STORYMIRROR

Swati Devale

Inspirational

3  

Swati Devale

Inspirational

शब्देविण संवादू

शब्देविण संवादू

2 mins
299

आजीकडे आठवडाभर राहून पियू आणि मी एकदम फ्रेश झालो. अजून आठवड्याभराने पियूची शाळा सुरू होणार होती. पाचवीचा अभ्यासही तसा पुष्कळ होता. गेल्याच महिन्यात पालकसभा झाली तेव्हा शाळेकडून सगळ्या सूचना मिळाल्या होत्या. 

"पियू , आज तुझी पुस्तकं ऑनलाईन बुक करून टाकूया आणि क्राफ्टचं साहित्य वगैरे सगळंच बुक करू म्हणजे ऐनवेळी गडबड नको." 

 मी घर आवरता आवरता पियूला सांगत होते पण तिचं लक्षच नव्हतं. कसला तरी विचार करत होती. मी तिच्याजवळ बसले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 

"काय गं , आजीची आठवण येतेय ? " 

पियूने हसून माझ्याकडे पाहिलं. 

"ती तर नेहमीच येते. पण आई , आजी झाडांवर किती प्रेम करते नं ! माझ्याशी बोलते तशी झाडांशी पण बोलते. आबा पण म्हणत होते एक वेळ तिला जेवायला नसलं तरी चालेल पण ही झाडांशी गप्पा झाल्याच पाहिजेत. तिची झाडं म्हणजे ऑक्सिजन आहे तिचा.. " 

" हो मग. झाडांना पण प्रेमाची भाषा कळते. आपलं बोलणं जरी कळत नसलं तरी त्या बोलण्यातली माया त्यांच्यापर्यंत पोचते. आपण बोलत असतो त्या स्वरातल्या पॉझिटीव्ह व्हेवज् त्यांच्यापर्यंत पोचतात." 

" हो आजी पण मला हेच सांगत होती. आजी म्हणत होती, ' झाडांचं आपल्यावरचं प्रेम त्यांच्या फळांमधून, फुलांमधून व्यक्त होत असतं. आपण त्यांच्यावर माया केली की ती बहरतात, फुलतात, फळतात. आता ह्या कोरोनाचा धडा घेऊन निसर्गाचा आदर करायला शिकलो नं आपण तरी पुष्कळ.' किती मस्त बोलते नं आजी"

"हंऽऽऽ. खरंच. थोडी मोठी झालीस नं की आजी तुला त्यांच्या कविता दाखवतील. फार सुरेख लिहितात त्या. बऽऽरं चला बाई , आता हळुहळू शाळेची तयारी करायला लागायची का ?" 

" आई, मला काय वाटतं आपण बाबाला सांगूया ." 

" आता काय ? " पियूच्या डोक्यात काहीतरी शिजतंय हे तर कळतंच होतं.

" आपण त्याला सांगू , जेव्हा एखाद्या पेशंटला डिसचार्ज मिळेल तेव्हा त्याला एक रोप द्यायचं आणि त्याच्याकडून प्रॉमिस घ्यायचं की ते रोप नीट लावायचं , त्याच्यावर प्रेम करायचं आणि त्यांच्याशी बोलायचं. आजी म्हणत होती , दोन झाडं अशी आहेत की ती दिवसरात्र ऑक्सिजन देतात. एक वडाचं झाड आणि दुसरी तुळस. वडाचं झाड देऊन काही उपयोग नाही. पण आपण तुळस देऊ शकतो. थांब , मी बोलते बाबाशी. "


पियूने जे सुचवलं ते मला आणि केदारला खूपच आवडलं. एका ओळखीच्या नर्सरीवाल्याकडून तुळशीची रोपं आणून मी ती रोपं हॉस्पिटलमध्ये नेऊन दिली. उद्याची आशा निर्माण करणारं डिस्चार्ज लेटर, आनंदी राहा सांगणारं पियूने तयार केलेलं ग्रिटिंग आणि शब्दावाचून आरोग्याचा संवाद साधणारं तुळशीचं रोप घेऊन जाताना पेशंट नक्कीच सकारात्मकतेची ऊर्जा घरी घेऊन जात आहेत. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational