STORYMIRROR

Niranjan Niranjan

Comedy

4  

Niranjan Niranjan

Comedy

वर्क फ्रॉम ऑफिस

वर्क फ्रॉम ऑफिस

7 mins
24.3K


ब्रेकिंग बॅडच्या पाचव्या सिझनचा सहावा एपिसोड पाहता पाहता माझं ‘वर्क फ्रॉम होम’ चालू असताना फोन वाजला तसा माझा मुड ऑफ झाला. फोन माझ्या बॉसचा होता. “काय कटकट आहे” असं म्हणतच मी फोन कानाला लावला. “एप्रिलचा रिपोर्ट तू सकाळी पाठवणार होतास. अजून तुझा मेल नाही आला. आपल्याला पगार काम करायसाठी मिळतो रे. झोपा काढायसाठी नाही मिळत.” बॉस खोचकपणे म्हणाला. मला काय बोलावं तेच सुचेना. शेवटी मी कसाबसा बोललो, “सर रिपोर्ट तयार आहे. जरा भांडी घासत होतो. घासून झाली की लगेच मेल करतो.” समोरून शिव्या ऐकायची मनाची तयारी मी केव्हाच केली होती. पण झालं उलटंच. माझा बॉस अगदी शांतपणे म्हणाला, “अरे वा! माझी पण आत्ताच झाली भांडी घासून. भांडी घासून झाली की मात्र लगेच पाठव हं रिपोर्ट. आणि उद्यापासून आपलं ऑफिस पुन्हा सुरू होतय. उद्या सकाळी सात वाजता ये ऑफिसात.” बॉसच्या शेवटच्या वाक्याने माझी झोपच उडाली. पण आता झोप उडून चालणार नव्हती कारण मला उद्या सकाळी सात वाजताच ऑफिसात पोहोचायचं होतं.

रात्री झोपताना मी पहाटे साडेपाच पासून पाच मिनिटांच्या अंतराने पाच अलार्म लावले. पहाटे पहिल्याच अलार्मने मला जाग आली. पण मी नेहमीप्रमाणे अलार्म ‘स्नुझ’ करून डोळे मिटले. सलग पाचव्यांदा अलार्म स्नुझ केल्यावर मी महत्प्रयासाने अंगावरचं पांघरूण बाजूला केलं. 

आवरून झाल्यावर मी घरातून निघणार होतो. तेवढ्यात मला मास्कची आठवण झाली. बेडरूममध्ये कपड्यांच्या ढिगाऱ्यात पडलेला मळकट मास्क उचलून मी नाकाला लावून घरातून बाहेर पडणार होतो इतक्यात माझं लक्ष भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडरकडे गेलं. आज रविवार आहे हे पाहून मला हायसं वाटलं. पण बॉसचे शब्द आठवताच मनातला आनंद ओसरला. पण तरीही बॉस कडून सांगण्यात चूक झाली असेल. सोमवारी ऑफिसला ये असं म्हणायच्या ऐवजी तो चुकून उद्या ऑफिसला ये असं म्हणाला असेल असा सकारात्मक विचार करून मी बॉसला फोन लावला. “इथून पुढे रविवारीही वर्किंग असणार आहे. आणि तू अजून निघाला नाहीस का घरातून? लवकर ऑफिसात ये. एम. डी सोबत मिटिंग आहे.” असे म्हणून बॉसने माझं शंकानिरसन केलं व हृदयावर दगड ठेऊन मी घरातून एकदाचा निघालो.

ऑफिसच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचलो तर सिक्युरिटीवाल्याने आडवलं. माझ्या नाकावरून घसरून ओठांवर आलेल्या मास्ककडे पाहून, “साहेब मास्कची दोरी लूज झालीय. नवीन मास्क घ्या.” असा फुकटचा पुणेरी सल्ला सिक्युरिटीवाल्याने मला दिला. मी त्याला उत्तर देणार होतो तेवढ्यात त्याच्या हातातल्या उष्मांकमापकयंत्राकडे माझी नजर गेली व माझं उत्तर माझ्या घशातच अडकलं. त्या यंत्राकडे पाहताच आपलं टेम्परेचर जास्त असेल तर? या भीतीनेच अंगातलं टेम्परेचर वाढलं. सिक्युरिटीवाल्याने यंत्र काहिक्षण माझ्या कपाळासमोर धरलं व तो यंत्रावरचे आकडे पाहू लागला. काहीवेळ त्या आकड्यांकडे एकटक पाहून त्याने मला परवानगी दिली व माझा जीव भांड्यात पडला. मी गाडी पार्क करून लिफ्टमधून वर गेलो. 

समोरच्या काउन्टरमागे रिसेप्शनिस्ट बसली होती. बाजूला एक लोखंडी स्टँड ठेवला होता. त्या स्टँडवर सॅनिटाइझरची एक बाटली ठेवली होती. रिसेप्शनिस्टने त्या स्टँडकडे बोट दाखवून मला सॅनिटायझरने हात धुवायला सांगितलं. पण तो स्टँड कसा वापरायचा तेच मला कळेना. बराच वेळ मी त्या स्टँडकडे पाहत होतो. शेवटी रिसेप्शनिस्टने मला त्या स्टँडखालील पॅडलवर पाय प्रेस करायला सांगितलं. मी त्या पॅडलवर पाय प्रेस करताच सॅनिटायझरची पिचकारी थेट माझ्या शर्टवर उडाली. माझ्या ओल्या शर्टकडे पाहून रिसेप्शनिस्ट हसली पण मी तिच्याकडे पाहताच तिने तिचं हसू आवरतं घेतलं. या पूर्वीही ती एकदा माझ्याकडे पाहून असच खोचकपणे हसली होती. एकदा घरातून निघायला उशीर झाला तेव्हा मी गडबडीत पायात स्लीपर घालूनच ऑफिसला आलो होतो. तेव्हा माझ्या आवताराकडे पाहून ती असच हसली होती. पण काहाही असो हसली की ती फार छान दिसते.

शर्टवर उडालेलं सॅनिटायझर हातानेच पुसत मी ऑफिसात प्रवेश केला. सगळ्यांना हाय हॅलो करून झाल्यावर मी माझ्या डेस्कसमोर येऊन बसलो. मी बॅगेतून लॅपटॉप काढून डेस्कवर ठेवला. लॅपटॉप ऑन करून मी वॉशरुमध्ये जायला उठलो तितक्यात डेस्कवरचा फोन वाजला. मी फोन कानाला लावला. “इन माय केबिन इन फाईव्ह मिनिटस.” एवढं एकच वाक्य बोलून बॉसने फोन ठेवला. खरंतर बॉसचं केबिन माझ्या समोरच होतं. पण बॉसला फोनवर बोलायची हौस दांडगी.

मी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो. बॉसच्या केबिनमध्ये जाताच माझी नजर बॉसच्या अजूनच वाढलेल्या पोटाकडे गेलं आणि काहीही कारण नसताना ‘पेन्सिल जर बॉसच्या पोटावर दाबली तर किती लांब उडेल’ असा विचार माझ्या डोक्यात डोकावला. आलेलं हसू कसंबसं आवरत मी बॉसच्या टेबलसमोर उभारलो. “काय रे किती केस वाढवलेस. नुसतं जंगल झालय डोक्याचं.” माझ्या वाढलेल्या केसांकडे पाहून बॉस म्हणाला. त्याच्या दुष्काळी डोक्याकडे माझी नजर जाताच मला माझ्या डोक्यावरच्या जंगलाकडे पाहून त्याला एवढा राग का आला ते समजलं. मी काही न बोलता नुसता हसलो. पुढचा अर्धा तास बॉसने मी काल पाठवलेल्या रिपोर्टमधल्या चुकांचा पाढा वाचून दाखवला आणि पुढची दहा मिनिटे त्याने वर्क फ्रॉम होमचा माझ्यासारखे कर्मचारी कसा गैरफायदा घेतात हे सांगण्यात घालवली. शेवटी त्याने “पुढच्या पंधरा मिनिटात माझ्

याकडे रिपार्ट पोहोचला पाहिजे” अशी तंबी देऊन मला बाहेर पिटाळलं.

मी लगेच कामाला लागलो व चौदा मिनिट चाळीस सेकंदानी सुधारित रिपोर्ट बॉसला मेल केला. मेल केल्यावर मी सहजच आजूबाजूला नजर फिरवली तर बडबड्या विकी माझ्या दिशेने चालत येताना दिसला. त्याला पाहताच मी फार ‘बिझी’ आहे असं दाखवण्यासाठी मी लॅपटॉपवर तीन चार एक्सेल फाईलस उघडल्या. तो माझ्यापाशी येऊन म्हणाला, “कामात आहेस का?” मी नाही म्हणीन अशी त्याला अपेक्षा होती पण मी “हो रे फार काम आहे.” असे म्हणताच तो थोडा निराश झाला. पण बडबडया विकी एवढ्यात हार मानणाऱ्यातला नव्हता. तो बाजूच्या खुर्चीवर बसून माझ्या लॅपटॉपच्या स्क्रिनकडे पाहू लागला. आता मात्र माझा नाईलाज झाला. मी समोरच्या एक्सेल शीटमधले एकदोन फॉर्म्युले उगाचच बद्दले आणि काहीतरी बोलायचं म्हणून विकिकडे पाहून म्हणालो, “मग विकिसाहेब काय केलं लॉकडाऊन मध्ये?” मी विचारायची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे विकीने त्याने पाहिलेल्या मूवीझ व सिरीजची लिस्टच वाचायला सुरुवात केली. ही लिस्ट संपताच विकी लॉकडाऊनच्या काळात त्याने कोणते कणते पदार्थ बनवले ते सांगू लागला. त्याने काय काय बनवलं हे जाणून घेण्यात मला काडीभरही रस नव्हता. मी नुसती मुंडी हलवत होतो. माझ्या डेस्कवरचा फोन वाजताच विकीच्या तोंडाचा पट्टा थांबला तसा मी सुटकेचा निश्वास टाकला व फोन कानाला लावला. “दहा मिनिटात मिटिंग रूममध्ये ये.” एवढे बोलून बॉसने फोन ठेवला. मला मिटिंग हा प्रकार अज्जिबात आवडत नाही. एकतर नेमकं मीटिंग चालू असताना मला प्रचंड झोप येते. आणि झोप नाही आली तर नेमका एखादा जोक आठवून हसू येतं.

बरोबर नऊ मिनिटे दहा सेकंदानी मी ओठांवर आलेली जांभई आवरत लॅपटॉप उचलला व मिटिंग रूममध्ये गेलो. समोरच्या खुर्चीवर बॉस बसला होता. लॅपटॉपकडे पाहत तो काहीतरी टाइप करत होता. त्याच्या बाजूला माझे दोन सहकारी बसले होते. थोड्यावेळाने आमच्या कंपनीच्या एमडीने मिटिंग रूममध्ये प्रवेश केला. या माणसाला मी फॉर्मल कपड्यात कधीच पाहिलेलं नाही. आजही त्याने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट व निळी डेनिम जीन्स घातली होती. आत येताच एमडी साहेब त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले. त्यांनी बोलायला सुरुवात केली. कोरोनामुळे कंपनीला किती नुकसान झालय. तरीही कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना पगार देऊन कसे उपकार केलेत वगैरे वगैरे रडगाणं चालू होतं. नेहमी प्रमाणेच मला प्रचंड झोप येत होती. बॉस नेमका समोरच बसल्यामुळे श्वासागणिक वारंवार हलणाऱ्या त्याच्या त्या तुळतुळीत पोटाकडे माझं लक्ष जात होतं. मी मनोमनच एक पेन्सिल बॉसच्या पोटावर दाबली आणि नुसत्या विचारानेच मला हसू आलं. मला हसताना पाहून सगळे माझ्याकडे पाहू लागले. बॉसचा चेहेरा तर रागाने लाल झाला होता. त्याच्याकडे पाहतच मी हसायचा थांबलो. पण आमच्या एमडीनेच मला वाचवलं. जणू काही झालंच नाही अशा आवेशात ते पुढे बोलू लागले. 

मिटिंग संपताच बॉसने मला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. आता आपलं काही खर नाही हे मला कळून चुकलं. ऑफिस मॅनर्सबद्दल त्याने मला बराच वेळ लेक्चर दिलं. आता माझं डोकं जोरात दुखत होतं. भूकेने पोटातले कावळे ओरडत होते. शेवटी एकदाचं बॉसचं लेक्चर संपलं व “या पुढे असं मिटिंग चालू असताना हसणार नाही” अस वचन बॉसला देऊन मी बाहेर आलो.

आता जेवायची वेळ झाली होती. माझ्या सहकाऱ्यांसोबत मी कॅन्टीनमध्ये आलो. “कोणती भाजी आहे रे?” काउंटरवरच्या पोऱ्याला मी विचारलं तसा तो म्हणाला, “पतले छोले.” त्याला “पातळ छोले” असं म्हणायचं आहे हे मला ताटात वाढलेल्या त्या पांचट भाजीकडे पाहून समजलं. मी ताट उचललं व टेबलवर ठेवून जेवणाला सुरुवात केली. पतले छोलेत मला मोजून तीन छोले सापडले. जेवण होताच अर्धवट भरलेल्या पोटावर एकदा हात फिरवून मी उठलो व नाखुषीनेच साठ रुपये त्या पोऱ्याच्या हातावर टेकवले.

जेवण करून मी पुन्हा ऑफिसात आलो तेव्हा फार झोप येत होती. आजचा दिवस कधीएकदा संपतोय असं मला झालं होतं. मी लॅपटॉप पुन्हा सुरू केला व मेल चेक करायला आउटलूक ओपन केलं. दोनच मिनिटांपूर्वी एच.आर कडून एक मेल आला होता. मी मेल ओपन केला व वाचू लागलो. मेल वाचून झाला तेव्हा माझा आनंद गगनात मावेना. बाजूच्या ऑफिस मध्ये एकजण कोरोना पोसिटीव्ह सापडल्यामुळे बिल्डिंग त्वरित रिकामी करायला सांगितलं होतं. तसेच पुढचे काही दिवस पुढची सूचना येईपर्यंत ऑफिस बंद राहील त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे असं मेलमध्ये लिहिलं होतं. एकेक करत सर्वजण ऑफिसमधून बाहेर पडले. मीही ऑफिसातून बाहेर पडलो. पुढचे काही दिवस तरी माझ्या बॉसचा मनहूस चेहेरा पाहावा लागणार नाही या विचारानेच मी फार खुश झालो होतो. 

घरी पोहोचताच आवरून झाल्यावर मी अंग टेकलं. आज मी फार दमलो होतो. रात्री जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी मोबाईलवर नेटफ्लिक्स सुरू केलं व ब्रेकिंगबॅडच्या पाचव्या सिझनचा सातवा भाग पाहू लागलो. काही वेळाने माझा फोन वाजला. मोबाईलच्या स्क्रिनवर “बॉस” हा शब्द पाहताच माझा चेहेरा उतरला. मी फोन कानाला लावला. “आपल्या कंपनीचं दुसरं ऑफिस चालू आहे. त्या ऑफिसचा पत्ता तुला पाठवला आहे. उद्या सकाळी सात वाजता पोहोच. तसा तुला एच. आर कडून मेल येईलच.” एवढे बोलून बॉसने फोन ठेवला आणि माझा मूड पुन्हा एकदा ऑफ झाला…



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy