हळद पिवळी!! (रंग पिवळा)
हळद पिवळी!! (रंग पिवळा)
"मुलीची बाजु असुन सुद्धा एवढा तोरा ?? चला रे आल्या पावली परत निघा.नाही करायची यांची पोरगी आमच्या पोरासाठी. बसवुन ठेवा म्हणावं आयुष्य भर आपल्या पोरीला घरातच. अरे मी म्हणतो कोण करेन या पोरीशी लगीन जिचं हळदीचं अंग हाय!"
नवरदेवाच्या बापाचा मोठा आरडाओरडा चालु होता.नवरीचा बाप हात जोडून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता . नवरीची आई तर हे सर्व ऐकून चक्कर येऊन खाली पडली होती.तिला सावरण्यासाठी बायकांची एकच गर्दी जमली होती.
नवरी आपली एका कोपऱ्यात खाली मान घालून रडत होती.आलेली सर्व पाहुणे मंडळी ,नातेवाईक, सर्वांची कुजबुज सुरु होती. "चंदा च काय होणार,कोण करणार हिच्याशी लगीन."
नवरदेव मात्र एकही शब्द न बोलता घुम्या सारखा उभा होता.जणु काही त्याला लग्न करायचं आहे पण त्याच्या बापाच्या शर्ती पुर्ण झाल्यावर. चंदाच्या मैत्रिणींचा घोळका तिच्या भोवती जमला होता.त्या तिला समजावत होत्या. "अगं चंदा बरंच केलं तु लग्नाला नकार देऊन हा असला नवरा काय कामाचा?काही बोलत नाही ये तो.त्याचा बाप एवढा काही बाही बोलुन रायला तरीबी."
चंदाचा बाप शेतकरी अती साधारण परिस्थिती असुनही जसं लग्न जमलं तसं मुलाकडच्यांच्या सर्व मागण्या त्याने पुर्ण केल्या. अवाक्या बाहेर जाऊन हुंडा, सोनं,बस्ता,लग्नाचा खर्च सर्व, सर्व केलं एवढ्याने मुलाच्या बापाचे पोट भरले नाही म्हणून त्याने ऐन लग्नाच्या वेळी, भरल्या मंडपात मुलासाठी बुलेट गाडी चे फर्मान सोडले. आता मात्र चंदा शांत बसली नाही.
" मला नाही करायचे लगीन अशा भिकारड्या माणसाशी जो फक्त भिक मागुन, मागुन आपल्या गरजा पूर्ण करतो.अशा लालची लोकांच्या घरात जाऊन मी कधीबी सुखी रहायची नाय..मीच सांगते मोडलं हे लग्न चालते व्हा इथुन !"
पण आता प्रश्न होता चंदाच्या लग्नाचा आणि तेवढ्यात अमर पुढे आला. चंदाच्या बापाचा हातात हात घेऊन म्हणाला "मामा तुम्ही कायबी काळजी करू नका. मी करेल चंदाशी लगीन. हळदीच्या अंगावर चंदा तशीच राहणार नाही.मी तिला माझ्या घरची लक्ष्मी म्हणून घेऊन जाईल.तुम्ही सप्तपदी ची तयारी करा."
(वरील कथा आणि कथेतील पात्रे पुर्णपणे काल्पनिक आहेत तरी कुणाच्या आयुष्याशी मिळता जुळता प्रसंग असेल तर केवळ योगायोग समजावा कथा आवडल्यास एक लाइक करा कमेंट करा अजुन नवनवीन कथा वाचण्यासाठी नक्कीच फॉलो करा)
