संवाद
संवाद
पियूचं सगळे कौतुक करत होते. हॉस्पिटलमधल्या छोट्यामोठ्यांना तर ही छोटी मैत्रीण आवडत होतीच पण केदारचा एक मित्र पेडिट्रीशिअन होता . त्यानेही पियूचं फोन करून अभिनंदन केलं आणि आमच्या क्लिनिकमधे पण तुझी कागदी खेळणी आणि ग्रिटिंग्ज पाठवशील का असंही विचारलं होतं. आनंद आणि अभिमानाने माझं मन भरून गेलं होतं. तिने लिहिलेली एकेक पत्र वाचताना आश्चर्य तर वाटत होतंच पण प्रत्येक पत्रातला मजकूर वेगळा होता हे तर फारच छान वाटत होतं.
"मॅडम, पियूताईऽऽ "
कुणीतरी हाक मारतंय हे ऐकून माझी विचारांची तंद्री मोडली. हॉस्पिटलमधून एक पाकीट घेऊन गणेश वॉर्डबॉय आला होता. मला जरा आश्चर्यच वाटलं. सध्याच्या परिस्थितीत केदार हॉस्पिटलमधल्या कुठल्याच माणसाला असं घरी पाठवत नव्हता.
"गणेश? काय रे इकडे कसा काय ? "
"मॅडम, पियूताईंसाठी हे पाकीट द्यायचंय. मी हे गेटवरच्या पोस्टपेटीत टाकतो. दोन दिवसांनी पत्र पियूताईंना द्या नक्की. "
"कसलं पत्र रे? साहेब काही बोलले नाहीत मला ! "
"नाही. साहेबांना माहित नाही पत्राबद्दल. मला वाटलं सगळ्यात आधी ते पियूताईंनी वाचायला पाहिजे."
"बरं. देईन मी तिला. तू हॉस्पिटलमध्ये चाललायस का ? थांब चहा तरी करते."
"नको मॅडम, खूप काम आहे. जातो मी."
गणेश निघून गेला खरा पण कुणाचं पत्र , काय लिहिलं असेल या उत्सुकतेने अगदी आमच्या दोघींचा पेशन्स पाहिला. पण दोन दिवस थांबणं भाग होतं. केदारला विचारलं तर त्यालाही काही माहित नव्हतं. शेवटी दोन दिवस थांबून आज हाताला सॅनिटायझर लावून पेटीतून पत्र बाहेर काढलं. पियूने माझ्याकडे बघत हसत हसत पत्र बाहेर काढलं.
"आई , कोण तरी प्रशांतदादा म्हणून आहे त्याचं पत्र आहे. "
"कोण प्रशांतदादा ? " मला अशा नावाचा कुणी वॉर्डबॉय असल्याचं आठवत नव्हतं पण या काळात केदारने नवीन स्टाफ भरला होता त्
यापैकी कुणी असेल कदाचित.
"पियू, मोठ्याने वाच नं!" मला फारच उत्सुकता वाटत होती .
"हो वाचते थांब" असं म्हणून पियू पत्र वाचू लागली.
प्रिय छोटी मैत्रीण,
तुझं पत्र मला 4 दिवसांपूर्वी मिळालं. खूप मस्त लिहिलं आहेस. मला पहिल्यांदाच असं कुणीतरी पत्र लिहिलं आहे. माझे आई, बाबा पण ॲडमिट आहेत दुसरीकडे. ते कसे आहेत मला माहिती नाही पण तू त्यांना पण पत्र पाठवशील का? त्यांना सांग की मी त्यांच्याशी बोलू शकत नाहीये पण मी आता ठीक आहे. तुझं पत्र वाचून ते पण हसायला लागतील आणि पटकन बरे होतील.
तुझ्या पत्रामुळे आता मी रिलॅक्स राहण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो आहे. नर्समावशी म्हणत होत्या की त्यामुळे माझी ऑक्सिजन लेव्हल पण व्यवस्थित राहायला लागली आहे. हसत राहा म्हणत होत्या. मी प्रयत्न करतो आहे. तुझ्याकडे खरंच सुपर पॉवर आहे की नाही माहित नाही पण तुझं पत्र म्हणजे माझ्यासाठी सुपर पॉवर आहे. पत्रासाठी तुला थँक्यू. माझं अक्षर तुझ्यासारखं नाहीये पण तुला कळेल असं काढलंय.
तुझा
प्रशांतदादा
तेे पत्र वाचून आम्ही दोघी एकमेकींकडे बघायला लागलो. पियू एकदम माझ्या कुुुुशीतच शिरली .
" आई, बाबाला माहित असेल नं त्या दादाचे आईबाबा कुठे ॲडमिट आहेत ते? मी पाठवेन त्यांना पत्र. आपण रोज बाबाशी बोलतो आहोत आणि सुरक्षित आहोत तरी मला किती आठवण येते बाबाची. तो दादा तर आजारी आहे तरी एकटाच आहे आणि त्याचे आईबाबा कसे आहेत हे पण त्याला माहित नाही." बोलता बोलता पियूचे डोळे भरून आले. मी तिला आणखी जवळ घेतलं.
पियूच्या पत्राने एक संवाद निर्माण होत होता. हा संवाद नात्यात ऑक्सिजन निर्माण करेल माझी खात्री होती.