Shilpa Desai

Inspirational Others

3  

Shilpa Desai

Inspirational Others

तु भेटशी नव्याने - भाग १

तु भेटशी नव्याने - भाग १

8 mins
283


माझी एम.ए. ची परीक्षा संपली. आजच शेवटचा पेपर झाला होता. त्यामुळे आज डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे कमी झाले होते. अगदी मस्त! प्रफुल्लीत वाटत होते. जवळ जवळ दोन महिने नुसता अभ्यास एके अभ्यास चालला होता. स्टडीरुम हेच जणू विश्व झाले होते. इतर गोष्टीकडे लक्ष दयायला वेळच नव्हता.


   परीक्षा संपली की प्रथम स्वयंपाक करायला शिकायचा. तसेच आईला वाटते म्हणून विणकाम, भरतकाम इ... शिकावे. असा एक मी मनात ढोबळ आराखडा आखत बसले होते. इतक्यात आईने गरमागरम चहा आणला. चहाचा कप हातात घेऊन मी गच्चीवर गेले. चहा पितानांच टेबलवरचे मॅगझीन चाळत बसले. वातावरणात मस्त धुंदी होती. दूरवर पक्षांचे थवे आपल्या घरटयाकडे जाताना दिसत होते. सूर्यराज लाल जांभळया रंगात पश्चिमेकडे मिरवत होता. कुंडीतल्या गुलबकावलीकडे माझी नजर गेली अन ती गोजरी फुले खुदकन हसली. कितीतरी दिवस मी त्यांना पाहिलंच नव्हतं. बिचारी माझी आतुरतेने वाट पाहत असावीत. पटकन उठून कुंडीपाशी गेले आणि हळुवारपणे फुलांवर ओठ टेकवले. त्याक्षणी रस्त्याकडे लक्ष गेले. रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. त्या अनोळखी माणसात ओळखीचा आभास झाला. माझे डोळे ताटारले. पुन्हा एकदा खात्री केली. ‘होय ...तीच ती..’ मनाची खात्री झाली. आता मी धावतच रस्त्याच्या दिशेने सुटले. स्कुटर थांबवून कोणाशीतरी ती बोलत होती. मी बाहेर येईपर्यंत ती बरीच पुढे गेली होती.

रिक्षाने जाऊ का.

‘रिक्षा ’’…sssssssssssssss‘

‘मॅडम कहा जाना है ’’

‘सीधा चलो. किसीका पिछा करना है ’’ ‘‘ भैया तेज से चलाओ ना. थोडा और तेज से’’ माझी सारखी भूणभूण चालू होती. तसा तो गुस्यातच बोलला, ‘‘मॅडम और कितना तेज चलाऊ, एक्सीडेंट करवाना चाहती हैं क्या.’’ पण मला त्याच्या बोलण्याची पर्वाच नव्हती.

आत्ताच तर दिसली. एवढया लवकर गेली कुठे. तीच होती का ‘ती’.... होय नक्कीच. तीच ती. माझ्या मनाने कौल दिला.

रुको... रुको!

भुर्र.. भूर्र... आवाज करत रिक्षा तिच्या बाजूला जाऊन थांबली. तशी ती बाई दचकून जोरात चालू लागली.

"ताई...’ मी मोठयाने हाक दिली. तसे तिने मागे वळून पाहिलं.

"आपण मला विचारलंत का? सॉरी पण तुम्ही मला माझ्या ताईसारख्या दिसलात म्हणून हाक मारली. सॅारी, काही नाही या आपण." ती कोणीतरी अनोळखी बाई आहे, हे पाहून माझी खूपच निराशा झाली. पुन्हा हताशपणे माघारी फिरले.


    गच्चीवर जाऊन पुन्हा त्याच खुर्चीवर विसावले. काही वेळापूर्वी हवेहवेसे वाटणारे वातावरण आता नकोसे वाटू लागले. पुन्हा एकदा विचारचक्र सुरु झाले. कालचक्राचे वर्तुळ दिवस‐महीने‐ वर्षे करीत अखंडपणे चालू असते. आपल्याही सुखदु:खाचे असेच असते, कालचक्राप्रमाणे ती भेटत राहतात. हा पाठशिवणीचा खेळ असाच असतो कोणालातरी सुखाची आशा देतो तर कोणी दु:खाचे राज्य घेऊन बसतो. आणि हे सगळे करतो तो परमेश्वर ! त्याच्यावर श्रद्धा जितकी जास्त तितका हा खेळ चांगला रंगतो. मग त्या दु:खाच्या राज्यातही सुखाची आशा माणसाला खेळण्याची ताकद देते.


   या सगळ्याचा तिने कधी विचार केला असेल का? या जगात परमेश्वर वैगेरे कोणी नाही. आणि तो जर असेल तर नक्कीच आंधळा किंवा बहिरा असावा. का छळतो तो असा मला. डोळयातील आसू लपवत ती बोलली होती. तिचे आणि माझे नेमके नाते कोणते हे सांगणे अशक्यच. आमचे नाते मायेचे होते. नाती काय फक्त रक्ताचीच असावी लागतात. माणूसकीची नाती किती लागेबंधे निर्माण करतात. असेच होते आमचे नाते कोणाला न उमगणारे पण मायेने भरलेले.

   

काही वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा आम्ही आमच्या गावी म्हणजे सोनगावला राहात होतो. कारण माझे बाबा शिक्षक होते; आणि बाबांची बदली त्याच गावांतील स्कूलमध्ये झाली होती. अनासाये आम्हाला स्वत:च्या घरात आमच्या जॉईन्ट फॅमिलीमध्ये राहायला मिळत असल्याने दिवस मजेत जात होते. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाचे मंदीर. गावापासून देऊळ लांब नाही पण उंच घाटमाथ्यावर बांधलेले आहे. घाटाला बगल देऊन वाहणारी नदी आणि पैलतीरावर घनदाट जंगल. तसेच किनाऱ्यावर केवडयाचे आणि वेळूचे दाट बन आहे. अगदी विलोभनीय देखावा. निसर्गाचा वरदहस्त आहे हया गावावर. कमनीय विलास! संध्याकाळचा तासनतास बसून निसर्गाचे मधुर संगीत ऐकण्यात खूप मजा वाटे. मला तर तो छंद जडला होता.


   त्या दिवशी सोमवार होता. सकाळचे नऊ वाजले होते. देवळात घंटानाद चालू होता. मलाही महादेवाच्या देवळात जायचे होते. मी पूजापात्र व फुलांनी भरलेली परडी घेऊन घाटाच्या पायऱ्या चढत होते. तेव्हाच मला समोरच्या कठडयावर एक जोडपं बसलेले दिसले. त्यातील पुरुषाच्या हाताला जबर जखम झालेली दिसली. आणि ती बाई आपल्या रुमालाने त्याच्या हातावर पट्टी बांधत होती. तो एकसारखा कण्हत होता.

‘‘मॅडम प्लीज मला थोडे पाणी मिळेल का’’ ती व्याकुळतेने मला म्हणाली.

‘‘हो, नक्कीच मिळेल. यांना खूपच लागलंय, तुम्ही थांबा इथे मी लगेच पाणी आणून देते.”

मी लगबगीने देवळामागच्या तळ्यातील पाणी त्यांना आणून दिले. तिने पहिल्यांदा त्याला पाणी पाजले. मग तहानेने व्याकुळ झालेली ती स्वत: घटाघटा पाणी प्यायली. ते पिताना तिच्या अंगावर सांडत होते याची जाणीव तिला नव्हती. आता तिला थोडंसं सावध वाटलं. तशी ती म्हणाली ‘थॅंक यू मॅडम, आणखी एक विचारु का?’

‘विचारा की’ मी.

 "गावात एखादी भाडयाने खोली मिळेल का." किलकिल्या डोळ्यांनी पाहात अपेक्षेने तिने मला विचारल.

‘तसं काही निश्चित सांगता येणार नाही पण चौकशी करावी लागेल. पण तुम्ही कोठून आला आहात व यांना हा अपघात कसा काय झाला.’ माझे प्रश्न चालूच होते.

पण व्याकुळ होऊन ती मला पुन्हा म्हणाली ‘आम्हाला कुठेतरी राहायची सोय सांगा ना प्लीज.’ तिच्या त्या प्लीजमध्ये आर्तता होती. मला तिची खूपच दया आली.

 

‘‘ताई, तुम्ही थोडा वेळ त्या झाडाखाली बसा मी देवळात जाते व तुमच्या मदतीसाठी कोणालातरी विचारणा करते. कारण तुमच्या मिस्टरांना खूप त्रास होत आहे त्यांना लवकरात लवकर डॉक्टरकडे नेले पाहिजे.’ असे सांगून घाईनेच मी देवळात प्रवेश केला. पिंडीवर डोकं ठेवलं आणि मनातलं देवाला सांगितलं, देवा त्या अनोळखी माणसांना मार्ग मिळू दे. देवाचा प्रसाद घेऊन पुन्हा त्या दोघांजवळ आले.

"हा घ्या प्रसाद.’ तिच्या हातावर प्रसाद ठेवत मी म्हणाले. तिने तो प्रसाद अधाशासारखा तोंडात टाकला. नंतर त्या बाप्याला भरविला. पुन्हा एकदा ते पाणी प्यायले. आता त्या दोघांना बरं वाटत होत. बरं, इथल्या सदानंदाला मी सांगितलेले आहे तो आत्ताच बाजार लाईनला जाणार आहे. तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरकडे जा; म्हणजे तुम्हाला तिथे उपचार होतील. हा, आणि एक इथे वाहतुकीची साधने जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत त्यामुळे सदाबरोबर सायकलने जा. तो नेईल तुम्हाला."


इतक्यात सदा तिथे आलाच आणि रोजच्याप्रमाणे हीsss हीईssss करत विचारलं, ‘मंजीरीबाय कोणला इजा झाली हाय. हयांना व्हय. तुम्ही काळजी करु नका माझ्या या सायकलनं मी तुम्हास चटदिशी डाक्टरकडं नेतो’. बोलल्याप्रमाणे सदाने सायकलच्या मागे बसवून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. नाहीतरी सोनगावचे लोक एकमेकांना मदत करण्यास पुढे असतात. आपल्या जीवाची पर्वा न करता अडलेल्याला मदत करणे हा त्यांचा धर्म. आता तिचे डोळे पाण्याने भरले. कासावीस होत ती बाई म्हणाली, मी कविता आणि हे माझे पती श्रीकांत गवाणेकर. मी एका कंपनीत नोकरी करते आणि श्रीकांत इंजिनिअर आहेत. आमच्या दोघांचे कालच लग्न झाले आहे. असे म्हणून ती ओक्साबोक्सी रडू लागली. तिला मी कसेबसे सावरले. चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. मी येते तुमच्याबरोबर. असं मी बोलताच तिचा चेहरा खुलला. आम्ही पायीच चालू लागलो. ती पुढे बोलू लागली. ‘माझं हे दुसरं लग्न. पहिला नवरा अपघाती वारला. आणि श्रीकांतनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्याहीपेक्षा असे म्हणेन घटस्फोट प्रोसेस चालू आहे. काल आमचं लग्न अंबाबाईच्या देवळात झालं. त्यानंतर आम्ही श्रीकांतच्या घरी गेलो. श्रीकांतने दरवाजाचे लॉक ओपन केले आणि आम्ही घरात प्रवेश केला. आजूबाजूला अगोदरच दबा धरून बसलेली चार-पाच आडदांड माणसे काठ्या-कोयते घेऊन दरवाज्यात उभी होती. एकाने तर जोरात एक दांडा श्रीकांतच्या डोक्यात घातला. लगेच दुसरा, तिसरा पुढे सरसावले. काय करावे हेच कळत नव्हते. पण तशाही अवस्थेत श्रीने ढकलत एकाला बाहेर काढलं अंधारामुळे दुसरा माणूसही बाहेर खेचला गेला त्या संधीचा फायदा घेऊन श्रीने दरवाजा आतून बंद केला. मी खूप घाबरले होते. दरवाजा बाहेरुन मोठमोठयाने ठोठावला जात होता. ती माणसं आम्हाला ठार मारण्याची धमकी देत होती. अश्लील शिव्यांचा मारा चालूच होता. जीव मुठीत घेऊन मी व श्री बाथरुमध्ये जाऊन बसलो. मला हे सगळेच नवीन होते. काहीच कल्पना येत नव्हती. ते लोक दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही त्याचवेळी खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो. उंबरठयावरचे माप ओलांडून नवरी घरात प्रवेश करते तोच उंबरठा सोडून जीव वाचविण्यासाठी पळून दूर जायचे होते.


   कसलाही आवाज न करता श्रीकांतने बाथस्टूल व बकेटचा आधार घेत बाथरुमच्या भिंतीवर चढून मागच्या बाजूच्या छप्पराची चार कौले काढली. नंतर भिंतीवर चढून मागच्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला पकडून कसेबसे आम्ही बाहेर पडलो. श्रीकांतच्या हातावर, मानेवर रक्ताचे ओघळ वाहत होते. हाताला जखम झाली. आवाज न करता लपतलपत पळत सुटलो. पुन्हा मागे वळून पाहण्याचा धीर होत नव्हता. त्यांच्या बोलण्याचा आवाज मात्र येत होता. एका मोठया खडकाच्या मागे जाऊन बसलो. तर परत त्यांच्या आकृत्या मागावर असलेल्या दिसल्या. माझ्या पायात आता चालण्याचेही त्राण उरले नव्ह्ते. समोर काळोखाचे साम्राज्य पसरले होते आणि आमच्या डोळयासमोर काजवे चमकत होते. पुन्हा तिकडून पळण्याचा प्रयत्न केला असतानाच श्रीकांतचा पाय खडकाला अडकला व तो सरळ चार पाच फूट खोल खड्डयात कोसळला. आता माझ्या छातीचा ठोका चुकला होता. मागून त्या मारेकऱ्यांचा आवाज येत होता. म्हणजे ते अजूनही आमचा पाठलाग करीत होते. आता मी क्षणाचाही विचार न करता श्री कोसळला त्या खडयात अक्षरश: उडी घेतली. सुदैवाने मला कोणतीही इजा झाली नाही. श्रीकांत निपचित पडला होता. आता मरण समोर दिसू लागले. त्याही अवस्थेत मी देवाचा धावा करीत होते आणि माझ्या लक्षांत आले की श्री जिथे पडला होता त्या खडकाच्या खाली खोलवर कपारीत वन्य प्राण्यांनी खड्डा केला आहे. मी श्रीकांतला उठविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना उठताच येत नव्हते. मग मी त्यांना ओढतच त्या कपारीत नेले. कसेबसे त्या खड्‌डयात जाऊन आम्ही बसलो. बाजूलाच असलेल्या झुडूपामुळे आम्ही दोघेही कुणालाच दिसलो नाही. पंधरा मिनिटांनी त्यातला बाब्या नावाचा माणूस झुडूपापर्यंत येऊन पोहोचला. तो काही वेळ तिथे उभा होता. तोपर्यंत श्वास रोखून मी झुडपातून त्याच्याकडे पाहत होते. आजूबाजूला सगळीकडे त्याने नजर टाकली, पण त्याला काहीच दिसले नाही तसा तो निघून गेला. आता आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर पहाटे तीन वाजेपर्यंत आम्ही तिथेच बसून राहिलो. श्रीकांतला फार दुखत होते. त्याला वेदना होत होत्या. तो सारखा कण्हत होता. सहा वाजेपर्यंत आपल्याला पोलिस स्टेशन गाठायचे असा मी विचार करत होते. श्रीला चालता येत नव्हते. पण कोणत्याही परिस्थितीत तिकडून निसटायचे होते आणि आम्ही वाट मिळेल तिकडे चालू लागलो. रोडवर आल्यावर एखादे वाहन मिळेल या आशेने चालत राहिलो पण ते मिळालेच नाही. अखेर इथे येऊन पोहचलो. समोर शंकराचे मंदिर बघून धीर आला आणि तुम्ही भेटलात.


    बोलत असताना आम्ही हॉस्पिटलला कधी येऊन पोहोचलो कळलेच नाही. श्रीकांतला एक वेदनाशामक इंजेक्शन दिले होते. हाताला मलमपट्टी केली होती. आम्ही तिथे गेल्यावर त्यांना सलाईन लावण्यात आले. दोन दिवसांसाठी ॲडमिट करण्यास सांगितले. डोक्याला काही प्रमाणात मुका मार लागला असल्याचे डॉक्टरने सांगितले. कविता सारखी विनंती करत होती, ताई आम्हाला तू खूप मदत केली हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता मला आणखी एक मदत कर. आम्हाला भाड्याने रुम बघून दे. मी काहीच बोलत नाही हे बघून ती गयावया करू लागली. ‘कुठेतरी भाडयाने जागा मिळाली म्हणजे टेन्शन नाही.’ ती स्वत:शी पुटपुटली.


   आता मला राहवलं नाही. मी नाईलाजास्तव तिला म्हणाले, ‘बरं दोन दिवस तुम्ही आमच्या घरी रहा. मी माझ्या बाबांना सांगते. पण त्यानंतर तुम्हाला दुसरीकडे व्यवस्था करावी लागेल. ’देव तुझं भलं करु दे !’ डोळयातील पाणी लपवत ती म्हणाली.

"चला तर मग, ठिक आहे." मी हसून म्हणाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational