STORYMIRROR

Swati Devale

Others

2  

Swati Devale

Others

गडकोट

गडकोट

4 mins
39

दर्शनदादांची रोहिडा ट्रेकची सूचना destination Nature या आपल्या ग्रूपवर पोस्ट झाली. खूप दिवसांपासून कुठेतरी जावं असं मनात होतं . पण नुसतं कुठल्या तरी फार्म हाऊसवर जायचं , खायचं प्यायचं , नाचायचं, मजा करायची याची मला आणि श्रेयाला फारशी आवड नाही. त्यात दर्शनदादांबरोबर गडावर जायला मिळतंय म्हणजे माहितीचा खजिना आपल्यापुढे रिता होणार याची खात्री असल्याने रोहिडा गडावर जायचं नक्की ठरलं. 

शनिवारी दर्शनदादांनी ग्रूपवर साहित्याची यादी टाकली. आम्ही त्याप्रमाणे पटापट सॅक भरल्या. शनिवारी रात्री अजून न पाहिलेल्या गडाची स्वप्नं बघत झोपी गेलो. 


रविवारी पहाटे साधारण 5.15 वाजता तयार झालो. इतर वेळी चार चार हाका मारल्याशिवाय न उठणारी श्रेया आज मात्र गजर वाजल्याक्षणी ताडकन् उठून direct दात घासायला पळाली. गाडी भोरच्या दिशेने पळायला लागली आणि इतके दिवस लॉकडाऊनमुळे मरगळलेलं मन मोकळं व्हायला लागलं. गाडीत चविष्ट सँडविचचा नाष्टा केला. गाडी पायथ्याला पोहोचली. तिथे परत चहा आणि गरमगरम वडापाव. संतुष्ट होऊन गड चढायला सुरुवात केली. 


रोहिडा चढण्यासाठी 2 मार्ग आहेत त्यापैकी बाजारवाडी गावातून जाणारी वाट दर्शनदादांनी निवडली होती. रोहिडा यादवकालीन किल्ला / गड आहे. 

रोहिडा हा गड पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना दिला परंतु 1670 साली तो परत जिंकून स्वराज्यात आणला. भोरच्या पंतसचिवांकडे या गडाची जबाबदारी होती . 


गडाची चढण तीन टप्प्यातली आहे. सुरवातीला थोडी खडी चढण , मधे सपाटी आणि शेवटी परत खडी चढण आहे. शेवटचा टप्पा पार करताना जरा दमछाक होते. गड चढताना भणाण वारा , आजुबाजूला हिरवी मखमल , पाय सटकतील की काय असे दगडगोटे, खडकांची अवघड वाट तुम्हाला स्वतःचं वय विसरायला लावते. 

 

गडाला तीन दरवाजे आहेत. दुस-या दरवाजाच्या उजवीकडे एक भुयारी टाकं आहे. पावसाचं पाणी दगडातून झिरपल्यामुळे नैसर्गिकरीत्या शुद्ध होऊन ते त्या टाक्यात जमा होतं. त्या टाक्यासमोर एक छोटा झरोका आहे . सूर्याची कोवळी किरणं टाक्यातल्या पाण्यावर पडून पाण्यातले अनावश्यक जिवजंतू नष्ट व्हावेत पण प्रखर किरणांमुळे पाण्याची शुद्धता नष्ट होऊ नये अशा पद्धतीने हे टाकं आहे. अर्थात हे निरीक्षण आणि अभ्यास दर्शनदादांचा. 


काही अंतरावर भक्कम असा तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या दगडी चौकटीवर चंद्र , सूर्य , कमळं अशा कोरीव प्रतिमांचे नक्षीकाम आहे. हे नक्षीकाम यादवकालीन कलेची साक्ष आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हत्तीचे दगडातील शिर आहे. मराठी आणि फारसी भाषेतील शिलालेख आहेत. दरवाजे काटकोनात असून पायथागोरसचा सिद्धांत इथे वापरलेला दिसतो. त्या काळात बांधकामासाठी किती प्रगत दृष्टीकोन होता त्याबद्दलची दर्शनदादांनी दिलेली माहिती ऐकून

 

भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धिच्या देशा 

शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा


या गोविंदाग्रजांच्या ओळींची आठवण होत होती. आधुनिक आर्किटेक्चर्सनी खरोखरच गडांच्या या बांधणीचा अभ्यास केला तर त्यांना अनुभवांचं एक समृद्ध दालन खुलं होईल. तिस-या दरवाजातून आत गेलं की समोर भग्नावस्थेतील सदर आणि साधारण डावीकडे किल्लेदाराचा वाडा दृष्टीस पडतो. 


तिथून पुढे रोहिडमल्लचे मंदिर आहे. मंदिरातील रोहिडमल्लची दर्शनदादांनी सांगितलेली पौराणिक कथा ऐकण्यासारखी होती. मंदिरासमोर एक पाण्याचं टाकं आहे, दीपमाळ आणि चौकोनी आकाराची थडगी आहेत. त्या थडग्यांवर शिवलिंग आहेत. थडगी म्हणण्यापेक्षा त्यांना समाधीस्थळं म्हणता येतील. स्त्रियांची आणि पुरुषांची वेगवेगळी समाधीस्थळं ओळखता यावीत म्हणून त्यावरची शिवलिंगही वेगळी आहेत. 


शिरवले , पाटणे , दामगुडे, वाघजाई, फत्ते आणि सदर असे 6 बुरुज आहेत. त्याच वेळी सिंहगड-राजगड-रोहिडा-केंजळगड-कमळगड-चंदन-वंदन-वैराटगड-अजिंक्यतारा-भैरवगड-पन्हाळा अशी गडांची सलग रांग आणि त्या काळात या गडांवरून शब्दांविना होणारं संदेशवहन याबद्दल ऐकताना खूप भारी वाटत होतं. 


वाटेत चुना तयार करण्याची एक गोलाकार चक्की आम्हाला दिसली. पूर्वी बांधकाम करताना जो चुना तयार करायचे तो कसा केला जायचा , त्यात काय काय विशिष्ट पदार्थ वापरायचे , किती तास तो चुना तयार केला जायचा , चुना तयार करण्यासाठी असणारी दोन दगडी चाकं फिरवायला रेडे का वापरले जायचे अशी सगळी माहिती घेऊन आम्ही टाक्यांची सलग रांग बघायला पुढे गेलो. 


टाक्यांची रचना , बांधणी , शास्त्रीय दृष्टीकोन, गडावर असणारी पाण्याची मुबलकता , त्याचं महत्त्व, नैसर्गिक जलशुध्दीकरण प्रक्रिया हे सगळं प्रत्यक्ष दर्शनदादांकडूनच ऐकायला हवं. रोहिड्यावरचं गार पाणी बाटल्यांमधून भरून घेतलं. हे पाणी दर्शनदादांनी कशा प्रकारे अतिशय कौशल्याने आम्हाला काढून दिलं ते सुद्धा प्रत्यक्ष पाहण्यासारखं आहे. 


रोहिड्यावरच्या एका बुरुजावरून कुजबुजत बोललं तरी काही किलोमीटर अंतरावर स्पष्टपणे ऐकू येणारा आवाज आम्ही अनुभवला तेव्हा अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले. 


जवळपास 3 वाजता परत मंदिरात आलो. सुग्रास साधं पण भरपेट जेवण केलं. 4 वाजता उरलेला एक बुरुज आणि त्या बुरुजाच्या थोड्याच अंतरावर असणारं टाकं पहायला गेलो. या बुरुजावरून लांब पल्ल्याची तोफ डागली जायची. ही तोफ बांधण्यासाठीचा उंच गोलाकार दगडी कट्टा पाहिला. तोफ डागल्यानंतर त्याचा होणारा महाप्रचंड आवाज आणि उष्णता यापासून जवळच असलेलं टाकं कसं उपयोगी पडत असे हे दादांनी सांगितलं.   


साधारण 5 च्या सुमारास गड उतरायला सुरुवात केली. समोर वाघजाईचा डोंगर , मागे राजगडचा बालेकिल्ला पावसाळी ढगांनी वेढलेला दिसत होता. मन तृप्त होऊन सुखावलं होतं . मावळतीच्या किरणांनी उतरणीची वाट सोनेरी झाली होती. वाटेत घराकडे जाणा-या गाईगुरांच्या गळ्यातल्या घटांचा आवाज येत होता. मधेच काळ्या ढगांना पाहून पावसाची ओढ लागलेल्या मोरांचा केकारव ऐकू येत होता. 


Rate this content
Log in