Swati Devale

Others

2  

Swati Devale

Others

भ्रमंती

भ्रमंती

3 mins
140


अनेक दिवसांपासून श्री. दर्शन वाघ यांच्या ऐतिहासिक पोस्ट, गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीचे फोटो बघत होते. रविवारी त्यांच्याबरोबर जायचा योग आला. सकाळी 7 वाजता शिवाजी पुतळा, कोथरूडहून वय वर्ष 1.5 ते 75+ अशा वयोगटातील इतिहासप्रेमी आणि ड्रायव्हरकाका यांनी सज्जनगडच्या दिशेने कूच केले. काहीजण दर्शनदादांबरोबर यापूर्वी सहलीला जाऊन आले असले तरी आमची एकमेकांशी ओळख नव्हती. दर्शनदादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी आमची ओळख करून दिली. वयाप्रमाणे सर्वांचीच काम करण्याची क्षेत्रं सुद्धा खूपच वेगवेगळी होती. 


गाडी थोडी मार्गस्थ झाली आणि दर्शनदादांनी त्यांच्या पोतडीतले एकेक ऐतिहासिक अनुभव , ठिकाणं - त्यामागचा इतिहास सांगायला सुरवात केली. किल्ले कसे आणि कशासाठी निर्माण झाले , शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेच्या सुरवातीलाच तोरणा किल्ला का जिंकून घेतला , सज्जनगडाची इतर दोन नावे कशी पडली अशा अनेक गोष्टी ते सांगत होते. असं वाटत होतं की आपण पहिल्यांदाच सगळा इतिहास या दृष्टिकोनातून ऐकत आहोत. दर्शनदादांचं बोलणं एक समृद्ध करणारा अनुभव होता. 


भोरच्या वाटेवर एका विजयस्तंभाच्या ठिकाणी आम्ही थांबलो. अतिशय दुर्लक्षित असा हा स्तंभ असला तरी त्यामागे असलेला इतिहास जेव्हा दादांनी सांगितला तेव्हा अशी ठिकाणं आपण नीट जतनही करू शकत नाही याबद्दल फार खंत वाटली. त्या स्तंभाच्या खालच्या चौथऱ्यावर भोर संस्थानाकडे असलेले किल्ले, त्यांची दिशा - अंतर यांचे उल्लेख कोरलेले आहेत. 


पुढे एका उत्तम हाॅटेलमधे भरपेट नाष्टा झाला. सज्जनगडाकडे जाताना पुन्हा शाळेत इतिहासात कधीही न ऐकलेल्या आणि वाचलेल्या ऐतिहासिक घटनांची, माहितीची मेजवानी सुरू झाली. सज्जनगडावर लिहिलेल्या एका श्लोकाचा अर्थ दर्शनदादांनी अतिशय उत्कृष्टपणे स्पष्ट करून सांगितला. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींचे स्थान , त्याचे भौगोलिकदृष्ट्या महत्त्व अशी माहिती ऐकत असताना कल्याणीने (दर्शनदादांची


पत्नी : या सहलीत छान मैत्रीण झाली.) पुन्हा सॅन्डवीचचा खाऊ पुढ्यात ठेवला. चंगळ चालली होती मुलांची आणि आमची पण . 


साधारण 12 वाजता सज्जनगडावर पोचलो. सुट्टीचा दिवस असल्याने खूप गर्दी होती. दरवाजापाशी पोचता पोचता माहितीचा खजिना रिता होत होता. जांभा दगड, दगडाखालून येणारं पाणी आणि त्यामागचं शास्त्रोक्त कारण , दरवाजाला लागून असलेली कमान , त्यामागचं आर्किटेक्चर, कमानीची रचना अशी बारीकसारीक माहिती लक्षात ठेवणं आणि मुलांना समजेल अशा पद्धतीने ती समजावून सांगणं हे दर्शनदादांचं कौशल्य hat's off . खरं तर मुलांबरोबर आम्हाला पण पुष्कळ नवीन माहिती मिळत होती. 


समाधीचं दर्शन घेतल्यावर उरमोडी नदीवरचं धरण दिसतं त्या पाॅईंटवर गेलो. हिरवाईने नटलेला निसर्ग , निळ्या ढगांचं प्रतिबिंब पडलेलं नितळ पाणी , हवाहवासा वाटणारा झुळझुळणारा वारा आणि अतिशय उत्साहाने भरलेला आमचा इतिहासप्रेमींचा गट . अजून काय हवं होतं ! खरं तर कुणालाच तिथून हलावसं वाटत नव्हतं पण शेवटी वेळ आपलं ऐकत नाही. जेवणासाठी गडाखाली थांबलो. साधं सात्विक आणि चविष्ट जेवण . गडावरच्या पाण्यातही काही वेगळीच जादू असते म्हणतात ते खरेच आहे. कल्याणी जातीने सगळे नीट जेवतायेत नं , सगळ्यांना जेवण आवडतंय नं हे बघत होती. 

चाळकेवाडीला पोचलो तर समोर प्रचंड पवनचक्क्या स्वागतासाठी उभ्या. पवनचक्क्यांबद्दल सांगता सांगता दर्शनदादांनी एक दगड सहज उचलला तर छोट्या घोणसमावशी छान झोपलेल्या दिसल्या. आधी दचकल्या मग सळसळत त्या निघूनही गेल्या. मुलं तर वारा प्यायलेल्या वासरासारखी हुंदडत होती. 


थोडा वेळ पावसानेही हजेरी लावली. ठोसेघरचा अनुभव विलक्षण होता. मागे एकदा ठोसेघरचा धबधबा पाहिला होता लांऽऽबून पण यावेळी अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटलं. धबधब्याचे तुषार अंगावर घेत थोडा वेळ तिथे थांबलो .


परतीचा प्रवास सुरु झाला. मनातल्या मनात दर्शनदादा आणि कल्याणीबरोबर पुढच्या सहलीचे बेत आखता आखता सगळ्यांची मान गाडीच्या वेगाच्या तालात कधी डुलक्या घ्यायला लागली ते कळलंच नाही. 


Rate this content
Log in