यास्मिन
यास्मिन


यास्मिन हिमाचल प्रदेशमधील एका छोट्याशा खेड्यात जन्माला आली. दुदैवाने ती एका अशा कुटुंबात आणि खेड्यात जन्माला आली जिथे मुलींना शिक्षणासाठी वाव तर नव्हताच , परत तिथे बालविवाहाची प्रथा पण होती. तिथे मुलींना साधारण अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा लढायला लागत. यास्मिन च्या वडीलांचा साहजिकच यास्मिन च्या शिक्षणाला विरोध होता. पण आईच्या पाठिंब्याने ती शाळेत जाऊ लागली.
यास्मिन ला शाळेत जाण्यासाठी सुद्धा खस्ता खायला लागायच्या. तिची शाळा ४ किमी वर होती. ४ किमी रोज पायी चालून यावे जावे लागत. रस्ता सुद्धा खूप खडतर होता. ती रोज सकाळी ६ ला घरातून निघत. ट्रेकिंग करत पहाड चढत तिला जावे लागे वरतून पहाडी प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करत ती जात असे. कधीकधी परत येताना धुके किंवा पाऊस लागायचा आणि तिचे वह्या पुस्तके ओले होत तेव्हा तिला धडे, घरचा अभ्यास परत करावा लागे. एवढे होऊन पण ती ज्या शाळेत शिकत होती तिथे शिक्षणाचा दर्जा चांगला नव्हता कारण तिथे तेवढे चांगले शिकलेले शिक्षक नव्हते.
तिचा सगळयात मोठा लढा होता गरीबीशी. तिच्या वडीलांचा शाळेला विरोध असल्याने तिचा शैक्षणिक खर्च वडील करत नव्हते. ती आणि तिची आई शेतात काम करत, कपडे शिवून विकत आणि पैसे जमा करत. तिचे वडील कधी शाळेत येऊन पाहात नसे त्यामुळे त्यांची ती कमी तिला चांगलीच मनाला लागत असे. तिच्या एकाकीपणामुळे आणि तिच्या आईच्या समर्थनामुळे ती आतून मजबूत बनली होती. ती स्वतः लाच अभ्यासासाठी आणि यश गाठण्यासाठी प्रोत्साहन देत. तिच्या आईचे जगणे पाहून तिने ठरवलेले की मी असे जीवन जगणार नाही, मी आयुष्य आणि भविष्य दोन्ही बदलेल. ती सतत शाळेतून पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत.
एकदा तिचे वडील काही लोकांना तिला न सांगता घेऊन आले. तिचे लग्न लावून द्यायचा त्यांचा मानस होता. ती तेव्हा जेमतेम ५वी ला असेल. तिच्या आईने तिच्या लग्नाला आणि तिचे शिक्षण थांबवायला कडाडून विरोध केला. तिच्या आईला कळलेले की तिचे वडील तिला इथे जगू देणार नाही. तिच्या आईने तिला मावशीकडे शिकायला शहरात पाठवून दिले. चांगले शिकून तिने कॉलेजात प्रवेश घेतला पण तिची परिक्षा होण्याआधी घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले. तरीही तिने शिक्षणाचा हट्ट सोडला नाही. ती शिकत होती. गरोदर असतानाही त्रास सहन करून ती शिकत होती.
तिने तिचे स्वप्न शेवटी पुर्ण केले. स्वप्न साकार झाले तिच्या महत्वकांक्षांमुळे, मेहनतीमुळे आणि आईच्या पाठिंब्याने. यास्मिन सारखा सगळ्याच मुलींना आईचा पाठिंबा नसतो. आजही काही ग्रामीण भागात मुलींना शिकवित नाही. शिकल्यामुळे विचार वृद्धी होते. जरी अजूनही कितीतरी शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात पण जिथपर्यंत मुली आणि शिक्षण यामध्ये असणारा सामाजिक आणि वैचारिक अडथळा तुटत नाही तिथपर्यंत मुली शिक्षणापासून वंचित राहतील.भविष्य हे फक्त शिक्षणामुळे उज्ज्वल होते. मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त वाचू नका तर अंमलात पण आणा. मुलींना शिक्षणाचा अधिकार द्या.