उलट्या पायांची म्हातारी - भाग चार
उलट्या पायांची म्हातारी - भाग चार
म्हातारीने गोष्ट संपवली. “लयच भारी गोष्ट सांगता हो तुमी आज्जी. माझी आज्जी पन मला अशाच भुताच्या गोष्टी सांगायची. लय भ्या वाटायची मला तवा. पन आता मी नाय घाबरत.” सनी म्हणाला. ही गोष्ट ऐकून तर नंदू आणि विनूची दातखिळीच बसली होती. भीतीतर वाटत होती पण तसं बोललो तर आपल्याला बाकीचे दोघे भित्रा म्हणतील या भीतीने दोघेही काहीच बोलत नव्हते. सनी मात्र आता चांगलाच रंगात आला होता. “आज्जी अजून एक गोष्ट सांगा ना.” असं म्हणत त्याने नंदू आणि विनूची आणखीनच पंचाईत केली. तो असं बोलायची जणू वाटच पाहात असल्यासारखं म्हातारी म्हणाली, “सांगते पण आधी एकेक कप गरमगरम दूध प्या. थंडीमुळे गारठले असाल. इथेच थांबा मी दूध घेऊन येते.” असे म्हणून म्हातारी उठली व काठीचा आधार घेत हळू हळू चालत स्वयंपाकघरात गेली.
म्हातारी जाताच विनू उठला व सनीपाशी जाऊन म्हणाला, “सनी आपन निघायचं का हितुन? मला लय भ्या वाटायलय. ही म्हातारी काय बरी वाटत नाय.” “काय बी बोलू नगस. मला तर या आज्जीला पाहून माझ्या आज्जीची आठवन आली. अन तुला भ्या वाटत असल तर तू जा. मी हितच थांबनारे.” सनी चिडून म्हणाला. विनूने एकदा दाराच्या बाहेर पाहिले व धो धो कोसळणारा पाऊस पाहून नाईलाजाने तिथेच थांबायचं ठरवलं.
थोड्या वेळाने म्हातारी बाहेर आली व म्हणाली, “जरा कोणीतरी येऊन कप घेऊन जावा.” तसा सनी उठला व स्वयंपाकघरातील टेबलवर ठेवलेला ट्रे घेऊन बाहेर आला. म्हातारीही काठी टेकत आली व तिच्या खुर्चीवर बसली. तिघांनाही जोरदार भूक लागली होती. तिघांनी दोनच मिनिटात कप रिकामे केले. “तुम्हाला घरी जायचं नाही का रे बाळांनो.” दुध पिऊन होताच म्हातारीने विचारलं. “नाही आमी घरी सांगूनच आलोय की आज रातच्याला येनार नाही.” सनी म्हणाला. खरंतर विनूच्या घरचे परगावी गेले होते व सनी आणि नंदूने आम्ही आज रात्री विनूकडेच झोपणार आहे असं घरी सांगितलं होतं. “बर. आता पुढची गोष्ट ऐका” असे म्हणून म्हातारीने तिसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकत असताना काही वेळातच तिघांनाही अचानक गुंगी आली व काही क्षणातच त्यांना निद्रादेवी प्रसन्न झाली. झोपी गेलेल्या मुलांकडे पाहून म्हातारी ओठांच्या कडा रुंदावून हसली व तिने गोष्ट तिथेच थांबवली.
काही वेळातच एक माणूस दारातून आत आला व म्हातारीजवळ जाऊन काहीतरी म्हणाला. त्याने एकेक करत तिघांनाही ओढत स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीत आणलं. त्या खोलीत तीन खुर्च्या ठेवल्या होत्या. त्या माणसाने तिघांनाही एकेका खुर्चीवर बसवलं व त्यांचे हात पाय खुर्चीला बांधले. एक कापडाची पट्टी तोंडाभोवती बांधून त्यांची तोंडही बंद केली. खोलीच्या दुसऱ्या टोकाला एक मोठा दगड ठेवला होता. तो दगड काळ्या रंगाने रंगवला होता व त्यावर लाल रंगाने डोळे आणि ओठ रंगवले होते. कंदीलाच्या उजेडात तो दगड फारच भयानक दिसत होता.
सनी, नंदू आणि विनूला जेव्हा जाग आली तेव्हा समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहून धक्का बसला. त्यांच्या समोर त्यांचे लाडके बळवंत मास्तर उभे होते. त्या तिघांचेही हात पाय तोंड बांधले असल्यामुळे त्यांना काहीच हालचाल करता येत नव्हती. तिघेही समोर उभ्या बळवंत मास्तरांकडे आश्चर्याने पाहात होते. पण बळवंत मास्तर नेहमी सारखे वाटत नव्हते. त्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच असुरी आनंद दिसत होता. “तुम्ही म्हातारीच्या गोष्टी ऐकल्याच असतील. आता मीही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका.” असे म्हणून मास्तरांनी गोष्टीला सुरुवात केली-
ही गोष्ट गुब्बू नावाच्या एका मुलाची आहे. गुब्बू अगदी लहान असल्यापासून फारच गुबगुबीत होता म्हणून त्याला सगळे गुब्बू म्हणायचे. गुब्बूचा जन्म इथून खूप दूर एका छोट्याश्या गावात झाला होता. त्याचे वडील डॉक्टर होते. गुब्बू अगदी लहान असतानाच त्याची आई वारली. घरात गुब्बू , त्याचे वडील आणि आज्जी असे तिघेच रहात होते. गुब्बू पहिल्यापासूनच आभ्यासात फार हुशार होता. वडिलांसारखं डॉक्टर बनायचं त्याचं स्वप्न होतं. शाळेत असताना त्याला मित्र फारसे नव्हतेच. त्याच्या जाडीमूळे मुलं त्याला फार चिडवायची. त्यामुळे गुब्बू जास्तच एकलकोंडा झाला होता. गुब्बूला वाचनाची आवड होती. त्यातही इंग्रजी कथा कादंबऱ्या वाचायला त्याला फार आवडायचं. एखादं पुस्तक त्याला आवडलं तर ते वाचून पूर्ण होईपर्यंत तो जागचा हलत नसे. गुब्बू आज्जीचा फार लाडका होता. ती त्याला भुताखेताच्या गोष्टी सांगायची. आज्जीच्या कथेतील भुतांनी गुब्बूला कितीतरी रात्री झोपून दिलं नव्हतं. पण तरीही त्याला आज्जीच्या गोष्टी आवडायच्या.
तर अशा या साध्या सरळ गुब्बूच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे त्याचं आयुष्यच बदललं.
तेव्हा तो आठवीच्या वर्गात शिकत होता. शनिवारचा दिवस होता. शेवटचा तास पिटीचा होता. सगळी मुलं शाळेच्या मैदानावर जमली होती. मास्तर मुलांना कवायतीचे वेगवेगळे प्रकार करून दाखवत होते व त्यांचं पाहून मुले कवायत करत होती. गुब्बूही कवायत करत होता. त्याचं हलणार थुलथूलीत शरीर पाहून त्याच्या मागे उभी असलेली काही टारगट मुलं हसत होती. मास्तरांनी त्या मुलांना हसताना पाहिलं तसे ते हातात काठी घेऊन गेले व एकेकाच्या पोटऱ्या आणि पाठीवर काठीचा प्रसाद दिला. त्या मारामुळे ती मुलं चांगलीच कळवळली. पिटीचा तास संपला तशी सर्व मुलं पांगली. गुब्बूही मैदानावरून जात होता. ती टारगट मुलंदेखील गुब्बूच्या मागून चालत होती. एका मुलाने जो त्यांचा म्होरक्या होता त्याने म्हणजेच सतिशने मैदानावरचा एक दगड उचलला व गुब्बूच्या पाठीवर मारला तसा गुब्बू कळवळला. त्याने मागे वळून पाहिले, ती टारगट मुलं त्याच्याकडे बघून हसत होती. त्यांना पाहताच गुब्बूने चालण्याचा वेग वाढवला. तो घाबरला होता. आता सतीशने धावत जाऊन गुब्बूच्या डाव्या पायावर एक जोरदार लाथ मारली तसं गुब्बूचं अवजड शरीर खाली मातीत कोसळलं. त्याचा पाय चांगलाच ठणकत होता. सगळी मुलं गुब्बूच्या भोवती जमली व त्याच्याकडे पाहून हसू लागली. गुब्बू आता रडकुंडीला आला होता. सतीशचं लक्ष गुब्बूच्या डाव्या मनगटावर अडकवलेल्या सोनेरी घड्याळाकडे गेलं. त्याने गुब्बूच्या मनगटावरचं घड्याळ काढलं व गुब्बूला दाखवत तो म्हणाला, “आता हे घड्याळ माझं.” असं म्हणून तो त्याच्या मित्रांना म्हणाला, “चला रे. या जाड्याला पडुदे इथंच.” टारगट मुलं तिथून पळाली तसा गुब्बू उठला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते चेहऱ्यावर संताप होता.
गुब्बू घरी पोहोचला. “काय रे गुब्बू कुणाशी भांडण झालं का?” त्याचा पडलेला चेहरा व मळलेले कपडे पाहून आज्जीने विचारलं. गुब्बूने रडतच घडलेला प्रकार सांगितला. आपल्या लाडक्या नातवाची ही अवस्था पाहून आज्जीला फार वाईट वाटलं. “माझ्या सोबत ये.” असे आज्जी गुब्बूला म्हणाली व जिना चढून वरच्या मजल्यावर गेली. गुब्बूही जिना चढून तिच्या मागे गेला. समोरच्या खोलीला कुलूप होतं. या खोलीत आज्जी कुणालाच येऊन देत नसे. गुब्बूच्या वडिलांनाही या खोलीत प्रवेश नव्हता. आजीने हातातल्या चावीने कुलूप उघडलं व दरवाजा ढकलला. आतून अतिशय उग्र वास आला. आज्जी खोलीत गेली, तिच्या पाठोपाठ गुब्बूनेही खोलीत प्रवेश केला. आज्जीने ट्यूबलाईटचं बटन दाबताच खोलीत लख्ख प्रकाश पडला. खोली छोटीशीच होती. खोलीत एका कोपऱ्यात बरीच जुनी पुस्तकं ठेवली होती. समोर एक जुनाट कपाट होतं तिथे वेगवेगळ्या आकाराच्या भावल्या ठेवल्या होत्या. जमिनीवर वेगवेगळ्या आकाराच्या विचित्र आकृती होत्या. त्या सर्व आकृती भाजलेल्या काळ्या तांदळाच्या दाण्यांपासून बनवल्या होत्या. एका कोपऱ्यात वेगवेगळ्या आकाराची हाडे व कवट्या ठेवल्या होत्या. त्यांच्या बाजूला एक मोठा दगड ठेवला होता. तो दगड काळ्या रंगाने रंगवला होता व त्यावर लाल रंगाने डोळे व ओठ रंगवले होते. कपाटात खालच्या कप्प्यात काचेच्या रिकाम्या बरण्या ठेवल्या होत्या. गुब्बू आवासून पाहात होता. चेटकिणीच्या अनेक कथा त्याने आज्जीच्या तोंडून ऐकल्या होत्या पण आज्जी स्वतःच चेटकीण आहे याची त्याला यापूर्वी तिळमात्रही कल्पना नव्हती.
खोलीतून बाहेर येताच आज्जीने आजूबाजूला पाहीलं व खोलीला कुलूप लावलं. आज्जी गुब्बूकडे पाहून म्हणाली, “तू आज जे काही पाहिलस ते कुणालाही सांगायचं नाही. अगदी तुझ्या बाबांनाही नाही सांगायचं.” “तुला सतिशला धडा शिकवायचा आहे ना? मग मी सांगेल ते करायचं. करशील?” आज्जीने विचारलं. गुब्बूने मान हलवली. आज्जी पुढे सांगू लागली, “काहीही करून मला त्या सतिशचे केस आणून दे. एक केस पण चालेल. मग बघ मी काय करते.” आज्जी क्रूरपणे हसत म्हणाली.
गुब्बूच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. आज्जीने सतिशचे केस आणायला सांगितलंय पण हे कसं शक्य आहे. आधीच मला त्या सतिशची भीती वाटते. पण काहीतरी करायलाच हवं. असा बराच वेळ विचार केल्यावर त्याला एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे गुब्बू शाळेत गेला. त्याने सतिशकडे पाहिलं. गुब्बूला त्याचं सोनेरी घड्याळ सतिशच्या मनगटावर दिसलं. ते घड्याळ गुब्बूला त्याच्या बाबांनी वाढदिवसाला भेट दिलं होतं. गुब्बूने त्याच्या ठरलेल्या योजनेची मनात उजळणी केली व तो शाळा सुटायची वाट पाहू लागला. एकदाची शाळा सुटल्याची घंटा वाजली. एकेक करत मुलं वर्गातून बाहेर पडत होती. गुब्बूचं लक्ष सतिशकडे होतं. सतिशचा कंपू वर्गाच्या बाहेर आला व मैदानाच्या दिशेने चालू लागला. गुब्बूही त्यांच्या मागून जाऊ लागला. आता सतिशचा कंपू मैदानावर आला. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर गुब्बू उभा होता. तो अजूनही सतिशकडेच पाहात होता. सतिशचं लक्ष गुब्बूकडे जाताच तो म्हणाला, “काय रे ढोल्या कालचा मार कमी पडला म्हणून आज परत मार खायला आलायस?” व सगळे हसले. गुब्बू काहीच बोलला नाही. तो धावतच सतिशजवळ गेला व सतिशला काही कळायच्या आतच त्याने सतिशचे केस पकडले. गुब्बूने पूर्ण जोर देऊन सतिशचे केस ओढले तसा सतिश “आई ग…….” असा ओरडला. गुब्बूने हाताची पकड अजूनच घट्ट केली तसा सतिश अजून जोरात ओरडू लागला. सतिशला सोडवायला त्याचे मित्र धावून आले व त्यांनी गुब्बूवर लाथाबुक्यांचा वर्षाव केला. एकदाची गुब्बूची मूठ सैल झाली तेव्हा कुठे सतिशने सुटकेचा निःश्वास टाकला. बराच वेळ लाथाबुक्यांचा प्रसाद दिल्यावर ती मुलं तिथून निघून गेली. सतिशही डोकं चोळत त्यांच्या मागे चालू लागला. आज एवढा मार खाऊन देखील गुब्बू रडला नाही. मुलं निघून जाताच त्याने हाताची मूठ उघडली व हातातल्या केसांकडे पाहून तो समाधानाने हसला.
घरी जाताच गुब्बूने हातातले केस आज्जीकडे दिले. आज्जीने गुब्बूचेही थोडे केस कात्रीने कापले व ते घेऊन ती वरच्या खोलीत गेली. बऱ्याच वेळाने आज्जी खाली आली व गुब्बूला म्हणाली, “बाळ आता काही काळजी करू नकोस. उद्या शाळेत गेलास की तो सतिश समोर दिसताच त्याच्या समोर उभा राहून फक्त एकदा चुटकी वाजव. मग बघा तो कसा पळतो ते.” दुसऱ्या दिवशी शाळा सुटतात गुब्बू सतिशच्या मागे गेला. मैदानावर पोहोचताच त्याने सतिशला हाक मारली. सतिशने मागे वळून पाहिले. समोर गुब्बूला पाहताच त्याचा पारा चढला व तो धावतच गुब्बूच्या दिशेने जाऊ लागला. तो जवळ येताच गुब्बूने चुटकी वाजवली तसा सतिश जागीच थबकला. त्याला गुब्बूच्या बाजूला एक काळी आकृती दिसत होती. त्या आकृतीचा आकार माणसासारखाच होता पण ती हवेत तरंगत होती. आता ती आकृती सतिशच्या दिशेने सरकू लागली. हे पाहताच सतिश धावत सुटला. त्याच्या मित्रांना मात्र काहीच समजत नव्हतं. अखेर गुब्बू विजयी झाला होता. आता त्याला चिडवण्याचं, मारण्याचं धाडस कोण करणार नव्हता. पुढचे कित्येक दिवस सतिशला गुब्बूकडे पाहायचसुद्धा धाडस झालं नाही.
दिवस पटापटा पळत होते. गुब्बू दहावी उत्तीर्ण झाला. आज्जीच्या हाताखाली तो तंत्रविद्येत पारंगत झाला होता. आता दहावीनंतर पुढे काय हा प्रश्न होता. यावरून वडील आणि मुलात बराच वाद झाला. आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी गुब्बूच्या बाबांची इच्छा होती लहान असताना त्यालाही तसं वाटायचं. पण वय वाढलं तशा आवडीनिवडी बदलत गेल्या. इंग्रजी पुस्तकं वाचता वाचता गुब्बूच्या मनात इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण झाली होती. त्याला बी.ए करून नंतर एम. ए करायचं होतं. शेवटी वडिलांच्या हट्टाला न जुमानता त्याने अकरावीला कला शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजात गेल्यापासून गुब्बूला त्याच्या स्थूल शरीराचा जास्तच राग येऊ लागला होता. सडपातळ किंवा बळकट शरीर असलेल्या मुलांशीच मुली जास्त बोलतात हे तो पाहात होता. आता त्याने व्यायाम करायला सुरुवात केली व काही महिन्यातच त्याला स्वतःतला बदल जाणवू लागला. त्याचा आत्मविश्वासही आता वाढला होता.
सगळं चांगलं चाललं असताना गुब्बूच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना टीबी झाला होता. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती आणि जवळजवळ तीन महिने सुरू असलेली ही झुंज अखेर संपली. टीबी जिंकला होता वडील हरले होते. आता घरात गुब्बू आणि आज्जी दोघेच राहिले.
बारावी, बारावी नंतर बी.ए, बी.ए झाल्यावर एम.ए असं एकदाचं गुब्बूचं शिक्षण संपलं. आज्जीही आता थकली होती. गुब्बूला तालुक्याच्या कॉलेजातून प्राध्यापकाच्या नोकरीसाठी बोलावणं आलं होतं. त्यालाही ही संधी सोडायची नव्हती. पण आज्जीची गाव सोडायची इच्छा नव्हती. तसेच तिची तब्येतही आता फारच खालावली होती. त्यामुळे गुब्बूने त्या नोकरीवर पाणी सोडलं. तो गावातल्याच शाळेत इंग्रजी विषय शिकवू लागला.
एक दिवस आज्जी जवळच्याच एका दुकानात गेली होती. ती परत येत असताना अचानक तिला चक्कर आली व ती रस्त्यावरच कोसळली. गुब्बू तेव्हा शाळेत होता. दुकानदाराने त्याला फोन करून बोलावले. आज्जीचा श्वास अजूनही सुरू होता. तिला आता तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिच्या गळ्यावर जणू कोणी गळा दाबायचा प्रयत्न केल्याप्रमाणे लालसर पट्टे उठले होते. तिला नक्की काय झालंय हे डॉक्टरांनाही सांगता येत नव्हतं. श्वास अतिशय मंदगतीने चालू होता. तिला नक्की काय झालंय हे गुब्बूला मात्र समजलं होतं. तिची करणी तिच्यावरच उलटली होती. पण गुब्बू असा सहजासहजी आज्जीला मरू देणार नव्हता. तिला वाचवायचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. गुब्बूनेही त्याच्या मार्गाने प्रयत्नांची शिकस्त केली. पण उपयोग झाला नाही. हॉस्पिटलच्या बेडवरच आज्जीने शेवटचा श्वास घेतला.
आज्जी वारली तेव्हा गुब्बू लहान मुलासारखा रडला. पण अचानक त्याच्या डोक्यात एक विचार जन्मला. तो विचार होता आज्जीला पुन्हा जिवंत करण्याचा. त्यासाठीचा विधी त्याने आज्जीच्याच एका पुस्तकात वाचला होता. यशाची शास्वती नव्हती पण तरीही तो प्रयत्न करून पाहणार होता. आता त्याच्या समोर दोन अडचणी होत्या. पहिली अडचण ही होती की त्याला अंत्यविधी करता येणार नव्हता. कारण एकदा शरीर जाळलं की सगळंच संपलं. दुसरी अडचण सावजाची होती. त्या विधीप्रमाणे त्याला एका जिवंत माणसाचा बळी द्यावा लागणार होता. बराच वेळ विचार केल्यावर दोनीही अडचणींची तोड त्याला सापडली.
गुब्बू कडे आता जास्त वेळ नव्हता. तो हॉस्पिटलमधून निघाला. रात्रीचे दोन वाजले होते. त्याच्या घरासमोरच एक भिकारी बसायचा. रात्री तिथेच पोतं पसरून तो भिकारी झोपायचा. तो कायम दारूच्या नशेत असायचा. गुब्बू घराजवळ पोहोचला. त्याने आजूबाजूला पाहिले, सगळीकडे अंधार होता. एकाही घरात दिवा दिसत नव्हता. गुब्बू घरात जाऊन एक कापड व दोरी घेऊन आला व त्याने हळूच ते कापड झोपलेल्या भिकाऱ्याच्या तोंडाभोवती बांधले. गुब्बूने दोरीने भिकाऱ्याचे हात पाय बांधले. अजूनही भिकारी झोपेतच होता. गुब्बूने भिकाऱ्याला उचलून खांद्यावर टाकले व इकडे तिकडे पाहात अलगद एकेक पाऊल टाकत तो घरात आला. त्याने वरच्या खोलीचे कुलूप उघडून भिकाऱ्याचं मुटकुळ तिथे नेऊन टाकलं.
दुसऱ्या दिवशी त्याचे काही नातेवाईक अंत्यविधीसाठी आले होते. तसेच गावातील लोकही होते. त्या सर्वांना तो आता मोठा धक्का देणार होता. जमलेल्या सर्व लोकांसमोर गुब्बूने एक छोटं भाषण दिलं. आज्जीच्या आठवणी अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितल्या व शेवटी तो म्हणाला, “आता मी जे काही बोलणार आहे ते तुम्हाला विचित्र वाटेल पण मला बोलणं भाग आहे.” एवढे बोलून तो पुढे बोलू लागला, “काल रात्री माझी लाडकी आज्जी जेव्हा शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा तिने माझा हात तिच्या हातात घेतला व तिची शेवटची इच्छा बोलून दाखवली. तिच्या मृत्यनंतर तिच्या मृत शरीराचं दहन न करता नदीकाठी दफन करावं अशी तिची शेवटची इच्छा होती.” एवढे बोलून डोळ्यात आलेलं पाणी गुब्बूने शर्टच्या बाहीने पुसलं.
हे ऐकताच लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. हे काहीतरी भलतंच होतं. पण म्हातारी किती विचित्र होती हे गावातल्या लोकांना ठाऊक होतं. ती काळी जादू करते असाही काही लोकांना संशय होता. तसही फारसं कुणाला काही देणंघेणं नव्हतं. आज्जीच्या इच्छेप्रमाणे नदीकाठीच एक खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरण्यात आला.
सगळं काही गुब्बूने ठरवल्याप्रमाणे झालं होतं. त्याच दिवशी रात्री गुब्बू नदीकाठावर गेला. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्याने जिथे आज्जीला पुरलं होतं त्या जागी खणून आज्जीचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या वडिलांच्या लाल कारच्या मागच्या सीटवर त्याने आज्जीला ठेवलं व तो घरी परतला. घरी येताच आज्जीला उचलून त्याने वरच्या खोलीत नेलं व विधीला सुरुवात केली. साधारण दोन तासांनी विधी संपला व झोपेतून जागी झाल्यासारखी गुब्बूची आज्जी पुन्हा जिवंत झाली.
आपल्या समोर उभे बळवंत मास्तरच गुब्बू आहेत हे आता तिघांनाही कळून चुकलं होतं. साक्षात मृत्यूच त्यांच्यासमोर उभा होता.
तिघांच्याही चेहेऱ्याकडे पाहात बळवंत मास्तर म्हणाले, “तुमच्या कडे पाहून मला वाटतंय की तुम्हाला समजलय मी नक्की कोण आहे ते. हा तर आपण कुठे होतो? हा तर आज्जी जिवंत झाल्यावर गुब्बू अर्थात मी या तुमच्या गावात आलो. आज्जी जरी पुन्हा जिवंत झाली असली तरी जगासाठी ती मेली होती. त्यामूळे मी तिला माणसात आणू शकत नव्हतो. तेव्हाच मला या बंगल्याबद्दल समजलं व आज्जीच्या राहण्याची सोय झाली. आधीच हा बंगला भुतांचा बंगला म्हणून बदनाम होता त्यात मी उलट्या पायांच्या म्हातारीची अफवा पसरवून भर घातली. अजून दोन महिन्यांनी आज्जीचा दहावा स्मृतिदिन आहे. म्हणजेच आज्जीचं वाढीव आयुष्य आता फक्त दोनच महिने राहिलं आहे. अर्थात तुमच्या कृपेने ते नक्की वाढेल.” एवढे बोलून अचानक डोक्यात वेदना उसळली व गुब्बू उर्फ बळवंत खाली कोसळला.
क्रमशः