Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Horror Drama

4.7  

Suresh Kulkarni

Horror Drama

केतकी

केतकी

10 mins
8.9K


सरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन मजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पांत रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसांखाली आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली... केतकी, पण होती. नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारशा ओळखी झाल्या नव्हत्या, तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा ऐकत होती. 


"मग? मग काय झालं?" पिंकीने विचारले. 

"मग, ना, मला त्या अंधाऱ्या कोपऱ्याची खूप भीती वाटू लागली!" मंजिरी सांगत होती. 

"का? तेथे काही होतं का?"

"काय माहित? मला कसं दिसणार? तिथं अंधार होता ना! पण काहीतरी डोकं-हात असल्यासारखं वाटत होतं!"

"बापरे! मग?"

"मग आईने लॅम्प लावला. त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं! मला अंधाराची खूप भीती वाटते! लहानपणापासून!" 


केतकीने नेमका धागा पकडला. सगळ्या पोरी किती उत्सुकतेने ऐकतात आहेत? मोठ्ठाले डोळे करून. या पोरींना 'भुताच्या' गोष्टी सांगितल्या तर? काय हरकत आहे? खूप फ्रेंड्स मिळतील! आत्ता आपल्याशी, फारसं कोणी बोलत नाही. काही जणी तर, त्यांच्या ग्रुपमध्येपण, येऊ देत नाहीत! आपला चांगलाच भाव वधारेल. शाळेत एकदम फेमस होऊन जावू! अन् आपल्याइतक्या भुताच्या गोष्टी, कोणाला ठाऊक असणार आहेत?


"मंजिरी, तुला अंधारात भूत बसलंय, असे वाटले असेल!" केतकीने त्यांच्या चर्चेत आपला सहभाग नोंदवला. 

"हो, असंच असेल! माझी गावाकडची आजीपण म्हणते, की अंधारात भुतं असतात!" पिंकीने केतकीला सपोर्ट केला. 

"ये, यार, व्हॉट 'भूत' मीन्स?" नकट्या ज्योत्स्नाने विचारले. ही इंग्रजी मीडियमवाली! 

"'भूत', म्हणजे ना घोस्ट!" शबरीने ज्योत्स्नाची शंका दूर केली. 

"छट! खोटं! माझी मम्मी म्हणते की भूत-बित काही नसतं! ती सगळी आपलीच इमॅजिनेशन असते!" स्नेहाने मात्र विरोधी सूर लावला. 

"हो! हो! माझे पप्पापण सेमच बोलतात!" टीना म्हणाली. 

"सगळी मोठी माणसं, मुलांना भीती वाटू नये म्हणून असेच सांगत असतात! अन् आपण मात्र अंधारात जात नाहीत! त्यांना पण भुतांची भीती वाटत असते!"

"कशावरून?" रोजीने शंका काढली. 

"अगं, तुला ठाऊक नाही. माझी काकू, तुझ्या, माझ्या मम्माच्या वयाची, चांगली मोठी, तिलाच भूत लागलं होतं! मग 'भूत' नसतं कसं म्हणायचं?" केतकीच्या या प्रश्नाने सगळ्याच जणी गप्प बसल्या. 

"बापरे! खरंच! तू पाहिलंस?" पिंकीच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हते. 

"मग? होच मुळी! मी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत, तिकडे कोकणात गेलेली होते, तेव्हा पाहिलंय!"

"म्हणजे, नक्की काय झाल्तं?" सुषमाने विचारले. 

आता केतकी सावरून बसली. तिच्या मनाप्रमाणे घडत होतं. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच होत्या. आता सारी सुत्रे तिच्याकडेच होती. 

"म्हणजे, काकूला भूत लागल्याचं, आजीनं घरात सांगितलं. कारण काकू काहीबाही बडबडायची, स्वतःलाच बोलायची. कधी हसायची तर कधी रडायची! हाती लागेल ते फेकून मारायची. एकदा तर तिने आजीला, 'मर ,म्हातारे!' म्हणून लोटाच फेकून मारला होता! 'तिला आपली माणसे आता ओळखू येत नाहीत!' आजी म्हणायची. आज्जी, बरोबरच म्हणत होती! कशी ओळखू येणार माणसे? तिच्या अंगात भूत शिरलं होतं ना? परक्या भुताला, आपली माणसे कशी ठाऊक असणार?"

"मग?" पिंकीने विचारले. 

केतकी पुढे सांगणार तोच, लंच संपल्याची बेल झाली. 

"केतकी, राहिलेलं उद्या सांग हं! उद्या असेच आणि येथेच बसुयात." पिंकीने आग्रहाची विनंती केली. केतकीने होकारार्थी मान हलवली. सगळ्याजणी आपापल्या वर्गाकडे निघाल्या.

शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे, केतकी, तिच्या पप्पांच्या स्कुटरवर बसून घरी निघाली. उद्या ग्रुपला काय काय सांगायचं, कस सांगायचं, या विचारातच ती गुंग होती. 

                                                                     ०००  


दुसरे दिवशी पिंकी, सकाळपासूनच कधी इंटरव्हल होते, याची वाट पहात होती. लंचमध्ये झटपट डब्बा खाऊन, ती कालच्या 'पायरी ग्रुप'ला सामील झाली. आज केतकीला सगळ्यांच्या मध्यभागी बसवलं होतं. 

"केतक्या, ते भूत काकूला कसं सोडून गेलं गं?" पिंकीने कालची लिंक पुन्हा ओपन केली. 

"मग, आज्जीनं एक ढेरपोट्या, दाढीवाला, हरीबाबा नावाचा मांत्रिक आणला होता." केतकीने सुरवात केली. 

"व्हॉट, 'मांत्रिक'?" त्या नकट्या ज्योत्स्नेने विचारले. 

"आग, मांत्रिक म्हणजे, ते 'घोस्ट हंटर्स'!" पुन्हा शबरीनेच तिच्या शंकेचे निरसन केले. 

"मग, न, त्या हरीबाबानं, एक हळदीचे मोठ्ठे सर्कल काढले. त्यात काकूला बळेबळेच बसवले. तो तिला सारखा विचारायचा, 'कोण आहेस तू? तुला काय पाहिजे?' पण काकू काहीच उत्तर देत नसे. नुसतंच 'हूSSS, हूSSS' करायची. मग तो चिडून, हातातल्या कडूलिंबाच्या फांदीने तिला मारायचा!!"

"व्हॉट, 'फांदी?'" ज्योसनीने पुन्हा डिस्टर्ब केलं. 

"तू गप ग 'जो'! फांदी म्हणजे 'ब्रांच'. केतकी तू सांग गं पुढे. गेलं का ते भूत?"

" काय ठाऊक? मग आम्ही सुट्ट्या संपल्याने माघारी आलो ना!"

"पण काय गं केतक्या, तू पाहिलंस का कधी भूत? तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी!" पिंकीने विचारले. 

"मी न? नकोच! तुम्ही सगळ्यांना सांगाल! मी नाही सांगत!" 

"प्रॉमिस, आपल्या या ग्रुपच्या बाहेर ही गोष्ट जाणार नाही!"

"हो! हो! कोणी नाही सांगणार!" सगळ्याजणींनी एकच कल्ला केला. 

"बरं, बाई मग सांगते! ऐका. मी दोनदा पहिली भुतं! म्हंजे आत्ता कळतंय ते भूत होतं म्हणून. पण पहात होते तेव्हा नव्हतं कळलं!"

"कधी? अन कुठं?"

" माझं आजोळपण कोकणातच आहे. रत्नागिरीपासून जवळच एक खेडेगाव. तेथे आज्जीच कौलारू घर आहे. त्या घराच्या मागच्या अंगणात, एक विहीर आहे. रहाट असलेली!"

"व्हॉट 'रहाट' मीन्स?" ज्योसनेने पुन्हा आडकाठी आणली. 

"गप बे, साली ही 'जो' नं येडचाप आहे! 'रहाट' म्हणजे, विहिरीतलं पाणी काढायचं व्हील! केतकी नको तिच्याकडे लक्ष देऊ! तू कन्टीन्यु कर!" पिंकीने ज्योसनाला झापलं. 

"रात्री मी आजीजवळ झोपलेली होते. विहरीत कोणीतरी, मोठ्ठा दगड टाकल्यावर, पाण्याचा जसा आवाज होईल ना?, तसा मला आला. मी एकदम जागी झाले. अंथरुणातून हळूच उठले. अन् खिडकीचे दार किलकिले करून बाहेर पाहिलं. तर विहिरीच्या कट्ट्यावर एक बाई, मोकळे केस सोडून बसलेली!. तेव्हड्यात आजीला जाग आली. तिने पटकन ती खिडकी लावून घेतली! तोंडावर बोट ठेवून 'बोलू नकोस!' म्हणून खूण केली. पुन्हा मला जवळ घेऊन झोपी गेली. सकाळी उठल्यावर मला तिन सांगितलं कि विहिरीवर बसली होती, ती 'हडळ!' होती!"

तेव्हड्यात इंटरव्हल संपल्याची बेल वाजली. सगळ्याजणी उठल्या. 

"व्हॉट इज हाडळ?" ज्योसनाने पिंकीला थोडे थांबवून विचारले. 

"हाडळ? ना? 'लेडी घोस्ट!', त्यापेक्षा आरसा बघ! तिथे दिसेल तुला ती!" पिंकी वैतागली. 

                                                                             ०००  


केतकी तिच्या पप्पांच्या स्कुटरवरून शाळेत आली, तर पिंकी शाळेच्या गेटजवळच उभी होती. 

"केतक्या, तू कोणाच्या स्कुटरवरून शाळेत येतेस?" पिंकीने विचारले. 

"ते न माझे पप्पा आहेत! पण का गं?"

"काही नाही. पण ते नं एकदम 'कूल' वाटतात. चार्मिंग! शारुखसारखी क्युट डिम्पल पण त्यांच्या गालावर पडते!"

"ये! असं नाही म्हणायचं त्यांना! नजर लागेल ना? पण खरंच मी खूप लकी आहे, असे पप्पा मला मिळालेत! ती डिम्पल नं आमच्या दोघात कॉमन आहे! तुला ठाऊक आहे का पिंके? ते मला न डॉक्टर करणार आहेत!"

"हाऊ स्वीट! केतक्या, मी तुझी येथे मुद्दाम वाट पहात उभी आहे. "

"का ?"

"मी आमच्या शेजारी, एक खुप्प म्हातारे आजोबा रहातात, त्यांना ते 'हाडळ!' विचारलं बरं का? ते पण तू म्हणालीस तेच म्हणाले! बाई मेली की ती 'हाडळ' होते! म्हणजे 'भुतं' असतात तर!!"

"मग? मी काय तुम्हाला खोटं सांगत होती का काय? यार, तुम्ही माझे फ्रेंड्स आहात ना? मैत्रीत कोणी खोटं बोलत का?"

प्रार्थनेची घंटा वाजली तशी, 'चल, लंचमध्ये बोलू' म्हणून, दोघी प्रार्थनेसाठी रांगेत उभ्या राहिल्या. 

                                                                        ०००  


एकंदर केतकीच्या 'भूत' कथनाने चांगलीच ग्रिप घेतली होती. तिचे फ्रेंड्सर्कल वाढत होते. श्रोतावर्ग वाढत होता. त्याचबरोबर खुन्नसपण वाढली होती. केतकी आल्याने, स्नेहाचे महत्व कमी होत होते. ती केतकीचा द्वेष करू लागली होती. तिचा ग्रुप केतकीने नकळत हायजॅक केला होता! 

आज केतकीने स्पेशल 'गोष्ट' सांगायची ठरवली होती. ठरल्यावेळी, ठरल्या ठिकाणी, म्हणजे लंच अवर्समध्ये पायऱ्यांवर सगळ्याजणी जमल्या होत्या.

"आज ना, मी तुम्हाला एक जम्माडी गम्मत सांगणार आहे. माझ्या पप्पांची या गावात बदली झाली, तेव्हा आम्ही, एका भाड्याच्या घरात राहायला आलोत. हे घर गावापासून थोडंसं दूर आहे, पण छान आहे. आजूबाजूला खूप झाडं आहेत. वडाची, पिंपळाची तर खूप आहेत. चार-दोन पडकी घरपण दूरवर आहेत. तेथे मला खेळायला खूप आवडतं. अशा पडक्या वाड्यात आणि घरात 'भुतं' असतात, असं माझी आई आज्जी, मला लहानपणी सांगायची. इतके दिवस मी नाही विश्वास ठेवला, पण गेल्या शनिवारी, हो त्या दिवशी शनी अमोश्या होती म्हणे, मला ते भूत दिसलं!" केतकीने शेवटी, कालपासून विचारपूर्वक तयार केलेला, बॉम्बगोळा टाकला. 

सगळीकडे चिडीचूप.

 

"ऑ!! म्हणजे? कसं? काय? दिसलं?" पिंकी सगळ्यात आधी भानावर आली. 

"मी त्या दिवशी, वडाच्या पारंब्याला धरून झोका खेळत होते. म्हणजे नेहमीच खेळते, आज खेळताना एक काळं मांजराचं पिल्लू माझ्या पायात आलं. मी दचकले. कारण त्याच्या तोंडाला लाल, लाल काहीतरी लागलेलं होतं!"

"रक्त!?" पिंकीचे डोळे मोठ्ठे झाले होते. 

"असेलही. पडक्या घरातला एखादा उंदीर गट्टम केला असेल. पण मी घाबरून घराकडे धूम ठोकली. तेव्हा ते पिल्लू तेथेच झाडाखाली बसलेलं होत. मी घरात आले, अन् पहाते तर काय? ते काळं पिल्लू आमच्या सोफ्यावर आरामात बसलंय! मी आईला हाक मारली, आणि ते दाखवलं. 'वेडाबाई, हे पिल्लू सकाळपासून घरातच फिरतंय! तू पाहिलेलं, काळ्या मांजराचं पिल्लू वेगळं असेल, आणि हे वेगळं आहे. आगं, दोन सारखी पिल्लं असतात की!' मी पुन्हा सोफ्यावरल्या पिल्लाकडे पाहिलं, ते तेच होतं, कारण त्याच्यापण तोंडाला रक्त लागलेलं होतं!! मी आईला पुन्हा हाक मारली, त्या मांजराच्या तोंडाला लागलेलं रक्त दाखवण्यासाठी, पण ते पिल्लू तोवर, जम्प मारून, खिडकीतून पळून गेलं! ते मांजराचं काळं पिल्लू भूत होतं!"

"केतकी! आम्ही ऐकून घेतोय म्हणून, तू फारच फेकाफेकी करायला लागली आहेस! इट्स बॅड!" स्नेहाने आज राडा करायचा पक्का निर्णय घेतला होता. 

"तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय?" केतकीने धडक स्नेहाला विचारले. 

"हो!" स्नेहा ठामपणे म्हणाली. दोघींची जुंपणार अशी ग्रुपला शंका येऊ लागली. 

"मग, या सगळ्याजणी येत्या शनिवारी, दाखवते प्रत्यक्ष 'भूत'!" केतकीपण इरेला पेटली. कसल्या येतायेत या भित्र्या पोरी! उगाच आपली खुन्नस. 

"चॅलेंज! तू 'भूत'दाखवणार?" स्नेहाने विचारले. 

"हो! चॅलेंज! तुमचेच डेरिंग आहे का?"

"ठीक! आम्ही, या येथे असलेल्या सगळ्याजणी येतोय, सॅटर्डेला! दे तुझ्या घरचा पत्ता!"

या तर खरेच यायला निघाल्यात! आता काय करावं? असे काही होईल असे केतकीला वाटलेच नव्हते. 

"अरे यार, असं काय करताय? पहा तुम्हाला भीती वाटली तर माझी जिम्मेदारी नाही!"

"तू नको त्याची काळजी करू! आम्ही आमच्याच रिस्कवर येणार! शनिवारी शाळा सुटली की आम्ही वह्या-पुस्तकं घरी ठेवून, पाच वाजता तुझ्या घरी येतो!

"बघा हं, घाबरायचं असेल तरंच या!" केतकीने शेवटचा प्रयत्न केला. पण तो दुबळा पडला. 

"अरे, जारे, भूत दाखवणारी! आता तर आम्ही येणारंच! तयारीत रहा, आणि तुझ्या 'भुता'लापण तयार ठेव!" केतकीच्या डोळ्यापुढे हात नाचवत स्नेहा म्हणाली अन् ताडताड निघून गेली. 

केतकीच्या डोळ्यात पाणी आले. हे भलतंच झालं! आता सगळंच मुसळ केरात जाणार. इतक्या दिवसांची मेहनत, ते फ्रेंडसर्कल मातीमोल होणार होतं! पण एक बरे झाले होते. या गोंधळात स्नेहा आपल्या घराचा पत्ता घ्यायला विसरली होती! आज बुधवार, तीन दिवस शाळेला बुट्टी मारली की झालं!

                                                                       ००० 

पाचवीच्या वर्गाचा क्लासटीचर सध्या सुटीवर असल्याने, रक्षिताकडे त्या वर्गाच्या क्लासटिचरचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता. 

रक्षिताने हेडमिस्ट्रेसच्या केबिनच्या दाराला नॉक केले. 

"या, या आत या!" हेडमिस्ट्रेस दातार मॅडम म्हणाल्या. 

रक्षिता आत गेली. 

"हूं, काय काढलंस रक्षिता?"

"काहीतरी तुमच्या कानावर घालायचं आहे!"

"बोल"

"माझ्या वर्गात म्हणजे, पाचवीच्या वर्गात काहीतरी गडबड आहे!"

"नेमकं काय आहे?" कपाळाला आठ्या घालत दातार मॅडमनी विचारलं. ही रक्षिता नं, पाल्हाळ लावणारी आहे. पटकन मुद्द्याचं सांगायची नाही. 

"मुली लंच अवर्समध्ये, शाळेच्या पायऱ्यांत घोळका करून काहीतरी कुजबुजत असतात."

"आगं रक्षिता, मुलींचं वाढतं वय असतं, असतील बोलत मनातलं आपसात."

"तसं नाही मॅडम, ते मी समजू शकते! पण हे वेगळंच आहे! आधी इंटरव्हलमध्ये, डब्बे खाऊन पोरी ग्राऊंडवर हुंदडायच्या, हल्ली तसं दिसत नाहिये!"

"रक्षिता, तुला नेमकं काय सुचावायचं आहे?"

"ती नवीन आलेली मुलगी, केतकी, एकटीएकटी असायची, ती आता मुलींच्या गराड्यात असते!"

"मग?"

"मी असं ऐकलंय की..."

"हे पहा रक्षिता, मला खूप कामं आहेत! तू तुझा प्रॉब्लेम सांगणार नसशील तर, तू तुझ्या वर्गावर जा! तुला फक्त दोनच मिनिटे देते, काय सांगायचं असेल ते सांगून टाक! युवर टाइम स्टार्टस नाऊ!" दातार मॅडम खरेच वैतागल्या. 

रक्षिताला फारसा फरक पडला नाही. हे तिला नेहमीचंच होतं!

"मी असं ऐकलंय की, ती केतकी, मुलींना भुताच्या गोष्टी सांगत असते आणि आपली फ्रेंड्सर्कल वाढवतीये!"

"वाढवेना, तुला काय प्रॉब्लेम आहे?"

"तसं नाही, गेल्या चार दिवसांपासून शकुंतला शाळेत आली नाही!" 

ही रक्षिता किती इरिलेव्हंट बोलतीये?

"त्याचा इथे काय संबंध?"

"आहे! शकुंतलेची आई माझी मैत्रीण आहे! मी तिला फोन करून विचारलं!"

"काय म्हणाली?"

"म्हणाली, शकू खूप घाबरली आहे! ती एकटी अजिबात रहात नाहिये! अंधाराची तिला खूप दहशत वाटत आहे! आपल्या घरात 'भूत' आहे! हा घोषा तिने लावलाय!"

दातार मॅडम आता मात्र गंभीर झाल्या. अशी भीती कोवळ्या वयात मनात घर करू लागली तर मुलीच्या भविष्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो! हे त्यांना जाणवलं.

"बापरे! असे असेल तर, प्रकरण गंभीरच आहे!"

"खरी बातमी तर पुढेच आहे! या शनिवारी, काही मुलींना तिने घरी बोलावले आहे! ती त्यांना 'भूत' दाखवणार आहे!"

"खरे की काय? मला काय वाटलंय, आपल्या शिक्षिकांपैकी कोणीतरी त्या मुलींसोबत केतकीच्या घरी जावं! तिच्या आई-वडिलांदेखत तिची समजूत काढावी.'अशी भुताची भीती दाखवत जाऊ नकोस.' हे सांगावं." दातारांनी आपला विचार मांडला. 

"मलापण असंच वाटतंय!" रक्षिता म्हणाली. 

"कोणाला बरे पाठवावं? खरेतर मीच गेले असते, पण मला नेमकं शनिवारी समीरला आणायला एअरपोर्टला जायचंय! रक्षिता तूच का नाही जात मुलींसोबत? मुली तुझ्या सहवासातल्या आहेत. तू सोबत असशील तर त्यांना, आधारही वाटेल!"

"ठीक आहे! जाते मी!" 

                                                                       ००० 

रक्षिताने मग सगळा प्लॅन ठरवला. शनिवारी शाळा सुटली की, पिंकी, टीना, शबरी, स्नेहा, सगळ्या मुलींनी आपापली दप्तरं घरी ठेवून पुन्हा शाळेत जमायचं. मग रक्षिता मॅडमच्या ओम्नी व्हॅनमधून केतकीच्या घरी जायचं. पिंकीला हे केतकीला कळवायचं होत, पण केतकीकडे मोबाईलच नव्हता! 


रक्षिताने ऑफिसमधून केतकीच्या घरचा पत्ता घेतला. मुलींना घेऊन ती केतकीच्या घरी पोहोचली. घर बैठे होते. जुने असले तरी सुस्थितीतले. आजूबाजूला एक दोन पडकी घरं होती. घराला तारेचे कम्पाऊंड होते, त्याच्या काटेरी तारा जुन्या अन् बऱ्याच जागी तुटलेल्या होत्या. 


घराच्या दाराजवळ नेमप्लेट होती. ती मात्र घराच्या मानाने तरुण वाटत होती. 

केतकर्स,

-केशव 

-कावेरी 

-केतकी. 

हेच केतकीचे घर. 

रक्षिता मॅडमनी घराची बेल वाजवली. रक्षिताच्याच वयाच्या तरुणीने दार उघडले. सात-आठ शाळेच्या मुली आणि त्यांची मास्तरीण, हे तिने तर्काने ताडले. पण या येथे कशाला आल्यात?

"कावेरी, कोण आहे गं?" घरातून पुरुषी आवाज आला. 

"केशव, अरे कुठली तरी शाळेची ट्रीप दिस्तेय!, तूच ये ना!"

कावेरीपेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठा असलेला तरुण दारात आला. कावेरी आणि केशवच्या चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह, रक्षिताला दिसत होते. 

"नमस्कार, मॅडम! काही काम होतं का?" केशवने दोन्ही हात जोडून नमस्कार करत रक्षिताला विचारले. 

"तुम्ही केतकीचे आई - बाबा का?" रक्षिताने विचारले. 

"हो. पण --- तुम्ही?"

"मी रक्षिता! केतकीची क्लासटीचर, आणि या तिच्या वर्गातील क्लासमेट आहेत!"

केशव आणि कावेरी कसलीही प्रतिक्रिया न देता, अवाक होऊन दारातल्या त्या घोळक्याकडे पहात होत्या. 

"आज नं केतकीने, आम्हाला घरी बोलावलं होतं! कोठे आहे ती? बोलावता का तिला जरा?"

कसली येतीय ती? बसली असेल कोठेतरी तोंड लपवून! खोटारडी कुठली! म्हणे 'भूत' दाखवते... स्नेहाच्या मनात येउन गेलं. 

केशव आणि कावेरी दारातून बाजूला झाले. त्यांनी रक्षिताला घरात येण्याची खूण केली. रक्षितापाठोपाठ तो मुलींचा घोळका घरात आला आणि रक्षिता जागीच खिळून उभी राहिली! समोरच्या भिंतीवर केतकीचा गालावर खळी असलेला गोड हसरा फोटो होता, आणि त्याला चंदनाचा हार घातलेला!

"तुम्हीच सांगा, कसं बोलावू केतकीला?" काळजाला घर पडणाऱ्या आवाजात केशवने रक्षिताला विचारले. 

"आम्हाला मूल नाही म्हणून, आम्ही केतकीला दत्तक घेतली होती! दोन वर्षाखाली अल्पशा आजाराने गेली! हसतंखेळतं पोर, नजरेसमोरून अजूनही हलत नाही! अनाथालयाच्या रेकॉर्डला केतकीसोबत 'हिला डॉक्टर करायचंय!' या अर्थाची चिठ्ठी होती म्हणे, इतकंच..."

रक्षिताची तर वाचाच खुंटली! मग कालपर्यंत शाळेत येणारी केतकी कोण? ती तशीच माघारी फिरली. चिडीचूप झालेल्या पोरी, कश्याबश्या गाडीत बसल्या. व्हॅन शाळेकडे परत फिरली. 

रक्षिताच्या मागच्या सीटवर बसलेल्या मुलींचा संवाद तिच्या कानावर पडत होता. 

"टीना, तुला एक गम्मत सांगू का?" पिंकी सांगत होती. 

"काय?"

"त्या घरातला माणूस केतकीचे पप्पा नव्हते! ती रोज ज्यांच्यासोबत स्कुटरवर येते, ते वेगळेच आहेत, क्युट! केतकीसारखे त्यांच्यापण गालावर डिम्पल आहे! आणि यांच्या दारात स्कुटर पण नव्हती! मी मुद्दाम पाहिलं ना!"

रक्षिताच्या अंगावर सरसरून काटा आला! म्हणजे केतकी अन् तिला शाळेत सोडायला येणारे तिचे पप्पा दोघेही.... 


पिंकी वाट पाहातीय, पण त्यानंतर केतकी कधीच शाळेत आली नाही!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror