Swati Devale

Inspirational

4.7  

Swati Devale

Inspirational

पत्र

पत्र

2 mins
370


"आई, आईऽऽऽऽ हे बघ नं कसं वाटतंय ?" 

"हे मागे पुढे करता येतंय का बघ गं आई!"

"आई, ऐक नं. हे ग्रिटिंग केलंय ते आमच्या ताईंना दाखवलं. खूप आवडलं त्यांना. "


पियू हॉस्पिटलमध्ये गेले तीन आठवडे काही न काही वस्तू करून पाठवत होती. केदार सुद्धा तिला फोनवर फिडबॅक देत होता. लहान लहान मुलांना कागदी खेळणी आवडत होती. थोड्या मोठ्या मुलांना पियूने लिहिलेलं पत्र वाचून छान वाटत होतं. तिने केलेली ग्रिटिंग्ज आणि त्यात लिहिलेले मेसेज तर हॉस्पिटलमध्ये फारच प्रसिद्ध झाले होते. अजून गोष्टी ऐकवायचं जमलं नव्हतं पण केदार ते जमवण्याच्या प्रयत्नात होता. ऑक्सिजन, इंजेक्शन, औषधं, ताण या सगळ्या विषयांपेक्षा वेगळ्या विषयावर वॉर्डात चर्चा होत होती. तब्येत सुधारलेल्या मुलांना डिसचार्ज द्यायची वेळ आली की पियूने तयार केलेली ग्रिटिंग्ज त्यांना हातात दिल्यावर मुलांच्या चेह-यावरचं स्मितहास्य पाहून हॉस्पिटल स्टाफला पण जरा छान वाटतंय हे केदारकडून ऐकल्यावर मला फार मस्त वाटलं. 

हे सगळं ऐकून पियूचा उत्साह खूप वाढला होता. तिचं कंटाळणं , चिडणं आणि मग बाबाची आठवण येतेय म्हणून रडणं तर कुठल्या कुठे पळून गेलं होतं. पियू खूश होती म्हणून मी पण खूश होते. माझं वाचन होत होतं , माझी काऊंन्सिलिंगची सेशन्स घेण्यासाठी मला पुरेसा वेळ मिळायला लागला. इतर वेळी आमच्या गप्पा, खेळ वगैरे चालूच होतं . 

 

बेडवर गाढ झोपलेल्या आणि झोपेतही आनंदी दिसणा-या पियूकडे पाहिलं तर आत्ताही तिच्या हातात हॉस्पिटलमध्ये पाठवायचं तिच्या वळणदार अक्षरात लिहिलेलं पत्र होतं. मी ते तिच्या हातातून काढून घेतलं आणि सहज वाचायला लागले,

प्रिय , 

कसे आहात तुम्ही ? 

 मी तुमची छोटीशी मैत्रीण. माझ्याकडे सुपर पॉवर आहे . ती सुपर पॉवर मी तुमच्यासाठी वापरायचं ठरवलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की लवकर बरे होणार. 

पण माझी सुपर पॉवर तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही आनंदी असता😊

म्हणून माझ्याशी करा मैत्री , आनंदाशी करा गट्टी 

टेन्शनशी करा कट्टी म्हणजे होईल कोरोनाची छुट्टी

मग आजपासून आपल्या मैत्रीचा हाच जादूचा मंत्र आहे . आता जेव्हा जेव्हा तुम्ही मस्त हसाल तेव्हा तेव्हा माझी सुपर पॉवर ऑन् होईल. म्हणून हसत राहा😊

तुमची 

छोटी मैत्रीण  


पियूचं पत्र वाचून माझे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. छोटंसं पत्र, 10 वर्षांच्या मुलीची साधीशीच भाषा, अनोळखी पेशन्टस् तरीही त्यांच्याबद्दलची आत्मीयता ओतप्रोत भरलेली. खरंच पत्र म्हणजे नुसती अक्षरं नसतात. तो असतो संवाद हृदयाने हृदयाशी बांधलेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational