Rahul Borde

Tragedy Inspirational Others

3.0  

Rahul Borde

Tragedy Inspirational Others

आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही

3 mins
72


                           असे म्हणतात की, आयुष्य जगताना आपण नेमके काय कमावले आणि किती माणसं जोडले, याच अचुक उत्तर हवं असेल तर एकदा सरणावर झोपून बघावे. एकदा व्यक्ती सरणावर पोहोचला की देह नष्ट होतो आणि उरतात त्या फक्त त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कार्याच्या आठवणी. सरणा वरून पुढे सुरू होतो तो फक्त आठवणींचा प्रवास. आपण आठवणींच्या रूपाने अनेकांच्या मनात जिवंत आहोत का? याच्या उत्तराने कळते की आपण आयुष्य नेमके कसे जगलो?

                           आयुष्य म्हणजे नेमके काय आणि कसे जगावे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आयुष्याची नेमकी व्याख्या करणे तसे अवघडच. व्यक्ती तेवढ्या प्रकृती आणि त्यामुळेच प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आयुष्याचे अनुभव देखील तेवढेच वेगवेगळे. प्रत्येक व्यक्तीची आयुष्याबद्दलची व्याख्या ही त्याच्या जगण्याच्या अनुभवातून साकारत जात असते. एवढंच कशाला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर देखील आयुष्याची व्याख्या बदलत राहते. या विश्वात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच स्वतःच देखील एक वेगळं विश्व असत ज्याला आयुष्य म्हणतात. आयुष्य कसं जगावं, कोणा सारख जगावं, कोणाला आदर्श मानावं या प्रश्नांची उत्तरे शोधताना प्रत्येक वेळेस आपल्याला हवी ती उत्तरे मिळतातच असे नाही. आयुष्याची साधी आणि सरळ मांडणी करायची म्हणजे ज्या वयात ज्या गोष्टींनी आनंद मिळेल त्या वयात त्या गोष्टी जरुर कराव्यात. पण आनंद मिळवताना असुरीपणा असता कामा नये एवढेच भान ठेवावे. आपला आनंद दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनता कामा नये. लहानपणी खोड्या कराव्यात, तरुणपणी तारुण्य सुलभ भावना जपाव्यात, गृहस्थाश्रमात परिवारावर प्रेम करावे आणि वार्धक्यात मार्गदर्शक व्हावे. आणि हे सर्व करत असताना आयुष्यातील ध्येयापासून विचलित होऊ नये. आयुष्याच्या या प्रत्येक टप्प्यावर जगताना आपल्या वाट्याला येणार्‍या भूमिकेशी कधी कलाकार बनून, कधी कर्तव्य म्हणून, कधी माणुसकी जिवंत ठेवत प्रामाणिकता जपली की आयुष्य सार्थकी लागते.

                            या जीवसृष्टीवर जेवढे जीव जन्माला येतात आणि जगतात त्यामध्ये मानवाचा जन्म हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो विचार करण्याची क्षमता बाळगतो. मनुष्य विचार करण्याची क्षमता बाळगतो म्हणूनच या जगावर राज्य देखील करून दाखवू शकतो. हे करत असताना मनुष्य आयुष्यभर चांगुलपणा जपतो की सोडतो यावर त्याचे व्यक्तिमत्व घडत असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काही क्षण येत असतात जिथे त्याच्या संयमाची परीक्षा होत असते. प्रत्येक जण या परीक्षेत पास होतोच असे नाही. जो पास होतो तो आयुष्य कसे जगायचे, आव्हानांना तोंड कसे द्यायचे, संकटांवर मात कशी करायची हे पण शिकतो. जीवन जगत असताना बरेच वेळेस संघर्ष अटळ असतो. जीवनात चढउतार देखील असतातच. या संघर्षातूनच आपल्या पंखाना बळ मिळते. संघर्षाने आपण कणखर बनतो आणि मनाची प्रगल्भता देखील वाढते. जीवना कडे पाहण्याची दृष्टी व्यापक बनते. जेव्हा आपण अनेक संघर्षावर मात करत पुढे जात असतो तेव्हा आपल्या जीवनातील संघर्ष अनुभव हा इतरांसाठी ‘प्रेरणा’ ठरू शकतो.

                           आयुष्याला कलाटणी देणारे सुद्धा अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात. हे प्रसंगच नवी दिशा दाखवत असतात आणि आयुष्याची व्याख्या सुद्धा लिहित असतात. जे अशा प्रसंगांना सामोरे जाऊन पुढील आयुष्य फुलवत असतात, तेच सर्व प्राणिमात्रा मध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ का आहे, हे सुध्दा सिद्ध करतात. कोणीतरी म्हणाले आहे : "आपण जे ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं तेही कधी ठरवलेलं असतच असही नाही, यालाच कदाचित आयुष्य म्हणतात".

                           आयुष्य जगताना आपण इतरांचा आदर्श अवश्य घ्यावा. इतरांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरणही करावे. मात्र आपल्या स्वतःच्या आयुष्याचा एक अध्याय स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करावा जो की इतरांसाठी अनुकरणीय असेल. आयुष्याचा एक असा अध्याय जो सरणावरील प्रवासानंतर इतरांच्या मनात जिवंत असेल. यालाच कदाचित आयुष्य असे म्हणतात!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy