अक्षता कुरडे

Inspirational

3  

अक्षता कुरडे

Inspirational

टर्निंग पॉईंट

टर्निंग पॉईंट

3 mins
123


Breaking News..! Breaking News..! Breaking News..!

फक्त पंधरा वर्ष वयाच्या मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न...

चार माळ्याच्या बिल्डिंगवरून घेतली झेप...

नुकत्याच आलेल्या मालवाहू ट्रकमुळे वाचला जीव...

दोष कोणाचा..?


आज दिवसभरात टीव्हीवर सतत ही बातमी दाखवत होते. प्रणिताने न राहवून टीव्हीच बंद केला आणि किचनमध्ये गेली. चार दिवसांपूर्वी शुभम म्हणजेच तिच्या मुलाने बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारली होती. त्यांचं दैव बलवत्तर म्हणून तिथे मालवाहू ट्रक आला होता. आणि त्यात शुभम पडला. तिचं नक्की काय चुकलं याबद्दल ती विचार करत बसली. जेवणाचा डबा भरण्याची ती तयारी करू लागली. प्रणयने तिला खाली येण्यास सांगून निघून गेला. तीही लगेच दाराला कुलूप लावून खाली आली. प्रणयने रिक्षा थांबवली होती. लगेच ती त्यात बसली. आणि निघाले हॉस्पिटलच्या दिशेने. तिथे पोहोचताच ते जनरल वॉर्डमध्ये गेले जिथे शुभमला आज शिफ्ट केले होते. शुभमला नुकतेच इंजेक्शन दिल्यामुळे तो झोपला होता. नर्सने येऊन त्यांना डॉक्टरांनी बोलवल्याचा निरोप देऊन गेल्या.


टकSss.. टकSss..


"हो या आत या."


"डॉक्टर, तुम्ही बोलावलंत. शुभम ठीक तर आहे ना. आम्ही घरी कधीपर्यंत..."


"सध्या त्याला डिस्चार्ज नाही देऊ शकत. जखमा खोल आहेत. शरीरावरच्या आणि मनावरच्यासुद्धा. शारीरिक दृष्टीने तसा तो होईल रिकव्हर पण मानसिक दृष्टीचं काय..? त्यामुळे खरी गरज त्याला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची आहे. आणि त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची गरज लागेल."


"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की शुभम..?"


"यातच चुकतो आपण. मानसोपचार म्हटलं की व्यक्ती वेडा झाला, असं होत नाही मिस्टर देशमुख. डॉक्टरकडे जाऊन जसे शारीरिक उपचार करतो तसे मानसिक उपचार होणेदेखील अत्यंत गरजेचे आहे. हे कार्ड घ्या. गरज लागेल तुम्हाला. बघा विचार करा. मी फक्त इतकेच करू शकतो. आफ्टर ऑल इट्स युअर डिसिजन."

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शुभमला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच्या एका आठवड्याने मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाण्यात आलं. त्याला विचारलेल्या प्रश्नांनी कळलं, की तो एक गेम खेळत होता. ज्याचं नाव होत "ब्लू व्हेल." त्याला त्या गेमची लिंक कोणत्या प्रायव्हेट अकाउंटद्वारे मिळाली होती. शाळेत नेहमी अव्वल येणारा, कोणाशीही जास्त संपर्कात न राहणारा, अभ्यासाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर न बोलणारा असा होता शुभम. एकलकोंडा स्वभाव असल्याने कोणी मैत्रीदेखील करत नसे. वर्गातही एकटाच पुस्तकात डोकं घालून बसत. अभ्यासात हुशार असल्याने सगळे त्याचा तात्पुरता फायदा घेऊन निघून जात. महागडे गेम्स, आणि लेटेस्ट फिचर्सच्या सगळ्या गोष्टी घरी होत्या. पण खेळून खेळून किती खेळणार. तसेच आई-बाबा कामाला जात आणि उशिरा येत. त्यामुळे शाळेतून घरी आल्यावर घर त्याला खायला उठे. अशातच त्याला त्या नवीन गेमबद्दल कळलं.


सततच्या एकाकीपणामुळे तो कंटाळला होता. म्हणून काहीतरी नवीन करण्यासाठी त्याने हा गेम खेळण्याचे ठरवले. याची जाणीव ना प्रणिताला होती ना प्रणयला. त्या गेमनुसार पन्नास चॅलेंज त्याला देण्यात आले होते. आणि ते आतापर्यंत पारदेखील त्याने केले. आणि हेच शेवटचे चॅलेंज होते, जे करण्याचे धाडस आज शुभमने केले. त्याने मध्येच क्विट करण्याचेदेखील ठरवले होते पण एकदा का तो गेम आपल्या मोबाईलमध्ये आला, तर पूर्ण मोबाईल आपला हॅक होऊन जातो. त्यामुळे त्याला तिथून धमक्या येऊ लागल्या. आणि ते टास्क पूर्ण करण्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हतं.

कामात स्वतःला पूर्णपणे झोकून घेतलेल्या प्रणिता आणि प्रणयला हे सगळं अनपेक्षित होतं. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. उशीर झाला होता पण वेळ निघून गेली नव्हती. त्यांनी लगेचच घरी जाऊन आधी तो कॉम्प्युटर फोडून टाकला. त्यांना अजून कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. शर्टच्या बाह्यात लपलेलं, ब्लेडने हातावर काढलेलं व्हेलचं चित्र आज त्यांना दिसलं. त्याला फक्त औषध-गोळ्या न देता, शुभमला घेऊन ते दर विकेंडला बाहेर जाऊ लागले. त्याला आवडणाऱ्या गोष्टी करू लागले. त्याच्याशी कमी होत असलेला संवाद आता ते रोज गप्पा गोष्टी करून, त्याचे फक्त आई वडील न राहता आता मित्र बनू लागले. शिक्षकांशी संपर्क साधून त्यांना देखील या गोष्टीबद्दल सांगून, सतर्क केले. त्यांना साथ देण्याचे ठरवून शिक्षकांनी आठवड्यात एक चर्चासत्राचा तास ठेवू लागले. त्यामुळे शुभम सोबतच काही अबोल असणारी मुले हिम्मत करून बोलू लागली. त्यांचे बुजरे स्वभाव खुलू लागले. मनात कोंडलेले विषय बाहेर आल्याने शुभम सोबत इतरही मुलांचा स्वभाव स्वच्छंदी झाला.


आज शुभम लॉ कॉलेजमध्ये शिकत आहे. आजही त्याला त्याच्या आई-वडिलांची दिलेली साथ आठवते. फक्त गोळ्या, औषधांच्या भरवश्यावर न राहता त्यांनी आधी स्वतःमध्ये बदल घडवून त्याला मानसिकदृष्ट्या बरं आणि सक्षम केलं, आणि हाच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणून त्याला आठवतो. याच गोष्टीचा धडा घेत, आता बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्या वाईट लोकांना धडा शिकवत, निरागस लोकांची यातून सुटका करण्यासाठी, त्यांना सतर्क ठेवण्यासाठी त्याला वकील बनायचे आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational