तशात पाऊस.....
तशात पाऊस.....


"उघडली थोडी खिडकी, इतकी काय गरज होती लगेच भसकन आत येण्याची ?" मी चरफडत पावसाला विचारलं.
खिडकी बंद केली. तिथेच रेलून बसलो. डोळे मिटलेले. अधीर पावसाचा आवाज कानात घुमत होता.
काही माणसं अशी येतात आपल्या आयुष्यात की, ती आपणहून बंध जोडतात, संबध तयार करतात.
एका सुंदर नात्याचं साजरं घर बांधतात. पण त्या घरात आपल्या सोबत रहायला मात्र येत नाहीत! घर बांधून पूर्ण झालं, तरीही 'नक्की राहूया ना इथे ?' हा प्रश्न सतत त्यांना पडत राहतो. आपण मात्र आतमध्ये, ती व्यक्ती आत्ता येईल, मग येईल अशी वाट बघत बसतो. बराच वेळ झाला, म्हणून आपण बाहेर जाऊन बघतो, तर ती व्यक्ती तिथं थांबलेलीच नसते! कुठेतरी लांब निघून गेलेली असते!
नंतर आपल्या लक्षात येतं, की हे नात्याचं घरही तिनं बांधलंच नव्हतं! ते तर आपणच बांधत होतो आतल्या आत. पण आपण तिच्यात इतके मिसळून गेलो होतो, की बाधणारे हात तिचे नसून आपलेच होते हे लक्षातच आलं नाही आपल्या.
म्हणजे तिला नकोच होतं का हे घर? छे.. आपलाच खुळेपणा सगळा.
"वाटला थोडा आपलेपणा. इतकी काय गरज होती लगेच नात्यांत इतकं गुंतायची?" यावेळी पाऊस मला म्हणाला.
या जगात आपलं कोण आणि परकं कोण हेच कळेनासं झालंय. त्यांनी आपल्यासाठी घर बांधलं म्हणून ते 'आपले'; की घर बांधून आपल्याला एकटं सोडून गेले म्हणून ते 'परके'?
अशा 'आपले-परकेपणा'च्या गोंधळात सापडलेला मी.
तशात पाऊस.