शांताबाईस पत्र
शांताबाईस पत्र


आदरणीय शांताबाई,
आदरणीयच लिहितो कारण प्रिय लिहिलेले बायकोला आवडणार नाही आणि लिहिले तर बायको हे पत्र न वाचताच तुमच्या पर्यंत पोहोचू सुद्धा देणार नाही. पत्रास कारण की कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन महिन्यापासून कार्यस्थळी म्हणजेच आमच्या घरात जाणवणारी तुमची अनुपस्थिती. तुमची अनुपस्थिती ही स्वाभाविक आणि समजण्या सारखीच आहे. पण तुम्हाला तर माहितच आहे कि "शो मस्ट गो ऑन". ऑफिसमध्ये एखादा सहकारी अनुपस्थित असेल तर त्याचे काम कोणालातरी पार पाडावेच लागते. याच नियमाप्रमाणे शांताबाई नसल्या तरी घरातील कोणाला तरी शांताबाई चे रूप धारण करणे भाग आहे. माझ्या बायकोने तुमचे रूप धारण करून धुनी, भांडी, झाडलोट ही सर्व कामे हिरारीने करून दाखवून तुमची कुठलीही कमी जाणवू दिली नाही. पण हे वाढीव काम करताना तिला कधी कधी ताण यायचा आणि हा ताण तुमचे काम खरेच किती कष्टाचे आहेत याची जाणीव पण करून द्यायचा. या गोष्टीची मला आधी कधीच जाणीव झाली नाही कारण मी तुमच्याशी संभाषण करण्याच्या कधी भानगडीतच पडलो नाही. बायकोचे कष्ट बघून माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण झाला आणि तुमच्या शांताबाई नावाचा आदर मी जसा आहे तसा बायकोला वाहिला. बहुदा इथेच माझा सगळ्यात मोठा घोळ झाला आणि तुमच्या कामाचा व्याप बायकोने माझ्या पाठीमागे लावला. तिला गरजेनुसार शांताबाई बनणे मान्य होते पण शांताबाई नावाने आदराणे संबोधने मात्र मान्य नव्हते. शांताबाई नावाने तिचा इगो फारच दुखावला आणि तिने चक्क मला एक दिवसाचा उपवाससुद्धा घडवला. तुमच्या अनुपस्थितीने आणि तिच्या असहकाराणे घराची पार कचराकुंडी केली आणि शांताबाई नावाची फ्रॅंचाईजी मला हातात घ्यावी लागली. शांताबाई चे महत्त्व किती हे मला त्या दिवशी कळाले. तुमचे काम एकच दिवस केल्यानंतर मला हे पत्र लिहायला भाग पाडले. धुणी, भांडी आणि झाडलोट ही कामे प्रथम दर्जाची की दुय्यम दर्जाची असा भेदभाव मी कधीच करणार नाही कारण तुमची कामे स्वछता निर्माण करणारी आहेत एव्हढे मात्र नक्की. तुमच महत्त्व आणि महात्म्य गेल्या दोन महिन्यात फार तीव्रतेने जाणवले. काम कसेही असो पण तुमच्या उपस्थिती पेक्षा अनुपस्थितीने तुमचे महत्त्व जास्त अधोरेखित केले. घराबाहेरील स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांसाठी आपण थाळी आणि टाळी वाजवून आधीच कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण घरातील स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या शांताबाई साठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला या पत्राने निर्माण करून दिली आहे. असो...आता पत्र लिहिणे थांबवतो आणि आपल्या आजपर्यंतच्या योगदानासाठी परत एकदा कृतज्ञता व्यक्त करून आपली रजा घेतो. पत्र कोणी लिहिले यापेक्षा पत्रातील कृतज्ञतेचा भाव समजून घ्यावा आणि लिहिणारा चेहरा कधीच न शोधावा.
.
आपलाच,
तीन फुल्या आणि तीन बदाम
ताजा कलम : या पत्रातील सर्व पात्रे पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा