वाचलेले सर्वोत्तम पुस्तक
वाचलेले सर्वोत्तम पुस्तक


कर्णाच्या जीवनावर आधारित श्री. शिवाजी सावंत यांनी लिहिलेली "मृत्युंजय" हि कादंबरी मी पहिल्यांदा शाळेत असताना वाचली. मला अजूनही आठवतेय की या कादंबरीने अशी काही भुरळ घातली होती कि मी तहान-भूक विसरून ती वाचली होती.
या कादंबरीत सामाजिक तसेच राजकीय परिस्थितीचे वर्णन अतिशय सुंदरपणे केले आहे. सूर्यपुत्र असूनही कर्णाच्या जीवनात उपेक्षाच आली. लग्नाआधीच कुंतीला सुर्यदेवाच्या आशिर्वादामुळे पुत्ररत्नाचा लाभ झाला. परंतु, समाजाच्या भीतीने मनावर दगड ठेवून कुंतीने त्याचा त्याग केला. सूर्यपुत्र असल्याने कर्णाला जन्मताच मिळालेली कवचकुंडले हीच त्याची एकमेव ओळख कुंतीकडे होती. कुंतीने एका पेटीत कर्णाला ठेवून त्याला नदीत सोडले. ती पेटी हस्तिनापुरात घोडागाडी वाहक अधिरथ यांना सापडली. पेटीतील त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरील तेज, त्याची कवचकुंडले पाहून अधिरथांची खात्री पटते की हे कोणी सर्वसाधारण बालक नाही. अधिरथ व त्यांची पत्नी राधा यांनी खूप प्रेमाने कर्णाचे संगोपन केले. सूर्यपुत्र असूनही धनुर्विद्या प्राप्त करताना कर्णाला आलेल्या अडचणी मन हेलावून टाकतात.
दुर्योधन चुकीचा आहे हे माहीत असून आणि तो जेष्ठ पांडव आहे हे कळल्यावरसुद्धा मैत्री निभावण्यासाठी कर्णाने शेवटपर्यंत दुर्योधनाची साथ सोडली नाही. जन्मताच प्राप्त झालेली कवचकुंडलेही दान करताना तो बिथरला नाही. कर्ण, कर्णपत्नी वृषाली, कर्ण भ्राता शोण, कुंती, दुर्योधन व कृष्ण यांच्या संभाषणाच्या माध्यमातून कर्ण किती श्रेष्ठ व्यक्ती होती हे आपल्याला समजते.
आयुष्य म्हणजे काय याचा जणू शाश्वत शोध म्हणजे "मृत्युंजय". लेखक श्री. शिवाजी सावंत यांनी आपले विचार अगदी स्पष्टपणे मांडले आहेत. दानशूर असावे कर्णासारखे, मित्र असावा तर कर्णासारखा, हे आपल्याला अनेक समर्पक उदाहरणातून ही कादंबरी पटवून देते. "मृत्युंजय" हे एक उत्तम कादंबरीचे उदाहरण आहे. एकदा वाचून समाधानच होत नाही. आतापर्यंत पाच ते सहा वेळेस मी ते वाचले आहे आणि अजूनही पुन्हा वाचण्याचा मोह आवरत नाही म्हणूनच मी वाचलेले हे एक सर्वोत्तम पुस्तक/कादंबरी आहे.