वेदनांचे अलगूज शोधी नवे आकाश
वेदनांचे अलगूज शोधी नवे आकाश
मानसीने स्वतःच्या केबिनमध्ये प्रवेश केला. केबिनच्या चारही बाजूला तिची नजर भिरभिरली. विंडोवरच्या स्वच्छ पडद्यावरून तिचा हात फिरला. भल्यामोठ्या गुळगुळीत टेबलवरचा पारदर्शक पेपरवेट, पेन स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवलेली पेने, आणि मुख्य म्हणजे त्या पदासाठी असणारी खुर्ची, या सगळ्या वस्तूंना ती स्पर्श करून डोळे भरून पाहत होती. हे स्वप्नवत वाटणारं सगळं काही तिच्यासाठी होतं. मानसी खुर्चीवर जाऊन बसली डेस्कवर डोकं टेकवून एक क्षण डोळे मिटून घेतले. त्यानंतर दीर्घ श्वास घेतला आणि कामाचे स्वरूप समजावून घेऊन तितक्याच उत्साहाने कामाला सज्ज झाली.
उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना आज तिचा पहिला दिवस होता. सराईतासारखे तिने काम नजरेच्या टप्प्यात घेतले. नागरी सेवांचे काम लोकाभिमुख व्हायला पाहिजे; त्यामुळे तिने ऑफिसमधील इतर स्टाफला गरजेप्रमाणे सूचना आणि त्यांची मदतही घेतली. जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून ती घरी जायला निघाली तेव्हा सरकारी गाडी घेऊन ड्रायव्हर ऑफिसच्या मुख्य गेटकडे आला. ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडताच आत जाऊन बसली. ड्रायव्हरला तिने गाडीतील एसी बंद करायला सांगितला. आणि गाडीच्या विंडोजची ग्लास सरकवत तिने बाहेर पाहिलं. गाडीच्या वेगाबरोबर झुळझुळणाऱ्या वाऱ्यामुळे तिला ताजंतवानं वाटत होतं. घरी पोहोचताच तिचा मूड आणखी चांगला झाला कारण दरवाजावर फुलांचं छान तोरण लावलेलं तिला दिसलं. छान रांगोळी, त्यातील नाजूक नक्षी सगळं कसं आल्हाददायक वाटत होतं. आता तर काय अचानक दरवाजामागे लाल गुलाब डोकावताना दिसला.
"Congratulation मम्मा", म्हणत मिहीर दरवाज्यामागून बाहेर आला.
"अरे माझ्या पिल्ला, राजा तू आणि आईने माझं छान स्वागत केलं. तुझा हा गुलाब की नाही, मी माझ्या पुस्तकामध्ये कायम ठेवून देईन."
मिहीरला उचलून घेत तिने त्याचे पटापट मुके घेतले. मिहीर खुश झाला आणि बाहेर खेळायला गेला. मनू हे घे पाणी असं म्हणत आईने पाण्याचा ग्लास मानसी समोर धरला. पाणी पिऊन ती सरळ आपल्या बेडरूममध्ये गेली. जाता जाता तिने आईला सांगितलं, "आई, चहा बनवत असशील तर आलं टाक त्यात. आणि तुझा चहा बनला की मला हाक दे गं.”
मानसीने बेडरूममध्ये जाऊन हातातली पर्स बेडवर ठेवत आपणही तिथेच बसली. आई आल्याचा चहा घेऊन आली."काय गं आई मी येते मला हाक दे असं तुला सांगितलं होतं तू का आलीस घेऊन."
"अगं मनू तू तर दमून-भागून आली आहेस, चहा-बिस्कीट आणली खाऊन घे. मी मिहीर कुठे गेला बघून येते." टेबलवर ट्रे ठेऊन आई निघून गेली.
चहा पित असतानाच तिची नजर समोरच्या टेबलावरच्या जुन्या डायरीवर गेली सहज चाळत असताना त्या डायरीमध्ये सुभाषचा पासपोर्ट साईजचा फोटो मिळाला. फोटोतला सुभाष खूपच रुबाबदार व देखणा वाटत होता पण खरंच या सोज्वळ चेहऱ्यामागे माणुसकी होती का? छे! नको त्या आठवणी. मनाशी म्हणत तिने डायरी बंद केली. डायरीच्या पाहण्याने मानसीला तिचं मन तिला स्वस्थ बसू देईना. आठवणी ओथंबणाऱ्या पावसासारख्या झरझर येऊ लागल्या.
मुलगा खूप शिकलेला मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला. मुंबईला राहणारा. एक स्मार्ट तरुण. असं स्थळ आपण होऊन चालत आल्यावर आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. मानसीलाही मनापासून सुभाष आवडला होता. आईने स्वतःचे सगळे दागिने मोडून मानसीला तिच्या आवडीचे दागिने बनवले. शेत जमिनीचा काही भाग विकला आणि मानसीचे लग्न अगदी थाटामाटात करून दिले.
लग्नानंतर मानसी मोठ्या आनंदाने शहरात आली. झगमगत्या दुनियेत वावरताना तिला बराच त्रास होत होता. पण ती ते समजून घ्यायचा प्रयत्न करीत असे. नवरा कामावरून उशिरा यायचा त्यामुळे संपूर्ण दिवस एकट्याने वावरताना ती कंटाळून जायची.
नंतर नंतर तर नवरा कधी कधी घरी येत नसे. तर कधी कधी उशिरा यायचा आणि तेही दारू पिऊनच. सुरुवातीला मानसीने सुभाषला अनेक वेळा त्याच्या अशा वागण्याविषयी विचारले पण त्याच उत्तर ठरलेलं, 'कॉर्पोरेट जगात असंच राहावं लागतं. तुझ्यासारखं गावंढळ नाही. समजलं.'
"अहो पण तुम्ही रात्रीचे कधी कधी घरी येत नाहीत, ते कुठे जाता ते तर कळू दे."
"हे मूर्ख बाई मीटिंग्ज असतात समजलं का, तुला अडाणीला काय समजतं; नॉन्सेन्स कुठची.” असं काहीबाही तो ओरडूनच बोलायचा.
एक दिवस तर सुभाष मध्यरात्रीनंतर घरी आलेला तोही दारू ढोसून त्याला तशा अवस्थेत पाहून आज तिच्या सहनशक्तीचा बांध फुटला. ती रागाने त्याला म्हणाली "अजूनपर्यंत कुठे शेण खायला गेला होता." मानसीच्या तोंडचे असे उद्गार ऐकून सुभाषचा पारा चढला. स्वतःला धड उभही राहता येत नसलेल्या त्याने तिच्या कानशिलात धाडकन लावून दिली. तशी ती भिंतीवर जाऊन आदळली आणि तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्याही अवस्थेत मानसीने सुभाषला नेऊन झोपवले. आपण मात्र स्वतःच्या नशिबाला दोष देत रात्रभर पश्चातापाच्या आगीत जागीच राहिली.
पहाटे पहाटे तिला झोप लागली. ती तशीच सोप्यावर पडून राहिली. रोजच्याप्रमाणे आळोखेपिळोखे देत सुभाष सकाळी उठला तेव्हा त्याला बेड-टी मिळाली नाही. म्हणून त्याने मानसीला हाक दिली. त्याच्या हाकेला कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे त्याला खूप राग आला उठून पाहतो तर मानसी सोप्यावर झोपलेली. तिला झोपलेली पाहताच त्यांच्या संतापाचा पारा चढला. एका लाथेसरशी त्याने मानसीला सोप्यावरून खाली पाडली. व्याकूळ अवस्थेतील ती कशीबशी खाली बसली. पुन्हा तो मारायला गेला तोच डोअरबेल वाजली. आणि तिची सुटका झाली. पारोशा तोंडाने त्याने दरवाजा उघडला.
"साहेब दूध, माफ करा साहेब,आज थोडा लेट झाला बघा. दुधाचा संप पुकारला शेतकऱ्यांनी; कमी भाव मिळतो म्हणून. आज लई कमी टॅंकर आले बघा ही मोठी लाईन लावावी लागली. म्हणून लेट झाला....बर.... आज ताई न्हाही आल्या दुध घ्यायला. तब्येत बरी हाय ना त्यांची." दूधवाला विचारत होता.
"हा ठीक आहे" होकारार्थी मान हलवत दूधवाला जाण्याची वाट न पाहता सुभाषने दरवाजा लावून घेतला. आतापर्यंत त्याचा तिच्यावरचा राग बराच कमी झाला होता. थोड्याच वेळात तिच्याशी काहीही न बोलता आपली तयारी करून सुभाष ऑफिसला गेला.
रात्रीपासून सतत रडण्यामुळेआणि त्याच्या मारण्यामुळे आज ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या खुपच थकली होती. बराच वेळ मानसी जमिनीवर पडून राहिली. मोबाईलच्या रिंगटोनने तिला जाग आली. टेबलवरचा मोबाईल उचलून पाहिला. साधनाचा कॉल बघून तिने तो घेतला.
'हॅलो...'
साधना- "काय गं किती वेळ फोन करते. फोन घेत का नव्हतीस. काय नवऱ्याच्या प्रेमापुढे सख्या मैत्रिणीला विसरलीस."
मानसी- "नाही गं, तुला विसरून कसे चालेल."
साधना- "तब्येत बरी आहे ना तुझी आवाज वेगळाच वाटतो."
मानसी-"ठीक आहे गं मला काय झालं."
साधना- "काय झालं माहित नाही पण गुड न्यूज देण्याचा आजार वगैरे झाला असेल तर!!!" असं म्हणून साधना जोरात हसू लागली तिच्या बोलण्यामुळे मानसीला भीतीने घाबरून उचकी लागली.
साधना- "हॅलो मानसी अगं तुला उचकी लागली मला वाटतं पतीदेव तुझी खूपच आठवण काढतात."
साधनाची फोनवर बडबड चालू होती.
"हॅलो साधना तुला मी नंतर फोन करते." असे बोलून मानसीने जवळ जवळ फोन कटच केला. साधनाचा फोन आला की जिवाभावाच्या मैत्रिणीशी तन्मयतेने बोलणारी ती आज तिच्याशी बोलण्याचे टाळत होती कारण तिला आज तिच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती. त्याहीपेक्षा तिच्या अंगात बोलण्याचे त्राण नव्हते. सारखी चक्कर येत असल्यासारखं वाटत होतं. पुन्हा वाद नको म्हणून ती कसबस सगळं काम करत होती. सुभाष ऑफिसला गेल्यावर मानसी थोड्यावेळासाठी बेडवर जाऊन पडली सारखं मळमळल्यासारखं वाटत होतं. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर तिने डॉक्टरकडे जायचं ठरवलं. बिल्डिंगच्या खाली येऊन रिक्षा केली व सरळ हॉस्पिटल गाठलं. आता तिला खूप भीती वाटू लागली. डॉक्टरांनी तपासणी अंती तिला सांगितलं, मॅडम काही काळजी करण्याचे कारण नाही तुमचा आजार म्हणजे तुम्ही आई होणार आहात तेव्हा स्वतःची काळजी घ्यायची,... अमुक खायचं तमुक खायचं नाही...... हे करायचं...... हे करायचं नाही..... वगैरे वगैरे डॉक्टर माहिती देत होते पण मानसीचे डॉक्टरच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. या बातमीने आपल्याला आनंद होत आहे की दुःख हेच तिला समजेनासे झाले. हॉस्पिटलमधून विचारांच्या तंद्रीतच ती घरी आली. असेच आठ दिवस गेले. सुभाषला ही बातमी सांगणं तिला तितकंच महत्त्वाचं वाटत होतं.पणअजून पर्यंत तिने ते सांगितलं नव्हतं. आज मात्र त्याला सांगायचं तिनं ठरवलं. सुभाष ऑफिसला जाण्यासाठी शर्ट अंगात घालत असताना मानसी सुभाषला म्हणाली, "अहो मी डॉक्टरकडे गेले होते."
"मग मी काय करू."-सुभाष
"तुम्ही लवकरच बाबा होणार आहात.”
"मग मी काय नाचू; मोठा पराक्रम केल्यासारखा सांगू नकोस मला. जाता माझे बूट पुसून ठेव मला ऑफिसमध्ये जायला उशीर होतो."
निमुटपणे त्याचे बूट साफ करून ठेवले आणि आपल्या रोजच्या कामाला स्वतःला गुंतवून घेतलं. जेव्हा तो घरातून बाहेर पडला. तसं इतका वेळ दाबून ठेवलेला तिचा हुंदका फुटला. त्याच्या या वागण्याने तिच्या मनाचा तोल पार ढळला होता. कितीतरी वेळ ती रडत राहिली.
संध्याकाळी सुभाष घरी आला तो भरपूर दारू पिऊनच. येताच क्षणी त्याची रटाळ बडबड, मध्ये मध्ये शराबी डोळे मिचकावून हसणं याची तिला खूपच किळस आली. रागाच्या भरात ती बोलून गेली. "पुन्हा शेण खाऊन आला तर, काय गरज होती दारू ढोसायची. सकाळी मी आपल्या बाळाविषयी सांगत होते तर तुम्हाला वेळ नव्हता आणि हे दारू पिण्यास तुमच्याकडे वेळ आहे ?" तसा तो बेफिकीरपणे म्हणाला, "हे मूर्ख बाई, बेअक्कल मला आनंद झाला म्हणून मी आज प्यायलो. समजलं तुला. तुला काय माती समजतं. आपल्या घरी बाळ येणार आहे. याचा मला आनंद झाला आहे. नॉन्सेन्स तू आहेस." असं काहीतरी तो बरळत राहिला. थोड्याच वेळात सुभाष जागेवरून उठला. अवसान भरल्यागत मानसीजवळ येऊन तिला घट्ट पकडले. तशी ती ढकलली गेली. मग तो तिच्या पोटाला जोरात चिमटे काढू लागला. आता मात्र मानसी जोरात ओरडली, "काय करता तुम्ही. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय." तिच्या पोटावर हात ठेवत तो म्हणाला, "मग का तर मी त्याच्याशी खेळतोय." पुन्हा एकदा तिच्या पोटावर त्याने जोरात हात मारला मानसीला आता खूपच वेदनेची कळ आली. ती थोडावेळ कळवळली. पण त्याच ताकदीने स्थिरावली. तितक्याच जोरात तिने सुभाषच्या श्रीमुखात लगावली. तो धाडकन जाऊन सोप्यावर कोसळला.
आज कुठून आली हिम्मत..... की मातृत्वाच्या जाणिवेने तिला ताकद दिली होती. त्याच क्षणी मानसीने आपली बॅग भरली व घरातून चालती झाली. कुठे जायचं हे तिला माहीत नव्हतं. पण ती चालत राहिली जिथे मार्ग सापडेल तिथे. मानसीच्या घरी अगोदर धुणीभांडी करण्यासाठी कामवाली बाई यायची. लग्नानंतर पंधरा दिवसांनी सुभाषने तिला कामावरून काढून टाकले. धनाबाई नाव तिचं. ती समोरून येताना दिसली. कोणतेही आढेवेढे न घेता मानसी सरळच म्हणाली, 'धना मावशी तुमच्या वस्तीत कुठे राहायची सोय होईल का ', त्यावर धनामावशी म्हणाली, ताई तुमचं एवढं मोठं घर असताना का विचारता'. मावशीला घडला प्रसंग सांगणं भाग होतं. तिने सुभाषविषयी तिला सर्व काही सांगितले.
"ताई म्या आता इथे कामाला नाही येत. पोरगा कामाला लागला बघा तो आता मला काम करू देत नाही. विश्रांती घे म्हणतो. गुजरातला कामाला लागला. तुम्हाला चालत असेल तर माझ्या घरी राहायला या. माझ्या झोपड्यात सध्या मी एकटीच असते." धनामावशीच्या बोलण्यामुळे मानसी आतून सुखावली दोघी मावशीच्या झोपडपट्टी वस्तीत पोहोचल्या. त्या रात्री तिने आपली कर्मकहाणी धनामावशीला सांगितली ते एकून तिचे डोळे पाणावले. डोळे पुसत ती म्हणाली, "ताई काय काळजी करू नका. तुमच्या पोटातल्या बाळाला जपा. मी हाय तुमच्या बरोबर." तिच्या त्या धीरोदत्त बोलण्याने मानसी खंबीर झाली. धनामावशीकडे येऊन आठ दिवस झाले. संपूर्ण दिवस ती घरातच बसून राहायची. वस्तीतल्या लोकांनी जेव्हा धनामावशीकडे तिच्याविषयी विचारलं तेव्हा मावशी लोकांच तोंड बंद करण्यासाठी सांगून मोकळी झाली. ती माझ्या बहिणीची पोर हाय. ती आता हितच राहणार हाय.
आतापर्यंत राहण्याचा प्रश्नच सुटला होता. प्रश्न होता तो पोटाचा. पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं मग एक दिवस मानसीने मनाशी ठरवलं आणि ती जवळच्या होलसेल मार्केटमध्ये जाऊन पिना, बायकांना लागणाऱ्या बांगड्या, टीकल्या अशा वस्तू खरेदी करून आली. लगेच दुसर्या दिवशी एका मोठ्या पिशवी सगळं सामान भरून ती स्टेशनकडे निघाली. स्टेशनमध्ये जाताच समोरून येणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. हात रुमाल........ टिकल्या......असं मोठ्याने म्हणत आपल्याकडे सामान खपवू लागली. लेडीज डबा असल्याकारणाने बर्याच बायकानी तिच्याकडच्या वस्तू खरेदी केल्या. पहिल्याच दिवशी तिच्या श्रमाला यश मिळाले. आता मानसीचा रोजचाच हा दिनक्रम झाला.
असेच दिवस चालले होते.बघता बघता तिला सातवा महिना लागला. ट्रेनची धावपळ, खेचाखेची यामुळे तिला खूप त्रास व्हायचा. पण पोटासाठी करणं भाग होतं. तिची तशी अवस्था बघून बर्याच महिला तिच्याकडचा सामान मुद्दाम खरेदी करत. तर काही महिला ट्रेनमध्ये बसायला जागा देत. एक दिवस मानसीच्या आईचा फोन आला. फोनवरून आई मानसीला माहेरी बोलवत होती, "बरं हट्ट करू नकोस लेकीचं पहिलं बाळंतपण माहेरीच होतं तेव्हा जावईबापूंना तुला माहेरी सोडायला सांग." आई असं काहीबाही फोनवरून सांगत होती. मानसी मात्र दुसऱ्याच विचारात गढून गेली होती. ती स्वतःशीच बोलत होती. 'बिचारी माझी साधी भोळी आई तुझ्या जावयाचे पराक्रम ऐकले तर धक्क्याने अंथरूण धरशील तसं व्हायला नको गं आई माझ माणूस म्हणून तूच तर आहेस म्हणून तर मी तुझ्याकडे येत नाही. तुला या सगळ्याचा त्रास व्हायला नको असं मला वाटतं.'
या सगळ्या जाणिवामुळे सकाळपासून तिला अस्वस्थता जाणवत होती. मावशीला त्याची कल्पना न देता मानसी तशीच स्टेशनकडे निघाली. प्लॅटफॉर्मवर माणसांचा जणू समुद्रच होता. ती गर्दी बघून धंदा चांगला होणार असं मानसीला वाटलं. ट्रेन येताच गर्दीचा प्रवाह दरवाज्याच्या दिशेने गेला. ती त्या गर्दीत आपलं भलं मोठं पोट सांभाळत चालू लागली. दरवाज्यापर्यंत पोहोचेपर्यंत ट्रेन चालू झालेली. गर्दीचा घोळका धावत सुटला. सामानाची बॅग सांभाळत धावत असताना अचानक गर्दीतला एक पाय तिच्या पायावर पडला. तिचा त्यामुळे तोल गेला. गर्दीत कोणाला काहीच कळायच्या आत हा लोट तिच्यावरून उड्या मारून चालला. पाठीवर पडल्याने समोर दिसणारे स्टेशनचे छत तिला अधांतरी वाटू लागलं. इतक्यात ट्रेनने वेग घेतला. तिच्यात व ट्रेन यामध्ये फक्त अर्धा ते एक फुटाचा अंतर होतं. आता आपण ट्रेनखाली खेचले जाणार. याची तिला खात्री झाली. तिने डोळे गच्च बंद केले व तशीच पडून राहिली. गर्दी अजून पांगली नव्हती. ट्रेन निघून गेल्यावर कोणीतरी केलेल्या थंड पाण्याच्या शिडकाव्याने ती स्थिरावली. घोळक्यातील कोणी सभ्य माणसाने तिला रिक्षात नेऊन बसवले. रिक्षात बसताक्षणी तिला जाणवायला लागले, की पोटातील हालचाल मंदावली आहे व पाठीला असह्य कळा येत आहेत. त्याच रिक्षाने मग ती वस्तीवरच्या सरकारी आरोग्य केंद्रात गेली. वेटिंग कक्षातील सिमेंटच्या बाकावर जाऊन बसली. डोळ्यासमोर अंधारी येत होती. मग तिथल्याच एका पेशंटच्या नातेवाइकांनी डॉक्टरच्या कक्षात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली व तिला सोनोग्राफी करण्यास सुचविले. आता ती पाठीच्या वेदना पुर्णपणे विसरली होती. तिला फक्त जाणवत होत्या त्या पोटातील बाळाच्या न होणाऱ्या हालचाली. घाबरलेली ती ओक्साबोक्सी रडू लागली. काही पेशंटनी देखील तिला धीर दिला. थोडाशी सावध झाल्यावर जेव्हा सोनोग्राफी झाली व तिला तिच्या बाळाच्या हालचाली स्क्रीनवर दाखवल्या गेल्या तेव्हा तिच्यात पुन्हा बळ आलं.आनंदाने तिने नर्सला जाऊन मिठीच मारली.
धनामावशीला ही गोष्ट समजताच तीही फार घाबरली. त्या संध्याकाळी धनामावशीने बळजबरीने मानसीला प्यायल्या दिलेलं ग्लासभर दूध इच्छा नसताना मानसी पीत बसली होती. आणि मोबाईलवर रिंग वाजली. हॅलो म्हणायचा अवकाश आई घाबऱ्या आवाजात रागाने बोलू लागली. "मनू उद्या मुंबईला मी येते. तुझं बाळंतपण गावी होणार. तुझी आई अजून जिवंत आहे. आईपासून आपल्या मुलाचं काहीही लपत नसतं. तेव्हा गुपचुप माझ्याबरोबर माहेरी यायची तयारी करून ठेव. तुला उद्या काही कमीजास्त झालं तर मी जगू शकत नाही. तुला तुझी आई जिवंत हवी असेल तर तू माझ्या बरोबर गावी येशील." असं बोलून तिने फोन ठेवून दिला.
त्यानंतर मानसीने पुन्हा बराच वेळ आईचा फोन ट्राय केला. पण व्यर्थ सारखे फोनवर स्वीच ऑफ असल्याचा मेसेज येत होता. मानसीला आता समजून चुकलं. कोणत्याही परिस्थितीत आई येणार. पण हे सगळं आईला कसं समजलं की मी धनामावशीकडे राहते. की सुभाषने सांगितलं. नेमकं काय समजलं असेल तिला. जो माणूस मी घरातून बाहेर पडल्यावर साधी चौकशीही करू शकत नाही तो माणूस आईला फोन करून कसं सांगू शकतो. शक्यच नाही. मग आईला कसं कळलं असेल बरं बराच वेळ ती विचार करत बसली.
सकाळी जाग आली ती 'मनू' या हाकेने. अरे देवा, म्हणजे आई आली. डोळे चोळत ती बाहेर आली. खोलीचा दरवाजा उघडला गेला. आणि काय... समोर आई दत्त म्हणून हजर होती. बरोबर शेजारचा रमाकाकूंचा मुलगा राघवदादा. राघवदादा आत्ताच मिलिटरीमधून रिटायर झाला होता. राघवदादा म्हणजे ससाण्यासारखा. कुठच्याही गल्लीबोळातील गोष्ट शोधून काढणारा. आणि आई ही तर काय विचारूच नका. एखादी गोष्ट ठरवली की करणारच. दोघांना समोर बघून मानसी त्यांना घरात बोलवायचं देखील विसरून गेली. “आम्हाला आता घरात बोलशील की नाही का असं बाहेरच ताटकळत राहायचं. आणि काय गं तुझी आई जिवंत आहे ना, मग बाळा का अशी वागलीस. मी कोणी परकी असल्यासारखी का वागलीस. एवढ्या मोठ्या भयानक प्रसंगातून एकटी जातेस मला का नाही सांगितलं. देवाच्या मनात होतं म्हणून दुसऱ्याकडून तरी निदान समजलं. नाहीतर काय झालं असतं कोण जाणे." आई डोळ्याला पदर लावत म्हणाली.
आईला रडताना पाहून मानसी आईजवळ जाऊन म्हणाली,"तू काही टेन्शन घेऊ नकोस मी आता तुझी पूर्वीची भित्री, लाजाळू मनू नाही राहिली. येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करते. आणि मी काय एकटी नाही आहे; माझं बाळ आहे माझ्याबरोबर." आता मात्र आई आवाक होऊन मानसीकडे पाहतच राहीले तिचे ते बदललेले रूप पाहून आईला रणचंडीकेचे दर्शन झाले.
दुसऱ्याच दिवशी धनामावशीचे खूप आभार मानून मानसी बाळंतपणासाठी आईकडे जायला निघाली. आईकडे आल्यापासून मानसी खूप खुश झाली. आणि तिचे डोहाळे पुरवत होती. तिला हवं नको ते बघायची. सुभाषने मानसीला केलेला त्रास आठवून आई कधी कधी रडायची. मग मानसीच आईला धीर द्यायची.
नऊ महिने आणि नऊ दिवस झाले आणि आज सकाळपासून प्रसूतिवेदना व्हायला लागलेल्या. आईला सोबत घेऊन ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. मानसीला ऍडमिट केल्यानंतर काही वेळातच नॉर्मल डिलिव्हरी होऊन मुलगा झाल्याची बातमी डॉक्टरांनी तिच्या आईला दिली. त्या गोंडस बाळाला बघून आईला अत्यानंद झाला. आपल्या डोळ्यातील पाणी लपवत ती मनूला म्हणाली,''बाळा तू किती सोसलस याची जाणीव येते मला पण या बाळाकडे बघून सगळा त्रास नाहीसा झाला बघ. तू खऱ्या अर्थाने आज स्ट्रॉंग झालीस."
बाळाचं बारसं झालं आणि मानसी जवळच्या शहरात एका कंपनीतील ऑफिस मध्ये डाटाऑपरेटर म्हणून काम करू लागली. आता ती खऱ्या अर्थाने आर्थिक स्वावलंबी झाली होती. चार वर्ष तिथेच ती काम करत होती. आपल्या बौद्धिक कौशल्याने ती मॅनेजर या पदापर्यंत पोहोचलेली. मध्यंतरी सुभाषला घटस्फोट घ्यायचा निर्णय मानसीने घेतला. वकिलांना भेटून तशी व्यवस्था केली. सुभाष तिला मनवण्याचा खोटा प्रयत्न करत होता.पण त्याच्या कोणत्याही गोष्टीला न जुमानता तिने वकिलामार्फत त्याला नोटिसा पाठवल्या. दोघेही विभक्त झाले. आणि इथूनच तिच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली. काही महिन्यांपूर्वी एमपीएससीची जाहिरात तिच्या नजरेत आली. मग काय मानसीने निश्चय केला की ही परीक्षा द्यायची व सरकारी नोकरी मिळवायची. कोणताही विलंब न करता मानसीने फॉर्म भरला. त्यानंतर एम पी एस सी चे क्लास जॉईन केले. खूप परिश्रम करून अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीची परीक्षा विशिष्ट गुणासहित पास झाली आणि उपजिल्हाधिकारी या पदावर रुजू झाली. या सगळ्या प्रयत्नात तिला आईची मदत आणि आशीर्वाद होता. आईची सोबत असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य होणे नाही. याची तिला पुरेपूर खात्री पटली. आपल्या मीहीरलाही आपण असच खंबीर केलं पाहिजे हे तिला आज पूर्णपणे जाणवत होतं.
