।।
अमृताची वाणी । आई अभिमान ।
जीवनाची शान । भूवरती ।।२।।
जीवनाचे स्तोत्र । निर्मलता मनी ।
संस्काराची धनी । आई नित ।।३।।
कोमल माऊली । सौंदर्याची शान ।
संस्काराचा मान । जीवनात ।।४।।
ज्ञानाची गंगोत्री । अलौकिक मान ।
भाव स्नेहदान । शिकविती ।।५।।
सुगरण आई । कलेचा व्यासंग ।
विपुल प्रसंग । तिच्या ठायी ।।६।।
मांगल्याची मूर्ती । स्वामी सकलांंची ।
प्रेरणा मनाची । आई जणू ।।७।।
दिव्यत्वाची ज्योत । ईश्वर प्रेरित ।
शुद्ध नवनीत । आई जगी ।।८।।
माऊलीचा हस्त । सदाचारी भक्ती।
आशिर्वाद शक्ती। जगण्यास ।।९।।
सर्वांभूती प्रेम । मायेचा पाझर ।
उपकार थोर । जन्मोजन्मी ।।१०।।