पत्र....अनमोल खजाना
पत्र....अनमोल खजाना
दरवाज्यावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर दारात पोस्टमन काका उभे होते.
दरवाजा उघडताच मला म्हणाले, " हे घ्या तुमचे पत्र"
या मोबाईलच्या जमान्यात पत्र येणे कसे शक्य आहे असा विचार करून मी आश्चर्यानेच विचारले, "पत्र...आणि माझे."
"हो...तुमचेच नाव आहे पत्रावर" असे बोलून पोस्टमन काकांनी माझ्या हातात पत्र दिले.
अक्षर थोडेसे ओळखीचे वाटले. मी सोफ्यावर बसत-बसतच ते पत्र उघडले. पत्र इंग्लिश मध्ये लिहिले होते. मी प्रथम सर्वात शेवटी जाऊन पत्र कोणी लिहिले आहे ते वाचले. माझ्या मुलाचे नाव वाचताच मी अक्षरशः जागेवरून उडाले. आनंद व आश्चर्य अश्या संमिश्र भावनांनी मी पत्र वाचण्यास सुरुवात केली. त्यामध्ये माझ्या सातवीत असणाऱ्या मुलाने माझ्याबद्दल त्याला काय वाटते ते अगदी बेधडकपणे लिहिले होते. माझ्या स्वभावातील न आवडणाऱ्या गोष्टींचाही त्यात समावेश होता. तसेच पत्रात त्याने मी त्याच्यासाठी घेणाऱ्या कष्टांचे वर्णन अगदी समर्पक शब्दात केले होते. त्याच्या अभ्यासातील प्रगतीचे संपूर्ण श्रेय मला दिले होते.
मी घर व नोकरी सांभाळून त्याच्यासाठी जे काही करते त्यासाठी माझे आभार मानले होते. हे सर्व वाचता- वाचता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
माझा मुलगा शाळेतून घरी आल्यावर चौकशी केली असता मला समजले कि मुलांना टपालखात्याच्या कामाची माहिती व्हावी म्हणून शाळेत त्यांना सांगितले होते कि घरच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा मित्राला पत्र लिहा. माझ्या मुलाने माझी निवड केल्याचा मला अभिमान वाटत होता. या उपक्रमासाठी मी शाळेची शतशः ऋणी आहे.
त्या पत्रात शेवटी लिहिले होते कि " मी देवाला पहिले नाही पण मला माहित आहे तो माझ्या आईसारखाच आहे." हि ओळ वाचून तर माझी छाती अभिमानानं भरून गेली. माझ्या मुलाने मला लिहिलेले हे पत्र म्हणजे माझ्यासाठी अनमोल खजाना आहे.