वस्त्रहरण रावणाचे
वस्त्रहरण रावणाचे


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या गणेश मंडळातर्फे गणपतीची वाजत गाजत स्थापना करण्यात आली. त्यांचा बाल गणेश मंडळ संपूर्ण गावात प्रसिद्ध होता. मंडळात सहभागी असणाऱ्या सर्व बाल गणेश भक्तांचे वय साधारणतः ८ ते १३ दरम्यान होते. सर्वजण उत्साहाने सहभागी होऊन खूप चांगली सजावट करत, छोट्या छोट्या कार्यक्रमांचे आयोजन पण करत. खरे तर त्या सर्वांच्या वयाच्या मानाने त्यांच्या बाल गणेश मंडळाचे आयोजन खूपच प्रभावी होते. यावर्षी त्यांना रामलीलेचे आयोजन करून प्रभू श्रीराम आणि रावणाचे युद्ध सादर करायचे होते. परंतु, सुरेश आणि रमेशमध्ये राम किंवा रावण कोण होणार यावरून वाद सुरू होता. त्यांच्याच वर्गातल्या आणि त्याच गल्लीत राहणाऱ्या मिनीला सीतामातेची भूमिका साकारायची होती. दोघांनाही मिनी जाम आवडायची पण मिनीला मात्र रात्रंदिवस फक्त अभ्यासच करायला आवडायचे. मिनी सीता बनणार असल्यामुळे रावण बनायला न सुरेश तयार होता न रमेश. एकाच वर्गात शिकणाऱ्या मिनीवरून सुरेश आणि रमेशचे बऱ्याच वेळेस भांडणदेखील झालेले होते. कायम अभ्यासात व्यस्त असणाऱ्या मिनीला मात्र दूर दूरपर्यंत याचा थांगपत्ता देखील नव्हता. शेवटी हो नाही करत सुरेशने प्रभू श्रीरामांची आणि रमेशने रावणाची भूमिका साकारण्याचे ठरले.
सुरेश मुळातच सालस आणि शांत वृत्तीचा मुलगा तर रमेश सतत "रावडी" रूपात वावरणारा. त्यामुळे खंरतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वांना अनुरूप भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. शेवटी सादरीकरणाचा दिवस उजाडला. बरीच प्रेक्षक मंडळी रामलीला बघण्यासाठी जमा झाली. रामायणातील एकेक पात्र प्रेक्षकांच्या समोर अवतरायला सुरुवात झाली. प्रभू श्रीराम आणि रावण दोघेही एकमेकांसमोर उभे राहिले. दोघांमध्येही शाब्दिक तसेच बाण वर्षावांचे युद्ध सुरू झाले. सीता मातेची भूमिका करणारी मिनी मात्र इथेही शांतच बसली होती. आधीचीच खुन्नस म्हणून की काय सुरेश आणि रमेश हे प्रभू श्रीराम आणि रावणाच्या भूमिकेत त्वेषाने एकमेकांविरुद्ध लढत होती. कधी कधी तर आपण भूमिकेत वावरत आहोत याचा विसर पडून दोघेही कथेत नसलेले पण आपलेच मनाचे डायलॉग बोलून जाऊ लागली. युद्ध आता अंतिम टप्प्यात आले होते. प्रभू श्रीरामांकडून रावणाचे एकेक शीर धडावेगळे करणे अपेक्षित होते. पण युद्धाला अचानक कलाटणी मिळाली आणि रावणाचे न जाणे कसे धनुष्यच मोडले. धनुष्य मोडताक्षणी रावणामधील रमेश अचानक सावध झाला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरेशच्या अंगावर चालून गेला. सुरेशने प्रसंगावधान राखत आणि प्रभु श्रीरामांच्या भूमिकेतच वावरत जवळची प्लास्टिकची तलवार उचलली आणि त्या तलवारीने रावणाचे शिर धडावेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलवारीचा घाव रावणाने चुकवला आणि घाव शिरावर बसण्याऐवजी तलवार सरळ रावणाच्या धोतरात घुसली आणि रावणाच्या भूमिकेत वावरणाऱ्या रमेशचे पूर्ण धोतरच फिटले. धोतर फिटलेल्या रावणाने रामलीला बाजूला ठेवली आणि रमेशच्या भूमिकेत शिरून सुरेशसोबत गुद्दागुद्दी सुरू केली. रमेशची ही तारांबळ बघून मिनी मात्र खळखळून हसली. सुरेशला वाटले मिनी हसली म्हणजे फसली. त्यांच्या धोतर फेडीने आणि गुद्दागुद्दीने खूपच गोंधळ झाला आणि रामलीला बाजूला राहून प्रेक्षकांमध्ये मात्र एकच हास्यकल्लोळ उडाला. स्वतःचे फिटलेले धोतर सावरत रावणाने तिथून पळ काढला आणि एकदा पळ काढल्यावर न रावण न रमेश परत आला. रामलीलाच्या आयोजनाने सुरेशला मिनीचे हास्य बघायला भेटले मात्र मध्येच रावणाचे धोतर फिटल्याने सीतेच्या रुपाने मिनीला मिळवण्याचे त्याचेसुद्धा स्वप्न भंगले.