Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Alka Jatkar

Inspirational

5.0  

Alka Jatkar

Inspirational

मैत्र

मैत्र

3 mins
1.8K


सायंकाळचे पाच वाजले आणि वीणाचे पाय लगबगीने "मैत्र" कडे धावू लागले.

मैत्र मध्ये जायला फार आवडायचे वीणाला. समवयस्क मित्रमैत्रिणाच्यात तास दोन तास एकदम मस्त जायचे तिचे. हसणे खिदळणे, आवडलेल्या पुस्तकाचे वाचन, एखाद्या गहन विषयावर चर्चा, कधी भेळ,पाणीपुरी सारखे चटक मटक हादडणे असे चालायचे सारे. दिवसभराचा सारा कंटाळा निघून जायचा तिचा. अतिशय उत्साहित मानाने परतायची ती घरी. नाहीतर दिवस खायला उठायचा तिला. घटस्फोट घेतलेल्या वीणाची एकुलती एक मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि वीणा अगदी एकटी पडली. मैत्रिणी होत्या तशा .... पण त्या साऱ्या त्यांच्या संसारात मग्न.

"मैत्र" नावाचा मस्त ग्रुप सापडला होता वीणाला. सारे साठ ते सत्तर वयाचे आणि सम विचारांचेही. काही पतिपत्नी तर काही वीणासारखे एकटे. मस्त एन्जॉय करायचे सारे. ग्रुप मध्ये कसले गॉसिप नाही कि एकमेकांची उणीदुणी काढणे नाही. खुल्या दिलाने फक्त कौतुक चालायचे एकमेकांचे. एखाद्याची गैरहजेरी लगेच जाणवायची सगळ्यांना. तातडीने फोन करून चौकशी व्हायची का आला नाही याची.

एकदा तीन दिवस झाले मोहनचा पत्ताच नाही. फोन ट्राय करून पहिला पण लागलाच नाही. सर्वांनाच काळजी वाटू लागली. पत्नी निधनानंतर एकटाच राहत होता तो. मुलगा व मुलगी अमेरिकेत स्थायिक झालेले. मोहनला काही तिथे चैन पडायचे नाही. मग इथेच एकटे राहण्याचा त्याने निर्णय घेतला होता.

काय करावे? कशी कळेल मोहनची खबरबात? सारे विचारात पडले...आणि एकदम एकाच्या लक्षात आले वीणा अगदी जवळच राहते मोहनच्या. मग घरी जाताना वीणानेच मोहनची ख्यालीखुशाली विचारावी असे ठरले.

त्यानुसार वीणा मोहनच्या घरी आली आणि पाहते तो काय मोहन तापाने फणफणलेला. एकटाच होता घरात. कामवाल्या मावशींनी सूप आणि मऊ भात करून ठेवला होता. शेजारचा वॉचमन रात्री येणार होता सोबतीला. वीणाला पाहताच मोहनला खूप बरं वाटलं. म्हणाला " वॉचमन येईपर्यंत सोबत बसशील का माझ्या? एकट्याला फार घाबरायला होत ग."

वीणाने विचार केला ... काय हरकत आहे? नाहीतरी घरी कोण वाट बघतंय माझी? दोन तास गप्पा मारत बसून राहिली वीणा आणि वॉचमन येताच म्हणाली "आता येते मी. उद्याही येईन दिवसभर. काळजी करू नको." मोहनने अगदी हसून मान डोलावली.

पुढचे सात आठ दिवस, मोहन अगदी खडखडीत बरा होईपर्यंत वीणा त्याच्याकडे जातच राहिली. ह्या सात आठ दिवसात दोघांची मैत्री अजूनच घट्ट झाली. दोघांच्या आवडीनिवडीही बऱ्याचश्या सारख्या निघाल्या. मग दोघांचे एकमेकांकडे जाणेयेणे वाढले. कधी एखाद्या नाटकाला तर कधी एखादे चित्रांचे प्रदर्शन पाहायला दोघे जाऊ लागले. एकमेकांच्या सहवासात वेळ मजेत जाऊ लागला त्यांचा.

दोघे अगदी आनंदात होते पण आजूबाजूची लोकं? त्यांना नसत्या चवकश्याच फार. दोघांची वाढलेली मैत्री ...त्यांच्या थोडीच पचनी पडतेय? लगेच कुजबुज सुरु झाली."काय म्हातारचळ लागलाय दोघांना? शोभतं का हे? आजी आजोबा झालेत आणि काय हि थेरं ? त्यापेक्षा लग्न करून एकत्र राहा म्हणावं."

घटस्फोट प्रकरणाने पोळलेल्या वीणाला आजिबात दुसरे लग्न नको होते. तर तृप्त संसारसुख उपभोगलेल्या मोहनला परत लग्न करण्याचा विचारही मनाला शिवत न्हवता. पण एकत्र राहायची कल्पना काही वाईट न्हवती. शेवटी खूप विचार करून दोघे एका निर्णयाप्रत आले. त्यांचा निर्णय पक्का होताच दोघांनी प्रथम आपल्या मुलांच्या कानावर हि बातमी घातली.

वीणाच्या मुलीने प्रथम नापसंती दर्शविली. समाज काय म्हणेल? सासरचे काय विचार करतील? या काळजीत ती पडली. खूप विचार केल्यावर तिला आईचे म्हणणे पटले व कोणी नाही तर मी तरी तुझ्या पाठीशी उभी राहीन हि ग्वाही तिने वीणाला दिली.

मोहनच्या मुलांचा प्रश्नच न्हवता.त्यांनी हा निर्णय अगदी आनंदाने स्वीकारला. एका परीने त्यांची बाबांबद्दलची काळजीच मिटली.

मग एक दिवस "मैत्र" मध्ये त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. "आमच्या मैत्रीला कसल्याही नात्याचे लेबल न लावता फक्त मित्र म्हणूनच आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे." हे ऐकताच त्यांच्या सर्व प्रगल्भ विचाराच्या सवंगड्यानी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून छानश्या पार्टीची जोरदार मागणी केली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational