वेळ चुकली (भाग १)
वेळ चुकली (भाग १)


कॉलेजची नवीन सुरवात. नवे शहर, नवे लोक, नवी दुनिया... सगळं काही नवीन. कॉलेजला सुरवात झाली अन सगळेच मस्त वाटू लागले. हळूहळू दिवस जाऊ लागले अन ह्या बाहेरून रंगीन दिसणाऱ्या दुनियेचे अनेक चेहरे दिऊ लागले. नवे लोक आयुष्यात आले तसे जुनेही आठवूं लागले. घरच्या आठवणीने मन व्याकुळ होत असे. नव्या विश्वात मन रमायचे नाव घेत नव्हते. कॉलेज चे एक वर्ष त्यातच गेले. हळूहळू मैत्रिणी झाल्या, करमायला लागले अन हे परके लोकही आपले वाटू लागले. गोष्टी रुळावर येऊ लागल्या अन आता मन अभ्यासातही रमू लागले. काहीतरी नवीन शिकण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आयुष्यात खूप काही मिळवण्यासाठी आपण येथे आहोत, ही जाणीव वाढू लागली आणि तसतशे कष्टही . त्याचे परिणामही दिसू लागले आणि बघता बघता अभ्यासात चांगला जमही बसला. महत्वाच्या गोष्टींवर काम व्यवस्थित सुरु झाल्याचे जाणवल्यावर अन्य गोष्टी खुणावू लागल्या. कॉलेजचीच दुनिया ती .... हेवे दावे, मजा मस्ती सर्वकाही सुरूच होते, पण आता मात्र काहीतरी वेगळे होणार होते. कॉलेजात रोजच दिसणारा तो चेहरा आता नवीनच वाटू लागला. दोन वर्ष झाली पण कधी असं काही जाणवलंच नाही. अभ्यास सोडून मन कुठे डोकावलाच नाही !!! तो तसा नेहमीच तिच्याशी बोलायचं पण ती मात्र विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आणि संभाषण तिथेच थांबणार. आज मात्र तिला स्वतःहून बोलायची इचछा झाली. कसे कोणास ठाऊक..... कारण शोधायचा तर प्रश्नच नाही. कॉलेज मध्ये ती गरजच पडत नाही. पुस्तक, वही, लेक्चर, परीक्षा, अभ्यास , मदत... अनेक विषय असतात. एखादा त्यातलाच निवडायचा म्हणजे झालं. तिनेच डोकं लावलं आणि त्याच्याशी बोलली. त्याचं ते बोलणं अन चेहऱ्यावरचं हास्य आज प्रथमच भावलं. नकळत चेहऱ्यावर हसू येऊन गेलं अन मनात खूप काही.... तो दिवस तर छान गेला आणि त्यानंतर गोष्टींची रंगत वाढू लागली. सर्वकाही अचानक सुंदर वाटू लागलं. कॉलेजला जाण्याची कारणं बदलली !! बोलणं तसं आधीपासूनच व्हायचं, त्यामुळे थोडीफार मैत्रीही होती. पण त्या मैत्रीला आता वेगळीच झालर लागणार होती. कॉलेज ला जाणे सुखाचे वाटू लागले. वर्गात प्रवेश केल्यावर नजर एकाच चेहरा शोधू लगे. आजूबाजूचे काही दिसतच नसे. असले तरी नगण्य वाटे आणि तो चेहरा पाहिल्यावर आनंदाला पारावर उरात नसे. शिक्षक शिकवत, पण लक्ष मात्र पलीकडच्या बाकाकडे असे. बघता बघता तास अशेच जात अन कॉलेजही संपे. मग परत दुसऱ्या दिवसाची वाट आणि त्याला बघण्याची तितकीच आतुरता. रात्री झोपतानाही तोच, सकाळी उठल्यावरही तोच, अभ्यासाच्या पुस्तकातही तोच अन जेवणाच्या ताटातही तोच. हे मात्र सर्वकाही विचित्रच होते. याआधी असा अनुभव कधी आलाच नाही. लोक प्रेम प्रेम म्हणता ते हेच का ?? असेल तरी कशावरून ?पण जाऊद्या , जे काही आहे ते फार सुंदर आहे. असॆ विचार डोक्यात असत. हळू हळू भावना वाढत होत्या अन मैत्रीही. तिचे अवघे विश्वच त्याने व्यापून टाकले होते; पण त्याच्यासाठी ती फक्त मैत्रीण होती. त्याच्या असलेल्या अनेक मैत्रिणींपैकी ती एक होती. सर्वांशी जसा वागे तसाच तो तिच्याशीही वागे. पण तिला अशे अनेक मित्र नव्हते, अन हा फक्त 'त्यातलाच एक ' असा नव्हता. त्याचे ते सरळ सरळ वागणेही तिला खूप काही भासवून जाई. तिला अनेक गोष्टींत मदत करणे, चिडल्यावर तिला समजावणे, रडल्यावर लहान मुलांगात चॉकोलेट देणे, ती नसतानाही वेळ पडल्यावर खंबीरपणे तिच्या बाजूने उभे राहणे हे सर्व तिला खास वाटायचे. त्याच्या मैत्रीला तिने वेगळ्या अर्थाने स्वीकारले होते. होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ ती तिच्या भावनांनुसार लावत असे अन स्वतःच्याच विश्वात रममाण होत असे. ते विश्व तिचे होतेच कुठे, त्यानेच तर व्यापलेले होते.
भावनांची तीव्रता हळूहळू वाढू लागली आणि मग त्याचे परिणामही. प्रेम केले होते; पण त्याबरोबर एकल चूकही ...ते पूर्णत्वाला जाण्याची अपेक्षा. त्याच्यासाठी ती मैत्रीण सोडून त्यापलीकडे काहीच नव्हती; पण ती त्याच्यात पूर्णपणे गुरफटून गेली होती. या गोष्टीची त्याला किंचितही कल्पना नव्हती. असणार कशी.... प्रेमाबरोबर मैत्रीही तिने तितकीच निभावली होती. तो समोर असताना मैत्रीण अन नजरेआड असताना प्रेयसी. त्याच्या प्रेमात बुडून गेलेली, स्वतःचेही भान हरपलेली, त्याला आपले सर्वस्व मानून बसलेली. पण परिस्थिती भिन्न होती अन त्याची जाणीव होणे तितकेच अवघड....