पांढरी साडी..(लघुकथा)
पांढरी साडी..(लघुकथा)
"आई ही बघ गं अबोली रंगाची साडी .किती सुंदर आहे ना,ताईचा आवडता रंग ना? जरीच्या काठाची साडी तर तिला खुपच आवडते.आपण ताईसाठी हीच साडी घेऊयात.."
लग्नाच्या साड्यांची खरेदी करण्यासाठी आलेली वीणा आपल्या आईला सांगत होती..आईने वीणाचा आनंद पाहून तेव्हा ती साडी विकत घेतली खरी पण घरी आल्यावर मात्र तिला स्पष्ट सांगितले.
"हे बघ विणु ही साडी तुला छान वाटली.म्हणुन घेतली मी.पण हो ताईला देण्याआधी थोडा विचार करावा लागेल बघ.. तिच्या सासुबाईंना या रंगाची साडी आपण त्यांच्या सुनेला दिलेली आवडेल की, नाही काहीही सांगता येणार नाही.कारण जेव्हा पासुन तुझे भाऊजी आपल्यातुन गेले आज पाच वर्षे झाली तेव्हा पासून कधीही तुझ्या ताईने या अबोली रंगाची साडी नेसलेली आपण पाहिलं नाही तिला.ठाऊक आहे ना तुला.मला तर वाटतं तिच्या सासुबाई तिला लग्नाच्या विधीतही सहभागी होऊ देणार नाही.. नेहमीप्रमाणे कोठीच्या खोलीत बसवणार की, काय मला तर बाई याचीच चिंता आहे.."
आईचे बोलणे ऐकून विणाला खुप राग आला.
"आई मग काय ताई माझ्या लग्नात सुद्धा ती पांढरी साडी नेसणार आहे का? अगं तिच्या सासर कडचे लग्न असते तर मी समजू शकले असते पण हे तर तिचं माहेर ना, नाही मला नाही चालणार माझ्या ताईने माझ्या लग्नाच्या विधीतुन बाहेर राहिलेलं..मी आधीच सांगते आहे.. आणि पांढरी साडी कशाला?असा कुठे काही कायदा आहे का की, विधवा बाईने फक्त पांढरी साडी नेसून आयुष्यभर बेरंगी आयुष्य जगायचे.."
आईला विणाचे बोलणे आणि तिच्या मनाची घालमेल कळत होती.पण तरीही ती समाजाच्या नियमांच्या बाहेर जाऊ शकणार नव्हती.ही मोठी शोकांतिका आहे..
