Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Niranjan Niranjan

Horror Thriller


4  

Niranjan Niranjan

Horror Thriller


उलट्या पायांची म्हातारी - भाग दोन

उलट्या पायांची म्हातारी - भाग दोन

6 mins 214 6 mins 214

  “घाबरू नका रे बाळांनो. कितीतरी वर्षांनी आज या बंगल्यात तुमच्या सारख्या मुलांचा पाय पडला.” असं म्हणून ती म्हातारी रडू लागली. समोरचं दृश्य तिघांसाठीही अनपेक्षित होतं. सनीला तर त्याच्या आज्जीची आठवण झाली व त्या आठवणीने त्याचेदेखील डोळे पाणावले. आता बाहेर पाऊस पडू लागला होता. “तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का?” म्हातारीने प्रश्न केला तसा तिघांनीही एका सुरात उत्तर दिलं “होssssss” “घाबरणार नाही ना?” म्हातारीने पुन्हा प्रश्न केला. यावर आधीच भ्यायलेला विनू काहीतरी बोलणार होता इतक्यात सनीने त्याच्याकडे पाहिलं व त्याला नजरेनेच गप्प केलं. “नाय भिनार आज्जी तुमी सांगा गोष्ट. पन येक ईचारु का?” सनी म्हणाला. “विचार की?” असे म्हातारीने म्हणताच सनीने मनातील शंका विचारली, “तुमी इथं एकट्या असता तर तुमचं जेवन खान वगरे कोन करतं?” “मी एकटी नसते रे बाळा. माझा नातू आहे तो येत असतो अधूनमधून इथे. तोच सगळं काही पाहतो.” आज्जीने उत्तर दिलं व “आता ऐका” असे म्हणून गोष्टीला सुरुवात केली-

तर ही गोष्ट तुमच्यासारख्याच पण तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या तीन मित्रांची आहे. दिनेश, पवन आणि योगेश हे तिघे मित्र एका गावात रहात होते. तिघेही तालुक्याच्या कॉलेजात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होते. दिनेश आणि योगेश दोघेही एकदम टगे होते तर पवन मात्र अगदी साधा सरळ मुलगा होता. पवन जरी हुशार असला तरी मुलखाचा भित्रा होता. त्याच्या भित्रेपणामुळे कॉलेजातील उनाड मुले त्याला चिडवायची त्रास द्यायची. सुरवातीला दिनेश आणि योगेशदेखील पवनला फार छळायचे. बिचारा पवन अगदी रडकुंडीला यायचा. दिनेश आणि योगेश अभ्यासात तसे साधरणच. तरी योगेश त्यातल्यात्यात बरा होता. दिनेश कॉप्या करून कसाबसा पास व्हायचा. दिनेश फक्त त्याच्या वडीलांनाच घाबरायचा. निकालाच्या दिवशी तर वडिलांच्या हातचा मार पक्का होता. अशाच एका दिवशी गणिताच्या पेपरला दिनेश कॉपी घेऊन जायला विसरला. पण त्याचं नशीब चांगलं होतं कारण त्याच्या पुढच्याच बेंचवर पवन बसला होता. पवन त्याच्या नेहमीच्या सवयीने एका हातात पॅड तिरकं धरून लिहीत होता. दिनेश पवनशी बोलायला थोडा पुढे झुकला पण मास्तर आपल्याकडेच रोखून पाहतायत हे लक्षात येताच तो मागे गेला. ‘आता आपलं काय खरं नाही. नापास झालो तर वडील चामडीच सोलतील’ या विचाराने दिनेश अस्वस्थ झाला. काही वेळाने वर्गात शिपाई आला व त्याने मास्तरांना अगदी हळू आवाजात काहीतरी सांगितलं. तसे मास्टर शिपायाला मोठ्याने म्हणाले, “मी येतोच. तोपर्यंत तू इथेच थांब आणि कोणी कॉपी करताना दिसला तर मला सांग. एकेकाचे गाल रंगवतो.” असे म्हणून एकदा पूर्ण वर्गावर आपली धारदार नजर फिरवून मास्तर वर्गाबाहेर गेले. मास्तर जाताच वर्गात कुजबुज सुरू झाली. “ए चष्मेश तुझा पेपर दाखव नाहीतर तुला माहितीये मी काय करेन.” असे दिनेशने धमकावताच पवनने त्याची उत्तरपत्रिका दिनेशकडे दिली. पेपर संपायला आता वीस मिनिटेच बाकी होती. तेव्हढ्या वेळात जेवढा जमेल तेवढी गणितं दिनेशने त्याच्या उत्तरपत्रिकेवर उतरवली. इतका वेळ शिपाई मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त होता. शेवटची पाच मिनिटं बाकी असताना मास्तर वर्गात आले. त्यांना पाहताच शिपायाने गडबडीने मोबाईल खिशात घातला. 

त्या दिवसापासून दिनेश आणि पवन चांगले मित्र झाले. पवन दिनेशचा मित्र झाल्यामुळे योगेशही त्याला आता काही बोलत नव्हता. वर्गातल्या कोणत्या मुलाने जर पवनची खोड काढली तर दिनेश त्याला बडवायचा. त्यामुळे आता पवनच्या नादाला कोण लागत नव्हतं. 

आता पाहता पाहता कॉलेजचं शेवटचं वर्ष संपलं. दिनेश आणि योगेशने जोरदार पार्टी करायचं ठरवलं. तसं त्यांनी पवनला ही यायला सांगितलं. ‘मला वडील सोडणार नाहीत. तसही मी काय पित नाही. तुम्ही मजा करा.’ असं नेहमीचं रडगाणं पवनने गाऊन दाखवलं. “हे बघ. तू पि असं आम्ही म्हणत नाही. पण तुला आमच्या बरोबर यावेच लागेल.” असं जेव्हा दिनेशने दरडावल तेव्हा पवन नाईलाजाने पार्टीसाठी तयार झाला. ठिकाण आणि दिवस ठरला. जवळच्याच एका डोंगरावर ते जाणार होते. तिथे टेकडीवरच एक रिसॉर्ट होते. ठरलेल्या वेळी तिघेही तिथे पोहोचले. रात्रीची वेळ होती. अमावस्येची रात्र असल्यामुळे आकाशात तारे चमकत होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. वातावरण आल्हाददायक होतं. जेवणाची ऑर्डर देऊन दिनेशने पिशवीतली बाटली बाहेर काढली व दोन ग्लास भरले. त्यात सोडा ओतून दिनेश आणि योगेशने ग्लास तोंडाला लावला. पवनचा ग्लास मात्र रिकामाच होता. तो नुसता त्या दोघांच्या तोंडाकडे पाहात होता. मध्येच समोरच्या बशीतले शेंगदाणे तोंडात टाकत होता. आता ग्लास मधील दारू दोघांच्याही पोटात गेली होती. दिनेशने एकदा रिकाम्या ग्लासकडे पाहिले व ग्लास पुन्हा भरला. त्याने योगेशचाही ग्लास भरला व पवनच्या रिकाम्या ग्लासकडे पाहून तो म्हणाला, “ए पवन एकदा घेऊन तर बघ. आपल्या मैत्रिखातर घे.” असे म्हणून त्याने पवनच्याही ग्लासमध्ये थोडी दारू ओतली. पवनने तरीही ग्लास उचलला नाही. हे पाहून दिनेश चिडला व पवनच्या अंगावर खेकसला, “घे म्हणतोय ना घे.” हे ऐकून पवन थोडा बिथरला व त्याने ग्लास हातात धरला. आता दिनेश आणि योगेश पवनकडेच पाहात होते. शेवटी नाईलाजाने पवनने ग्लास तोंडाला लावला. एक घोट पोटात जाताच त्या कडवट चवीमुळे पवनला कसंसच झालं. त्याच्या चेहेऱ्याकडे पाहून दिनेश आणि योगेश जोरजोरात हसू लागले. पवनने तोंड वाकडं करून ग्लास परत टेबलवर ठेवला. “का रे आवडली नाही का?” योगेशने खवचटपणे विचारलं तसं पवनने फक्त मान हलवली. “तेवढा ग्लास संपव.” दिनेश पवनला म्हणाला. “मला नाही आवडली चव.” पवन म्हणाला. “दारूचा असा अपमान केलेला मला चालणार नाही. तुला तेवढा ग्लास संपवायलाच लागेल. संपव!” दिनेश पवनवर पुन्हा खेकसला. आता त्याचा दुसरा ग्लास संपला होता. पवनने नाईलाजाने ग्लास पुन्हा ओठांना लावला व तोंड वाकडं करतच संपवला. दिनेश आणि योगेशचा आता तिसरा ग्लासही संपला होता. दारू त्यांच्या अंगात भिनली होती. 

दिनेशने वेटरकडे जेवणाची चौकशी केली. पण जेवण तयार व्हायला अजून वेळ होता. त्यामुळे ते तिघेही खुर्चीवरून उठले व टेकडीच्या टोकाच्या दिशेने जाऊ लागले. दिनेश आणि योगेशच्या गप्पा चालू होत्या. पवनला मात्र ते काय बरळतायत तेच कळत नव्हतं. तो खाली दरीत पाहात उभा होता. त्यालाही थोडं गरगरल्यासारखं होत होतं. आता दोघांचेही आवाज वाढले होते. ते नक्की काय बोलतायत हे अजूनही पवनला समजत नव्हतं. आता तर ते चक्क एक मेकांशी भांडत होते. पवनला आता काळजी वाटत होती. त्याने योगेशच्या अंगावर धावून जाणाऱ्या दिनेशचा हात पकडला. हे पाहून आधीच चिडलेल्या दिनेशने पवनला हाताने धक्का मारला तसा पवनचा तोल जाऊन तो खाली दरीत पडला. “धप्प……” असा मोठा आवाज झाला तसा वेटर धावत आला. वेटरच्या मागोमाग रिसॉर्टचा मालकही धावत आला. दिनेश आणि योगेशही आता चांगलेच भानावर आले होते. नक्की काय झालंय हे त्यांना समजलं होतं. 

पवनच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने दिनेशला पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. योगेशवरही या सगळ्या घटनेचा परिणाम झाला होता. या धक्क्यातून सावरायला बऱ्याच महिन्यांचा काळ जावा लागला. आता मात्र योगेश पूर्णपणे सुधारला होता. त्याच्या वडिलांनी त्याला गावात एक दुकान उघडून दिलं होतं. काळ पटापट पुढे सरकत होता. पाच वर्षांचा तुरुंगवास भोगून दिनेश घरी आला होता. त्याला भेटायला योगेश त्याच्या घरी आला होता. दिनेशला पाहताच योगेशला तो दुर्दैवी प्रसंग आठवला व नुसत्या आठवणीनेच त्याच्या अंगावर काटा आला. दिनेश पूर्णपणे बदलला होता. दाढी वेडीवाकडी वाढली होती. शरीर रोडावलं होतं. एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा निर्ढावलेपणा चेहऱ्यावर दिसत होता. तो योगेशला म्हणाला, “इतक्या वर्षात घशाची कोरड काही कमी झाली नाही. तुरुंगात जे मिळल त्यावर भागवावं लागलं. आता माझ्याकडे चांगला माल आलाय. उद्या मारुती मंदिराच्या मागे भेट.” दिनेशच्या चेहेऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशसुद्धा दिसत नव्हता. योगेशला खरंतर इच्छा नव्हती पण इतक्या वर्षांनी भेटलेल्या मित्राला नाही म्हणता येईना.

दुसऱ्या दिवशी रात्री ठरलेल्या वेळी दोघेही मारुती मंदिरापाशी पोहोचले. मारुती मंदिर गावाच्या हद्दीलाच होतं. सकाळी तिथे भक्तांची गर्दी असायची तर रात्री दारुड्यांची. आजूबाजूला पूर्ण अंधार होता. रस्त्यावरचा दिवाही बंद होता. दिनेशने मंदिराच्या मागे मातीतच एक चटई पसरली. दोघेही चटईवर बसले. दिनेशने पिशवीतून दोन ग्लास काढून चटईवर ठेवले. “च्यामायला त्या पवनच्या. त्या भिकारड्या भित्र्या चष्मेश पवनमुळे माझ्या आयुष्यातली पाच वर्षे वाया गेली.” योगेशकडे पाहून दिनेश म्हणाला. हे बोललेलं योगेशला आवडलं नाही. तो काहीच बोलला नाही हे पाहून दिनेशने पिशवीतून बाटली काढली. एकदा त्या बटलीकडे जणू काही ती एखादी मौल्यवान वस्तू असल्याप्रमाणे कौतुकाने पाहिलं व बूच उघडून तो दारु ग्लासात ओतू लागला. दोन्ही ग्लासात दारू ओतल्यावर त्याने एक ग्लास योगेशच्या हातात दिला व एक ग्लास स्वतः उचलला. दोघांनीही आपापले ग्लास ओठांना लावले. तेवढ्यात अंधारातून आवाज आला- “माझाही ग्लास भर की!” व त्या पाठोपाठ अंधारातून एक रिकामा ग्लास पुढे आला आणि दिनेश व योगेशच्या किंकाळ्यानी आकाश दणाणलं.

“कशी वाटली गोष्ट. घाबरला नाही ना?” गोष्ट संपताच हसतच म्हातारीने विचारलं. “लयच भारी गोष्ट होती आज्जी. आवडली आपल्याला.” सनी म्हणाला. नंदू आणि विनू मात्र काहीच बोलले नाहीत. त्यांचा चेहराच काय ते सांगत होता. 

क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from Niranjan Niranjan

Similar marathi story from Horror