ट्रेन मध्ये भेटलेली ती...भाग 2
ट्रेन मध्ये भेटलेली ती...भाग 2
साक्षी घरी पोहोचते. साक्षीला दारात उभी पाहताच "अरे! पहा कोण आलंय आज..."असं म्हणत साक्षीची आई येते. "माझं बाळ किती दिवसांनी आलीस तू. आज आठवण आली का तुला आमची?"असं म्हणत तिची आई तिचं सामान तिच्या भावाला आत नेऊन ठेवायला सांगते.साक्षी तिच्या गळ्यात पडून म्हणते, "नाही गं, रोजच आठवण यायची तुम्हा सर्वांची पण chance मिळत नव्हता ना यायचा म्हणून..." तेवढ्यात तिची आई म्हणते,"चल मस्का नको मारूस आता. आता आली आहेस तर महिनाभर राहाच. मी काही एक ऐकून घेणार नाही.साक्षी म्हणते "अगं आई, मी एवढे दिवस कशी राहू? मी एवढ्या सुट्टया नाही घेऊ शकत." आई म्हणते,"बरं बाई.ठीक आहे जा आधी तोंड हातपाय धुऊन ये तुला जेवण वाढते." साक्षी फ्रेश होऊन जेवून घेते. दोघी मायलेकी गप्पा मारत बसतात.घरातील सर्व लोक तिच्या येण्यामुळं खुश असतात. असा तो लगबगीचा दिवस संपतो. रात्री झोपताना सहज साक्षीच्या मनात विचार येतो की, "पुन्हा 'ती' मला दिसेल का?..."
दुसऱ्या दिवशी साक्षीची आई साक्षीला तिच्या सोबत बाजारात घेऊन जाते. तिची इच्छा नसतानाही ती आईसोबत जाते. ते खरेदी करत असतात, त्यांची खरेदी करून झाल्यावर साक्षी मागे वळते, तेवढ्यात कोणीतरी तिला धडकतं.साक्षीच्या तोंडून "आई... गं कोण धड..." असं निघणार तर तोच समोर साक्षात "ती" उभी होती, कपाळ चोळत. ('ही इथे?...') साक्षीला विश्वासच बसेना.
ती(कपाळ चोळत) : "Oh! Sorry, sorry."
साक्षी : "तुम्ही?... इथे??..."
(तेवढ्यात आई मध्येच त्यांचं संभाषण कट करत)
आई : "अगं, बाळा तू ठीक आहेस ना
(आणि साक्षीला एक फटका मारत
"नीट बघून चालत जा जरा...") लागलं नाही ना बाळा तुला. सॉरी हं, ही थोडी वेंधळीच आहे नाहीतरी."
ती : "मी ठीक आहे. नाही ओ माझीदेखील चूक आहे."
साक्षी : "अगं आई, मला पण लागलंय की..."
आई : (तिरपा कटाक्ष टाकत)गप्प.. बस... जरा....(साक्षी एकदम silent...)
हे सगळं पाहून 'ती' जरा हसली.साक्षी मनातल्या मनात(हिची तर smile पण मस्त आहे यार. अरे यार पण 'ती'चं नाव काय आहे???....)
ती : "sorry... माझ्यामुळे तुम्हाला लागलं. काल आपण भेटलो होतो, आठवतंय?"
साक्षी : "हा... पण तुम्ही नावच नाही सांगितलं तुमचं."
आई : "तुम्ही एकमेकींना ओळखता होय?"
ती : "हो काकू . आम्ही काल ट्रेन मध्ये सोबत होतो."
आई : "अगं मग तुम्ही एकमेकींना एवढं काय अहोजावो घालून बोलताय. तुम्ही एकाच वयाच्या असाल."
साक्षीच्या चेहऱ्यावरील भलंमोठं प्रश्नचिन्ह पाहून आई म्हणते, "साक्षी, ही प्राची. आपल्याच इथं (गावात) राहते." साक्षी मनातल्या मनात विचार करते "प्राची.... अच्छा! तर हे नाव आहे हिचं. तसं मला हिला भेटायचं होतं पण एवढा जास्तीचा योगायोग देखील अपेक्षित नव्हता मला."
प्राची : "ठीक आहे काकू येते मग मी.चल मग bye साक्षी भेटू पुन्हा."
साक्षी :हा.भेटू पुन्हा कधीतरी. (चला कमीत कमी तीच्या नावाची उकल तरी झाली आज. प्राची.... Hmm... Such a nice name.)

