विचित्र - ओळख
विचित्र - ओळख
ओळख:
मी नामदेव जगदाळे. प्रेमाने सगळे मला नाम्या म्हणतात. मी काही महिन्यांपूर्वीच एका नामांकित कंपनीत मनुष्यबळ विभागात नोकरीला लागलो. अर्थातच मी फ्रेशर आहे. मला जर तुम्ही प्रत्यक्षात पाहिलत तर माझ्या चेहऱ्यावरील कुतूहल व नुकतच फुटलेलं मिसरूड पाहून तुम्ही ओळखालच की मी फ्रेशर आहे. खरंतर मला अजुन पुढे शिकायचं होत पण घरच्या हालाखी मुळे बीकॉम होताच ही नोकरी स्वीकारावी लागली. खरंतर बीकॉम झालेली मुलं एकतर एखाद्या सी. ए च्या ऑफिसात कामाला लागतात नाहीतर एखाद्या छोट्या मोठ्या कंपनीत अकाउंट्स विभागात सामावून जातात. पण मी अकाउंट्स विषयात काटावर पास झालो त्यामुळे तसेच माझ्या मित्रांच्या मते मी चांगला बोलबच्चन असल्यामुळे मी ही मनुष्यबळ विभागाची नोकरी स्वीकारली. हा हा हा हा…
कसा वाटला जोक. तर आता मी मुख्य मुद्याकडे येतो.
काही दिवसांपूर्वीच मला ही नोकरी मिळाली आणि नेमका लॉकडाऊन लागला. दोन महिने मी घरूनच काम करत होतो. पण आजपासून सरकारने लॉकडाऊन उठवला तसा लगेच कंपनीकडून ऑफिसात हजर रहायचा आदेश आला. दोन महिन्यांपासून साठलेला आळस झटकून ऑफिसात हजर झालो. दिवसभर फार झोप येत होती. त्यात बॉसने सकाळपासूनच कामाला लावलं होतं. कसा बसा दिवस संपला. निघायचं म्हणून कॉम्पुटर बंद करणार होतो तितक्यात कॉम्प्युटरची स्क्रीन चमकली. मी नुकताच आलेला ईमेल उघडला. मेल वाचून मी हादरलोच. मागच्या वर्षापासून कोरोनामुळे कंपनीच्या नफ्यात कमालीची घट झाली आहे. तसेच अजूनही कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे पुढचे काही महिने सर्व कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार दिला जाईल. तसेच आठवड्यातले चारच दिवस काम असेल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आम्ही समजू शकतो पण दुसरा कोणताच इलाज नसल्याने कंपनीला हा अतिशय दुर्दैवी निर्णाय घ्यावा लागतोय. तुम्ही इतकी वर्षे कंपनीची साथ दिलीत अशीच साथ तुम्ही या कठीण काळात देखील द्याल अशी अपेक्षा करतो. खाली एम. डी ची सही होती. दुष्काळात तेरावा महिना अशी माझी स्थिती झाली.
घरी पोहोचलो तेव्हा माझ्या मनात सतत विचार सुरू होते. काय करावं तेच कळत नव्हतं. नोकरी सोडावी असाही विचार मनात येऊन गेला. पण या कोरोनाच्या संकट काळात दुसरी सहजा सहजी मिळायची शक्यता पण कमी होती. त्यापेक्षा आहे ती नोकरी सध्या सुरू ठेवणंच योग्य होतं. पण नुसतं तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. अजून काहीतरी करायला हवं. बऱ्याच वेळ विचार केल्यावर मला आठवलं. काही दिवसांपूर्वी माझा शाळेतला मित्र मोहन मला किराणाच्या दुकानात अचानक भेटला. दहावीच्या सेंडोफ नंतर आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर नोकरीचा विषय निघाला. मी माझ्या कंपनीबद्दल त्याला सांगितलं. तो मात्र मला काही सांगायला तयार नव्हता. खूप खोदून विचारल्यावर पार्ट टाइम जॉब आहे पण पैसे मात्र चांगले मिळतात असे तो म्हणाला. आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले व तेथून निघालो.
मी मोहनला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजत राहिली व बंद झाली. मी पुन्हा फोन लावला. पुन्हा तेच. असं चार वेळा झालं. आता वैतागून मी शेवटचा म्हणून पाचव्यांदा फोन लावला. एकदाचा मोहनने फोन उचलला. मी थेट विषयालाच हात घातला. पण मोहन मला त्याच्या कामाबद्दल ठोस असं काही सांगतच नव्हता. उलट हे काम कसं विचित्र आणि धोक्याचं आहे हे सांगून विषय टाळत होता. पण मी पण इतक्यात हार मानणार नव्हतो. शेवटी माझ्या जिद्दीला वैतागून मोहन मला त्याच्या बॉसला भेटवण्यास तयार झाला.
********
रविवारचा दिवस उजाडला तसा नाम्या नेहेमी प्रमाणे आळोखे पिळोखे देत जागा झाला. त्याने घड्याळात पाहिले. सकाळचे दहा वाजले होते. आज नाम्याला मोहनसोबत त्याच्या बॉसला भेटायला जायचं होतं. नक्की काय काम आहे हे मोहनने सांगितलं नव्हतं. पण हे काम विचित्र व धोक्याच आहे असं तो फोनवर बोलताना म्हणाला होता. पण नाम्याला पैशाची अत्यंत गरज होती. त्यामुळे तो धोका पत्करायला तयार होता. तसाही मोहनच्या बॉसला भेटण्यात तरी त्याला कसला धोका वाटत नव्हता. तरीदेखील त्याच्या मनात एक कुतूहलयुक्त भीती होतीच.
ठरल्याप्रमाणे नाम्या मोहनच्या घरापाशी पोहोचला. तिथून ते दोघे मोहनच्या गाडीवरून निघाले. थोड्याच वेळात मोहनने गाडी एका जुनाट अशा बंगल्यासमोर थांबवली. बंगला चहूबाजूंनी झाडवेलीनी वेढला होता. भिंतीना ठिकठिकाणी तडे गेले होते. बंगल्याकडे पाहून इथे कुणा माणसाचं वास्तव्य असेल असं वाटतच नव्हतं. “तुझा बॉस इथे राहतो?” नाम्याने मोहनला विचारलं. “नाहीरे. त्याला जेव्हा काही काम द्यायचं असतं तेव्हा आम्ही इथे भेटतो.” मोहन म्हणाला व प्रवेशद्वारातून आत चालत गेला. नाम्यानेही त्याच्यामागून चालत वाळलेल पिवळं गवत तुडवत बंगल्यात प्रवेश केला. आत सर्वत्र धुळीचं साम्राज्य होतं. धुळीत माणसाच्या तसेच कुत्र्यांच्या पावलाचे ठसे उठून दिसत होते. मोहन व नाम्या दिवाणखान्याच्या डाव्याबाजूच्या दरवाजातून आत गेले. त्या खोलीत समोरच्या जुनाट खुर्चीवर एक लठ्ठ माणूस बसला होता. त्याने पूर्ण चेहेरा कापडाने झाकला होता. “बसा” मोहन आणि नाम्याकडे पाहून तो लठ्ठ माणूस म्हणाला. त्या माणसाच्या शरिराप्रमाणेच आवाजालाही चांगलच वजन होतं. मोहन व त्याच्यापाठोपाठ नाम्या समोरच्या खुर्च्यांवर बसले. आता बॉस बोलू लागला, “तर नामदेव तुला कामाची फारच गरज आहे असं मला मोहन कडून समजलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव. हे काम काही तुम्ही ऑफिसमधे करता तसलं काम नाही. या कामात तुला पैसे चांगले मिळतील. पण जोखीम ही तितकीच आहे. काहीवेळा तर जिवावरही बेतू शकतं. जर तुझी तयारी असेल तरच मी पुढे बोलतो.” नाम्याने काही क्षण विचार करून मान डोलावली. बॉस पुढे बोलू लागला, “आपल्याकडे प्रत्येक काम हे वेगळं असतं. तसेच सगळीच कामं ही कायद्याच्या चौकटीत बसणारी असतात असं नाही. आपला ग्राहक माझ्याकडे येऊन कामाचं स्वरूप सांगतो. मग मी हे काम तुमच्या सारख्या मुलांवर सोपवतो. जर तुझी तयारी असेल तर आपण लगेच कामाचं बोलूयात.” “हो मी तयार आहे.” नाम्या म्हणाला.
(क्रमशः)