Rahul Borde

Others

4.5  

Rahul Borde

Others

काकस्पर्श

काकस्पर्श

3 mins
948


मृत्यू ही या जगातील एकमेव शाश्वत आणि सत्य गोष्ट मानल्या जाते. तिचादेखील दहा दिवसाखाली अचानकपणे दुर्दैवी मृत्यू झाला होता. वय होते साधारण ६० वर्ष. मृत्यूआधी फार कुठला गंभीर आजारदेखील नव्हता. पण काळ जेव्हा येतो तेव्हा वेळ थोडीच सांगून येतो. काळ एखाद्यावर अचानक घाला घालताना हे तपासत बसत नाही की त्या व्यक्तीचे आयुष्यातील काही कार्य बाकी राहिले आहेत का? तिच्या बाबतीत देखील असेच घडले होते. काही कौटुंबिक जिम्मेदाऱ्या तिच्या खांद्यावर होत्या पण त्या पूर्ण होण्याआधीच तिला काळाचे बोलावणे आले होते. मृत्युसमयी वय वर्ष ६० असल्या कारणाने खरेतर हे तिचे नातवांना अंगाखांद्यावर खेळवण्याचे दिवस होते. पण बहुदा हे सुख तिच्या नशिबात नसावे. तिच्या अखेरच्या काही वर्षात नवऱ्याच्या आजारपणामुळे कुटुंबप्रमुखाची भूमिका खऱ्या अर्थाने तिच्या खांद्यावर येऊन पडली होती. मुलांचे शिक्षण, लग्न, संसाराच्या निर्णयांची जिम्मेदारी तिच्यावर येऊन ठेपली होती. कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेताना बरेच वेळेस तिची दमछाक होत होती. तिला मुख्य चिंता होती ती मुलांच्या लग्नाची. दिवस पुढे सरकत होते पण लग्नाचा योग येत नव्हता. ही चिंता तिला स्वस्थपणे जगू देत नव्हती.


नवऱ्याच्या आजारपणामुळे ही जिम्मेदारी आपल्यालाच पार पाडावी लागणार आहे हे ती मनोमन जाणून होती. वरवर तिच्या चेहऱ्यावर खूप खंबीरपणा जरी दिसत असला तरीही चिंता तिच्या मनाला आणि शरीराला आतून पोखरत चालली होती. आणि चिंता ही चिता समान असते. या चिंतेमधून निर्माण झालेल्या तणावाने तिला हॉस्पिटलच्या बेडपर्यंत नेऊन पोहोचवले होते. दहा दिवसाखाली त्या हॉस्पिटलच्या बेडवर लवकर ठीक होऊन घरी परतण्याच्या दृष्टीने आराम करताना कधी काळाचे बोलावणे आले हे तिलादेखील कळाले नाही. देवाने तिच्या नकळतच तिला या सर्व चिंतेतून मुक्त केले होते.

 

        आज दहाव्या दिवशी तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी घाटावर तिच्या मुलांकडून दशक्रिया विधी सुरू होते. दशक्रिया विधीमध्ये एक विधी हा पिंडदानाचा असतो. या विधीमध्ये भाताचा गोळा तयार करून तो कावळ्या समोर ठेवला जातो. हिंदू संस्कृतीमध्ये या विधीबद्दल अशी मान्यता आहे की जर कावळ्याने त्या पिंडाला स्पर्श केला तर मृत व्यक्तीची कुठलीही इच्छा मागे शिल्लक उरली नाहीये. तिची मुले हे जाणून होती की आईच्या हयातीत दुर्दैवाने त्यांच्या लग्नाचा प्रश्न सुटलेला नव्हता. तिच्या मृत्यूनंतर आणि वडिलांच्या आजारामुळे हा प्रश्न पुढे अजून जटिल बनणार होता. यामुळे पिंडदान करताना काकस्पर्श होणे अशक्य आहे हे ती मुले जाणून होती. पण चमत्कारिकरित्या पिंडाला आज लगेच काक स्पर्श झाला होता. त्या पिंड दानातील काकस्पर्शाने तिच्या हयातीत जेवढे प्रश्न निर्माण केले नव्हते तेवढे तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्नांनी मनात काहूर निर्माण केले होते. तिच्या हयातीत मुलांचे लग्न व्हावे ही इच्छा पूर्ण झाली नसतानाही काकस्पर्श झाला कसा? हिंदू संस्कृतीमध्ये पिंडदान आणि काकस्पर्श या गोष्टीला जी मान्यता आहे ती श्रद्धा म्हणायची की अंधश्रद्धा? आपल्याला काळाचे बोलावणे आले आहे हे ओळखून आपल्या हयातीत मुलांच्या लग्नाचा प्रश्न सुटणार नाही म्हणून हताशपणे तिने इच्छांचा त्याग केला होता का? एखाद्या व्यक्तीने नैराश्यातून काही इच्छांचा त्याग केला तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काकस्पर्श होऊ शकतो का? या प्रश्नांवर कितीही काथ्याकूट केले तरी कदाचित कधीच उत्तरे मिळणार नाहीत. काळाच्या ओघात हे प्रश्न कदाचित कायमस्वरूपी अनुत्तरित राहतील. 



        एखाद्या व्यक्तीच्या हयातीतील इच्छापूर्तीला त्याच्या मृत्यूनंतर हिंदू संस्कृतीच्या मान्यतेनुसार पिंडदानाच्या विधीशी जोडून बघताना प्रत्येकाच्या भावभावना वेगवेगळ्या असू शकतात. पण हे पण तेवढेच खरे वाटते की काही प्रश्नांची सोडवणूक ही आपल्या नाही तर नियतीच्या इच्छेनुसार होत असते.


Rate this content
Log in