Neelima Deshpande

Comedy Drama

3.5  

Neelima Deshpande

Comedy Drama

वद जावू कुणाला शरण?

वद जावू कुणाला शरण?

7 mins
491


"अरे यार बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅनची काय गरज असते?" कविता वैतागातच बाथरूमच्या बाहेर बडबड करत पडली. आता नेमकी काय अडचण आहे? हे काही लक्षात न आल्याने शेवटी समीरने,

"तुझी नेमकी काय अडचण आहे, हे सांगशील का आता?" असे म्हणताच चिडलेली कविता त्याला म्हणाली,


"अरे म्हणजे एक्झॉस्ट फॅनची अडचण नाही ! तुला जे वाटतंय ना की, मला गर्मी होते म्हणून एक्झॉस्ट फॅनऐवजी सीलिंग फॅन लावून देऊ का? असे विचारतो आहेस मला! मुळात मला फॅन नकोय! पण व्हेंटिलेशन साठी जर तुम्ही एक्झॉस्ट फॅन ठेवला असेल तर मग निदान बाथरूमला दोन दार तरी ठेवा ना रे वेगवेगळ्या दिशेला! त्यात काही अडचण आहे तुम्हाला? मला दोन दरवाजे हवे आहेत बघ बाथरुम मधून बाहेर यायला!"


"अडचण आम्हाला कशाला असेल? तुझीच अडचण सांग नीट मला. कधी फॅन तर कधी दार! काय आहे हे? तुझा प्रोब्लेम नक्की ओळखता आला तुला की मग आपण त्यावर उपाय करू." आता समीरही वैतागला होता.


"तुला दोन दरवाजे कशाला हवेत, तू अजून तितकी जाड झाली नाहीस ! " थट्टेच्या सुरात समीर...आणि यावर रागाने बघत उत्तर देत कविता,


"माझा काही प्रॉब्लेम नाही! जो काही प्रॉब्लेम आहे ना तो त्या पालीचा 🦎आहे !! ती त्या एक्झॉस्ट फॅन मधून बाथरूम मधे तर शिरते पण मग तिला बाहेर पडायला रस्ता सापडत नाही. आणि मी बाथरूम मधे अडकून पडलेली असताना मला तिला कसे हाताळावे? हे सुचत नाही. त्या प्रयत्नात ती 🦎नेमकी दरवाजाच्या दिशेने जाते.


"मी मग बाहेर नाही पडू शकत किती घाबरले तरी! तिला जर बाहेर जायचं तर ती आली तिथून जावू शकते. तिला हे कळत नाही का की, मला तर दरवाजातून जायचा एकच रस्ता आहे! आणि तोही तिने अडवून धरल्यावर मला माझ्यासाठी बाथरुमला दुसरं दार नको का बाहेर पडायला?" सरते शेवटी कविताने तिची नेमकी अडचण काय होती ते सांगितले.


"तर मुख्य मुद्दा आहे पालीचा! अग ती केवढी! तू केवढी? कुणी कुणाला घाबरायचं? याचा विचार कर कधी!" समीरच्या या वाक्यावर कविताची विनोदबुद्धी सगळी संपली आणि ती भांडणाच्या मूडमध्ये आली.


"मी कोणाला घाबरत नाही! तुझ्यासारखी डरपोक नाही! प्रत्येक ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढायला मीच खंबीरपणे उभी असते, पण आता ही किडा, मुंगी, पाल आणि झुरळ यांना तर घाबरावच लागत ना ? ते तुला नाही कळणार!"


"हो बरोबर आहे बाई तुझं! ते मला नाहीच कळलं आजवर! 🦎 एक एवढासा मुका जीव चुकून कधी तुझ्या नजरे समोर पडला तर, तो आपल्या घरात शिरलाच कसा? ईथून तुझी सुरुवात होते. जणूकाही त्या पालीच्या पाच मिनिटासाठी घरात येण्याने कोणीतरी तुझ्या साम्राज्यात हस्तक्षेप करतय किंवा अतिक्रमण करत तुझ्या घरात शिरतोय असा काहीतरी तुझा समज होतो. "


"मग तू त्यांना हद्दपार करण्यासाठी सज्ज होते. सज्ज होते म्हणजे काय ? स्वतःला वाचवायला कुठल्यातरी पलंगावर चढून उभी राहतेस, तुझ्यावर कधीही हल्ला होणारं तेंव्हा बाहेर पडायच्या तयारीत! पण अशा अवस्थेतही हजार सूचना देऊन मला मात्र हैराण करते. हे कर, ते कर... यांनी बाहेर काढ, तिकडून ढकल... आधी दार उघड... हातावर चढेल... खरंतर तुझी अवस्था बघून हसावं की तुझी कीव करावी हे कळत नाही!"


"तुझ्या मदतीसाठी घरात शिरलेल्या किडा-मुंगी किंवा पालीला बाहेर काढण्यासाठी फोकस करावं तर मागून तुझ्या तोंडाचा पट्टा सतत चालू असतो."


तुझ्या त्या हजारो सूचनांमध्ये नेमकं कधीतरी लक्ष काही सेकंदांसाठी इकडच तिकडे होतं आणि पुन्हा तुला बोलायला चान्स मिळतो. 'बघ मी म्हटलं होतं... तसंच झालं!हे तुझे आवडते वाक्य बोलून तू उभी राहते...."


थोडक्यात असं आहे की, ती तू म्हटल्यामुळे ते झालेलं नसतं! जशी तू घाबरतेस ना तसे ते जीव पण घाबरतात... त्यामुळे त्यांना आम्ही अलगद बाहेर टाकताना मी त्यांच्याकडे बघावं की तुझ्याकडे बघावं अशी अवस्था जर करून सोडशील तर माझी नजर हटते आणि मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. आता मला सांग बाथरूम मधली पाल गेली की, मला.. तिला बाहेर काढायची आहे? "


"मी तर म्हणतो एक दिवस तू हिम्मत करून तिला बाहेर घालवण्याचा प्रयत्न तर कर किंवा तिच्याकडे दुर्लक्ष कर. मी घरी असताना मी मदत करेल तुला पण जेव्हा मी घरी नसतो तेव्हा काय?" पाल तशीच सोडून हा कुठे निघाला? या विचाराने कविता त्याला,


"घरी नसतो म्हणजे काय? आता तू कुठे चालला आहेस??? महिनाभर पण नाही झाला आपल्याला या घरात शिफ्ट होऊन!"


तिला शांत करत तो... "अग बाई मी कुठे जात नाही, पण ऑफिसला तर जाईल ना? आणि जर कधी टूरला जावं लागलं तर ? कालच सर म्हणत होते, तुम्ही इथे सेटल झाला असाल तर पालघरला एकदा टूर करून ये. तुला बदल हवा असेल तर येतेस का तू माझ्यासोबत?"


"कोण मी?" - कविता वैतागून...


"आता तू नाही तर काय मी पालीशी बोलतोय का?" समीरने हे म्हणताच पाल आठवून कविता,...


"ए, तू...पुन्हा पुन्हा ते पालीच नाव घेऊ नको. कुठे जायचं म्हणाला होतास, एकदा परत सांगतोस?"


"पालघरला!" हसत आणि मिश्किल नजरेने बघत समीर उद्-गरला.


"शी! पालघर!! ही काही जागा आहे का फिरायला जाण्याची? मला पालीचं नाव काढलेल आवडत नाही आणि तू मला पालघरला येतेस का विचारतोय? तेही तुझ्या ऑफिशिअल टूरमध्ये?? मी काय करू तिथे, दिवसभर हॉटेलमधे बसून? त्यापेक्षा मी इथेच बरी!"


तुझ बाथरूम मधली पाल🦎 बाहेर हाकलून झालं असेल तर सांग म्हणजे मला एकदा अंघोळ करून स्वयंपाकाला लागायला. उकाड्याने हैराण झाले आहे मी"


"हो काढली मी तिला! मी आहे तोपर्यंत घे उरकून तुझं."


"मी तोपर्यंत किचन मधली खिडकी उघडून ठेवतो म्हणजे जरा मोकळं वार येईल घरात" समीर हे बोलेपर्यंत कविता अंघोळीला निघून गेलेली होती आणि तिने त्याचे बोलणे ऐकले नव्हते, नाही तर ती लगेच म्हणाली असती, "किचनची खिडकी उघडू नको, माझ्या कडून ती बंद होत नाही."


कविताचे आवरून झाले आणि समीर तिचा निरोप घेऊन ऑफिसला गेला देखील! आता घरात आपलेच राज्य अशा थाटात समीरला बाय केल्यावर पुढचे दार लावून कविता किचन मध्ये शिरली. स्वतःसाठी मस्त पैकी चहा बनवून घेतला आणि सिंक मध्ये चहाचे भांडे ठेवायला गेली ती ओरडतच किचनच्या बाहेर पडली.


सकाळपासून इतकं सगळं पाल पुराण झालं होतं की बहुदा त्या पालीला सुद्धा उचकी लागली होती आणि कोण माझी आठवण काढत आहे? हे बघायला ती किचनमधे सींकला लागून असलेल्या खिडकीतून आत आली होती.


'किसी चीज को आप दिलो जान से चाहो, याद करो तो पुरी कायनात उसे आपसे मिलाने में जुट जाती है!' या गोष्टीचा कविताला आता प्रत्यय आला.


सकाळपासून काढलेली पालीचे आठवण आता महागात पडली होती. समीरच्या माघारी कविता एकटी असताना कविताच्या शब्दात सांगायचं तर 'साक्षात पाल' तिच्या भेटीला तिच्या इच्छेविरुद्ध साम्राज्यात दाखल झाली होती.


घरात तिला वाचवायला कोणीही नव्हते. आजू बाजूला मदत करणारा कोणी नसलं की, आपोआपच कुठून तरी उसन बळ अंगात येतं तसं आणून ती विचार करू लागली की, पालीला बाहेर कसे काढावे? हॉलमध्ये खुर्चीवर उभे राहून कीचन मधल्या पालीकडे🦎 बघत आणि इतक्या दुरूनही ती पाल सुद्धा आपल्याकडे बघते आहे असं कविताला वाटत होतं.


अजूनही समीरला फोन करावा का? असा विचार मनात येताच तिला आठवले की, आपला मोबाईल देखील किचनमध्येच ओट्यावर आहे. आपणच तो चहा बनवताना गाणे ऐकायला नेला होता आणि आता त्यावर अगदी प्रासंगिक गाणे लागले होते.


"वद जाऊ कुणाला शरण ग... करील जो हरण संकटाचे, मी धरीन त्याचे चरण ग...वद जाऊ कुणाला शरण?"


उभ्या उभ्या कविताची बोबडी वळली होती त्यामुळे याच गाण्याचा आवाज मोठा करता आला असता आणि शेजारी कुणीतरी मदत मागतय गाण्यातून असं वाटून आलं तर बरं होईल असाही विचार आला तिच्या मनात. असे कितीही विचार आले तरी त्याचा उपयोग होणार नव्हता, शेवटी पालीला घराबाहेर काढणे आता ही तिची जबाबदारी होती.


खूप हिम्मत करून कविता हॉलला लागूनच असलेल्या छोट्याशा किचनच्या जवळ गेली आणि पालीकडे बघून विचार करता करता तिच्याशी हात जोडून बोलू लागली. 'जिथे आपली शक्ती आणि युक्ती दोन्ही कमी पडतात तिथे उगाच आगाऊपणा न करता सरळ शरण जावे!' इतपत शहाणपण कविता कडे नक्कीच होते. आता तेच ती वापरत होती. क्षणभरासाठी पालीकडे बघत असताना वाटले.. जशी मी घरात एकटी आहे तशीच ही सुद्धा एकटी आहे! त्यामुळे आता जे काही आहे ते सामोपचाराने बोलूनच प्रश्न मिटवावा,.. आणि कविता चक्क पालीशी 🦎 बोलायला लागली,


"हे बघ मी तुला घाबरते हे तुला कदाचित माहिती नाही म्हणून सांगून टाकते. तू कदाचित मला घाबरत असशील किंवा नाही पण तरी जर तुला शक्य असेल तर खिडकी अजूनही उघडी आहे. तू त्यातून जशी आली तशी जा. "


"आता माझ्या मदतीला कोणी नाही. मी ठरवलं तर तुला बाहेर काढू शकते पण माझ्या बाहेर काढण्यात खिडकीच्या बाहेर मी तुला टाकलं तर खाली खूप खोल पडल्यावर तुला लागेल! मी तुला सिंकमधून किचनच्या ओट्यावर व त्यावरून किचनमध्ये मग हॉलमध्ये आणि तिथून दारातून अंगणात तुला घेऊन जाईपर्यंत तू कुठेतरी वळवळ करशील. इकडेतिकडे पडशील मग मी ओरडेल आणि तू पण घाबरशील. त्यापेक्षा मी तुला पाच मिनिट वेळ देते. तू प्लीज जा. मी वाटल्यास बाहेर तुझ्यासाठी काही खायला आणि पाणी पण ठेवते. तू तुझी बाहेर सुखी रहा, मी माझी घरात राहते. इतके दिवस हे घर रिकाम होतं त्यामुळे तू येत असशील पण आता मी राहते आणि तुला घाबरते त्यामुळे तू दुसरीकडे कुठेतरी जा बाई! "


एवढे बोलून कविता तिच्या जाण्याची वाट पाहत होती. आपण इतके बोलू शकलो याबद्दल स्वतःचं मनातल्या मनात कौतुकही करत होती. हिम्मत आणखी थोडीशी वाढवून पाच मिनिटा नंतर शेवटी कविता हातात झाडू घेऊन आली आणि पुन्हा एकदा विनवणी करू लागली,


"हे बघ मी पुढचं दार उघडले आहे. तू शहाण्या सारखी ओट्यावर येऊन तिथून फक्त एकदा खाली उडी मार म्हणजे मी तुझ्यावर झाडू ठेवेल. तुला दाराबाहेर नेऊन सोडले. पण हे करताना छोटा झाडू घेऊन कचरा भरण्याच्या सुपडीत तुला टाकून बाहेर टाकण्याची माझी हिम्मत नाही. मोठा झाडू दाबून ठेवला तर तुला त्रास होईल आणि अलगत ठेवला तर तू मला त्रास देशील. आपल्या दोघींमध्ये डील आहे, मी तुला त्रास देणार नाही आणि तू मला त्रास देऊ नकोस. मी अलगद तुला बाहेर घेऊन जाते..."


पालीच्या डोळ्यात डोळे घालून कधी नव्हे ते हे कविता एवढ सगळ बोलली आणि कशी कोण जाणे पण, पालीला कविताची कीव आली आणि स्वतःवरच दया करत तिने वरून खाली उडी मारली. उडी मारताच आधी तर चार पावलं घाबरून पळत जात कविता उभी राहिली पण नंतर हिम्मत करून दोघींमध्ये ठरल्याप्रमाणे तिने अलगद पालीला झाडूच्या मदतीने दारा बाहेर काढले आणि दार लावून एकदाचा मोकळा श्वास घेतला!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy