STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

2  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

स्वातंत्र्य अमृतमहोत्सव!!

स्वातंत्र्य अमृतमहोत्सव!!

4 mins
53

         ज्या जीवनासाठी मी आज तळमळत आहे, त्या जीवनाची सुरुवात कशी होते आणि कशी संपते हे फार मोठे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधताना बऱ्याच गोष्टींच्या माध्यमाने जीवन प्रवास करावा लागतो. ज्याचा त्याचा वेगवेगळा प्रवास, कधी सुखकर, तर कधी खडतर ! या खडतर प्रवासातून वाट काढताना अशा खूप काही घटना असतात जे आपल्यात अमुलाग्र बदल घडवून आणतात. लोकांच्या कल्याणासाठी निस्वार्थी भावनेने जगण्यास शिकवतात. स्वातंत्र्य म्हणजे काय असते हे उपभोगण्यास माणसांना प्रोत्साहित करतात. स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्यास भाग पाडतात.

           जीवनाचा प्रवास माझा 

           असो सुखी वा खडतर, 

           जगेन जीवन दुसऱ्यांसाठी 

           कष्टातून उभी राहीन तत्पर! 

     आज 15 ऑगस्ट ! 'स्वातंत्र्य अमृत महोत्सव' साजरा करण्याचा उत्सव! आपला राष्ट्रीय सण! आता तर कोरोनाच्या नियमावलीचे बंधन ही नाही. मग काय धुमधडाक्यात आपले देश प्रेम साऱ्या जगाला दाखवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालो आहोत. हा उत्सव साजरा करण्यासाठी, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, जो भला मोठा इतिहास रचला गेला आहे त्या इतिहासाची जाणीव ठेवण्याचा हा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट होय. इतिहास नेहमीच आपल्याला एक नवी दिशा दाखवत असतो. येणाऱ्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्याची नेहमीच मदत होते. इतिहासामुळेच आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होत असते. भूतकाळातील घटना वर्तमानास शिकवत असतात. ज्या धरतीत मी जन्मले, मोठी झाली, त्या मातृभूमीसाठी माझी मरण्याचीही तयारी असते.

          भारताच्या धरतीवर 

          मी पाय माझा रोवला,

          जन्म घेऊन या भूमीत 

          धन्य हा आत्मा जाहला! 

    मातृभूमी! या शब्दानेच आपोआप मनात देशभक्ती जागते. ज्या आईच्या उदरातून जन्म घेतो त्या आईसाठी वाटेल ते करण्याची आपली तयारी असते. आज आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने पूर्ण देशभरात 75 वा 'स्वातंत्र्य अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. हा अमृत महोत्सव साजरा करताना 'हर घर तिरंगा' हा उद्देश सर्वत्र देशभरात राबविला जात आहे. हर घर तिरंग्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती रुजावी. हा राष्ट्रीय उत्सव इतर उत्सवाप्रमाणे सर्वांनी समानतेने साजरा करावा. कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येकाने मनात एकता, समता आणि बंधुतेचे धडे जोपासून साऱ्या जगाला भारताची शक्ती दाखवून द्यावी, हाच ध्येय आहे. 

      स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थिती पाहता ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला अशा थोर व्यक्तीमत्त्वांची आठवण काढून, येणाऱ्या नव्या पिढीसमोर एक आदर्श, एक नवा इतिहास सकारात्मकतेने रचावा हेच या आजच्या उत्सवाचे महान कारण आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत जे आपल्या दैनंदिन जीवनात गुरफटून गेले आहेत त्यांना जागृत करणे, इतर देशांच्या तुलनेत माझा राष्ट्र कसा महान आहे हे दाखवून देणे, देशाचा विकास, नागरिकांचा विकास कसा होईल हे प्रत्येकाच्या मनात रुजवणे, देशभक्तीचा नारा घराघरातून दुमदुमवणे हाच आपल्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा खरा उद्देश आहे.

        आपल्या भारताने स्वातंत्र्यानंतर प्रगतीला सुरुवात करता करता आज भारत प्रगतीपथावर जाऊन पोहोचला आहे. देशाची प्रगती व्हावी म्हणून बऱ्याच क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी अतोनात कष्ट केले आहेत. ज्यांचे स्वप्न फक्त देशाचा विकास होता त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी स्वतःचा विकास रोखला होता. त्यांच्या कष्टांचे आज चीज झाले आहे. ज्या शून्यातून भारताला घडविले त्या भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीला काही वर्ष शिल्लक आहेत, तोपर्यंत आपल्या भारताला खेड्यापाड्यातील मूलभूत गरजांच्या विळख्यातून, बेरोजगारी, भ्रष्टाचार, भय, असुरक्षितता, अत्याचार, दारिद्र्यातून बाहेर काढून असा एक सशक्त, सुसंपन्न, सुसज्ज आणि सामर्थ्यशाली देश बनवायचा आहे.

    जोपर्यंत इंग्रजांचा छळ जन माणसाला जाणवत नव्हता तोपर्यंत इंग्रज लोक आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. इंग्रजांचे वेगवेगळे बंदीचे कायदे, त्यांनी केलेला भेदभाव, लोकांच्या नजरेसमोर येऊ लागले तसे लोकांचे डोळे उघडले आणि संघटने शिवाय सर्व व्यर्थ आहे हे त्यांना कळून चुकले . यातूनच लोकांच्या मनात सामाजिक, राजकीय, नैतिक व मानसिक उन्नतीसाठी संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे येत गेला. या संस्थेतूनच स्वातंत्र्याच्या ठिणग्या पेटत गेल्या. असा हा स्वातंत्र्याचा लढा 1857 पासून सुरू झाला होता. शेकडो वर्षे गुलामगिरीच्या जोखडात अडकून पडलेला आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन आज 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

     ज्या देशभक्तांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नांसाठी बलिदान केले त्यांचे स्वप्ने आज साकार करूया. स्वातंत्र्य जरी मिळाले असले तरी आजही अनेक समस्या, विषमता भेदभाव दूर करून आपण आपला देश बलशाली करूया. इंग्रजांनीं फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब करून लोकांमध्ये फूट पाडली, आज आपण आपल्या मनामध्ये ऐक्याची भावना रुजवून देशात एकतेने राहण्याचा ध्यास घेऊया. इंग्रजांनी शिक्षणाचा प्रसार केला परंतु फक्त कारकून बनवण्यासाठी परंतु आज आपण या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशाच्या विकासासाठी करूया. स्वतःच्या भरभराटीसाठी शेतकऱ्यांचा फायदा करून घेणाऱ्या धुर्त इंग्रजांसारखे न वागता कृषीप्रधान देशात उद्योजकांबरोबर शेतकऱ्यांची ही भरभराटी व्हावी, भारतीय जनतेला त्यांची स्थिती सुधारण्यासाठी लोकांमध्ये प्रेरणा, जाणीव जागृती निर्माण करून मनामनात देशाच्या विकासाचा विचार रुजवला पाहिजे यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया. आधुनिक तंत्रज्ञानाचे जाळे आज सर्वत्र पसरले आहे, परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग नव्या पिढ्यांना बिघडवण्यासाठी न करता त्यांच्या बुद्धीत भर पाडून देशाला त्यांचा उपयोग होईल या धोरणांसाठी करूया. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आपले संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे हे आपले सौभाग्य आहे . आपण सारे खूप भाग्यवान आहोत की आपण या भारताच्या पवित्र भूमीवर जन्म घेतला आणि स्वातंत्र्याच्या या सुंदर वातावरणात श्वास घेत आहोत.

      देशभक्ती ही एक पवित्र शक्ती आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनात ही देशभक्ती जागवायची आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ साऱ्या जगाला दाखवून द्यायचा आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' या मंत्राचा संदेश या धरती मातेवर पसरवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून पुढे व्हायचे आहे. आपल्या अधिकारांसोबतच आपल्या कर्तव्यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे आणि त्याचे पालन करणे ही गरजेचे आहे. तरच आपला भारत देश एक महासत्ता म्हणून इतर राष्ट्रांच्या समोर उभे राहील. अनेक आव्हानांना सामोरे जाऊन, एकनिष्ठेने एकत्रित येऊन,प्रयत्न करायचा आहे. लोकशाही मूल्यांना दृढ बनवण्याचा सर्वजण मिळून आज प्रण घेऊया. आपल्या पूर्वजनांनी देशासाठी केलेला त्याग बलिदानाची जाणीव लक्षात ठेवून आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या समोर हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास सज्ज व्हायला पाहिजे. बाह्य देशांची तिरकस नजर आपल्या देशावर पडू नये हे जगास दाखवण्यासाठी हा अमृत महोत्सव अती उत्साहाने, देशभक्तीने व निष्ठेने साजरा केलाच पाहिजे.

           घेऊनी तिरंगा हातात 

           ललकारी ह्रदय उल्हासाने,

           भारत माता की जय हो ,

           घराघरातून साद येई उत्साहाने!


जय हिंद जय भारत!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational