फुलपाखरू
फुलपाखरू


आईने असं मला सांगितलं होतं की, आपल्यावर देवाचा वरदहस्त आहे आणि ते खरंच आहे. एका आयुष्यात कधी कोण कोणाला दोन आयुष्ये देतं का हो...?
माझा पहिला जन्म एका छोट्याश्या अंड्यातून झाला, तो सुरवंटीरुपी. खरं सांगायचं झालं तर लहानपणी मी एवढा हावरट होतो ना... की जन्मल्या जन्मल्या स्वतःच्या अंड्याचं कवचच खाऊन टाकलं होतं. नंतर मी दिवसरात्र पाने खाऊ लागलो. खरं सांगू का... मला ना त्या शेंडीवर आलेल्या फुलांचं आकर्षण वाटत असे, त्यांच्यासंगे खेळावेसे वाटे. मी अहोरात्र खाऊन खाऊन मोठा झालो... आकारानेही अन् तब्येतीनेही.
एक दिवस खाऊन खाऊन एकाच जागी बसलो होतो तेव्हा मला ढेकर आल्याचा भास झाला. परंतु तो ढेकर नव्हता... माझ्या तोंडातून एक रेशमी धागा बाहेर पडू लागला आणि त्याने मला घट्ट मिठी मारायला सुरुवात केली. मला वाटलं सोडेल लगेच 2-3 मिनिटात. पण नाही त्याने मला धरून ठेवले तर तब्बल दोन आठवडे. एवढे दिवस मी बेशुद्धावस्थेत होतो. अचानक माझ्या पायांमध्ये त्राण आला. अन् मी पायाने जोर देऊन विळखा सोडवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू विळखा सुटू लागला. सूर्याचे किरण माझ्या नजरेस पडू लागले. आत्तापर्यंत मी विळख्यातून पूर्णपणे बाहेर आलो होतो. बाहेर पडताच मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण मला एव्हाना पंख फुटले होते, माझा दुसरा जन्म... फुलपाखरू!
क्षणाचाही विलंब न करता मी माझे पंख फडफडवत उडू लागलो. आणि त्या पिवळ्या फुलांपाशी जाऊन बसलो, त्यांनी माझे स्वागत करून मला मधही प्यायला दिला. नंतर मी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो. ईश्वराने माझी इच्छा पूर्ण केली...!