Pranjali Lele

Drama

4.0  

Pranjali Lele

Drama

तुझं-माझं जमेना.. नातं सासू-सुनेचे

तुझं-माझं जमेना.. नातं सासू-सुनेचे

2 mins
433


"अगं वृंदा पान वाढलंय, बस लवकर, ही म्हणजे ना कधीच वेळेवर बसणार नाही जेवायला..." शालिनीताई सुनीलकडे म्हणजे आपल्या मुलाकडे सुनेची तक्रार करत होत्या. सगळं अन्न गार होतंय.. हिचा आपला नेहमीच उशीर ठरलेला.. असं पुटपुटत असतानाच वृंदा तयार होऊन आली. घड्याळाच्या काट्यात दहा वाजले की शालिनीताई मुलाला आणि सुनेला दोघांनीही गरम फुलक्या करून वाढत असे.. दोघेही जेऊन ऑफिसला पळत.


स्वयंपाकाची शालिनीताईंना भारी हौस होती. जणू अन्नपूर्णाच होत्या त्या.. कुणालाही काही खाऊपिऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायच्या नाहीत. त्यांना विविध पदार्थ करण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याची खूप आवड होती. त्यामुळे किचनचा ताबा त्यांच्याकडे होता. वृंदा मात्र सकाळी त्यांना करू द्यायची. तिची पण ती धावपाळीची वेळ असायची. मुलांचे सारे आवरून बाकी वरची कामे ती उरकत आणि ऑफिसला जात असे. संध्याकाळी आल्यावर रात्रीचा स्वयंपाक मात्र तीच करत असे. तसे तिने सासूबाईंना सांगून ठेवलेलं होतं. सासू सूनेमध्ये याबाबतीत चांगले संगनमत असे.


शालिनीताईदेखील मग संध्याकाळी छान तयार होऊन बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारत बसत. शालिनीताई स्वभावाने बोलक्या तर वृंदा याच्या उलट.. आपलं काम आणि घर यात ती बिझी असे..तिला फार कुणामध्ये मिक्स व्हायला विशेष आवडत नसे. ऑफिसमध्ये तर वृंदा खूप लकी आहे अशा तिच्या साऱ्याच मैत्रिणी तिला म्हणत. आमच्या सासूबाई नाही बाई इतकी मदत करत असा इतरांचा सुर असे. 


वृंदा आणि शालिनीताई यांचा स्वभाव म्हणजे नदीचे दोन टोकं असाच..एक अबोल तर दुसरी बोलघेवडी..शालिनीताईंना सगळे काम पटपट आवरण्याची घाई तर वृंदाचे आपले सावकाश काम चाले. यावरून कित्येकदा दोघींमध्ये शाब्दिक वाददेखील होत असे..पण तो तेवढ्यापुरता..कारण दोघीही जाणून होत्या की दोघींचाही हा स्वभाव बदलायचा नाही. 


घरी बरेचदा "सासू बोले सुने लागे" या उक्तीची प्रचिती येई.. सासू सूनेमध्ये बऱ्याच छोट्यामोठ्या कारणावर वादावादी होई..सुनील मात्र त्यांच्या या भानगडीत पडत नसे.. वृंदाला वाईट वाटे आणि रागही येई पण तात्पुरता..कारण सासूची माया त्या शब्दातून जरी व्यक्त करत नसत तरी त्यांच्या कृतीतून मात्र त्याचा प्रत्यय तिला कायम येई. मग तीदेखील त्यांच्या वाढदिवशी खास शालिनीताईंना आवडते म्हणून त्यांच्या आवडीची बासुंदी आणि कांद्याची भजी आवर्जून करी. त्यांना आवडणाऱ्या फोडणीच्या भातासाठी मुद्दामच रात्री भात अधिक लावत असे. त्यांच्या आवडीच्या पीठ पेरलेल्या भाज्या अधूनमधून रात्रीच्या जेवणात करी. त्यावर सुनील तिला ओरडे की, "अगं आईला पचत नाहीत रात्री अशा पीठ पेरून केलेल्या भाज्या.." वृंदा मात्र शालिनीताईंना ती भाजी अगदी चवीने खाताना बघून खुश होई.


शालिनीताईंना बरे नसले की वृंदा त्यांच्या तोंडाला चव यावी म्हणून गरम गरम सोजी त्यांना खाऊ घालत असे. त्यांना फळं आवडत नसल्याने खास फळांचा रस त्यांना आग्रहाने प्यायला लावी. मग शालिनीताईदेखील खुश होऊन आपली खास कडक इस्त्रीतली कॉटन साडी वृंदाला ऑफिसला घालायला देत असे.


सासू-सुनेचं नातं म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच..दोघींमध्ये मतभेद निर्माण होणारच पण तरीही त्यात एक अदृश्य बंध असतो जो या नात्याला जपतो.

तर असे हे सासू-सुनेचे नातं म्हणजे "तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना" या उक्तीची परोपरीने आठवण करून देणारं असंच असतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama