विज्ञानकथा - दृष्टी
विज्ञानकथा - दृष्टी
सुलू आणि शंकर खेडेगावात राहणार जोडपं. दोघे मोलमजुरी करुन पोट भरायचे. लग्नानंतर दोन वर्षांनी सुलूच्या पोटी कन्यारत्न जन्माला आले. त्यांना खूप आनंद झाला. पण त्यांच्या आनंदावर विरजण पडल्यासारख झालं. डाॅक्टरांनी बाळाला तपासल्यावर त्यांच्या लक्षात आलं की जन्माला आलेली मुलगी अंध आहे. सुलू आणि शंकरवर आभाळ कोसळल्यासारख झालं.
मुलीच नाव त्यांनी मुद्दामुनच नेत्रा ठेवलं. ती मोठी होयला लागली तसं ती संवाद ऐकल्यावर म्हणायची ,' आई, मला का ग दिसत नाही ? मी कधीच हे जग बघू शकणार नाही का ? बाहेर फुलांचा किती छान सुगंध येतोय. ही फुले किती सुंदर असतील. मला हे सौंदर्य बघायचय. ' असं म्हणत ती रडायची. सुलूच्या डोळ्यात पण अश्रू यायचे. नेत्रा दिसायला सुंदर होती. पण या सुंदर चेहऱ्याला देवाने दृष्टी दिली नव्हती.
सुलू एका डाॅक्टरबाईंकडे घरकामाला जायची. नेत्रालापण ती जाताना बरोबर घेऊन जायची. नेत्रा कुतूहलाने अनेक प्रश्न विचारायची.
एकदा तिने डाॅक्टर बाईंना विचारले की तुम्ही उपचार करुन मला दिसू शकेल का ? डाॅक्टर बाईंना ह्या प्रश्नाने गहिवरुन आले. तिची दया आली. मग डाॅक्टर बाईंनी ठरवल की कोणी नेत्रदान करु शकता का याची चौकशी करुया. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या डाॅक्टरांना सांगून ठेवलं. पण नेत्राला आणि तिच्या आईला काही सांगितल नव्हतं.
एक दिवशी डाॅक्टर मॅडमना त्यांच्या ओळखीच्या डाॅक्टरांचा फोन आला की नेत्रदान केलेले डोळे उपलब्ध झालेत तर तुम्ही त्या मुलीला घेऊन या.
डाॅक्टर मॅडमनी सुलूला आणि नेत्राला बोलवून सांगितल की नेत्राला आता काही दिवसांतच दृष्टी मिळणार आहे. नेत्राला खूप आनंद झाला.ती टाळ्या वाजवत उड्या मारु लागली. तिने कुतुहलाने विचारले की मला दृष्टी कशी येणार. डाॅक्टर मॅडम म्हणाल्या,'अग, हा विज्ञानाचा चमत्कार आहे. एका मृत व्यक्तीचे डोळे काढून ठेवलेत. ते डोळे ऑपरेशन करुन तुला लावणार. मग तू बघू शकशील.'
सुलू पण आनंदित झाली. हा तर चमत्कारच आहे. आमचा देव नवस करुन जे करु शकला नाही ते तुमचं विज्ञान करणार आहे.
दुसर्या दिवशी शहरातल्या हाॅस्पिटलमधे सगळे गेले. तिथे शस्त्रक्रियाकरुन नेत्राला डोळे बसवले. ऑपरेशन नंतर जेव्हा नेत्राच्या डोळ्याची पट्टी सोडत होते तेव्हा तिला सगळ जग बघायची खूप उत्सुकता लागली होती. पट्टी सोडल्यावर तिने आईला बघितले आणि आनंदाने मिठी मारली. तिच्या डाॅक्टर बाईंना आणि ऑपरेशन केलेल्या डाॅक्टरांना नमस्कार केला. त्याचवेळी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सुध्दा आभार मानले.
