वंश
वंश


मालतीला प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिच्या पोटात वेगळाच गोळा आला. वास्तविक पाहता मूल जन्माला येते तेव्हा एक वेगळेच कुतूहल असते. आवड असते. पण मालतीच्या बाबतीत तसे नव्हते. एक तर तिची ही तिसरी वेळ होती. दोन्ही सव्वा वर्षे अंतराचे आणि हे तिसरेही तसेच. मालतीचे मन नवीन येणार्या बाळाबाबत अजिबात उत्सुक नव्हते. वेगळीच धडधड तिच्या मनात होती. पहिल्या दोन्ही वेळा कन्यका झाल्या. पहिली जन्माला आली तेव्हा माहेरचा उध्दार झाला होता. कारण तिच्या आईला पहिली तिच मालती झाली होती. मालती दिसायला खूप सुंदर हुशार होती. शिक्षणाला खर्च मग लग्नाला खर्च म्हणून तिला घरून जास्त शिकू दिले नव्हते. त्यामुळे नोकरीही नाही. सर्व पतीराजांवर अवलंबून.
दुसरी जन्माला आली तेव्हा तिचे पतीराज भेटायलाही आले नाहीत. तिच्या माहेरी दोन नंबर तिचा भाऊ होता. मग काय ! दिसायला सुंदर असली तरी काय उपयोग वंशाचा दिवा देऊ शकत नाही. तिच्या सासूबाई तर मुलाचे दुसरे लग्न करायला चालल्या होत्या. पण नशिब बलवत्तर तिचे अहोच कबूल झाले नाही.
पण मग त्या उपकाराखातर आता हे तिसर्याचे आगमन. सांगा कुठले कुतूहल आणि कुठला आनंद. डॉक्टरांनी आत घेतले. थोड्या वेळात ती प्रसूतही झाली. कोण जन्माला आले हे समजायच्या आतच तिचे शरीर थंड पडू लागले. तिची प्रकृती बिघडत चालली. तिला आय.सी.यू. मध्ये हलवण्यात आले. सह्या करून पतीराज गायब झाले होते. त्यांना बोलावण्यात आले. चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती. आत्ता पतिराज भानावर आले. मूल नको पण बायको हवी. सासूबाईंनी तोंड घातलेच. अहो पण सुनेला झाले तरी काय ? मुलगा की मुलगी. डॉक्टर म्हणाले "तुम्हाला वंशाचा दिवा मिळाला. पण त्यासाठी सुनेचा जीव वेठीला लावलात. याजागी तुमची मुलगी असती तर. . .
मनासारखे झाल्यावर सासूबाईंनाही सूनेवर प्रेम येऊ लागले. सूनेच्या जवळ जाऊन तिच्या हातात हात घेऊन लवकर बरी हो मुलगा झालाय. त्याला आपण दोघे मिळून मोठे करू. असा शब्द दिला. पुन्हा तीन मुलांची जबाबदारी आलीच.
मालतीच्या तब्येतीत सासूबाईंच्या आश्वासक शब्दांमुळे प्रगती होऊ लागली. सहाजिकच मुलगा झाल्यामुळे तिचे कोडकौतुक सुरू झाले. तिच्या मुलीही दिसावयास सुंदर होत्या. तिचा पुन्हा जन्म झाला. तिने त्या दिवशी मनाशी खूणगाठ बांधली, मुली कितीही सुंदर असल्या तरीही त्यांना शिकवायचे त्यांच्या पायावर त्यांना उभे करायचे. त्यांना जाणीवपूर्वक मोठे केले. स्वाभिमान शिकविला. वंशाच्या दिव्याचे सगळीकडून अती लाड झाले अन् तो जेमतेमच शिकला. मालतीने जरी उचल घेतली तरी ती अधून मधून आजारी असायची. मुली खूप शिकल्या. परदेशी गेल्या. जे बाबा मुलगी झाली म्हणून आले नव्हते त्यांना त्यांच्या आईला जगप्रवास घडवला. छोट्या भावाला धंदा टाकून दिला. वंशाच्या दिव्याला पणतीने सहारा दिला.
आई सतत आजारी असते म्हणून परत मातृदेशी आल्या. घरात सगळ्या कामाला बाई ठेवली. तिला पूर्ण आराम दिला. अखेर शेवटी बाबांनाही मुलीचे महत्त्व समजले. त्यांची चूक त्यांना कळली. परंतु त्यासाठी मालतीला खूप त्रास सहन करावा लागला.
पण म्हणतात ना अंत भला तो सब भला.