विशीतल प्रेम पुन्हा चाळीशीत
विशीतल प्रेम पुन्हा चाळीशीत
आता वयाची चाळीशी गाठली होती त्याने. जॉब आणि कुटुंब हेच विश्व होते त्याचे. एक चार वर्षाचा मुलगा होता त्याला. मित्रांचा अधून मधून संपर्क व्हायचा फोनवर. जॉब आणि कुटुंबाच्या कामातून फारसा कधी निवांत वेळ भेटत नसे त्याला. त्या दिवशी रविवार होता. बायको मुलासह माहेरी गेली होती. सुट्टीचा दिवस असल्याने तो निवांतपणे मराठी चित्रपट "ती सध्या काय करते" टीव्ही वर बघत बसला होता. हल्ली तो चित्रपट सुद्धा टीव्हीवरच बघायचा. “ती सध्या काय करते” चित्रपटाने त्याला त्याच्या कॉलेज जीवनातील भूतकाळात डोकावायला भाग पाडले.
अनायासे बायको माहेरी गेलेली होतीच. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होऊन आता जवळपास १८ वर्ष पूर्ण झाली होती. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या त्या सर्वजणी सध्या काय करतात याची सोशल मीडियावर त्याच्याकडून तपासणी सुरू झाली. पण खरे सांगायचे तर त्या सर्वजणीमध्ये विशेषतः त्याला पण खास करून “ती” सध्या काय करते हे शोधायचे होते. म्हणतात ना “गोपिया आनी और जानी है पर राधा तो मन की रानी है.” तीच राधा जिच्याशी त्याला भरभरून बोलायची इच्छा व्हायची पण ती समोर येताच बोलती बंद व्हायची. गेल्या अठरा वर्षात दोघांचा एकमेकांशी फार काही संपर्क नव्हता. ती एका कंपनीमध्ये जॉब करते एवढीच माहिती त्याच्या जवळ होती.
काही दिवसाखाली सोशल मीडियावर त्यांच्या कॉलेजमधील बॅचचा ग्रुप तयार झाल्यावर त्या दोघांनाही ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले होते. ग्रुप तयार झाल्यावर तिच्याशी संपर्क साधण्याची त्याला उत्तम संधी होती पण आता लग्न झालेले असल्यामुळे त्याने परत एकदा फोन करण्याची हिम्मत दाखवू शकला नाही. खरेतर कॉलेजमध्ये असताना देखील तिच्याशी भरभरून बोलायचे असताना तो ओठाने कमी आणि डोळ्यानेच जास्त बोलत राहिला. दोघांमध्ये ओठांचा कमी आणि डोळ्यांचा संवाद जास्त होता. त्यामुळे कॉलेजच्या दिवसातील ते जे काही नाते होते त्या नात्याला मैत्रीचे किंवा प्रेमाचे एक ठराविक असे नाव नव्हते. पण मित्रांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या परस्परच घोषणा केलेले कॉलेजच्या दिवसातील ते नवरा-बायको होते. मित्रांच्या दृष्टीने ते काहीही का असेना पण तिच्या मनात काय होते हे त्याला कधी कळले नाही आणि याच्या मनात काय होते हे तिला देखील कधी कळले नाही.
इंजिनिअरिंगची चार वर्षे पूर्ण झाली आणि पुढे दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाली. आज १८ वर्षानंतर मात्र त्याचे मन उधाण वाऱ्याचे झाले होते, ऊन/पावसाने भिजून गेले होते, बेभान होऊन गहिवरून पण आले होते. आज परत एकदा फोनवरून संपर्क साधून ती सध्या काय करते हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. पण ती सध्या काय करते यापेक्षाही अचानक फोन केल्यावर ती नेमकी काय करेल याचे तो चिंतन करत बसला होता. हिम्मत करून त्याने तिला फोन केला आणि अनपेक्षितपणे फोन उचलल्यानंतर याने काही बोलन्या आधीच तिकडून गोड आवाजात याच्या नावाचा उच्चार झाला. म्हणजे याचा नंबर तिच्याकडे सेव्ह होताच आणि याचा फोन आल्यानंतर तिला आनंद देखील झालेला होता. चाळिशीतल्या दैनंदिन जीवनाची एकमेकांकडून विचारपुस झाल्यानंतर संभाषणाने अलगदपणे कॉलेजच्या आठवणींमध्ये प्रवेश केला.
कॉलेजच्या आठवणीमध्ये रमताना आज ते चाळिशीचे नव्हे तर विशीचे बनून संवाद साधत होते. पण विशीतल्या भावना व्यक्त करायला चाळिशी गाठावी लागली हे मात्र खरे. मनात जे काही होते ते सरळपणे व्यक्त करण्यापेक्षा कोड्यात बोलण्याची दोघांची सवय आजही बदललेली नव्हती. काही भावना असतातच अशा की त्या व्यक्तही करता येत नाही आणि लपवताही येत नाही. कॉलेजच्या चार वर्षात त्यांच्या नात्याचं न सुटलेलं कोडं खरंतर आजही त्यांच्या संभाषणानंतर तसंच अनुत्तरीत होतं पण ते संभाषण इथून पुढे चांगले मित्र बनून एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे वचन देऊन गेले. संभाषण संपले. फोन ठेवला आणि तो कॉलेजच्या आठवणीत हरवून मनातल्या मनात तिच्यासाठी एक गाणं गाऊ लागला.
तुमसे मिलना बाते करना बडा अच्छा लगता है
क्या है ये? क्यूँ है ये?
हा मगर जो भी है बडा अच्छा लगता है.
हेच गाणं ती पण गुणगुणत असेल का??