विचित्र - भाग एक
विचित्र - भाग एक
बॉसने त्याच्या पँटच्या खिशातून दोन कागदाचे तुकडे काढले व एकेक तुकडा मोहन व नाम्याच्या हातात दिला. नाम्याने कागदाचा तुकडा उलगडला. “हासाल तर रडाल” एवढं एकच वाक्य त्यावर लिहिलं होतं. “हे आजचं तुमचं मिशन आहे.” नाम्याच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून बॉस म्हणाला. “कामाचं बाकी स्वरूप काय असेल ते मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही फक्त बाहेर उभ्या गाडीत जाऊन बसा. ड्रायव्हर तुम्हाला कामाच्या ठिकाणी पोहोचवेल. तिथे गेल्यावर तुम्हाला काय काम आहे ते कळेलच. पैसेही काम झाल्यावरच मिळतील.” एवढे बोलून बॉसने त्या दोघांना जाण्यास सांगितले.
दोघे त्या पडीक बंगल्याबाहेर आले व समोर उभ्या असलेल्या इनोवा मध्ये बसले. ड्रायव्हरने कार सुरू केली. थोड्याच वेळात कार एका आलिशान महाल सदृश्य बंगल्यासमोर येऊन थांबली.
मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला वॉचमनची केबिन होती. गेटसमोर उभी गाडी पाहताच वॉचमनने प्रवेशद्वार उघडलं. गाडी उजव्या बाजूला पार्किंगच्या दिशेला वळली. समोर मोठी बाग होती. चोहीकडे विविध रंगांची विविध प्रकारची फुलं वाऱ्यावर डौलत होती. वातावरण आल्हाददायक होतं. एक मोठं वळण घेऊन गाडी पार्किंग मध्ये पोहोचली. ड्रायव्हरने गाडी पार्क करताच मोहन आणि नामदेव गाडीतून उतरले व ड्रायव्हरच्या मागे चालू लागले. पार्किंग मधून बाहेर येताच मोहन आणि नामदेव नुसते समोर पाहतच राहिले. समोर दोन सुंदर ललना उभ्या होत्या. इतक्या सुंदर की जणू आपण इंद्राच्या दरबारात आलोय आणि समोर उर्वशी आणि मेनका उभ्या आहेत असा विचार क्षणभर नाम्याच्या मनाला स्पर्शून गेला. उजव्या बाजूला उभी असलेली तरुणी नाम्याजवळ आली आणि तिने नाम्याचा हात हातात घेतला तर दुसरीने मोहनचा. दोघेही त्या तरुणीच्या सोबत पायऱ्या चढून वर गेले. समोर जणू इंद्राचा महालच पाहिल्याप्रमाणे दोघेही डोळे विस्फारून पाहत होते. एखाद्या छोट्या मैदानाच्या आकाराचा तो दिवाणखाना होता. समोर एक भव्य जिना होता. वर जाईल तशी जिन्याची रुंदी वाढत गेली होती. जिन्याच्या शेवटी डाव्या व उजव्या बाजूला काही अंतरावर दोन दालनं होती. दालनांचे दरवाजे बंद होते. दिवाणखान्याच्या दोन्ही बाजूनही तसेच दरवाजे होते व छत वेगवेगळ्या रंगाच्या अतिशय सुंदर अशा झुंबरांनी सजलं होतं. भिंतींवर वेगवेगळी चित्र दिसत होती. प्रत्येक चित्रात वेगवेगळे देखावे दिसत होते. मात्र एका विशिष्ट चित्राकडे नाम्याचं लक्ष जाताच तो जोरजोरात हसू लागला. जिन्याच्या वरच्या भिंतींवर ते चित्र रेखाटलं होतं. ते एक व्यक्तिचित्र होतं. चित्रातला माणूस अतिशय कुरूप दिसत होता. त्याचा चेहेरा अतिशय उभट होता. दोन्ही गालांवर मोठे तीळ होते. उंदराने कुर्तडल्यासारखी दिसणारी तुरळक मिशी होती. त्याच्या शरीराच्या मानाने चेहेरा फारच मोठा दिसत होता व पाय अगदीच छोटे होते. चेहेऱ्यावर कसलेच भाव नव्हते. त्याने सप्तरंगी आंगरखा घातला होता व कंबरेखाली राजस्थानी महिला वापरतात तसा रंगीबेरंगी घागरा होता.
“चलावे” नाम्याच्या बाजूला उभी उर्वशी म्हणाली तसा नाम्या भानावर आला. नाम्या व मोहन आत गेले व समोरच्या सोफ्यावर बसले. त्या दोन तरुणी डाव्या बाजूच्या दरवाजातून आत गेल्या. बराच वेळ झाला तरी कोणीच आलं नाही. उर्वशी आणि मेनका सुध्दा गेल्या त्या परत आल्याच नाहीत. मोहन ही आता कंटाळला होता. नक्की काय काम असेल, काही धोका तर नसेल ना असे अनेक विचार नाम्याच्या मनात वारंवार येत होते. या बंगल्याचा मालक म्हणजेच त्यांचा इंद्र कोणीतरी मोठा माणूस असणार याबद्दल नाम्याला खात्री वाटत होती. आपल्याकडून काही वाईट काम तर करून घेणार नाहीना अशीही शंका त्याच्या मनात येऊन गेली. पण नक्की काय काम असेल याचा मात्र काहीच अंदाज येत नव्हता.
बऱ्याच वेळाने दरवाजा उघडण्याचा आवाज आला. डाव्या दरवाज्यातून एक माणूस आला व नाम्या आणि मोहनच्या समोर उभारला. त्या माणसाकडे पाहताच नाम्याला हसूच आलं. मगाशी पाहिलेल्या चित्रातलाच माणूस त्यांच्या समोर उभा होता. त्याचे कपडे पण अगदी तसेच त्या चित्रातल्या सारखे होते. मोहन सुद्धा गालातल्या गालात हसत होता. नाम्या मात्र अगदी मनमोकळेपणाने हसत होता. त्याला एक वाईट सवय होती. एकदा हसू आल की कितीही प्रयत्न केला तरी त्याचं हसू थांबत नसे.
आपल्याकडे पाहून हसणाऱ्या नाम्या आणि मोहन चा त्या माणसाला जरा सुद्धा राग नाही आला. तो म्हणाला, “हसा, हसा तुम्हाला हवं तेवढं पोटभरून हसा. मला आता सवयच झालीये. हसण्यासाठीच तर तुम्हाला इथे बोलावलंय मी.” हे ऐकून मोहन हसायचा थांबला. पण खूप प्रयत्न करून सुद्धा नाम्याचं हसू काही थांबेना.
क्रमशः