Preeti Sawant

Inspirational Others

3  

Preeti Sawant

Inspirational Others

विठ्ठल रखुमाई

विठ्ठल रखुमाई

5 mins
207


देव फक्त मंदिरात नाही तर तो सगळीकडे असतो. तो कधी कोणाच्या रुपात येऊन तुम्हाला दर्शन देईल हे तुमचं तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ह्याचा प्रत्यय सांगणारी ही कथा.

अरुणा सकाळी उठून तिची कामे आवरत होती. आज तिच्या आनंदाला पारावर नव्हता.

आज तिला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट लेखिकेचा पुरस्कार देण्यात येणार होता.

संध्याकाळी ७ वाजता तिला योग्य त्या ठिकाणी पोहोचायचे होते.

अरुणा भोईर ही लग्नानंतर अरुणा दाते झाली. तिला शाळेपासूनच लिखाणाची आवड होती. तेव्हा तिला निबंध स्पर्धेत कितीतरी पारितोषिके मिळाली होती. पण आजचा पुरस्कार तिच्या आतापर्यंतच्या लिखाणाची पोचपावती होता. आज अरुणा खूप खुश होती.

आज तिला तिच्या नवऱ्याची म्हणजे अमितची खूप आठवण येत होती. लग्नानंतरही अरुणाला लिखाणासाठी प्रोत्साहन देणारा एकच व्यक्ती तो म्हणजे अमित. त्याला नेहमी वाटे की, अरुणाने एक लेखिका म्हणून खूप नाव कमवावे. आज त्याची इच्छा पूर्ण होत असताना तोच ह्या जगात नव्हता.

पण त्याची आठवण म्हणजे त्या दोघांची एकुलती एक मुलगी वेदा.

आज ती आईचा कौतुक सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी तिच्या पाच वर्षांच्या मुलाबरोबर म्हणजे वेदांतबरोबर येणार होती.

वेदाला कोरोनामुळे दोन वर्षे माहेरी येता आले नव्हते. त्यामुळे मुलगी आणि नातू दोघांना ही अरुणा प्रत्यक्ष दोन वर्षांनी पाहणार होती. त्यामुळे आता तर तिचा आनंद द्विगुणीत झाला होता.

तिने आधीच वेदाला विचारून वेदांतच्या आवडीचे सगळे पदार्थ बनविले होते.आता तुम्ही म्हणाल ५ वर्षांच्या मुलाचे कसले आवडीचे पदार्थ? अहो, पण आजकाल त्यांचीच मोठी लिस्ट असते.

मला हे खायला हवं आणि ते खायला हवं.

वेदा दुपारी जेवायलाच घरी येणार होती. त्यामुळे अरुणाची लगबग सुरू होती.

वेदांतला पनीर खूप आवडते म्हणून तिने दोन पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनविले होते. तसेच त्याला आंबा आवडतो म्हणून कालच तिने हापूस आंब्याची पेटी विकत घेतली होती. काही आंब्यांचा तिने आमरस बनविला होता.बरं ही झाली नातवाची आवड.

पण वेदाला काय आवडते माहीत आहे?वरण-भात आणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे वेदाची आवडती डिश.

पण ती पण फक्त अरुणाने बनविलेली हा.

वेदा लहान असताना जर अरुणा तिला घेऊन कोणत्या नातेवाईकांकडे जेवायला गेली. तर वेदा हट्ट करायची मला आईच्या हातचा वरण भात हवा. अरुणाच्या तर नाकी नऊ यायचे. मग मुद्दामून अरुणा त्यांच्या किचनमध्ये जाऊन वरण ढवळायचे नाटक करत असे आणि मग वेदा जेवत असे.पण हे सगळ्या नातेवाईकांकडे कसे चालेल? मग काय जास्त हट्ट केला तर वेदाच्या पाठीवर एक धपाटा पडे. त्याची आठवण आताही काढून दोघी हसत असतात.

आता तर चक्क दोन वर्षे तिने अरुणाच्या हातचा वरण भात खाल्ला नव्हता.

असो, अरुणाचा जवळजवळ सगळा स्वयंपाक झाला होता. तिने किचन आवरलं व वेदा आणि वेदांतची वाट बघत बसली.तिने औक्षणाची थाळी ही तयार केली होती. पाण्याचा तांब्या आणि भाकर तुकडा ही प्लेटमध्ये होता.

इतक्यात दरवाजाची बेल वाजली.

मुलं आली वाटतं असा विचार करून अरुणाने आनंदाच्या भरात दरवाजा उघडला. तर सेल्समन होता. तिने काही नको सांगितले आणि दरवाजा बंद केला.

पुन्हा बेल वाजली आणि पाहते तर काय एक मध्यमवयीजोडपं तिच्या दारात उभं होतं. एकंदरीत चांगल्या घरातलं वाटत होतं. तिने त्यांना विचारले, "कोण हव आपल्याला?"तर त्या दाम्पत्यांपैकी जो पुरुष होता तो म्हणाला, "तुम्ही अरुणा दाते ना? नमस्कार बाई. माझे नाव आलोक देसाई आणि ही माझी पत्नी आशा देसाई. आम्ही पुण्याहून आलो आहोत. तुम्हा भेटायला. माझी नात तुमच्या साहित्याची खूप मोठी फॅन आहे. आता दोन दिवसात ती अमेरिकेला चालली आहे. ती पण कायमची. पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही. म्हणून तुमच्या काही पुस्तकांच्या प्रती आम्हाला तिला भेट म्हणून द्यायच्या आहेत. पण त्या ही तुमच्या सही सकट. यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत."

"अहो, पण माझ्याकडे सध्या पुस्तकाच्या प्रती उपलब्ध नाहीत", अरुणा म्हणाली.

"आम्ही त्या स्वतःबरोबर आणल्या आहेत. तुम्ही फक्त त्यावर एखादा छानसा मेसेज आणि तुमची सही करा. माझ्या नातीचे नाव 'बेला' आहे.", आलोक देसाई म्हणाले.

"ठीक आहे द्या ती पुस्तके. मी त्यावर सह्या करून देते", अरुण म्हणाली.

आलोकने ४ पुस्तकांचा संच अरुणाच्या हातात दिला आणि ते अरुणाला म्हणाले, "ताई, जरा पाणी मिळेल का प्यायला?हे ऐकताच अरुणाच्या लक्षात आले की, इतकावेळ झाला ती त्या जोडप्याशी दारात उभी राहून बोलत होती.तिने त्या दोघांना आत बोलावले आणि बसायला खुर्ची दिली आणि दोघांना प्यायला पाणीही आणून दिले.

त्यावर ते सद्गृहस्थ म्हणाले, "ताई, सकाळपासून इथे यायला निघालोय. बसने प्रवास करीत होतो. तर बस मध्येच खराब झाली. मग एका गाडीवाल्याच्या मदतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलो."

तेवढ्यात त्यांच्या मिसेस बोलू लागल्या, "आमचा मुलगा आणि सून अमेरिकेत असतात. नात पहिल्यांदाच भारतात आली. हा आठवडाभर ती आमच्याच घरी होती. तेव्हा कळले की, तिला तुमची इंग्रजी भाषिक पुस्तके फार आवडतात. ती स्वतः ही काहीबाही लिहिते. तिच्याकडून तुमच्याबद्दल फार ऐकलं. आता ती परदेशात गेली की, पुन्हा येईल की नाही ह्याची शाश्वती नाही. त्यामुळे आमची एखादी भेटवस्तू तिच्याकडे असावी आणि त्यामुळे तिला आमची आठवण सदैव राहावी यासाठी हा खटाटोप."

अरुणाने त्यांचे म्हणणे ऐकता ऐकता एक सुंदर मेसेज बेलासाठी लिहून प्रत्येक पुस्तकावर सह्या केल्या आणि ती पुस्तके त्या सद्गृहस्थानकडे दिली.

ती दोघेही दांपत्य अरुणाचे आभार मानून निघतच होती की, त्यांच्या पत्नीला भोवळ आल्यासारखे झाले. त्यांनी वेळेचं पकडून तिला खुर्चीवर बसविले.

अरुणाने पेल्यातून साखर पाणी आणून त्यांना दिले. तेव्हा कुठे त्यांना बरे वाटले.

त्यावर अरुणाला ते सद्गृहस्थ म्हणाले, "माफ करा ताई, त्या गाडीवाल्याने आम्हाला इथे सुखरूप पोहचोवले त्याचे पैसे त्याने जास्त मागितले. त्यामुळे आम्ही फक्त परतीच्या प्रवासाचे तेवढेच पैसे शिल्लक ठेवले आणि बाकीचे पैसे त्याला दिले. आमच्या दोघांच्या पोटात सकाळपासून अन्नाचा एक कण नाही गेला. त्यात हे रखरखते ऊन. त्यामुळे हिला भोवळ आली असेल. ताई हे बोलताना मला फार लाज वाटतेय पण जर घासभर हिला जेवायला दिलेत तर तुमची कृपा होईल माझ्यावर. अगदी दूधभात ही चालेल."

अरुणाला समजत नव्हते हे कोण अचानक आले आणि आता घरात जेवण असताना त्यांना नाही म्हणणे तिला जीवावर आले होते. तिने लगेच दोन्ही ताटे वाढायला घेतली.तिने ती दोन्ही ताटे त्यांच्यासमोर ठेवली. नाही म्हणता म्हणता दोघेही जेवायला बसली.

अरुणा पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली आणि त्यांच्या समोर पाणी ठेवले आणि ती बाजूच्या खुर्चीवर बसली.

तेवढ्यात तिचे लक्ष शोकेसच्या कप्प्याकडे गेले आणि ती मनात म्हणाली, "अरेच्चा! ह्या कप्प्यातली विठ्ठल- रखुमाई मूर्ती कुठे गेली?"

एव्हाना त्या दाम्पत्यांचे जेवण उरकले होते. अरुणाच्या मनात आले, "ह्या दोघांनी तर नाही ना ती मूर्ती चोरली?"

ती असा विचार करत असताना ते सद्गृहस्थ म्हणाले, "नाही ताई, आम्ही का चोरू ती मूर्ती. आम्ही नाही घेतली. हवं तर तुम्ही ही पिशवी पाहू शकता. येताना हीच आमच्याबरोबर होती" हे ऐकून अरुणाला फार संकोच वाटला.

तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि तो तिने किचनमध्ये ठेवला होता. तिने तो जाऊन उचलला. तर वेदाचा फोन होता.ती म्हणाली, "आई, माझी ट्रेन लेट झाली आहे. अजून घरी पोहचायला अर्धा तास लागेल. तोवर तू जेवून घे. आम्ही ट्रेनमधेच खाल्लं थोडं" असे म्हणून तिने फोन ठेवला.

अरुणा फोन घेऊन बाहेर आली तर बाहेरच्या खोलीत कोणीच नव्हते. तिची नजर खोलीभर फिरली. सगळ्या वस्तू जशाच्या तशा होत्या.अगदी विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सुद्धा आणि त्या मूर्तीखाली एक दोनशे रुपयांची नोट होती. अरुणाला अगदी भरून आले. तिने ती नोट आशीर्वाद म्हणून जपून ठेवली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational