हिरवा चुडा (लघुकथा)
हिरवा चुडा (लघुकथा)
चैत्र पौर्णिमे निमित्त जोशी काकुंनी आज आपल्या घरात चैत्र गौर हळदी कुंकू ठेवले होते.. जोशी काकुंची जिवाभावाची सखी सुधा ताई आपल्या धाकट्या सुनेला घेवुन हळदी कुंकवासाठी आल्या..
पण सुधा काकुंची धाकटी सून निशाला पाहुन मात्र इतर बायकांच्या भुवया उंचावल्या..
सर्वांच्या मनात एकच प्रश्न निशाला हळदी कुंकू ला निमंत्रण कुणी दिले..की,बिना बोलायची ती स्वतः आली.. सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव जोशी काकू ने बरोबर टिपले..
आणि त्यांनी आपली सुन मेघाला सर्वात आधी निशालाच हळदी कुंकू द्यायला सांगितले... तिच्या पाठोपाठ जाऊन जोशी काकुंनी निशाला हिरवा चुडा भरण्यासाठी आग्रह केला...हे ऐकुन बाजुला बसलेल्या कुलकर्णी माई तडक उभ्या राहिल्या आणि रागारागाने बोलु लागल्या..
"जोशी ताई हे काय चाललंय..मगापासुन बघते आहे..कुणी काही बोलत नाही,विचारत नाही तर तुम्ही आहात की, तुमचीच मनमानी करीत आहात..अहो आपल्या रीतीभाती सारं काही विसरल्या का?निशा च्या नवऱ्याला मरुन सहा महिने झाले नाही..तरी तुम्ही तिला इथे बोलावलं..ठिक आहे पण एका विधवा बाईला तुम्ही सवाष्णी सारखे हळदी कुंकू देताय.याला काय म्हणायचं आंम्ही.. आणि हा हिरवा चुडा.हा कसा भरु शकता तुम्ही निशाच्या हातात.. असं करणं तिच्या साठी आणि तुमच्यासाठी ही पाप आहे.. आणि अशा पापाचे वाटेकरी आंम्ही नाही होऊ शकत..एकतर निशा इथे थांबेल एकतर आंम्ही सर्व सवाष्णी..काय करायचं ते तुम्ही ठरवा."
केव्हा पासून जोशी काकुंनी सगळं निमुटपणे ऐकलं आणि एक दिर्घ श्वास घेऊन आता त्या बोलल्या
"कसं आहे ना कुलकर्णी माई हा हिरवा चुडा फक्त एक हिरवा रंग आहे.. त्यामुळे कुठल्याही रंगाच्या बांगड्या कुठलीही बाई कधीही तिच्या आवडीनुसार घालु शकते... आणि निशाच्या पतीचा अकाली मृत्यू झाला त्यात हिचा काही दोष नाही.. चोवीस वर्षांची पोरगी आहे ती.. आणि विधवा झाली म्हणून तिचे जगण्याचे अधिकार, हळदी कुंकू लावण्याचे अधिकार, हिरवा चुडा भरण्याचे अधिकार तिच्या पासुन काढुन घेणारे आपण कोण आहोत..कारण देवाला तर आपली सारी लेकरं सारखीच असतात..हा भेदभाव,या परंपरा,रीतरीवाज बनवणारे आपण माणसंच आहोत..पण हो एक बाई म्हणून आपण दुसऱ्या बाईच्या इच्छेचा सन्मान नक्कीच ठेवला पाहिजे..हो की, नाही माई? बरोबर बोलली ना मी?"
जोशी काकुंचे बोलणे सर्वांना पटले होते..आता तर कुलकर्णी माईंने स्वतः आपल्या हाताने निशाला हिरवा चुडा भरला होता.. आणि निशाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून इतर बायकांनाही समाधान वाटत होते...
