वाद की समंजसपणा?
वाद की समंजसपणा?
गैरसमज खोडून टाकायचे असतील तर बोलायला शिकले पाहिजे, वाद टाळायचे असेल तर आरोप करायचे थांबवले पाहिजे.
न बोलण्याने गैरसमज हे वाढतच जातात त्यामुळे गैरसमज संपवायचे असतील तर ज्या-त्या वेळी बोलून आपले मत मांडावेत अन्यथा दुसऱ्याच्या मनात काय आहे हे समजणार नाही आणि आपल्या मनात काय चालू आहे याच्यावर विश्वास ठेवून आपली वर्तणूक देखील तशीच होत जाते. त्यामुळे पेटलेला वाद न मिटता वाढतच जातो त्यापेक्षा ज्या त्या वेळी बोलून मन मोकळे केले पाहिजे.
दुसऱ्यांचे जरी चुकले असले, तरी त्याची चूक स्पष्टपणे दाखवून द्यावी. त्याच्यावर आरोप करून वाद वाढवण्यापेक्षा समजूतदारपणे बोलून, सर्व गोष्टींची परिस्थितीची जाणीव मनात ठेवून, आपले विचार स्पष्टपणे कोणाच्याही भावना न दुखावता मांडावे. रागला प्रतिउत्तर राग न देता समजुतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा.
मने दुखावली की नात्यांमध्ये ही दुरावा निर्माण होतो. हा दुरावा इतका वाढत जातो की त्याला सोडवण्याचा कोणत्याही व्यक्तीकडून प्रयत्न होत नाही. उलट आजूबाजूचे लोक याचा फायदा घेऊन स्वतःहाचा स्वार्थ साधून घेतात हे आपण प्रत्यक्षात समजले पाहिजे.
नात्यात गोडवा टिकवण्यासाठी कधी स्वतःही नम्रपणे भूमिका घेतली पाहिजे. आपल्या गोड वागण्याने जर समोरच्यांचे मनपरिवर्तन होत असेल तर तसे वागून हा बदल घडवून आणला पाहिजे. आपल्या वागण्याने जर आजूबाजूला शांतता निर्माण होत असेल तर नक्कीच असे वागावे.
जर परिस्थिती खरंच हाताबाहेर असेल तर अशावेळी शांत राहणे आणि सर्वकाही वेळेवर सोपवणे हाच एकमेव मार्ग आहे. शुल्लक आणि किरकोळ कारणांसाठी आकांडतांडव करण्यापेक्षा शांत राहणे म्हणजे आपण हार पत्करणे असे नव्हे तर भविष्यात परत या गोष्टी होऊ नये म्हणून आता तडजोड करणे हे महत्त्वाचे आहे.
समजूतदारपणे वागूनही जर समोरची व्यक्ती आपल्या वागण्याला अनुकूल उत्तर देत नसेल तर अशा व्यक्तींना दुर्लक्ष करून आपण स्वतः शांत राहिले पाहिजे. शेवटी उद्विग्न न होता शांतपणे प्रत्येक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणे यातच शहाणपण आहे.
