Swati Devale

Inspirational

4.4  

Swati Devale

Inspirational

साकव

साकव

4 mins
510


केदार परत हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा पियूकडून त्याने कबूल करून घेतले की पास आला की आठवडाभर तरी आजीकडे जाणार म्हणून. ऑनलाईन शाळा सुरू झाली की जाता येणार नाही, वाटल्यास परत आल्यावर हे तुझं काम तू चालू ठेव वगैरे समजूत काढून त्याने पियूला पटवलं. थोडं रुटीन बदलेल, पियू तिथल्या मोकळ्या वातावरणात रमेल या विचारानेच मला बरं वाटत होतं. 


आजीकडे आल्यापासून पियूची झोपाळ्यावर बसून नुसती बडबड बडबड चालू होती. ती करत असलेलं काम, प्रशांतदादा आणि बच्चू या सगळ्याबद्दल सांगून झालं. आणलेली दोन तीन ग्रिटिंग्ज, पत्रं दाखवून झाली. आजीच्या डोळ्यात नातीबद्दलचं कौतुक अपार भरलेलं. चार पाच दिवस भुर्र्कन उडून गेले. पियू दिवसभर आजीच्या मागे मागे असायची , रात्री आजीच्या गोष्टी ऐकत झोपून जाई. परसदारात असलेली फुलझाडं आणि निरनिराळ्या भाज्या यात आम्ही दोघी अक्षरशः बागडत होतो. पियू वेगवेगळ्या झाडांची पानं, झुडुपांचे रंगीबेरंगी धुमारे गोळा करून तिच्या वहीत ठेवत होती. थोड्या अंतरावर लांबच लांब पसरलेली आमराई , नारळाची झाडं , समुद्राची गाज ऐकू येईल इतकी निरवता. माझ्या मनावरचं कोरोनाचं मळभ पुरतं निघून गेलं. 


'आज लवकर आला केदारचा फोन !खरं तर ही केदारची हॉस्पिटलमध्ये राऊंड घेण्याची वेळ असते.' असं पुटपुटतंच पिठाचे हात धुवून मी बाहेर आले. फोन हातात घेतला तर हॉस्पिटलचा लॅडलाईन होता. काय झालं असेल ? केदारला बरं नसेल का ? गेले सहा महिने दिवसरात्र काम करतोय असे अनंत विचार त्या एका क्षणात मनात येऊन गेले. मी घाईघाईने फोन उचलला. 

"हॅलो, हॅलो मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम, मी विशाखा." 

"हॅलो विशाखा , बोल गं ! काही इमर्जन्सी आहे का? हॉस्पिटलच्या फोनवरून ......" मला केदारची विलक्षण काळजी वाटत होती. 

"नाही मॅडम. इमर्जन्सी नाही. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. पण सरांना तुमच्याशी बोलायचंय. त्यांनीच सांगितलं हॉस्पिटलच्या फोनवरून कॉल करायला. मॅडम , मी सरांना ट्रान्सफर करते." 

मला काही कळेचना काय चाललंय. केदारने त्याच्या फोनवरून का नाही फोन केला. 

"हॅलो हं केदार, काय झालं ? तू बरा आहेस नं? "

"अनु, काम डाऊन , मी व्यवस्थित आहे . ऐक. आता तू खरं तर कदाचित रागवशील पण माझा अगदीच नाईलाज झाला. हे बघ मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक. एका आजींना आज आपल्या हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळालाय. त्यांना पियूशी बोलायचं आहे. त्या घरीच जायला तयार नाहीत.  सगळ्यांनी खूप समजावलं पण त्या ऐकायला तयारच नाहीत. मी पण बोललो त्यांच्याशी पण त्या कॉरिडॉरमधे खुर्चीवरच बसून राहिल्या आहेत. "

"काय रे केदार ! पियू बाहेर आहे अळू तोडतीये आजीबरोबर. थांब बोलवते तिला." 

मी जराशा नाराजीनेच पियूला हाक मारली. बाबाचा फोन म्हटल्यावर ती पळत आली खरी पण हॉस्पिटलचा फोन नंबर पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं. मी खांदे उडवले, बाबा बोलतोय असं सांगितलं. 

"बाबा, काय झालं ? तू आत्ता कसा फोन केलास ? आणि तुझा फोन कुठेय? आपण आज व्हिडिओ कॉल करणार होतो नं ?" पियू उत्साहाने बोलत होती. 

" पियू , अगं व्हिडिओ कॉल करूया पण एक प्रॉब्लेम झालाय. आपल्या हॉस्पिटलमधल्या एका आजींना आज डिसचार्ज मिळाला आहे. त्यांना तुझ्याशी बोलायचंय. त्या घरीच जायला तयार नाहीत. तू बोलशील का त्यांच्याशी?"

"होऽऽ बोलते की त्यात काय ! पण काय बोलू ? म्हणजे लहान मुलांशी बोलणं वेगळं नं रे बाबा. ते मला माहितीये. आजींशी काय बोलू ?" 

"त्या काय म्हणतायेत ते ऐक आणि शुभेच्छा दे त्यांना. मी विशाखाताईकडे ट्रान्स्फर करतो . " 

मी फोन स्पिकरवर टाकला. आईंनाही उत्सुकता होती की पेशंट पियूशी एवढं काय बोलतात ? 

"हॅलो, आजी , कशा आहात तुम्ही? मी छोटी मैत्रीण बोलतेय. "

"अग्गं माझी बाय गं ती. तू कोन हायेस मला माहित नाही पोरी पन आपले मागल्या जन्मीचे कायतरी धागे असतील बग त्याशिवाय हे अप्रूप घडायचंच नसतं." 

आज्जींचा हळवा स्वर , मुसमुसत बोलणं ऐकून आईंचे पण डोळे भरले.

"आजी, काय झालं ? तुम्ही आता घरी जाणार नं मग का रडताय?" 

"अगं तुज्यामुळं हा दिस दिसतोय बग. मी चार दिस नसती अंथरुनावर पडून व्हते बाय माजे. माज्या शेजारी माजा नातू. तू त्याला बच्चू म्हनतेस नं तोऽ. त्याला माजी सून तुजं फोनमधलं बोलनं ऐकवायची रोज. हसत राहा, निवांत -हा म्हन्जे घरी जायला मिळंल असं सांगायची नं तू त्येला! ते ऐकून ऐकून मी बी हसायला लागले. तुज्या गोष्टी ऐकायला लागले. बाय माजे, बच्चू दोन दिसांपूर्वी घरी गेलाय, मस्त हाय तो आता. आज मी बी घरी चालले बग हसत हसत. तू बी हसत -हा पोरी. लई हुश्शार हो. आता ठिवते. जास्त बोलवत न्हाय अजून. सुखी -हा पोरी." असं म्हणून आजींनी फोन ठेवून दिला. 


आईंना काय बोलावं कळेना. त्यांनी पियूला जवळ घेतलं आणि दोघी परत अळू खुडायला गेल्या. पियूने बांधलेला हा आपुलकीचा , हास्याचा , ऋणानुबंधाचा साकव किती जणांना उपयोगी पडतोय हे ऐकून मी दिङ्गमूढ झाले होते.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational