Swati Devale

Inspirational

4.0  

Swati Devale

Inspirational

वळण

वळण

7 mins
924


   टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार स्विकारून व्यासपीठाच्या पाय-या उतरून खाली येत असलेल्या प्राजक्ताच्या चेह-यावरचा आत्मविश्वास पाहून अनिकेत स्तिमित झाला ; ' हिच का ती प्राजक्ता , जिला काही वर्षांपूर्वी घराच्या चार भिंतीपलिकडचं जग माहित नव्हतं ! घरातली माणसं आणि स्वयंपाकघर याच्या आसपास तिचं आयुष्य संपत होतं .' असे अनेक विचार त्याच्या मनात फेर धरून नाचायला लागले . 

****

प्राजक्ता , एका ज्योतिषाची मुलगी. खेडेगावात राहणारी , कष्टाळू आणि बाळबोध वळणाची . लांबसडक वेणी , सडपातळ बांधा आणि सतेज सुवर्ण. अभ्यासात हुशार पण त्यापेक्षाही चित्रकला , पेंटींग्ज , रांगोळ्या , भरतकाम करण्यात तिचा हात ज्या सराईतपणे चालायचा त्याला तोड नव्हती . ग्रॅज्युएट झाल्यावर माई आणि आप्पांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. काही ठिकाणी पत्रिका जुळायची नाही तर काही ठिकाणी प्राजक्ताचं बाळबोध वळण आड यायचं.  जसजसं वय वाढत होतं तसतसं माईंची काळजी वाढतच होती . ' मुलीची जात . चेहरा थोराड दिसायला लागला की पुढे अजून कठीण होईल सगळं. इतकी गुणी मुलगी , तिला साजेसा एकही मुलगा मिळू नये ? ' असं वारंवार माई आप्पांना विचारायच्या . घरच्या देवांना साकडं घालायच्या , उपासतापास करायच्या . आप्पा सुद्धा थकले होते. प्राजक्ताच्या पत्रिकेत दोष असा नव्हता पण विवाहयोग उशीरा होता हे त्यांनी पाहिले होते . त्यामुळे " तुम्ही काळजी करू नका हो . योग आल्याशिवाय या गोष्टी जुळत नाहीत. " असा ते माईंना धीर देत . 

****

अनिकेत प्राजक्ताला बघायला आला. पाहताक्षणीच प्राजक्ता त्याला आवडली . अनिकेत शहरात राहणारा सुस्वभावी तरूण . कर्तबगार आणि सचोटीने वागणारा. गरिबीतही नेटाने शिक्षण घेऊन आता ताठ मानेने उभा राहिलेला. आप्पांनी माईंना समजावलं , " रंग रूप पाहू नका . पत्रिका मी पाहिलेली आहे . चांगली आहे. मुलगा निर्व्यसनी आणि सुस्वभावी आहे . प्राजक्ताला नीट सांभाळेल. काळजी करू नका . घरातली लोकंही चांगली आहेत ." आप्पांच्या होकारात माईंनी आपली संमती मिसळली. प्राजक्ताच्या मनाचा कौल घ्यायला आता वेळ नव्हता. देण्याघेण्याचे ताल सांभाळत आप्पा - माईंनी प्राजक्ताचं यथाशक्ती कन्यादान केले .

****

अनिकेत प्राजक्ताचा थाटात गृहप्रवेश झाला. रुखवतात तिने सुंदर भरतकाम केलेल्या बेडशीटचं , रंगवलेल्या फ्लाॅवरपाॅटचं , पेटिंग्जचं सगळे कौतुक करत होते . नणंदा , दीर , जावा , सासू , सासरे आणि पुतण्या अशा भरलेल्या घरात प्राजक्ता वावरत होती . तिच्या भरतकामाचं , पेंटींग्जचं कौतुक सासरची सगळी मंडळी भरभरून करत होती . दारापुढे प्राजक्ता रांगोळी काढायची आणि अनिकेतचे कौतुक , आनंद अन् प्रेमाने भरलेले डोळे त्या रांगोळीचे रंग अधिक गडद करायचे . प्राजक्ताचं मन सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होतं . लग्नाला एक दोन वर्ष झाली आणि सगळ्यांनाच गोड बातमी ऐकायची ओढ लागली. दिवसभरातून एकदा तरी हा विषय निघायचा . सुरुवातीला अशा चेष्टेने लाजणारी प्राजक्ता आता कानकोंडी व्हायला लागली . सासूबाईंनी सांगितलेली व्रतवैकल्यं , जावेने सांगितलेले उपासतापास प्राजक्ता मनापासून करायची पण गुण येतच नव्हता. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि घरीदारी सतत निघणा-या याच विषयांनी प्राजक्ताचे दिवस व्यापू लागले . स्वयंपाकघरातल्या कामात आणि सगळ्याचं मायेने करण्यात तिने स्वतःला गुंतवून घेतले होते. भरलेल्या घरात तिचा कामात कसा दिवस संपायचा ते तिचं तिलाच कळत नव्हतं. ताण असह्य झाला तरच अनिकेतसमोर तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागत . अनिकेत तिची समजूत काढायचा . कधीतरी माई आप्पांना फोन करून मन मोकळं करायची.  

आप्पांना विचारायची , " आप्पा , माझ्याच नशिबात का हो असं . सगळं आहे पण आई होण्याचं सुख नशिबातच नाही का माझ्या . मला नाही आता सहन होत . तुम्ही तरी काहीतरी उपाय सांगा. " आप्पा तरी काय सांगणार . तिचं दुःख त्यांना समजत होतं . 

****

प्राजक्ताची पेंटींग्ज, कलाकुसरीच्या वस्तू सगळं आता माळ्यावर गेलं होतं . कधीतरी तिचं लक्ष माळ्यावरच्या त्या वस्तूंकडे जायचं आणि प्राजक्ताला वाटायचं , ' आपल्या आयुष्यालाही आपल्याला हवे तसे रंग देता आले असते तर ! ' निराशेने , काळजीने तिचं मन अंधारून जायचं . 

****

" प्राजू  , अगं प्राजक्ताच नं तू ? ओळखलंस का ? " पुतणीला क्लासहून आणायला चाललेल्या प्राजक्ताने आवाजाच्या दिशेनं पाहिलं. खळखळून हसत तिची बालमैत्रीण सरोज गाडीतून तिला हात करत होती . 

" अगं सरू , तू ? इकडे कुठे ? " 

दोघींनी भर रस्त्यात एकमेकींना मिठीच मारली . 

" काय गं कसल्या तंद्रीत चालली आहेस ? किती हाका मारल्या मी तुला तर तुझं लक्षच नाही. किती दिवसांनी भेटतोय ! कुठे असतेस ? काय करतेस ? आम्ही गाव सोडलं नंतर काही भेटच नाही आपली "

सरोजच्या बोलण्याच्या खळखळाटाने प्राजक्ता गांगरूनच गेली . 

" अशी काय डोळे विस्फारून पाहते आहेस ? " - इति सरोज

" अगं काही नाही. बरेच वर्षांनी भेटलो नं ! काय बोलावं कळत नाहीये. ऐक नं आत्ता मी जरा गडबडीत आहे . पुतणीला क्लासहून आणायला चालले आहे. " सरोजला आश्चर्यच वाटलं प्राजक्ताच्या उदासीन बोलण्याचं . 

" बरं , बरं , हे बघ हे माझं कार्ड . तुला वेळ झाला की फोन कर . भेटू परत . " सरोजने प्राजक्ताच्या हातात आपलं कार्ड कोंबलं. तिच्या दृष्टीआड होणा-या गाडीकडे प्राजक्ता काही क्षण बघत राहिली . 

****

आज अंथरुणावर पडल्या पडल्या प्राजक्ताला सरोजबरोबर गेलेला प्रत्येक क्षण आठवत होता. दुसरीपासून बारावीत असेपर्यंत त्या एकत्र होत्या. सरोज आणि प्राजक्ता म्हणजे एक जीव - दोन शरीरं , एक मन - दोन ह्रदयं . किती रुसवे फुगवे , किती भांडणं पण त्यापलिकडचं दोघींमधलं नितांत प्रेम, ओढ . दिवस मावळेल पण यांच्या गप्पा संपायच्या नाहीत. सरोजच्या बाबांची बदली झाली तेव्हा एकमेकींच्या गळ्यात पडून किती रडल्या होत्या त्या . मग सरोज दुस-या शहरात गेली शिकायला . दोघींच्या मैत्रीला अचानकच खीळ बसली. मधल्या काही वर्षात हे सगळे बालपणीचे सुंदर क्षण प्राजक्ताच्या हातून निसटून गेले होते. 

****

" हॅलो , मी प्राजक्ता करंदीकर बोलतेय. सरोज मॅडमशी बोलायचं होतं. " काहीसं बिचकतच प्राजक्ताने सरोजच्या कार्डवरचा नंबर लावला होता. तिची गाडी , ऐट पाहून प्राजक्ता दबकलीच होती . 

" अगं प्राज्ञा , मी सरूच बोलतेय . बोल कधी भेटायचं ? " सरोजच्या बोलण्यापाठोपाठ तिचं खळाळतं हसणं ऐकलंआणि प्राजक्ताचा जीव एकदम मोकळाच झाला.  

****


" सरोज मॅडमना भेटायचं होतं. " चकचकीत ऑफीसमधल्या सुंदर रिसेप्शनिस्टला प्राजक्ताने सांगितलं.  

" आपण प्राजक्ता मॅडम नं ! मॅडम आपली वाटच बघतायेत. या . " त्या पाॅश ऑफीसमध्ये आपण अगदीच ऑड मॅन आऊट आहोत असंच तिला वाटत होतं . " या मॅडम , प्राजक्ता मॅडम , प्लीज या . " रिसेप्शनिस्टच्या आवाजाने भानावर आलेल्या प्राजक्ताने सरोजच्या केबिनमध्ये प्रवेश केला. 


" प्राजू , ये गं बैस . मोना , दोन काॅफी पाठवतेस ? आणि मी सांगेपर्यंत प्लीज कुणाला आत पाठवू नकोस. आम्ही खूप गप्पा मारणार आहोत. खूप वर्षांनी भेटलो आहोत आम्ही जिवाभावाच्या मैत्रीणी ." मोना गेली . प्राजक्ताला फार संकोचल्यासारखं झालं होतं.  

" सरोज , अगं तुझी कामं असतील तर आपण नंतर भेटू नं ! "

" तू वेडी आहेस का ? अशी काय औपचारिक बोलतेयस. ते सोड . काय करतेस ? कुठे राहतेस ? सांग नं मला आणि तुझं पेंटींगचं वेड कुठल्या थराला गेलंय ? " डोळे मिचकावत सरोजने विचारलं आणि प्राजक्ताचे डोळे काठोकाठ भरून आले . 

' आता काय सांगायचं हिला ? गाव सोडून जाताना सरोजने आर्किटेक्ट व्हायचं आणि प्राजक्ताने कमर्शिअल आर्टिस्ट व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. एकमेकींना तसं वचन दिलं होतं. आज आपलं आयुष्य कोणत्या वाटेवर उभं आहे हे कसं सांगायचं सरोजला ? ' 

प्राजक्ताने 17 वर्षात सोसलेली प्रत्येक वेदना सरोजने समजून घेतली. 

" प्राजू , आता मागचं सगळं सोड . आत्ता तुझं रूटीन काय आहे ? दिवसभरातले दोन तास तू काढू शकतेस का स्वतःसाठी ? काढच . माझ्यासाठी , आपण मिळून पाहिलेल्या स्वप्नांसाठी . प्लिज नाही म्हणू नकोस. आपण परत भेटू. मला तुझी थोडी मदत हवी आहे. " सरोज आसुसून बोलत होती . 

" मी ? मी काय तुला मदत करणार ? सरू , नको भरीला पाडूस . आपण भेटू पण मी मदत वगैरे नाही गं करू शकणार प्लिज. "  

प्राजक्ताला मधेच तोडत सरोज म्हणाली ," बरं , भेटू तर खरं . मग बघू . " 

****


सरोजशी बोलणं झाल्यापासून प्राजक्ता विचारात पडली होती . ' काय मदत हवी असेल सरोजला माझी ? आणि दोन तास कशासाठी वेळ काढायचा ? ' 

****


" हे बघ प्राजू , ही साईट . इथे एक आर्ट गॅलरी उभी करण्याचं प्रोजेक्ट मिळालंय मला. येत्या 2-3 महिन्यात ही आर्ट गॅलरी बांधून पूर्ण होईल. पण तिथे मोक्याच्या ठिकाणी लावायला काही युनिक पेंटींग्ज मला हवी आहेत . फ्रेश आणि एकदम नवी. मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे इथे तुझी मला मदत हवी आहे. साधारण पाच पेंटींग्ज हवी आहेत . पण युनिक हवीत . तुझ्या स्टाईलची . " 

" अगं काहीतरी काय . गेल्या 15 वर्षांत ब्रश हातात सुद्धा धरला नाहीये मी " प्राजक्ता संकोचून म्हणाली. 

" मग आता धर . दिवसभरातले दोन तास काढ . नाही म्हणू नकोस. तू प्रयत्न केलास तर नक्की मिळतील तुला हे दोन तास. बघ विचार कर. प्लिज आपल्या मैत्रीसाठी. एकच सांगते इथे लागतील तर ती तुझीच पेंटींग्ज. मी थांबेन तुझ्यासाठी. " सरोजच्या बोलण्यातला निर्धार जाणवून 

प्राजक्ताला एकदम हतबल झाल्यासारखे वाटले . 


ती अनिकेतशी बोलली . पण तो म्हणाला, ' जमणार आहे का तुला सगळं घरचं सांभाळून ? कशाला उगीच जबाबदारी घेतेस नसती ! '

अनिकेतच्या या बोलण्याने खट्टू झालेलं तिचं मन पुन्हा पुन्हा सरोजने दाखवलेल्या स्वप्नांकडे ओढ घेत होतं .

****


सरोजच्या रिसेप्शनिस्टने , मोनाने , प्राजक्ताला लगेच ओळखलं आणि फोनवरच मॅडमची परवानगी घेऊन तिला केबिनमधे जायला सांगितलं.  

" झाला तुझा निर्णय ? मी थांबलेय तुझ्याशी. " जवळजवळ 3 महिन्यांनी आपणहून आलेल्या प्राजक्ताकडे ती अपेक्षेने पहात होती . 

" बघ जमली आहेत का तुला हवी तशी ? " प्राजक्ताच्या डोळ्यातली फुलपाखरं सरोजला जाणवली. तिचे डोळे आनंदाने चमकले . प्राजक्ताच्या हातातलं बाड बघून ती ओरडलीच.  

" प्राजू ऽऽऽऽ , अगं तू पेंटींग्ज आणली आहेस ? कसली ग्रेट आहेस तू ! " सरोजने ती पेंटींग्ज पाहिली आणि गेल्या 15 -16 वर्षांत मुग्धाने हातात ब्रशही धरलेला नाही यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.  

" कसली ग्रेट आहेस यार तू " सरोज पुन्हा पुन्हा त्या अप्रतिम पेंटींग्जकडे पहात होती . प्राजक्ताच्या 

चेह-यावरचा आनंद , समाधान याला तोड नव्हती . 

****

आज त्याच आर्ट गॅलरीच्या उद्घाटन सोहळ्यात सरोजने प्रमुख अतिथींच्या हस्ते प्राजक्ताचा सत्कार केला . त्या दोघींनी पाहिलेल्या स्वप्नांबद्दल सरोज जेव्हा भरभरून बोलली तेव्हा प्राजक्ताला वाटलं आत्ता तर आपल्या आयुष्याला खरी सुरुवात झाली आहे. अनिकेतच्या चेह-यावर आश्चर्य, आनंद आणि अभिमान यांचं सुरेख मिश्रण झालं होतं .


 प्राजक्ताच्या आयुष्यात एक सुंदर , हसरं , रंगीबेरंगी वळण आलं होतं.  

नवी स्वप्नं , नवी उमेद आणि नवी वाट .



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational