सदाची गोष्ट - भाग एकस्वप्न
सदाची गोष्ट - भाग एकस्वप्न
माणसाला स्वप्न का पडतात? काही तज्ज्ञांच्या मते माणसाच्या अतृप्त इच्छा तो त्याच्या स्वप्नांच्या मार्फत पूर्ण करू पाहतो. तर काही जण असही मानतात की माणूस जेव्हा झोपी जातो तेव्हा त्याच्या मनातील विचार सुरूच असतात. या सर्व विचारांचा एकत्रित परिणाम त्याच्या स्वप्नात दिसतो.
आता आपल्या सदाच्या स्वप्नात काय आहे ते पाहुयात.
हे मी कुठे आलोय? समोर इतकी सुंदर झाडं आहेत. या झाडांचा रंगही किती वेगळा आहे. सोनेरी रंगाची झाडं मी पहिल्यांदाच पाहतोय. आणि हे काय? किती सुंदर फळं लगडलियेत या झाडांच्या फांद्यांना. आंब्यासारखीच पण अंब्याहून बरीच मोठी. चला या फळांची चव चाखतो. वाह…. काय मस्त चव. अंब्यापेक्षाही रसाळ आणि सफरचंदापेक्षाही कुरकुरीत. मी स्वर्गात तर नाही ना? नक्कीच मी स्वर्गात आलोय. समोरून येणाऱ्या सुंदर ललनाना पाहून तर माझी खात्रीच पटली आता. मी खरच स्वर्गात आलोय. चला त्या मैद्याच्या पोत्यापासून एकदाची सुटका झाली. अरे हे काय त्या नर्तकींचा वेश परिधान केलेल्या ललना चक्क माझ्याच दिशेने धावत येतायत ( आनंदाने डोक्यावरच्या तुरळक उरल्या सुरल्या केसांवरून हात फिरवत). हे सुमधुर संगीताचे स्वर कुठून येतायत? वा काय ते संगीत! ऐकून कान अगदी तृप्त झाले. ललना आता जास्तच वेगाने धावतायत. मला भेटण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू आहे बहुदा. आहेच मी तेवढा हँडसम (पुन्हा एकदा तुरळक केसांवरून हात फिरवत). अरेच्चा इतका वेळ मी चष्मा घातला नव्हता (खिशातून चश्मा काढून डोळ्याला लावताच). हे काय पाहतोय मी? त्या सुंदर ललना कुठे गायब झाल्या. आणि हे समोरून कोण येतय? हे तर माझं मैद्याचं पोतं. चला आता इथून पळायला हवं. खूप धावलो आता अजून नाही जमणार (धापा टाकत). असं करतो त्या झाडाच्या मागे लपतो. अरे हे काय सुंदर ललनाही गेल्या तस सुमधुर संगीतही बंद झालं. (मागे वळून पाहत) मैद्याचं पोतही कुठे दिसत नाही, आता मस्त झोपतो. ढण…खण…ठण….. हा कसला आवाज आहे (झोपमोड झाल्याने वैतागून डोळे चोळत).
एका हातात पातेलं दुसऱ्या हातात पळी घेऊन बायको समोर उभी होती. पातेलं व पळी एकमेकावर आदळत. कानठळ्या बसवणारा ढण…खण…ठण…..आवाज त्या पाठोपाठ येणारी गर्जना – उठा……. सदाशिवरावांनी तत्क्षणी आंगावरच पांघरून झटकलं व ते ताडकन उठून बसले. छातीतली धडधड अजूनही कमी झाली नव्हती.
स्वप्न भंगलं होतं. “जरा बघा घड्याळात किती वाजलेत ते. उठा आणि भाजी घेऊन या भाजीवाल्याकडून. पूर्ण स्वयंपाक अजून बाकी आहे.” बायको वैतागून म्हणाली. सदाशिवरावांनी घड्याळात पाहिलं. सकाळचे दहा वाजले होते. “अगं आज रविवार आहे ना? म्हणून जरा निवांत उठलो.” सदाशिवराव समजावणीच्या सुरात म्हणाले. “रविवारीसुद्धा आपल्यात जेवतात बरका आणि मी जर उठवलं नसतं तर असाच दिवसभर ढाराढुर झोपला असतात.” बायको खोचकपणे म्हणाली. “भांडी वाजवून कोण उठवतं” अर्थातच हे वाक्य सदाशिवराव मनात बोलले. “बरं बाई चुकलं माझं. दे पिशवी. भाजी घेऊन येतो.” “आता ते पण मीच देऊ का? तिथं कोपऱ्यात आहे ती पिशवी घ्या आणि निघा.” “कोणती भाजी आणायची ते तर सांगशील का?” “एक किलो कांदे, पाव किलो शिमला मिर्ची, एक किलो बटाटे, एक किलो टोमॅटो.” एवढे बोलून बायको स्वयंपाक घरात गेली. सदाशिवराव पिशवी घेऊन निघाले. थोड पुढे गेल्यावर कोपऱ्यावरच्या जोश्याने मिश्कीलपणे हसत विचारलं, “काय सदा सगळे कापडे धुवायला दिलेत वाटत.” “का हो असं का बोलताय?” जोशींचा बोलण्याचा रोख न समजल्याने सदाशिवरावांनी विचारलं. “जरा कंबरेखाली नजर टाका म्हणजे कळेल मी असं का म्हणतोय ते.” जोशी खोचकपणे म्हणाले. “अच्छा पँट नवीन घेतली वाटतं.” जोशींच्या पँट कडे पाहत सदाशिवराव म्हणाले. “आहो माझ्या नाही हो स्वतःच्या कंबरेखाली बघा.” जोशी हसतच म्हणाले. सदाशिवरावांनी खाली पाहताच काय घोळ झालाय ते त्यांच्या लक्षात आलं. ते पँट घालायची विसरले होते. आपल्या वेंधळेपणाचं त्यांना स्वतःलाच हसू आलं व तोंड लपवतच ते मागे वळले. त्यांनी घराच्या दारातूनच बायको कुठे दिसते का पाहिलं. बायको दिसत नाही हे पाहताच ते पळतच बेडरूम मध्ये गेले. त्यांनी पँट चढवली तशी त्यांना पोटात कळ आली. पँट उतरवून ते संडासात गेले. पोट मोकळं होत्तच त्यांनी पुन्हा पँट चढवली व हातात पिशवी घेऊन निघणार इतक्यात समोरून बायकोला पाहताच ते जागीच थबकले. “द्या इकडे पिशवी आधीच उशीर झालाय.” बायको म्हणाली. त्यांनी भिऊन रिकामीच पिशवी चुकून बायकोच्या हातात दिली. “हे काय भाजी कुठाय? तुम्ही आजुन गेलाच नाहीत.” बायकोच्या डोळ्यातील आंगार पाहून ससदाशिरावांना काय बोलावे तेच सुचेना. “गेलो होतो पण संडास लागली म्हणून परत आलो.” हे ऐकताच बायको हसायला लागली. “काय बोलावं या माणसाला” असं म्हणून ती स्वयंपाकघरात पळाली.
खजील झालेले सदाशिवराव घराबाहेर पडले. या सगळ्या गोंधळात बायकोने नक्की कोणती भाजी आणायला सांगितली तेच सदाशिवराव विसरले. भाजीवाल्याकडे पोहोचताच ते नक्की कोणती भाजी बायकोने सांगितली हे आठवण्याचा विचार करू लागले. ते काहीच बोलत नाहीत हे पाहताच शेवटी भाजीवल्यानेच विचारले, “काय हवंय साहेब तुम्हाला?” “भाजी” सदाशिवराव म्हणाले. अजूनही त्यांना आठवत नव्हतं. “हो पण कोणती भाजी देऊ?” “थांबा मला जरा विचार करू दे.” हे ऐकताच दुकानदार खुदकन हसला. “काय बावळट ध्यान आहे!” तो मनात म्हणाला. दोन मिनिटे झाली तरी सदाशिवराव तसेच उभे होते. चेहेरा गोंधळलेला दिसत होता. शेवटी दुकानदाराने वैतागून विचारलं, “कांदा, बटाटा, गाजर, काकडी काय देऊ?” हे ऐकताच सदाशिवरावांना आठवलं. “हा एक किलो कांदा, एक किलो बटाटा, एक किलो टोमॅटो आणि पाव किलो मिर्ची द्या.” एवढं बोलून त्यांनी कपाळावरचा घाम शर्टच्या बाहिने पुसला. दुकानदाराने ही सुटकेचा निःश्वास सोडला. दुकानदाराने भाजी पिशवीत टाकली व १२० रुपये झाल्याचं सांगितलं. सदाशिव रावांनी पँटच्या खिशात हात घातला पण हाताला पाकीट लागलं नाही. या सगळ्या गोंधळात ते पाकीट घरीच विसरले होते. दुकानदाराला हे लक्षात येताच तो म्हणाला, “साहेब पैसे उद्या दिले तरी चालतील.” “नाही नाही कुणाची उधारी ठेवलेली मला पटत नाही. आणि समजा मी उद्या विसरलो तर? तुम्ही माझं कड ठेवा. उद्या मी पैसे देऊन कडं घेऊन जाईन.” या माणसाशी वाद घालायची शक्ती दुकानदारात नव्हती. त्याने काही न बोलता सदाशिवरावांचं चांदीचं कडं ठेवून घेतलं.
घरी येताच सदाशिवरावांनी पिशवी बायकोकडे सुपूर्द केली. बायकोने पिशवीत डोकावून पाहताच तिचा चेहरा रागाने लाल झाला. “मी तुम्हाला शिमला मिर्ची सांगितली होती तुम्ही नुसती मिर्ची घेऊन आलात. आता तुम्हाला मिर्चीचीच भाजी खाऊ घालते.” ती रागाने म्हणाली. मिर्चीची भाजी खावी लागणार या विचारानेच सदाशिवरावांना घाम फुटला व घामाने ओल्या झालेल्या बाहिनेच पुन्हा त्यांनी घाम पुसला.