Swati Devale

Inspirational

4.5  

Swati Devale

Inspirational

बंध नात्याचे

बंध नात्याचे

3 mins
309


"अनु, पियू उठली का गं ? जरा अर्जंट काम होतं " केदारचा सकाळी इतक्या लवकर फोन आल्यामुळे तसंच काहीतरी तातडीचं असणार हे नक्कीच होतं. 

" नाही उठलीये अजून. का रे , उठवू का ? काय झालं ? " मी काळजीने विचारलं. 

"उठवतेस का? मला जरा तिच्याशी बोलायचं आहे लगेच. बघ नं उठतेय का ? म्हणजे उठवंच." केदारच्या बोलण्यातला इतका हळवा स्वर मी पहिल्यांदाच ऐकत होते. 

"हो हो उठवते. 5 मिनिटात करते तुला परत फोन." मी घाईघाईने बेडरूमकडे वळले. 

"पियू बाळा , ए पियुड्या , उठ गं मनू. बाबाने तुला अर्जंट फोन करायला सांगितला आहे. " 

बाबाचं नाव ऐकताच पियू पटकन बेडवर उठून बसली. 

"आई, बाबा आला घरी ?" 

"अगं नाही. त्याने उठल्या उठल्या तुला फोन करायला सांगितला आहे. काहीतरी अर्जंट आहे म्हणत होता. उठलीयेस का तू पूर्ण ? मी फोन लावू का बाबाला?" 

केदारला फोन लागेपर्यंत पियू नीट जागी झाली होती. 

"हॅलो बाबा, गुड मॉर्निंग " पियू हसत हसत म्हणाली.

" गुड मॉर्निंग पियूड्या. सॉरी बाळा तुला झोपेतून उठवावं लागलं. ऐक नं. माझं एक महत्वाचं काम आहे. करशील का?"

"सांग नं बाबा. असं काय बोलतोयस?" 

"अगं मागच्या आठवड्यात एक छोटासा 5 वर्षांचा मुलगा आपल्या दवाखान्यात ॲडमिट झालाय. मागच्या गुरुवारी त्याला तू केलेलं ते कागदी मांजर दिलं त्याला खेळायला. पुढे मागे करणारं. त्याला फार आवडलं ते. पण आता आज तो सकाळपासून सारखा रडतोय. त्याला तुझ्याशी बोलायचंय. छोटी मैत्रीण पाहिजे , मैत्रीणीशी बोलायचंय म्हणून हट्ट करतोय. तर तू बोलशील का त्याच्याशी ?" 

केदारच्या आवाजात पियूवर अकारण वयाच्या मानाने जास्त ओझं टाकतोय याचं गिल्ट जाणवत होतं. मलाही खरं तर पियूवर या सगळ्याचा ताण येतोय की काय असं वाटतंच होतं. तिचं वय बघता तिचं बालपण असं अकाली प्रौढत्वाकडे ढकलण्यात काहीच अर्थ नव्हता. 

" अरे केदार, त्या मुलाची आई वगैरे असेल नं त्याच्याबरोबर. त्यांना समजवायला सांग नं ! पियू ओळखतही नाही त्याला. ती काय बोलणार त्याच्याशी?" 

"आई बाबा, मी बोलेन त्याच्याशी. नाहीतर असं कर . मी एक ऑडियो बनवून तुला पाठवते. तो तू त्याला ऐकव. जर तो परत हट्ट करायला लागला तर मी तुझ्या फोनवरून त्याच्याशी बोलेन.चालेल का?"

"बरं बरं पाठव ऑडिओ. बघूया काय होतंय. अनु, मला पण पटतंय तू म्हणतीयेस ते . पण आपण बोलू थोड्या वेळाने. मी फोन करतो तुला राऊंडला जाऊन आलो की" 

पियू पटकन दात घासून फ्रेश होऊन आली. माझा फोन घेतला आणि ऑडिओ ऑन् केला. 

"बच्चू , मी तुझी छोटी मैत्रीण बोलतेय बरं का ! तुला माझ्याशी बोलायचं होतं नं ! म्हणून मी तुला फोन केलाय. मी तुझ्यासाठी खेळणं पाठवलं होतं ते तुला आवडलं का ? तुला लवकर लवकर बरं होऊन घरी जायचंय नं मग असं रडायचं नाही. तू गुड बॉय आहेस नं! तुला गोष्ट ऐकायला आवडतं का ? मग मी गोष्ट पाठवेन हं तुझ्यासाठी. आता एक दोन तीन म्हटलं की हसायचं हं ! एक दोन तीन" 

पियूने केदारला ऑडिओ पाठवला. 

मी ऐकतच राहिले. काय मुलगी आहे ही ! कोण कुठला मुलगा. ना ओळखीचा ना पाळखीचा. स्वतःच्या छोट्या भावाशी बोलल्यासारखी, समजावल्यासारखी पियू त्याच्याशी बोलतेय. 

"अगं, तुला काय माहिती त्याचं नाव बच्चू आहे ते ? " 

"अगं 5 वर्षांच्या मुलाला बच्चू वगैरेच म्हणतात. मी असंच म्हटलं..... आई, मला फार भारी वाटतंय " पियू आनंदाने चक्क हसत होती आणि मी मात्र अस्वस्थ झाले होते. 

" भारी वाटतंय? का ? " 

"अगं मला नेहमी वाटायचं की एक छोटा भाऊ असायला पाहिजे मला. त्याने माझ्याकडे काहीतरी हट्ट करायला पाहिजे मग ताई म्हणून मी तो पूर्ण करणार वगैरे. त्यामुळे या बच्चूशी बोलताना इतकी गंमत वाटत होती मला. मस्त. आता फक्त बाबाला सांगते की पेन ड्राईव्हमधल्या एका गोष्टीचा ऑडिओ त्या बच्चूच्या आईकडे मोबाईलवर टाकायला सांग कुणाला तरी." 


पियूचं बोलणं ऐकून आणि आनंदाने लुकलुकणारे डोळे पाहून काय बोलावं मला समजतच नव्हतं. अनोळखी नात्याचे बंधसुद्धा इतके लोभसवाणे असू शकतात हे मी पहात होते, अनुभवत होते. केदारला आणि मला ज्या अनोळखी नात्याचा ताण आला होता ते नातं बच्चू आणि पियूने किती सहज जुळवलं ! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational