मनाचे खेळ - भाग एक
मनाचे खेळ - भाग एक
गणेश सरदेसाई नेहमी प्रमाणे बरोबर सकाळी दहा वाजता क्लिनिकला पोहोचले. गेली पंधरा वर्ष त्यांनी मानसोपचार तज्ञ म्हणून चांगलच नाव कमावलं होतं. त्यांचं निदान अतिशय अचूक असायचं आणि औषधांपेक्षा नैसर्गिक किंवा प्राकृतिक उपचारपद्धती यावर त्यांचा भर होता. त्यामुळे त्यांच्या क्लिनिकमध्ये कायम पेशंट्सची गर्दी असायची. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अगदी वर्क स्ट्रेस मुळे वैतागलेले तरुण, अनेक कारणांमुळे नैराश्याच्या खोल गर्तेत आडकलेले तरुण-तरूणी, वैवाहिक आयुष्यातील मतभेदांमुळे वैतागलेले जोडपी, डिमेंशियाने त्रस्त झालेले वृध्द लोक तसेच स्किझोफ्रेनिया सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेले रोगी अशा अनेक प्रकारच्या मनोरुग्णांना बरं केलं होतं.
आजदेखील नेहमीप्रमाणे ते येताच रिसेप्शनपाशी आधीच ४-५ पेशंट येऊन बसले होते. त्यातील काही नवीन तर काही अधीचेच पेशंट होते जे फॉलोअप साठी आले होते. डॉक्टरांची असिस्टंट गंगा एकेक करत बुक केलेल्या अपॉइंमेंटच्या क्रमानुसार पेशंटला आत सोडत होती.
डॉक्टरांनी घड्याळात पाहिले. दुपारचा एक वाजला होता. डॉक्टर तशे खूप वक्तशीर होते. जेवणाची वेळ देखील चुकलेली त्यांना खपत नसे. पण पेशंटना ताटकळत ठेवण त्यांना ठीक वाटत नसे. त्यांनी किती पेशंट बाकी आहेत असं गंगेला विचारलं. तिने बोटनेच एक अशी खूण करताच त्यांनी तिला पेशंटला आत सोडायला सांगितलं. एक किरकोळ शरीरयष्टीचा माणूस डॉक्टरांसमोर येऊन उभा राहिला. त्याचा चेहेरा पूर्णपणे उतरला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसत होती. त्यामुळेच तो अनेक दिवस झोपला नसावा असं जाणवत होतं. नजर कुठेतरी शून्यात हरवलेली दिसत होती. “या बसा” डॉक्टरांनी सांगताच तो एखाद्या रोबोट सारखा कृत्रिमपणे चालत आला व समोरच्या खुर्चीवर बसला. “सांगा काय त्रास आहे तुम्हाला.” डॉक्टर म्हणाले. काही क्षण तो नुसताच पाहत राहिला. सांगण्यासारखं खूप काही असावं पण कदाचित सुरुवात कशी करावी हे त्याला समजत नसावं. डॉक्टरांनी गंगाने दिलेल्या फॉर्म कडे पाहीले व ते म्हणाले, “मिस्टर संजय कारंडे, तुम्हाला जे काही सांगायचंय ते अगदी निसंकोचपणे सांगा. मनात कोणतीही भीती बाळगू नका. तुम्हाला मदत करण्यासाठीच मी इथे बसलोय.” “मला झोप लागत नाही. विचित्र भास होतात.” संजय तुटकपणे म्हणाला. “कसले भास होतात?.” “माझ्या मेलेल्या बायकोचे भास होतात.” हे ऐकताच डॉक्टरांची मुद्रा गंभीर झाली. “म्हणजे तुमच्या पत्नीचं निधन झाल्यापासून हे भास सुरू झाले का?” काही क्षण विचार करून डॉक्टरनी विचारलं. संजयने नुसती मान हलवली. “संजय, आता तुमच्या आयुष्यात जे काही घडलय ते सर्व काही मला सांगा. तुम्ही जेवढे तपशीलात सांगाल तेवढं माझ्यासाठी तुम्हाला मदत करणं सोपं होईल.” एवढं बोलून डॉक्टरनी गंगेला दोन कप चहा आणायला सांगितले. असाही आता जेवायला उशीर होणार होता. दोन घोट चहा पोटात जाताच संजयला जरा तरतरी आली. त्याने त्याची आपबिती सांगण्यास सुरुवात केली –
संजय खूप खूष होता. नुकतीच त्याला नोकरीत बढती मिळाली होती आणि आता त्याचं लग्न सुधा ठरलं होतं. त्याची होणारी बायको मधुरा दिसायला देखणी, तसेच स्वभावाने पण मनमिळाऊ होती. साखरपुडा झाल्यावर त्यांच्या गाठी भेटी सुरू झाल्या. दोघांच्यात सुरुवातीपासूनच छान मैत्री जमली होती. आता लग्नाला दहाच दिवस राहिले होते. ठरल्याप्रमाणे संजय बागेत मधुराची वाट पहात बसला होता. त्याला गेटमधून मधुरा येताना दिसली. गुलाबी ड्रेस मुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून आलं होतं. पण का कोण जाणे संजयला आज तिचा चेहरा उतरल्यासारखा दिसत होता. संजय कडे पाहून ती कसंबसं हसली आणि त्याच्या बाजूला बसली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. पण आज मधुरा नेहमीसारखी भरभरून बोलत नाही हे संजयला जाणवलं. शेवटी त्याने तिला विचारलं, “काय ग मधू आज काय झालय! तू जास्त बोलत का नाहीस? आणि चेहरा पण उतरलाय तुझा. जरा हास की? हसलीस की तू इतकी छान दिसतेस ना की माझ्या हृदयाचा ठोकाच चुकतो तुला पाहून!” हे ऐकताच मधुरा क्षणभर लाजली व तिचे गोरे गाल काश्मिरी सफरचंदासारखे लाल झाले. पण दुसऱ्याच क्षणी तिचा चेहेरा पुन्हा पूर्ववत झाला आणि हास्याची जागा काळजीने घेतली. पण ती काहीच बोलली नाही. शेवटी संजयने खोदून खोदून विचारल्यावर ती सांगू लागली, “आज पहाटेला मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात आपण दोघे हनिमून साठी शिमल्याला गेलो होतो. तिथे हॉटेल रूमवर सामान ठेवून आपण फिरायसाठी बाहेल पडलो. तिथे एका टेकडीवर आपण गेलो. संध्याकाळची वेळ होती. सूर्य नुकताच मावळून आकाशात लालसर जांभळा रंग पसरला होता. छान वारं सुटलं होतं. आपण टेकडीच्या काठाला उभे होतो. आजूबाजूला कोणीच नव्हतं. आपण एकमेकांच्या मिठीत विसावलो होतो. तेवढ्यात मला लांबून कोणीतरी येताना दिसलं. ती व्यक्ती जशी जवळ आली तसं मला समजलं की ती एक मुलगी आहे. पण तिला पाहताच मला जरा विचित्रच वाटलं कारण तिचा चेहेरा केसांनी झाकला होता. ती आपल्याच दिशेला चालत येत होती. मी खूप घाबरले होते. मी तुला सांगायचाही प्रयत्न केला पण तुझं लक्षच नव्हतं. ती आपल्या जवळ आली तशी मी किंचाळले. तू माझ्याकडे पाहिलस पण तेवढ्यात त्या मुलीने तुझा हात धरून तुला ओढत नेऊन तिने तुझ्यासोबत दरीत उदी मारली. मी किंचाळून जागी झाले.”
मधूराचा चेहेरा घामेघुम झाला होता. हृदयाची धडधड वाढली होती. मधुरा आपल्यावर किती प्रेम करते हे संजयला कळलं होतं. आतापासूनच तिच्या मनात संजयबद्दल आत्मीयता, काळजी उत्पन्न झाली होती. संजय तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, “छे! वेडी कुठली! अग हे केवळ स्वप्न आहे. स्वप्नात जे दिसत ते प्रत्यक्षात कधी घडतं का? ते आपल्या मनाचे खेळ असतात. स्वप्न जर खरी होत असती तर आतापर्यंत मी करोडपती झालो असतो.” संजयच्या या वाक्यावर दोघेही मनसोक्त हसले. “मलाही तू सांगितलस ते पटतय पण तरीही आपण शिमलात नको जायला हनिमून ला. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ.” मधुरा म्हणाली. “बरं बाई! तू सांगशील तिथे जाऊ! आता तरी खूष ना!” संजय म्हणाला तशी कोमेजलेली कळी पुन्हा खुलली व दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले.
क्रमशः