Vrushali Thakur

Thriller Others

3  

Vrushali Thakur

Thriller Others

तृष्णा अजूनही अतृप्त (भाग ७)

तृष्णा अजूनही अतृप्त (भाग ७)

7 mins
578


तुपाची एक धार सोडून गुरुजींनी यज्ञकुंड प्रज्वलित केले. बाजूला लावलेल्या उदबत्त्या लावल्या. त्याचा मिश्रित सुगंध पसरला. काहीतरी होत त्या सुगंधात. नुसत्या वासानेच सर्वांना अगदी हलकं वाटू लागलं. मनातील उचंबळणारे विचार आपोआप मनातच विरून गेले. डोळ्यांसमोर फक्त एकच लक्ष्य उभ राहील. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून गुरुजी समाधानाने हसले. गुरुजींनी इशारा करताच चारी बाजूला बसलेल्या सहकाऱ्यांनी उच्च स्वरात मंत्रघोषाला सुरुवात केली. नुसत्या मंत्रांच्या उच्चाराने गुहेतील वातावरण पालटू लागलं. ते चालू असतानाच गुरुजींनी सोबतच्या एका काचेच्या बाटलीतील काही पाणी हातात घेऊन यज्ञाच्या बाजूच्या सारवण केलेल्या जमिनीवर शिंपडले. त्या ओलसर झालेल्या जमिनीवर फिकट पिवळट दिसणाऱ्या पिठाच्या साहाय्याने मोठं वर्तुळ रेखाटलं. वर्तुळाचा बरोबर मध्य पकडुन एक मोठी चांदणी रेखाटली. त्याच्या भोवती काहीसा अंदाज बांधत काही ठिपके काढले. चांदणीचा आतला भाग हळदी कुंकवाने भरला. बाहेरच्या भागात गुलाल आणि अबीर सजवला. वर्तुळाच्या काठाला नाना प्रकारचे अष्टगंधानी सुशोभित केले. त्याच्याभोवती आपल्या झोळीतील मंतरलेल्या भस्माचा सडा घातला. इतक्या सुबक साकारलेल्या रांगोळीवर ठराविक अंतरावर अगदी नीट मोजून काही सुपाऱ्या स्थापन केल्या. त्यांची यथासांग पूजा केली. मधल्या चांदणीच्या पाच कोनांवर पाच स्फटिकाचे खडे ठेवले. ते खडे पाहून ओमच लक्ष सहजच गळ्यातील खड्यावर गेलं. समोरचा खडा अगदी गळ्यातील खड्याइतका टपोरा आणि तेजस्वी वाटत होता. पूजेची मांडणी मनासारखी झाली होती. आता मुख्य कार्याला सुरुवात करायची होती. अगरबत्तीच्या सुवासाने एव्हाना सर्वांच्या मनाची चलबिचलता शोषून घेतली होती. सर्वजण एका वेगळ्याच आत्मविश्वासाने तयार होते एका नव्या लढ्यासाठी. गुरुजींनी पूर्ण ताकदीने त्यांचा शंख फुंकत आपल्या पूजेला आरंभ केला. 

_____________________________________________

अनय मागच्या काही दिवसापासून अतिशय अस्वस्थ होता. मागच्या घटनेपासून सर्व काही माहित असतानाही न थकता गुरुजींच्या शोधात कित्येक गाव पालथी घालून आला होता. आपल्या लाडक्या बायकोची अशी दयनीय अवस्था त्याला पाहवत नव्हती. भलेही तिला प्रेम नको वाटू दे पण त्याच प्रेम तर होत ना. प्रेम ही नेहमीच काही मिळवण्याची गोष्ट नाही. पण जर जोडीदाराच्या चेहऱ्यावरच्या थोड्या आनंदाने जर तुमच्या तुटलेल्या काळजाच्या जखमा भरून निघत असतील तर... तिच्या आनंदापेक्षा दुसरे कोणते औषध नाही... अनयही असाच तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवण्यासाठी झटत होता. तिच्या अवस्थेला स्वतःला जबाबदार समजून आतल्या आत कुढत होता. त्यात तिच्या वडिलांची अवस्था बघून त्याला कीव येई. व आज सकाळी तर त्यांनी काही नवीनच खुलासा केला होता की तिच्या लहानपणी ते तिला घेऊन एका मंदिरात गेले होते. त्यावेळी तिथल्या पुजाऱ्याने तिला पाहून ती भविष्यकाळात एका कठीण प्रसंगात सापडेल व पुढे घडणाऱ्या सर्व घटनांना ती जबाबदार असेल असं भविष्य वर्तवल होत. मात्र ही केवळ अंधश्रद्धा आहे असं समजून तिच्या वडिलांनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. ते पुजारी काहीतरी उपाय सांगत होते की त्यांना अद्वातद्वा बोलून तिचे बाबा काहीही न ऐकता तिथून निघून गेले होते. आधी अंधश्रध्दा समजणारे तिचे बाबा मोठेपणी जस तीच वागणं बदललं तसे आपली चूक समजत गेले. आपल्या हातून घडलेली चूक उमजली मात्र वेळ निघून गेली होती. 

------------------------------------------------------------------------

विचार करून करून त्याच डोकं फुटायची वेळ आली होती. कपाळावरची शिर रागाने ताडताड उडत होती. सगळा संताप आणि हतबलता त्याच्या डोळ्यात उतरली होती. ह्या क्षणी हाताच्या मुठी घट्ट आवळून भिंतीवर प्रहार करण्यापलीकडे त्याला काहीच शक्य नव्हतं. एखादा माणूस असता तर त्याला जिवंत जाळलं असत पण हे जे काही होत ते विचित्र होत. पहिल्यांदा कधीतरीच येणार ' ते ' आता चारी ठाव त्याच्या घरात ठाण मांडून बसल होत. जखमी वाघासारख चवताळून समोर येईल त्याच्यावर झडप घालत होत. प्रचंड संतापाने फुत्कारत मांडलेला पट उधळून लावावा तशी पूर्ण घरात त्याने उलथापालथ माजवली होती. अनयला तर जणू स्वतःच्या घराच्या आसपास भटकण्यास मज्जाव होता. अनय घराच्या उंबरठ्यावर जरी गेला तरी ते गुरकावून उधळत त्याला मारायला त्याच्या अंगावर येई. 

जे केवळ ढगाच्या पांढऱ्या पुंजक्यासारखं दिसत, ज्याला कशाचा आकार नाही, जे अमानवी आहे, ज्याच्या अस्तित्वाबद्दल काही माहित नाही.... त्याला मारायचं तरी कशाने... कितीवेळा अनय हिम्मत करून दार ओलांडून आत गेला मात्र त्याच्यावर चारी बाजूने हल्ला होऊन कस्पटासारखा घराबाहेर फेकला गेला. अनयला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईपर्यंत त्याने अनयवर हल्ला चढविलेला असे. आपल्या बायकोच्या प्रेमाखातर जीवही द्यायला तयार असलेला तो वीर एकाच फटक्यात घायाळ होऊन मागे परते..... तो कसातरी वाचून पळे...पण तीच काय..? ती तर घराच्या आतच होती... तीच काय झालं काय नाही कोणालाच पत्ता नव्हता... समजावं तरी कसं...?

आताही अनय घराबाहेर उभ राहून घराचं निरीक्षण करत होता. बंगल्यावर काळया ढगांनी गर्दी केली होती. त्यांना भेदून सूर्यकिरणेही आत यायची हिम्मत करत नव्हती. बंगल्याभोवतालची झाडं उभ्या उभ्या कोमेजून गेली होती. काही दिवसांपूर्वी हिरवीगार डोलणारी त्याची बाग वणव्यात होरपळून गेल्यासारखी निस्तेज मान टाकून पडली होती. कालपर्यंत त्याच्या बंगल्याची येता जाता तारीफ करणारा प्रत्येकजण आज ढुंकूनही त्या बंगल्याकडे पाहत नव्हता.

" अनय " विचारांत हरवलेल्या अनयच्या कानांवर अपरिचित आवाज पडला. त्याने थोड्या आश्चर्याने वळून पाहील. त्याच्या मागे साधारण सव्वीस - सत्तावीस वर्षाचा एक उंचपुरा तरुण त्याच्याकडे पाहत स्मितहास्य करत होता... अनयला त्याला आधी कधी पाहिल्याच आठवत नव्हतं...नक्की हा आपल्यालाच बोलावत असावा ना... त्याच्या डोळ्यात तसेच अनोळखी भाव तरंगत होते. 

" अनय..." त्या तरुणाने पुन्हा आवाज दिला. ह्यावेळी मात्र अनयची तंद्री भंग पावली. 

" अं... मी..." खात्री करण्यासाठी त्याने विचारलंच.

" हो.. तुम्हीच..." तो तरुण चेहऱ्यावरच हास्य रुंदावत उत्तरला.

" आपण...." अनयला अजूनही तो कोण आहे ह्याच कोडंच होत. 

" ओह सॉरी.... ओळख राहिली.." अनयच्या प्रश्नार्थक नजरेेच रहस्य त्या तरुणाला उलगडल. " मी ओम.." गालात हसत त्याने अभिवादनासाठी उजवा हात पुढे केला. 

अनय अजूनही संभ्रमात होता. त्याच अभिवादन स्विकारण्याच भानही त्याला नव्हतं. आयुष्यात असे काही होत होत की आजूबाजूलाही जग आहे हे त्याच्या ध्यानात नव्हतं.

" अनय..." ओमने त्याला जाग करायला पुन्हा त्याला हाक मारली. 

" अं.... " अनयला काय होतंय तेच समजत नव्हतं. तिच्या काळजीने तो इतका हवालदिल झाला होता की त्याचं कोणाकडे लक्षच नव्हतं. 

" मी तुझ्याशी बोलतोय अनय..." ओम जरा मोठ्यानेच बोलला. त्यालाही अनयची परिस्थिती समजत होती. परंतु त्याने असे हात पाय गाळले तर संकटाला सामना कोण करणार...

" सॉरी.. ते.." अनय उगाच सारवा सारव करायचा प्रयत्न करू लागला.

" मला माहितेय तू कशाच्या विचारात आहेस... त्यासाठीच आलोय मी..." गुरुजींच्या आज्ञेवरून तिचा शोध घेत ओम पुन्हा शहरात आला होता.

नुसत्या ओमच्या आश्वासक स्पर्शाने अनयला धीर वाटला. आपल्या मनातील तळमळ आपण कोणालातरी बोलून दाखवू शकतो ह्या नुसत्या विचाराने त्याला बर वाटलं. काळजीने निस्तेज झालेल्या त्याच्या डोळ्यात थोडी का होईना आशेची चमक आली. 

" ओम हे सगळं..." अनयला स्वतःलाच नक्की काय ते माहित नव्हतं पण त्याला सगळ काही ओमला सांगायचं होत. 

" सगळ सांगतो मी तुला...पण इथे नको.." ओम त्याच बोलणं तोडत उत्तरला. " इथे नाही.." अनयच्या हाताला पकडुन खेचतच ओम त्या परिसरातून पळत निघाला. अनयच्या मनात बरेच प्रश्न होते आणि ओमजवळ त्या सर्वांची उत्तर. मात्र हे सगळं त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ठिकाणी ते बोलू शकत नव्हते. ओमसाठी अनयची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची होती. म्हणूनच तो नेहमीपेक्षा जास्तच वेगाने चालत होता. कदाचित त्याला माहित नव्हतं पण त्या आतल्या शक्तीला ओमच्या मनसुब्यांची भणक लागली होती. जर त्यांनी मागे वळून पाहिलं असतं तर घरातून निघणाऱ्या धुरांचे लोळ बघून त्यांना समजलं असतं की त्या शक्तीने घरात काय थैमान घातले होते.

---------------------------------------------------------------------

आपल्या मॉडर्न ड्रेसिंग टेबलवर स्वतःला न्याहाळत ती विचारांत गुंगून गेली होती. मागचे काही दिवस त्याच वागणं बदलल्यासारखं वाटत होत. आधी तिच्याभोवती भिरभिरत असणारा तो तिच्यापासून दूर गेल्यासारखं वाटत होता. तिच्यासोबत प्रणयाच्या रंगात तासनतास रंगून जाणारा तो आता कुठे गायब होऊन जाऊ लागला. आताही जसा आला तसाच निघून गेला.. जणू कुठल्या रागात असावा...मी समोर असताना राग तरी कसा आठवतो त्याला... आणि आता शोधणार तरी कुठे त्याला... तिने आरशात स्वतःला पुन्हा पाहिलं. तिचे तांबूस सोनेरी केस विस्कटून कपाळभर पसरले होते. तिच्या मादक डोळ्यात त्याच्या विरहाची कळ ठसठसून दिसत होती. तिचे आरक्त गुलाबी गाल संतापाने अजुनच फुगले होते. तीच धारदार नाक किंचित थरथरत होत. त्याच्या स्पर्शाला आसुसलेल तीच अंगप्रत्यंग उभारून त्याला साद घालत होत. 

तिने डाव्या हाताने आपले विस्कटलेले केस एका बाजूला घेतले. मानेवर उजव्या बाजूला कालच्या प्रेमलीलेची उमटलेली नाजूक खूण तशीच होती. तिला आवडायच्या त्याच्या शरीरभर पसरलेल्या खुणा. तो नसताना त्या खुणा त्याची आठवण करून देत. आणि मग अंगभर पसरलेला त्याच्या स्पर्श झंकारू लागे. 

ती दिवसेंदिवस त्याच्या प्रेमात साखरेसारखी विरघळत होती. आणि तो मात्र तिच्यापासून दूर जात होता. जणू काही त्याचा इथला मुक्काम संपला असावा... का अस वागतोय तो.. माहितेय त्याला.. मी प्रेमात आहे त्याच्या... त्याच्यासाठी मी सर्वांशी लढेन... तो.. तो.. अनय नकोय मला... मला फक्त तोच हवाय... कायमसाठी... भलेही जग रहाटीच्या विरुद्ध असेल... तर असुदे... प्रेमाची ताकद काय असते ते दाखवून देईन मी सगळ्यांना... आरशात पाहून ती स्वतःशीच घोकत होती. रडून पुन्हा पुन्हा तीच वाक्य वेड्यासारखी बडबडत होती. चिडून तिने ड्रेसिंग टेबलवरच सगळ सामान उधळून लावल. संतापाने ती इतकी थरथरत होती की तोल जाऊन धाडदिशी जमिनीवर कोसळली. जोराने कपाळावर आपटल्याने काही क्षणात तिची शुद्ध हरपली. तिने केलेल्या त्राग्याने तो मात्र हसत होता. त्याला जे पाहिजे ते गवसल होत. त्याच गडगडाटी आवाजातील भयंकर हास्य ऐकायला ती शुद्धीत नव्हती. त्याच्या प्रेमाचे पाश तिच्या भोवती असे काही आवळले गेले होते की आता तिची सुटका अजुनच मुश्किल झाली होती.

-----------------------------------------------------------------------


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller