Rahul Borde

Tragedy

4.2  

Rahul Borde

Tragedy

आणि चित्रगुप्त हरला

आणि चित्रगुप्त हरला

2 mins
132


असे म्हणतात की माणसाच्या आयुष्याची पाने ही चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये लिहिलेली असतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या वाट्याला तेवढंच आयुष्य येते जेवढे चित्रगुप्ताने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे. पण बहुदा एखाद्या दुःखद प्रसंगी कधीकधी तो पण माणसाच्या चांगुलपणाचे एकतर बक्षीस देऊन जात असावा किंवा माघार तरी घेत असावा.


तिच्यादेखील आयुष्याची अखेरची पाने संपत आली होती. चार दिवसाखाली तिला अचानक दवाखान्यात ऍडमिट करावे लागले होते. वय होते साधारणतः ६५. तिच्या शरीराने डॉक्टरांच्या प्रयत्नांना साथ देणे बंद केले होते. ती बोलू शकत होती, ती ऐकू पण शकत होती पण तिच्या ऐकण्या, बोलण्यात अखेरच्या श्वासांची औपचारिकता ठळकपणे जाणवत होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार व्हेंटिलेटरवर तिच्या आयुष्याचे फार तर एक किंवा दोन दिवस बाकी होते. तिचा मुलगा आणि सून असे दोघेही तिच्या जवळच बसले होते. व्हेंटिलेटरवर आईला बघून तिची नातवाचा चेहरा बघण्याची इच्छा अपुरीच राहणार हे मुलाने ओळखले.


मानवी जीवन जगताना प्रत्येकाच्या वाट्याला परिपूर्ण आयुष्य येतेच असे नाही. तिच्या आयुष्याची पाने संपण्याआधी तिच्या नशिबातदेखील नातवाचा चेहरा बघणे बहुदा लिहिलेले नसावे. व्हेंटिलेटरवर तिच्यावर होत असलेले उपचार ही मानवी प्रयत्नांची फक्त एक औपचारिकता शिल्लक राहिली होती. आणि जेव्हा मानवी प्रयत्न संपतात तेव्हा अपेक्षा उरते ती फक्त चमत्कारांची. नातवाचा चेहरा बघण्याची तिची इच्छा पूर्ण होण्यासाठी तिला जीवनदान मिळण्याच्या चमत्काराची आस मुलगा लावून होता. आईच्या जवळ बसत आणि उसने अवसान आणत मुलाने आईला खोटेच सांगितले की तू आज्जी बनणार आहेस. लवकर बरी होऊन घरी चल कारण तुला आता सुनेची काळजी घ्यायची आहे. उसने अवसान आणून केलेले खोटे विधान चमत्काराच्या रूपाने त्याच्या पथ्यावर पडणारे ठरले.


मुलाचे हे वाक्य ऐकल्यावर त्याही स्थितीत तिच्या चेहऱ्यावर एक आनंदाची भावना उमटलेली दिसली. त्याच्या एका वाक्याने मुलाचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडण्याएवढे बळ तिला नक्कीच मिळाले होते. व्हेंटिलेटरवर झोपूनच आपल्या होणाऱ्या नातवाचे चित्र ती मनोमन रेखाटते आहे, असे वाटत होते. तिच्या अखेरच्या क्षणी चेहऱ्यावर दिसणारा थकवा आनंदात परावर्तित झालेला दिसत होता. आजारातून बरी होण्याची इच्छाशक्ती जागृत झालेल्या तिने दोनच दिवस आयुष्य उरल्याचा डॉक्टरांचा अंदाज खोटा ठरवला. शरीर उपचारांना साथ देत नव्हते पण मन मात्र अजून जगण्याची इच्छा वारंवार व्यक्त करत होते. तिच्या शरीर आणि मनातील संघर्षाने तिला चार दिवसांचे वाढीव आयुष्य मिळवून दिले.


चार दिवसानंतर तिची प्राणज्योत मावळली पण जाता जाता आपण आज्जी होणार हा सुखद धक्का ती सोबत घेऊन गेली. तिच्या अखेरच्या क्षणी ती आज्जी होणार असल्याचे मुलाने केलेले विधान भलेही खोटे असेल पण तिला चार दिवसाचे मिळालेले जास्तीचे आयुष्य, आज्जी होणार याचा मिळालेला सुखद धक्का हे कदाचित तिच्या चांगुलपणाचे तिला मिळालेले बक्षीस होते. आयुष्यात वाढलेले हे चार दिवस चित्रगुप्ताच्या डायरीतील नक्कीच नव्हते. अखेरच्या क्षणी तिच्या आयुष्यातील चार दिवस वाढवणारा चमत्कार एक तर तिच्या इच्छाशक्तीची जीत होती किंवा चित्रगुप्ताची हार.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy