संकेत ची सहल
संकेत ची सहल
'आई, आज आमच्या वर्ग शिक्षकाने सांगितले की, रविवारी सहलीला जायचे आहे. मग मी जाऊ का ग ?',असा प्रश्न संकेत ने विचारला. आईने थोडंसं नको असं सुरू केलं. संकेतचा चेहरा उतरला, पण त्याने मनाशी ठरवले की काहीही करुन आईला तयार करायचे आणि सहलीला जाण्यासाठी परवानगी घ्यायची. विचार करत करतच तो आपले आवराआवर करत होता.
शाळेतून आल्याबरोबर पटकन दप्तर काढले आणि पळत हात-पाय धुवायला गेला. हातपाय धुताना देखील त्याच्या डोक्यात सहलीला जाण्याचे विचार घोळत होते. आईला कसं पटवू ?बाबांना कसं सांगू? हेच त्याच्या मनात घोळत होते. कारण आई-बाबा सहलीला जाण्यासाठी परवानगी देणार नाही याची त्याला खात्री होती. आता राहिले फक्त आजी आजोबा कसंतरी आजी-आजोबांना सांगून पटवून परवानगी मिळवायची होती .हाच विचार करत करत त्याने हात पाय धुतले आणि देव घरात येऊन हात जोडून उभा राहिला ,कारण शुभंकरोती म्हणण्याची वेळ झाला झाली होती. आजीजवळ लाडीगोडीने शुभंकरोती म्हणून झाल्यावर प्रसाद घेण्यासाठी हात पुढे केले . आजीने संकेतचा उतरलेला चेहरा पाहून विचारले, 'संकेत काय झाले? बेटा आज तू थोडासा नाराज उदास दिसतोय. शाळेमध्ये कोणी रागवलं का ?'
संकेत आपला उगाच उदास चेहरा करून पलीकडे जाऊन बसला. परत आजीने विचारले, ' बाळा काय झाले तुला?' तरीही संकेत उत्तर देण्यास तयार नव्हता. शेवटी त्याने सहलीबद्दल आजीला सांगितले. आजीने ही सुरुवातीला नको नको असे म्हणत नकार दिला, परंतु संकेत ची इच्छा पाहून आजीने देखील त्याच्यासमोर मान हलवून होकार दिला. आजीची मान्यता मिळाल्यावर संकेत खुश झाला कारण आजीचे म्हणणे घरात कोणीच मोडत नव्हते संकेत अभ्यास करत बसला. अभ्यास करता करता त्याच्या मनात सहली विषयी खूप उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचं अभ्यासात देखील लक्ष लागत नव्हतं. तेवढ्यात स्वयंपाक घरातून आवाज आला, आजी आईला सांगत होती ,'जाऊदेना संकेतला, कुठे जास्त लांब जाणार आहे, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक ही आहेत. तसेच त्याचे वर्गमित्र ही आहेत. जाऊ दे, जायचं म्हणतोय तर.' तेवढ्यात आई म्हणाली. ' आई तुम्हाला माहित आहे ना, की सहल म्हटलं की मला तो प्रसंग आठवतो. कसं आपण आपला जीव वाचवून आलो. माझ्या डोक्यातून अजून जात नाही .परंतु आजी म्हणाली ,'अगं झालेल्या गोष्टी परत परत उगाळत बसू नये. दरवेळी तसंच काही होईल असे का समजतेस? मुलं आता मोठी आहेत. त्यांना कळू लागले आहे. ते स्वतःचे संरक्षण करू शकतात. जाऊ दे आपण त्यांच्या शिक्षकांना भेटूया आणि सर्वकाही सांगूया. म्हणजे ते सगळ्यांची जास्त काळजी घेतील.'
शेवटी आईने देखील होकार दिला. नंतर थोड्यावेळाने आई माझ्या खोलीमध्ये आली आणि तिला सर्व काही विचारलं .संकेत ने सांगितलं,' पुढच्या रविवारी आमची सहल जाणार आहे. तू शाळेत ये आणि शिक्षकांची बोलून फी वगैरे भरून त्यांना सविस्तर विचार.' आईने हो म्हणत त्याला जेवण्यास घेऊन गेली. संकेत, बाबा ,आई आणि आजी आजोबा सगळे एकाच टेबलवर बसून जेवत होते. जेवता जेवता सहलीचा विषय निघाला. त्यामध्ये बाबाने आईने आजीने आजोबाने संकेतला बरेच नियम सांगितले आणि काही धोक्याच्या सूचनाही दिल्या. संकेत म्हणाला, 'काळजी करू नका ,मी सर्वकाही लक्षात ठेवीन आणि शिस्तीत वागेन.' असे म्हणत त्याने जेवण आटोपले आणि आपल्या खोलीत जाऊन थोडासा अभ्यास करत बसला.
अभ्यास झाल्यानंतर तो झोपी गेला झोपीत त्याने झोपडीत खूप सुंदर स्वप्न पाहिले. त्या स्वप्नात तो परग्रहावर सहलीला गेला होता. त्याचे स्वप्न फारच मजेशीर होते. स्वप्नात अंतराळात तो एका तबकडीत बसून गेला होता. ती तबकडी उडत उडत एका ग्रहावर गेली आणि हळूच खाली उतरली .संकेत देखील त्या यानधून बाहेर आला, तर पाहतो काय ! या ग्रहावर देखील पृथ्वी सारखी स्थिती होती. सर्वत्र हिरवी झाडे, काळी माती, उंच डोंगर रांगा, दऱ्याखोऱ्या परंतु एकही माणूस मात्र दिसत नव्हता . संकेतला हे सर्व पाहून फारच मजा येत होती. सर्वकाही आपल्या पृथ्वी सारखेच होते. फक्त फरक एवढाच होता की आपल्या पृथ्वीवर प्रदूषण भरपूर होते आणि इथे मात्र प्रदूषणाचा लवलेश ही नव्हता .सर्वत्र कसे निर्मळ आणि स्वच्छ दिसत होते. नदीचे पाणी खळखळत शुद्ध असे होते. थंड वाऱ्याच्या झुळकेने संकेत खूप सुखावला होता .फळे अतिशय ताजीतवानी ,सुदृढ व परिपक्व होते. संकेतने खूप फळे तोडली आणि खाऊन टाकली. रंगीबिरंगी फुलांवर हात फिरवून तो फुलांच्या रंगांचे मजे घेत होता. तो या सर्व नयनरम्य वातावरणात स्वतःला विसरला होता. त्याने कधीच अशी ही पृथ्वी असेल याची कल्पना केली नव्हती. कीती स्वच्छ सुंदर आणि रंगीत अशी पृथ्वी दिसत होती !
अचानक संकेतला धाड करून असा आवाज आला आणि त्या आवाजाने तो उठला. सकाळचे सात वाजले होते .
संकेतला आठवले, अरे हे तर स्वप्न आहे आणि आज त्याला सहलीला जायचे आहे .तो उठला आणि तयारी करू लागला .आई आणि आजी कावऱ्याबावऱ्या झाल्या होत्या. आई संकेतला सोडायला शाळेमध्ये गेली होती. ती वर्ग शिक्षकांशी बोलत होती. संकेतने पाहिले ती वर्गशिक्षकांना विनवणी करून सांगत होती. संकेत लहानपणी असाच सहलीला गेला असताना एका घाण पाण्यात पडला होता. त्याला कसे तरी बाहेर काढले पण घाण पाणी नाकातोंडात गेल्याने त्याला बरेच दिवस इस्पितळात अतिदक्षता विभागात ठेवलेले होते. वर्ग शिक्षकांनी आईला विश्वासात घेऊन सांगितले की त्या स्वतः जातीने संकेत कडे लक्ष देतील ,तेव्हा आईचा जीव भांड्यात पडला. सर्व मुले बस मध्ये चढली आणि आपापल्या पालकांना निरोप देत सहलीच्या ठिकाणी बस धावत सुटली.
सर्वजण आनंदात होते. मजेत बसच्या प्रवासाचा अनुभव उपभोगत होते .अखेरची बस एका किल्ल्यावर येउन थांबली .इथून पुढचा प्रवास पायीच करायचा होता . सर्व मुले खाली उतरली आणि रांगेत पुढे पुढे चालू लागली. पण हे काय सगळीकडे घाणच घाण होती . सगळीकडे दुर्गंधी सुटली होती . झाडे तर निस्तेज दिसत होती. रोपांना फुलेच आलेली नव्हती आणि धुळीने सर्व झाडे माखलेली होती . संकेतला हे पाहून कसेतरीच झाले. त्याने जी कल्पना केली होती त्याच्या पेक्षा वेगळेच असे काहीतरी पाहायला मिळत होते. शेवटी किल्ल्यावर सर्व मुले शिक्षक पोहोचली .सर्वांनी पहिल्यांदा उपस्थिती दर्शविली. त्यानंतर सर्वजण एका जागेला बसून जेवण घेतले .परंतु किल्ला जरी भारदस्त असला तरी त्याची व्यवस्था नीट नेटकी नव्हती. पुरातन काळात किल्ल्याचे फोटो पाहिले असता आताची अवस्था फारच ढासळलेली होती . सर्वत्र फक्त प्रदूषणाचे साम्राज्य होते.
किल्ला फिरून झाल्यावर सर्वजण घरी परतले . संकेत मात्र थोडासा नाराज दिसत होता. आईने कारण विचारल्यावर संकेतने जे जे काही पहिले ते ते सर्व आईला सांगितले आणि रात्री जे त्याने स्वप्न पाहिले होते त्याबद्दल ही सांगितले.
' मी स्वप्नात पाहिलेली पृथ्वी किती सुंदर होती आणि आपण खरेखुरे जिथे राहतो ती पृथ्वी का अशी प्रदूषित आहे? तशी पृथ्वी आपली कधी होणार?' असे प्रश्न तो आईला विचारत होता. याचे उत्तर देणे आईला फारच कठीण जात होते, परंतु हे प्रश्न खरंच विचार करायला लावणारे होते.संकेतचे प्रश्न आज सगळ्या जगाला विचारायला पाहिजे .शुद्ध निर्मळ पवित्र पृथ्वी साठी आपणच सर्वांनी पुढे होऊन प्रदूषण रोखण्यासाठी काहीतरी करायला हवे. प्रदूषण फक्त बोलल्याने संपवता येत नाही तर त्यासाठी आपण स्वतः जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. तेव्हाच आपली पृथ्वी प्रदूषण विरहित होईल.
