Swati Devale

Inspirational

3.8  

Swati Devale

Inspirational

स्वराज्याच्या राजधानीवर

स्वराज्याच्या राजधानीवर

2 mins
88


#traveldairy 

किल्ले रायगड : हिंदवी स्वराज्य राजधानी 🚩🚩


गडावर चढून जाणं यासारखं सुख नाही. ज्या जमिनीवर राजमाता जिजाऊने वर्षानुवर्ष एका वीर मातेचा अमूल्य दागिना धारण करून रयतेला समाधानी केलं, ज्या भुमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अलौकिक इतिहास रचला , अनेक मावळ्यांनी ज्या गडाला दैवत मानलं त्या रायगडावर जाण्याचा योग शाळेतील सहलीच्या निमित्ताने आला. 


हिंदवी स्वराज्याची राजधानी ती , अशी तशी कशी असेल. खडी चढण , 1435 पाय-या , चहोबाजूंनी सह्याद्रिच्या पर्वतरांगा , रायरीच्या डोंगरावर बांधलेला हा शिवदुर्ग महाड गावाजवळ उभा आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून तो उत्कृष्ट आहे , सुरक्षित आहेच पण चढाईलाही कठीण आहे. रोप वे हा पर्याय जरी उपलब्ध असला तरी गड चढून गेले तरच शिवाजी महाराजांनी ज्या हेतूने हा किल्ला बांधला त्यांची दूरदृष्टी, विचार आपल्याला समजतो. चढून जाताना पुढे अजून किती चढायचं आहे त्याचा अंदाजच येत नाही. असं वाटतं की आलोच आता संपलं चढण. पण थोडा टप्पा पार केला की लक्षात येतं , अरे अजून आहे थोडं. असं करतकरत आपण धैर्यानं संपूर्ण अंतर पार करू शकतो 😊. 


गडावर जाताना ठिकठिकाणी काळ्या पाषाणातून वाहणारे झरे दिसतात. उंचच उंच कडे गडाच्या सौंदर्यात भर टाकतात. गडाचा मुख्य दरवाजा दोन बुरुजांच्या आड लपलेला आहे. नागमोडी वळणं घेत आत गेलं की मगच किल्ल्यात शिरता येतं. गडावर गेल्यावर शत्रूवर तोफांचा मारा करण्यासाठी , शत्रूवर नजर ठेवण्यासाठी चौक्या दिसतात. बाजारपेठ , राणी वसा , धान्याचे कोठार , शिवराज्याभिषेक झाला त्याची जागा , गुप्त मसलती करण्यासाठीची खोली , अष्टप्रधान मंडळ , सदर , राण्यांसाठी असणारे सज्जे, वाघ्या कुत्र्याची समाधी , टकमक टोक , तिथून दिसणारा पाचडचा जिजाऊ आईसाहेबांचा वाडा , हिरकणी बुरुज, रायगड ते प्रतापगड पसरलेले जावळीचे खोरे हे सगळं बघताना ऊर भरून येतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं राजा शिवछत्रपती हे पारायणावर पारायणे केलेलं पुस्तक आठवतं. त्यातील वर्णनं आठवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर केवळ नतमस्तक व्हावं असं वाटतं. 


गड चढायला मुलांना पावणे दोन तास तर मोठ्यांना 2 ते अडीच तास इतका वेळ लागतो. स्टॅमिना असणं , प्रबळ इच्छाशक्ती असणं, चालायची सवय असणं सर्वात महत्वाचं. शिवराज्यातील मावळा होऊन चढलं तर कुठलाही त्रास होत नाही 😊 . 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational