टाकीचे घाव
टाकीचे घाव


मी सुमारे 100 वर्षांचा झाला होतो...! एकाच जागी ध्यान लावणाऱ्या ऋषिमुनींप्रमाणे मीही ध्यानस्थ होतो. पण त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक होता तो म्हणजे ऋषीमुनी हजारो वर्षे आयुष्य मिळण्यासाठी तप करत होते आणि मी नष्ट होण्यासाठी प्रार्थना...!
खरं सांगू का मी ना रानपक्ष्यांवर खूप जळायचो. त्याचं कारण म्हणजे ते स्वतंत्रपणे आकाशात संचार करायचे, हिरव्या मखमली शालेवर निजून मनापासून दाणे टिपत. तसेच इतर प्राण्यांचे रोज मुक्तसंचार करणे, त्यांचे हसणे, खेळणे माझ्या जिव्हारी लागायचे.
एक दिवस एक मनुष्य माझ्यासमोर येऊन उभा राहिला. तो खूप वेळ माझे निरीक्षण करत होता. हा मनुष्य का माझ्यासारख्या कुरूप खडकाकडे पाहत आहे? मला प्रश्नच पडला. नंतर त्याने त्याच्या एका हातात टाक घेतली वा दुसऱ्या हातात एक धारदार शस्त्र घेतले आणि माझ्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. प्रत्येक प्रहार माझ्या शरीराचे तुकडेच करत होते. माझे आयुष्य नष्ट होत आहे असे मला वाटले.
सुमारे एक महिना मी टाकीचे घाव सोसले...! नंतर त्या मनुष्याने मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून शेजारच्या गावात नेले. सर्व गावकरी पाळीपाळीने माझे चरण स्पर्श करत होते. मला काहीच कळत नव्हते. गावकऱ्यांनी मला स्वच्छ करण्यासाठी जवळच्या नदीत नेले. तेव्हा मी माझे प्रतिबिंब पाण्यात पाहिले. माझे रूपांतर श्रींमध्ये झाले होते. डोळ्यातून त्याक्षणी आनंदाश्रू आले. त्यावेळी मला एक गोष्ट लक्षात आली की... सुंदर असो वा कुरूप... देव हा प्रत्येकामध्ये असतो...!