Sushama Raut

Others Romance

4.8  

Sushama Raut

Others Romance

प्रपोजल

प्रपोजल

13 mins
3.3K


"वा... लाल रंग काय खुलून दिसतोय तुला"

"खरंच मम्मा...तुला आवडली ना मग हीच साडी मी रिसेप्शन साठी घेते"

"मी फक्त माझे मत सांगितले. तुला पसंत असेल तीच घे."

मृण्मयी, तिची आई, वाहिनी, होणारी नणंद व एक मैत्रीण अशा पाच जणी मिळून मृण्मयीच्या लग्नाची खरेदी चाललेली असते. मनपसंत नवरा मिळाल्यामुळे मृण्मयी खूप खुशीत असते. सर्वांच्या संगनमताने रिसेप्शन ची साडी खरेदी झाल्यावर इतर काही गोष्टी घेण्यासाठी जवळच असलेल्या मॉल मध्ये जाण्याचे ठरले. लेकीच्या लग्नाची खरेदी करताना तृप्ती आनंदीही होती आणि मृण्मयी आता तिला सोडून सासरी जाणार या कल्पनेने थोडी चिंताग्रस्त हि होती.

आनंद दुःख अशा मिश्र भावनांचा मनात चाललेला जोंधळा लपवून तृप्ती हसतमुखाने सर्व कामे पार पडत होती.

"मुलींनो एक वाजला आहे. पहिले जेवण उरकून घेऊया म्हणजे खरेदी साठी आणखी उत्साह येईल."

तृप्तीला सर्वानी एकमताने होकार दिला. जेवणावर यथेच्छ ताव मारून पुन्हा खरेदीला सुरुवात झाली. मृण्मयीला सासरी नेण्यासाठी काही नवीन वस्तू तृप्ती शोधत असताना तृप्तीला तिच्या मागे एक ओळखीचा आवाज ऐकू आला.

"हेय..टीपीटी , हाऊ आर यू ?"

तृप्ती वळताच सूट बूट घातलेली उंच गोरीपान व्यक्ती तृप्तीच्या नजरेस पडली.

"हाय सॅम ..कसा आहेस तू? अरे कुठे होतास इतकी वर्ष ?"एका श्वासात तृप्तीने प्रश्नांचा जणू भडीमारच केला.

ममा कोणाशी बोलतेय हे पाहण्यासाठी मृण्मयी तेथे आली.

"अगं किती प्रश्न विचारशील?"

"मृण्मयी, हा समीर माझा कॉलेज मित्र. खूप वर्षांनी भेटतोय."

"हाय अंकल, मॉम कडून बरेचदा ऐकलंय तुमच्याबद्दल"

"अरे बापरे, किती उद्धार केलाय माझा"

"काहीतरीच काय समीर ? अरे हिच्या लग्नाची खरेदी चाललेय."

"व्वा..अभिनंदन...कधी आहे लग्न?"

"सत्तावीस मार्चला. बरोबर वीस दिवसांनी" बोलत बोलतच मृण्मयीने वाकून नमस्कार केला.

"छान संस्कार दिले आहेस मुलीला. सुखी रहा बेटा."

"समीर, फोन नंबर दे तुझा. फोन करून रीतसर आमंत्रण देईन तुला. न विसरता लग्नाला यायचे बरं का."

फोन नंबरची देवाणघेवाण झाल्यावर समीर सर्वांचा निरोप घेतो व तृप्ती मुलींबरोबर पुन्हा खरेदी करण्यात व्यस्त होऊन जाते.

***************************************************

लग्न सोहळा अगदी छानपणे पार पडतो. लग्न झाल्यावर दोन दिवसांनी तृप्तीची जीवश्च कंठश्च मैत्रीण नीला तृप्तीला भेटायला येते.

"लग्न अगदी उत्तमप्रकारे पार पडले."

"हो ना. सगळं होईपर्यंत माझा जीव टांगणीला लागला होता."

"तू एकटी असून कुठेच काही कमी पडू दिले नाहीस."

"एकटी कुठे गं. तुम्ही सर्वानी जी मला मदत केलीत त्यामुळेच हे सर्व शक्य झाले."

"तृप्ती एक विचारू तुला?"

"विचार नं..परवानगी कसली मागतेस"

"मृण्मयीच्या लग्नात तू माझी तुझ्या कॉलेजच्या मित्राशी ओळख करून दिलीस. काय बरं नाव त्याचे, विसरले मी."

"सॅम...सॅम म्हणजे समीर"

"मी नोटीस केले कि सॅम सॉरी समीर लग्नात नवरा नवरी पेक्षा नवरी च्या आईलाच जास्त न्याहाळत होता."

"चल....काहीतरीच काय ?"

"काहीतरीच नाही. मी जे पहिले तेच सांगतेय. तुझी अवस्था सुद्धा मला त्याच्यासारखीच वाटतेय. अगं नुसतं त्याच नाव घेतलं तरी तुझ्या डोळ्यात मला वेगळीच चमक जाणवतेय. आपण दोघी एकमेकींना इतक्या जवळून ओळखतो कि आपली कोणतीही गोष्ट एकमेकींपासून लपून रहात नाही किंवा आपण लपवूच शकत नाही. खरं कि नाही ?"

"अगदी बरोबर बोलतेयस तू नीला. आजपर्यंत माझ्या आयुष्यातील एक गोष्ट मी तुला कधीच सांगितली नाही आणि आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण मला वाटतेय कि माझे हे सिक्रेट तुझ्याशी शेअर करण्याची वेळ आज आली आहे. मी कॉलेजात दुसऱ्या वर्षाला असतानाची गोष्ट आहे ही" असे बोलून तृप्तीचे मन अलगद गतकाळात रमले.

*********************************

"हाय"

"हाय"

"मी समीर. आपण गेली तीन वर्ष एकत्र शिकतोय पण कधीच एकमेकांशी बोललो नाही. आता आपली कॉलेजात फक्त दोन वर्ष उरली आहेत आणि नंतर प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात बिझी होऊन जाणार. म्हणून मी ठरविले आहे कि मी आतापर्यंत वर्गात ज्यांच्याशी बोललो नाही त्या सर्वांशी बोलून मैत्री करायची"

"वाह... फारच सुंदर कल्पना आहे ही समीर."

"अहं... समीर नाही सॅम...मला कॉलेज मध्ये सर्वजण सॅम म्हणूनच ओळखतात."

"ओके...सॅम... मी तृप्ती...आपण नेहमी एकमेकांना बघतो पण बोलणे कधीच झाले नव्हते. मलाही नवीन मित्र मिळाल्याचा आनंद झाला."

"असाच आनंद सर्वाना मिळावा व आपला मित्र परिवार वाढावा म्हणून मी पुढाकार घेऊन सर्वांशी बोलायचे ठरविले आहे."

"चल बाय...उद्या भेटूया"

"इतकी घाई घरी जायची."

"आधीच लेक्चर दहा मिनिटे जास्त घेतले गेल्यामुळे उशीर झाला आहे. घरी जाऊन जेवण उरकेपर्यंत माझी ट्युशन ची मुलं येतात. "

"दॅटस ग्रेट...तू स्वतः शिकता शिकता ज्ञानदानाचे पवित्र कामही करतेस."

" शाळेच्या मुलांना शिकविणे हा माझा छंद आहे. मला मनापासून त्यात आनंद मिळतो. खूप उशीर झाला मी निघते."

सॅम व तृप्ती रोज कॉलेजात भेटू लागले. दोघांच्यातील संभाषण वाढू लागले. दोन वर्ष कधी संपली ते कळलेच नाही. शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आल्यामुळे सर्वजणच नेटाने अभ्यासाला लागले होते. तृप्तीला शांत वातावरणात अभ्यास करायची सवय असल्यामुळे ती नेहमी लायब्ररीतच अभ्यास करत असे. एक दिवस सॅम लायब्ररीत आला.

"टीपीटी, जरा बाहेर येतेस का ?"

जसे समीर चे सॅम झाले होते तसेच सॅमने तृप्तीचे टीपीटी असे नवीन नामकरण केले होते.

तृप्ती लगेचच उठून बाहेर आली.

"काय रे, काय काम आहे ?"

"मला तुझ्याकडून इकॉनॉमिक्सच्या नोट्स पाहिजे होत्या. परीक्षा महिन्यावर आलेय आणि मला भरपूर शंका आहेत."

"एव्हढच ना. अजिबात घाबरू नकोस. मी तुला नोट्स हि देईन आणि तुला जिथे शंका आहेत ते सविस्तर शिकवेनही."

"नको नको.तुझ्या अभ्यासात व्यत्त्यय नको."

"व्यत्त्यय कसला. उलट तुला शिकवता शिकवता माझीहि इकॉनॉमिक्स ची रिविजन होऊन जाईल."

"ये तो सोने पे सुहागा हो गया. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन"

तृप्तीने जसा वेळ मिळेल तसा सॅमच्या शंकांचे निरसन केले. दोघांनाही पेपर उत्तम गेले.

शेवटच्या पेपरच्या दिवशी सर्व मित्र- मैत्रिणींनी कॉलेजात भेटायचे ठरविले होते. परीक्षा छान झाल्यामुळे सर्वजणच आनंदात होते.

गप्पाटप्पा, मजामस्ती झाल्यावर सर्वजण घरी जायला निघाले तेव्हा सॅम तृप्तीला म्हणाला, "टीचर, तुमची गुरुदक्षिणा द्यायचेय मला."

"काहीतरीच काय ? एकदुसऱ्याला मदत केली नाही तर आपली मैत्री काय कामाची ?"

"प्लिज टीपीटी, मला प्रवचन देऊ नकोस. उद्या आपण लंचसाठी भेटूया. माझ्याकडून तुला गुरुदक्षिणा."

"नाही रे, उद्या नाही जमणार. मला मावशीकडे जायचे आहे." सॅमने दिलेला प्रस्ताव टाळण्यासाठी तृप्तीने कारण दिले.

"ठीक आहे, उद्या नाहीतर परवा किंवा तुला जमेल तेव्हा. तू वेळ सांगितल्याशिवाय मी इथून हलणार नाही."

आता तर तृप्तीचा नाईलाज झाला. शेवटी एक दिवस ठरवून दोघेही निघाले.

ठरल्याप्रमाणे तृप्तीच्या घराजवळच असलेल्या हॉटेलमध्ये दोघेही भेटले.

"या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये किती छान दिसतेयस तू ."

"थँक यू. जेवणाची ऑर्डर दे. मला थोडे लवकर निघायचे आहे."

"एक काम कर, जेवण राहू दे. आताच निघून जा तू”

"रागावतोस कशाला ?"

"रागावू नको तर काय करू...तुझ्या सोयीप्रमाणे वेळ ठरवूनच आपण आज भेटलो आणि तू आल्याआल्याच निघायचे बोलतेयस."

"सॉरी....ऑर्डर दे बघू आता."

ऑर्डर देऊन झाल्यावर सॅमने तृप्तीला विचारले "पुढे काय करायचे ठरविले आहेस तू ?"

"मला शिकवायला फार आवडते हे माहीतच आहे तुला. बी.एड. करून टीचर व्हायचे ठरविले आहे मी."

"वा...फारच छान."

"तू काय करायचे ठरविले आहेस ?"

"मला एम. बी. ए. करायचे आहे. बघूया कसे जमतेय ते."

"उत्तम"

"टीपिटी मला तुला काहीतरी सांगायचंय नाही विचारायचं. पण कसे सांगू किंवा विचारू तेच कळत नाही आहे."

"कळत नाही तर एवढा कसला विचार करतोयस, कळल्यावर विचार" असे बोलून तृप्ती जोरात हसू लागली.

इतक्यात सॅमने तिच्यासमोर एक पेपर सरकविला.

"हसू नकोस. वाच काय लिहिलंय ते."

तृप्तीने पेपर उघडताच तिचा चेहरा कावराबावरा झाला. "I love you " असे शब्द वाचताच तिने लगेच आजूबाजूला पहिले व खात्री केली कि तिच्याव्यतिरिक्त आणखी कोणी पेपरवर लिहिलेले वाचले नाही ना.

"सॉरी टीपीटी...तू रागावली नाहीस ना"

"नाही रे बिलकुल नाही. तू तुझ्या भावना व्यक्त केल्यास. जे मला जमलं नाही ते तू केलंस."

"म्हणजे तू रागावली नाहीस...आणि तू काय बोललीस तुझ्या भावना म्हणजे काय सांगायचंय तुला."

"मला नाही सांगता येणार तुझ्यासारखं. तू समजून घे याचा अर्थ काय तो" तृप्तीने लाजत लाजत उत्तर दिले.

तृप्तीचा खुललेला चेहरा बघून सॅमला तर आभाळच ठेंगणे झाले. तृप्तीकडून एवढ्या लवकर उत्तराची अपेक्षाच नव्हती त्याला.

दोघेही जसा वेळ मिळेल तसं भेटू लागले. यथावकाश तृप्तीचे बी.एड. व सॅमचे एम. बी. ए. पूर्ण झाले. दोघांनाही मनासारख्या नोकऱ्या मिळाल्या. सर्वकाही अगदी दोघांच्या मनासारखे चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तृप्तीच्या घरी कोणीतरी तृप्ती व सॅम च्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली.

आणि जे सर्वसामान्यपणे घडते तेच घडले. घरात सुतकी वातावरण निर्माण झाले. जणूकाही तृप्तीने अक्षम्य गुन्हा केला होता. तृप्ती कधी घरी येतेय आणि तिला जाब विचारतोय असे आई-बाबांना झाले होते.

"सात वाजले तरी अजून कशी नाही आली कार्टी " बाबांनी फेऱ्या मारत विचारले.

"गेली असेल कुठे त्या सॅम कि प्याम बरोबर"

इतक्यात दारावरची बेल वाजली. आईने धावत जाऊन दरवाजा उघडला.

"काय गं कुठे गेली होतीस ?"

"कुठे म्हणजे शाळेतून येतेय मी. असं ओरडून का विचारतेयस."

"हल्ली बरेचदा तू घरी उशिरा येतेस म्हणून आईने विचारले." बाबांचा स्वरही नाराजीचा होता.

आईबांचा एकंदर बोलाण्याचा प्रकार व अवतार पाहून तृप्तीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

तरीही धीर एकवटून तृप्ती म्हणाली, "हो आता परीक्षा जवळ आली आहे ना. पेपर सेटिंग करतेय, जे शाळेच्या वेळेत करता येत नाही. त्यामुळे थोडा उशीर होतो."

आतापर्यंत आईचे डोळे लाल झाले होते.

"खोटं बोलू नकोस. हा सॅम कोण आहे" आईने एकदम मुद्द्यालाच हात घातला.

आईच्या तोंडी समीरचे नाव ऐकताच तृप्ती पार घाबरली. गोंधळलेल्या अवस्थेतच ती म्हणाली, "माझा कॉलेजचा मित्र आहे तो."

"मित्र कि आणखी काही. उद्यापासून घरातून बाहेर जायचे नाही. तुझी हि थेर आमच्याकडे चालायची नाहीत. लवकरच तुझे लग्न उरकून घेऊ " तृप्तीचे उत्तर ऐकायच्या आधीच बाबांनी डरकाळी फोडली.

आतातर तृप्तीची बोलतीच बंद झाली. सगळा धीर एकवटून ती म्हणाली "समीर तुम्हाला भेटायला येणार आहे."

"आम्हाला कोणालाच भेटायचे नाही. यशवंत काकांनी तुझ्यासाठी एक स्थळ आणले आहे. खुप दिवस ते मागे लागले आहेत. चांगल्या घरातील मुलगा आहे. त्याच्याशी लग्न करून आम्हाला आमच्या कर्तव्यातून मुक्त करा."

तृप्तीने आईबाबांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळे व्यर्थ... तिचे घराच्या बाहेर पडणे हि बंद केले गेले. परीक्षा जवळ आल्यामुळे बाबा तिच्याबरोबर शाळेत जात व तिला घेऊनच घरी परतत. समीरला निरोप देणे हि अशक्य झाले होते. खूप प्रयत्न करूनही तृप्तीचे म्हणणे कोणीच ऐकले नाही व एक दिवस तिच्या मनाविरुद्धच तिचे लग्न पार पडले.

हळूहळू तृप्ती संसारात रमली तरी क्षणोक्षणी ती समीरचाच विचार करत होती. लग्न झाल्यावर एक दिवस तिने घराबाहेर पडून समीरला फोन केला व झाला सर्व प्रकार त्याला सांगितला. समीरचे कुठेही लक्ष लागेना कोणत्याही कामात मन रमेना. शेवटी त्यानेही अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

तृप्तीला दोन मुले झाली...मुलगा तपन व मुलगी मृण्मयी...तृप्तीचा नवरा मात्र फारच संशयी होता. तृप्तीला संसार व नोकरी व्यतिरिक्त काही जीवनच उरले नव्हते. नवऱ्याच्या स्वभावामुळे त्यांचे सतत खटके उडत पण मुलांकडे बघून तृप्ती शांतपणा घ्यायची.

तपन इंजिनीअरींगच्या पहिल्या वर्षाला व मृण्मयी अकरावीत असतानाच अचानक तृप्तीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. न डगमगता तृप्तीने मुलांचे शिक्षण पूर्ण केले. तपन इंजिनीअर तर मृण्मयी सी.ए. झाली. चांगली नोकरी मिळाल्यावर तपनचे लग्न झाले. त्याची कंपनी पुण्याला शिफ्ट झाल्यामुळे तो आपल्या परिवाराबरोबर पुण्याला गेला. एक दिवस मृण्मयीनेही तिला आवडत असलेल्या मुलाबद्दल आईला सांगितले. तृप्तीने त्या मुलाला घरी बोलावले व त्याची सर्व माहिती विचारली. तृप्तीला मुलगा खूप आवडला. तिने त्याच्या आईवडिलांची भेट घेऊन रीतसर लग्न ठरविले.

*********************

तृप्तीची जीवनकहाणी ऐकण्यात रीमा एकदम मग्न होऊन गेली होती.

"आपण इतक्या चांगल्या मैत्रिणी आहोत पण आज मला तुझ्या आयुष्यातील घडामोडी कळल्या."

"माझ्या मनात सर्व गोष्टी होत्या पण मी सर्वांसमोर कधीच आणल्या नाहीत. पण सॅम भेटल्यापासून मन कसे चलबिचल झाले आहे. सर्व जुन्या आठवणी उफाळून आल्या आहेत. तुला सगळे सांगितल्यावर थोडं हलकं वाटू लागलंय."

"कळतंय मला सगळं. एक सांग सॅम मुंबईत कुठे राहतोय.”

"गोरेगाव मध्ये त्याचे घर आहे. मुंबईत आल्यावर तो तिथे राहतो. असे कालच त्याने मला फोनवर सांगितले. आम्ही बराच वेळ बोलत होतो तेव्हा मला कळले कि दोन वर्षांपूर्वीच त्याच्या बायकोचे कॅन्सरचे निदान झाले व अवघ्या चार महिन्यात ती हे जग सोडून गेली. त्याला एक मुलगा आहे पण अमेरिकन संस्कृतीप्रमाणे त्याने आपला वेगळा संसार थाटला आहे."

"मुंबईत किती दिवस मुक्काम आहे सॅम चा"

"अजून महिनाभर आहे तो मुंबईत. मी त्याला आज घरी जेवायला बोलावले आहे."

"अरे बाप रे. मला सॅम यायच्या आधी निघाले पाहिजे."

"तो येणार म्हणूनच मी तुला बोलाविले आणि तू तो येण्याआधीच निघून जाण्याच्या गोष्टी करतेयस."

"तुमच्या कॉलेजच्या, जुन्या दिवसांच्या गप्पा होतील त्यात मला उगाचच मान डोलावत व खोटं हसू तोंडावर आणून बसावे लागेल."

"म्हणूनच तर मी तुला माझ्या पूर्वायुष्याची कल्पना दिली. सॅम जसा माझा जुना मित्र आहे तशीच तू सुद्धा माझी जिवाभावाची मैत्रिण आहेस. तुमची एकमेकांशी ओळख व्हावी म्हणूनच मी तुला बोलावलेय."

"आपण पुन्हा एकदा भेटू. नाहीतरी बाहेरचे जेवण जेवून तो कंटाळतच असेल. आणखी एकदा जेवायला बोलव त्याला." असे बोलत-बोलतच रीमाने आपली पर्स उचलली व तृप्ती काही बोलायच्या आतच दरवाजा उघडून बाहेर पडली.

"मला एकटीला सोडून निघालीस न " तृप्ती नाराज सूरातच बोलली.

"हे वेडाबाई मी कायम तुझ्याबरोबर आहे लक्षात ठेव. बाय..."

"रीमा.....प्लीज थांब ना" तृप्तीचे शब्द हवेतच विरले. रीमा एव्हाना निघून गेली होती. तृप्तीने हताश होऊन आरशात पहिले. व स्वतःशीच बोलली "काय हा तुझा अवतार....जरा व्यवस्थित तयार हो..."

सर्व जेवण तयार करून तृप्ती सॅमची वाट बघत टी.व्ही. समोर बसली होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. ठरल्याप्रमाणे सॅम बरोबर सात वाजता दारात उभा होता.

"ये अगदी वेळेत आलास. "

 "हो..तुला माहितेय ना , मला कोणाला वाट बघायला लावायला आवडत नाही "

"आठवतंय, एकदा तर मी..." एवढेच बोलून तृप्ती एकदम थांबली.

"थांबलीस का? मलाही आठवतेय... तू चक्क दीड तास उशिरा आली होतीस. मी खूप चिडलो होतो. पण घरातून निघताना सर्वाना चुकवून किंवा त्यांना पटतील अशी कारणे सांगून निघायचे म्हणजे किती तारेवरची कसरत असते हे कळल्यावर माझा राग एकदम शांत झाला होता.

"तू असा दारातच बोलत उभा राहणार आहेस का ? आत ये ..."

पाणी प्यायल्यावर पुन्हा तृप्ती व सॅम कॉलेजच्या तसेच त्यांच्या जीवनात झालेल्या घडामोडींच्या गप्पांत इतके रंगून गेले कि नऊ कधी वाजले ते त्यांना कळलेच नाही.

"अगं बाई नऊ वाजले. मी पान वाढते."

जेवण उरकल्यावर पुन्हा थोड्या गप्पा झाल्या. सॅमने अगदी मनापासून जेवणाचे कौतुक केले कारण खूप दिवसाने तो असे मराठमोळे घरगुती जेवण जेवला होता. त्याला आवडतात म्हणून तृप्तीने केलेले उकडीचे मोदक तर त्याने ताव मारून खाल्ले होते.

"बराच उशीर झाला, निघतो मी आता." असे बोलत सॅम ने तृप्तीचा हात धरला आणि नकळतच तृप्तीला आपल्या जवळ ओढले. तृप्तीही कसलीही असंमती न दर्शविता सॅमच्या मिठीत विसावली. भानावर येताच लगेच मागे सरली व म्हणाली, "पुन्हा कधी मुंबईत येशील तेव्हा नक्की फोन कर."

बोलताना तृप्तीचा आवाज दाटला होता. डोळ्यात अश्रू तरळत होते. काहीही न बोलताच सॅम निघून गेला.

तृप्तीने लगेच रीमाला फोन केला व झाला सर्व प्रकार तिला सांगितला तेव्हा कुठे तिचे मन शांत झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता तृप्तीचा फोन वाजला. रात्री बऱ्याच उशिरा झोपल्यामुळे तृप्ती साखरझोपेत होती. झोपेतच तिने फोन उचलला आणि समोरचा आवाज ऐकून तिची झोप पार उडून गेली.

"सॅम काय झाले रे ? इतक्या सकाळी फोन का केलास ?"

"टी पी टी , मी रात्रभर झोपलो नाही आहे, काळ जे घडले त्यासाठी सॉरी."

थोडा वेळ दोन्ही बाजूला शांतता होती. "तृप्ती, मला आज तुला भेटायचंय."

"आज पुन्हा....का ?"

"काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आणि तुला सांगायच्या राहूनच गेल्या."

"अरे पान आज...."

"मला काहीच ऐकायचे नाही. आपण कुठे भेटायचे याचा मेसेज मी तुला पाठवतो" एवढे बोलून सॅमने फोन बंद केला.

ठरल्या ठिकाणी सॅम व तृप्ती भेटले.

"चल, समोरच्या बागेत बसूया."

बागेत एका बेंचवर बसल्यावर, तृप्तीने विचारले, "काय बोलायचंय तुला ?"

"तृप्ती तू दिवसभर घरी काय करतेस ?"

"माझ्यासाठी काही बिजनेस प्रपोजल आहे का तुझ्याकडे`" असे विचारून तृप्ती जोरात हसू लागली.

"नो मस्करी...आय एम सिरियस."

"मी सुद्धा." तृप्ती हसू दाबत दाबत म्हणाली.

"मग माझ्या प्रश्नाचे उत्तर दे."

"घराची कामे... दुपारी झोप किंवा मैत्रिणींबरोबर पत्ते...संध्याकाळी बागेत फिरणे...रात्री जेवून झाल्यावर मुलांसोबत फोनवर गप्पा..."

"बस एवढेच आयुष्य आहे का ? तुला एकटेपणा नाही जाणवत."

" म्हणूनच तुला विचारले ना कि काही बिजनेस प्रपोजल आहे का तुझ्याकडे"

"हो आहे. फक्त तुला ते किती पटेल हे मला माहित नाही."

"लवकर काय ते सांग. मी पण खूप एक्सआयटेड आहे ऐकायला. आवडले तर नक्कीच एक्सेप्ट करीन तुझे प्रपोजल"

"एकच सांगतो. नाही आवडले तर रागवायचे नाही."

"एकमेकांवर रागवायला आता आपण लहान आहोत का ? बोला साहेब....आम्ही नाही रागावणार."

"ऐक...नीट विचार कर आणि मगच उत्तर दे"

"तुला आठवतेय मृण्मयीच्या लग्नाच्या खरेदीच्या वेळी आपण मॉल मध्ये भेटलो होतो. ते आपले भेटणे म्हणजे एक अपघात होता असे तुला वाटले असेल ना "

"हो"

"तो अपघात नव्हता. तुझे लग्न झाल्यानंतर मला जगणेच अशक्य झाले होते. मी अमेरिकेला निघून गेलो पण तुझी आठवण मला तिथेही जगू देत नव्हती. मी कायम तुझी खबर ठेवत होतो. तू कुठे राहतेस ? काय करतेस ? तुझ्या नवऱ्यापासून तुला किती त्रास होतोय, हे सर्व मला वेळोवेळी समजत होते. पण मी काही करू शकत नव्हतो. कारण मी कोणत्या नात्याने समोर येणार होतो. मी जर पुढे आलो असतो तर आपल्या दोघांच्याही संसारात प्रॉब्लेम सुरु झाले असते. बायकोचा कॅन्सर, तिचा उपचार, नंतर तिचे मला सोडून जाणे, मुलाचे लग्न या सर्व घडामोडींमध्ये मागची तीन-चार वर्षे निघून गेली. तोपर्यंत तुझ्याही मुलाचे लग्न झाल्याचे मला समजले. जेव्हा मृण्मयीच्या लग्नाबद्दल समजले तेव्हा मी ठरविले कि लग्न झाले कि तुला भेटायचे. पण नंतर विचार केला कि जर मृण्मयीच्या लग्नानंतर तू पुण्याला मुलाकडे निघून गेलीस तर मला जे तुझ्याशी बोलायचंय ते स्वप्नच राहील."

तृप्ती अगदी नि:शब्द होऊन सर्व ऐकत होती.

"रागावलीस का हे सर्व ऐकून ?"

"नाही. कारण सुरुवातीलाच तू तसे वाचन घेतलयस माझ्याकडून."

"अगं, तुझं लग्न झाल्यावर मी पार कोलमडून गेलो होतो. तेव्हापासून आतापर्यत असा एकही दिवस नाही कि तुझा विचार मनात नव्हता."

"मी काय तुझ्यावर रागावणार. माझीही अवस्था तुझ्याहून वेगळी नव्हती. मी सुद्धा तुला आतापर्यंत विसरू शकलेली नाही. माणूस आपले पहिले प्रेम कधीच विसरत नाही हे अगदी खरं आहे. नवऱ्याकडून होणार छळ व मनःस्ताप मी फक्त मुलांकडे बघून सहन करत होते. मुलांचे सुंदर भविष्य हाच माझ्या जगण्याचा एकमेव आधार होता."

"आणि तुझे आयुष्य ?"

"ज्यादिवशी माझे लग्न झाले व मी तुझ्यापासून दूर गेले त्यादिवशी खऱ्या अर्थाने माझे आयुष्य संपले. मी स्वतःबद्दल विचार करणे कधीच सोडून दिलंय. चल आपण निघूया, बराच उशीर झालाय."

"उशीर तर झालाच आहे. रात्र हि झालेय पण रात्र सरल्यावर पहाट होतेच हा निसर्गाचा नियम आहे ." 

"म्हणजे काय बोलायचंय तुला."

"आपल्या आयुष्यात आलेल्या रात्रीला संपवून आपण पहाटेचे आशेचे किरण आणू शकतो.""

"कसे ?"

"कसे म्हणजे लग्न करून...मी तुझ्या होकाराची वाट बघतोय."

"आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला हि गोष्ट पटणारी नाही."

"हे बघ प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठून तरी व्हावीच लागते. मी माझ्या मुलाशी बोललोय तुझ्याबद्दल. त्याला तर ऐकून फार आनंद झाला. तुला आवडणार नाही पण तुझ्या मुलीशीही मी काल रात्री बोललोय. ती व तिचा नवरा दोघांनाही माझा निर्णय अतिशय आवडला आहे."

"हे सगळे करताना मला विचारावे असे नाही वाटले तुला ?"

"नाही वाटले कारण मला माहित होते कि काहीतरी कारण काढून तू माझे हे प्रपोजल धुडकावून लावशील. मला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. तू फक्त तुझ्या मुलाशी बोलून घे."

"मुलगा समजून घेईल पण हे माझ्या सुनेला बिलकुल आवडणार नाही."

"आता नाही पटले तरी कालांतराने सर्व काही ठीक होईल"

"मला विचार करायला वेळ दे."

"नाही. आधीच ३५ वर्षे उशीर झालाय."

तृप्तीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. काय उत्तर द्यावे हे तिला सूचत नव्हते. दहा मिनिटे कोणीच काही बोलत नव्हते. अचानक तिने हातात असलेल्या टिशू पेपर वर काहीतरी लिहिले व समीरला देत म्हणाली, "वाच माझा निर्णय"

समीरने वाचताच त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या पेपरवर लिहिले होते," मी लग्नाला तयार आहे."कथेसाठी ५० शब्द

आजच्या युगातही जोडीदाराच्या मृत्यूनंतर दुसरा विवाह आणि तो सुद्धा उतारवयात याला अजूनही समाज मनापासून स्वीकृती देत नाही. तृप्तीच्या घरी तिचे समीरबरोबर असलेले प्रेमसंबंध समाजाच्या भीतीपोटी आईवडिलांनी न स्वीकारल्यामुळे दोघे दुरावतात. दोघेही आपापल्या संसारात व्यस्त होऊनही आपले पहिले प्रेम विसरू शकत नाहीत. उतारवयात भेट झाल्यावर पुन्हा त्यांचे एकटेपणा संपविण्यासाठी ते दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. समाजप्रबोधन हे या कथेचा मुख्य उद्देश आहे.Rate this content
Log in