वेताळाचा तलाव
वेताळाचा तलाव
हर्सूलच्या जवळ एक पाझर तलाव बांधण्याचे काम चालू होते. आधीच मराठवाड्यात दुष्काळ, हाताला काम कोणाच्याच नव्हतं, पाझर तलाव व त्याचा बांध यामुळे बऱ्याच लोकांना मजूर म्हणून काम करायची संधी मिळाली. मराठवाड्यातील दुष्काळामुळे चोरीमारी , दरोडे याचे प्रमाण फार होते. या दुष्काळी परिस्थितीत तलावाचे काम म्हणजे आसपासच्या लोकांना परवणी झाली, चांगलीसंधी चालून आली.
हा हा म्हणता बांध घालायचे सामान येऊन पडले. लोखंडी कांबी, सिमेंटच्या गोण्या, वाळू, दगड आणि माती. ओव्हरसियर येऊन मोजमाप करून गेला. सिव्हिल इंजिनियर येऊन जमीन आखून गेला.
पण सगळ्यांमध्ये एक पंचाईत झाली, जिथे तलाव होणार होता ती तर मुसलमानांची दफनभूमी होती, शेजारीच हिंदुंचे स्मशान होते. आता काय करायचे. कामाला विलंब लागला. पोलीस पाटील सरपंच सगळ्यांनी सरकारकडे मध्यस्थी केली आणि एक लहान भूखंड मुसलमानांना आणि हिंदूंना देऊ केला. चला गुढीपाडव्याला मंत्रीमहोदयांच्या हस्ते पहिली कुदळ पडली आणि कामाला सुरुवात झाली.
शिवलाल आणि रामलाल हे दोघे भाऊ चौकीदार म्हणून कामाला होते. त्यांच्यासोबत अजून सहा माणसं रात्रपाळीला होती. तलावाच्या कामावर शंभरेक लोक काम करत होते. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत काम चालायचे. तलाव खड्डा खणणे, माती उपसणे, मोठे मोठे मशीन कामाला लागले. एका प्रायव्हेट कंपनीला कंत्राट दिलं गेलं. त्यांचा सुपरवायझर सुरेश कुलकर्णी, गडी मोठा हिंमतवान. तिथेच राहायचा. हर्सूल च्या गावात बऱ्याच लोकांनी आपल्या घरातल्या खोल्या साहेब लोकांना भाड्याने दिल्या. बडे साहेब सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले. शिवलाल आणि रामलाल एका रात्री गस्तीवर होते, दुरून फक्त आवाज येत होता, कशाचा आवाज?
म्हणून बघायला गेले तर काही तरुण मुलं कामासाठी आलेले लोखंडी कांबी आणि सिमेंट काढून देत होते, चोरून नेत होते.
शिवलाल त्यांच्यामागे पळाला, तोपर्यंत बरच लोखंड आणि पाच पाच सिमेंट पोती झाली होती झालं गायब. अमावस्येच्या रात्री तर जबरदस्त चोरी व्हायची. तरुण मुलं कामासाठी आलेले लोखंडी कांबी आणि सिमेंट काढून चोरून नेत होते. अमावस्येला हा प्रकार व्हायचा, चोरांची हिम्मत एवढी वाढली कि एका रात्री तर गडद रंगाचा टेम्पो सामान चोरायला आणला होता. शिवलाल पाटलाकडे तक्रार केली पोलिसांकडे नोंद केली, काही फायदा झाला नाही. शिवलाल आणि रामलाल त्यांचे साथीदार आणि सुरेश कुलकर्णी यांनी एक आराखडा तयार केला, आणि ते कामाला लागले.
आठवडी बाजारातून काळा रंगाचा डबा आणला. काळे टी-शर्ट माकड टोप्या, घोंगड्या, काळे पायजमे आणि चमकणारा केशरी रंगाचा पटका विकत घेतला. कंदील तर सगळ्यांकडे होते. ठरलं तर मग. पुढच्या आठवड्यात अमावस्येची रात्र आली.
अमावस्येची रात्र, सगळीकडे अंधार होता, बाजूला वाहणार्या नदीचा खळखळ आवाज येत होता, पावसाळी दिवस होते, मधूनच विजा चमकत होत्या, चोरांना चोरी करण्यासाठी योग्य वातावरण होते.
सुरेश बांधावर उभा राहिला, त्याच्या हातात गुंडाळलेल्या पटका होता, दुसऱ्या हातात बारीक कंदील होता वातीचा. उरलेली सहा साथीदार बांधावर वेगवेगळ्या ठिकाणी कंदील घेऊन उभे राहिले. शिवलाल आणि रामलाल एक बारीक चाबूक घेऊन गोडाऊनच्या तिथे उभे राहिले गोडाऊन च्या तिथे उभे राहिले. गोडाऊन च्या दरवाजापाशी सात कोंबड्या टोपली खाली झाकून ठेवल्या.. दरवाजापाशी मध्यरात्री चोर हळूच गोडाऊन पाशी आले. त्यांच्या पायाने कोंबड्यांची टोपली हलली. शक कुकू करत कोंबड्या उडाल्या, त्यासरशी पहिला कंदील पेटला. बाकीच्यांना खूण कळली, त्यांनी आपले कंदील लावून गोल गोल फिरवायला सुरुवात केली. सुरेश पटका खाली वर करायला सुरुवात केली खाली वर आजूबाजूला खाली वर आणि तो धावत बांधावरती ह्या टोकाकडून त्या टोकाकडे पळू लागला. सुरेश चे कपडे आणि सुरेश दिसतच नव्हते फक्त हवेत उडणारा केशरी पटका, बापरे, चोरांची तर पाचावर धारण बसली. सुरेशने आरोळी ठोकली,: अरे बघा वेताळाची स्वारी आली. पळा पळा मारेल तो आपल्याला" बांधावरच्या कंदिलांनी नाचायला सुरुवात केली. चोर घाबरले, हातातलं सामान त्यांनी टाकून दिलं, हळूच सरपटत बाहेर आले, रामलाल आणि शिवलाल ने त्यांना हातातल्या चाबकाने फोडून काढले. पोषाखा मुळे चोरांना कोण मारते हे कळलच नाही.
दुसऱ्या दिवशी कामावरचे मजूर हलक्या आवाजात बोलत होते, "तलावा खाली दफनभूमी दफनभूमी आहे आणि ते वेताळ म्हणून जागेचं रक्षण करतात, त्यांच्या पुढच्या पिढीला पाणी पाहिजे ना, बाबा रे चोरी केली तर ठोकून काढतात."
काही दिवसांनी सहज म्हणून सुरेश पाटलांकडे गेला, पाटलांचा आडदांड मुलगा एका खाटेवर पालथा झोपला होता, गावातले वैद्य त्याच्या पाठीला कसलं तरी मलम लावत होते. पाटील त्यांना सांगत होते, अॅक्सीडेंट झाला म्हणून, मात्र पाटलांची गडी माणसं दबक्या आवाजात कुजबुजत होती की वेताळाने पाटलांच्या पोराला ठोकून काढला. सुरेशने आपले हसू प्रयत्नपूर्वक दाबले.
जशा चोऱ्या थांबल्या तसा पाझर तलावाच्या कामाला वेग आला, वर्षभरात तलाव पूर्ण झाला आणि पाणीसाठा सुरू झाले. सुरेश शिवलाल रामलाल आणि त्यांचे सहकारी यांची काम संपली. काम पूर्ण होईपर्यंत कोणीही आपले गुपित फोडले नाही.
हरसुल आणि पंचक्रोशीतले लोक पाण्यामुळे सुखी झाले आणि त्यांनी पाझर तलाव याला नाव ठेवले
” वेताळाचा तलाव.”